Get it on Google Play
Download on the App Store

वलय - प्रकरण २४

राजेश सोबतच्या दु:खद ब्रेकपनंतर जीवनाला अचानक मिळालेली सुखद कलाटणी तिला आठवली. तिने मुद्दाम राजेशला असे सांगितले होते की ती यापुढे प्रोफेशनल रिलेशन कायम ठेवेल म्हणजे राजेश बेसावध राहील आणि तिच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करणार नाही.

राजेशकडून नकार आला तर असे सांगायचे हे तिने आधीच ठरवले होते. नंतर सोनी बनकरला राजेशसोबत झालेल्या ब्रेकपची कल्पना दिल्यानंतर ती काही दिवसांनी हॉस्टेल सोडून गेली होती. तिने मॅडम अकॅडमीच्या फायनल इयरच्या असाईनमेन्ट बऱ्याच आधी संपवल्या होत्या आणि रीतसर "मॅडम" चे प्रोव्हीजनल सर्टिफिकेट मिळवले.

मग तिने कायमचे पुण्याला घरी परत जाऊन आईला ब्रेकपबद्दल सांगितले. सुरुवातीला ती थोडी डिप्रेस झाली होती पण लवकर सावरली. तिने प्रॅक्टिकली विचार केला आणि सर्वप्रथम "चार थापडा सासूच्या" ही निरर्थक सिरीयल सोडायचे ठरवले. कॉन्ट्रॅक्ट ब्रीच केल्याचे पैसेही तिने प्रोड्युसरला ऑनलाईन देऊन टाकले. तसेच स्वतःच्या लग्नासाठी तिने आईवडीलांकडे तयारी दर्शवली. आईवडील तिच्याकरता सुयोग्य वर शोधण्यात मग्न झाले.

सिरीयल्समध्ये येण्याआधी तिने नाटकात काम केले होतेच. म्हणून थोड्या प्रयत्नांनंतर काही दिवसांनी तिला एका नाटकात काम मिळाले.

"कुमारगंधर्व" मध्ये त्याचे 10 यशस्वी आणि 7 हाऊसफुल प्रयोग झाले. त्या नाटकाचे नांव- "चाफेकळी खुलली". दरम्यान कलेची आवड जपणारा आणि अत्यंत रसिक असलेला सुबोध केतगांवकर इटलीहून सुट्टी घेऊन भारतात आलेला होता. त्या नाटकाच्या 20 व्या प्रयोगाला तो आणि त्याची आई आले होते. तो तिचे काम बघून प्रभावित झाला. नाटक चालू असतांना सुबोध आणि त्याची आई पहिल्या रांगेत बसले होते. लव्ह ऍट फर्स्ट साईट जे काय म्हणतात ते त्या दोघांत नाटक चालू असतांनाच घडले. नाटकातील तिच्या प्रत्येक संवादाला आणि लाजवाब अभिनयाला सुबोधची मिळणारी दाद तिला आवडली. लवकरच त्याने तिचा पत्ता शोधून घरी येऊन तिला प्रपोज केले. तिलाही तो आवडला कारण तिच्या मनातही तो होताच. मग सोबत फिरणे झाले. दोघांच्या घरच्यांना ते मान्य झाले. मग राजेशला ती हळूहळू विसरली.

फ्रेंडबुकवर राजेश तिच्या फ्रेंड्स लिस्ट मध्ये होताच पण तिने सिरीयल सोडल्यानंतर कटाक्षाने कोणतेच स्टेट्स अपडेट टाकले नव्हते. इतकेच नाही तर सुबोधने सुद्धा त्याचे स्टेट्स अपडेट केले नव्हते. लग्नानंतर इटलीला पोहोचल्यानंतरच सिंगल स्टेटस बदलून मॅरिड करायचे असे त्यांनी ठरवले होते. तिने सुबोधला राजेशबद्दल कोणताही आडपडदा न ठेवता सगळे सांगितले होते. त्यांचे लग्न पुण्यातच झाले पण तिने अभिनय क्षेत्रातील काही मोजके सहकारी आणि मोजके मित्र आणि नातेवाईक यांनाच बोलावले होते. सुबोधने तिला ऍक्टिंगचे करियर करायला मोकळीक दिली होती. त्यासाठी ती अधूनमधून भारतात येऊ शकणार होती. वडील आणि नवरा दोघेही तिला करियरसाठी मोकळीक देणारे मिळाले याहून आणखी भाग्याची गोष्ट दुसरी कोणती असू शकते? यावर आणखी चांगली गोष्ट म्हणजे इटली मधल्या काही टीव्ही स्टार्सशी सुबोधची त्याच्या ऑफिसमधील सहकाऱ्याद्वारे ओळख झाली होती आणि त्याने सुप्रियला त्यांचेशी ओळख करून घ्यायचे कबुलही केले होते. त्या ऍक्टर 'फ्रांको बोनुकी' ला प्रत्यक्षात भेटण्याची उत्सुकताही तिला होती. मुंबईत असतांना ती 'केपीएक्स' चॅनेल वरची 'प्राईम प्रॉस्पेक्ट' ही इंग्रजी सिरीयल नेहेमी बघायची.

नंतर तिचा व्हिसा आणि इतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झाली. दरम्यान ती हळूहळू इटालियन भाषा शिकली. त्यासाठी तिने पुण्यात "जोशींकडे झटपट परदेशी भाषा शिका!" अशी जाहिरात असलेला इटालियन भाषेचा कोर्स केला तसेच ऑनलाइन वेबसाईट्सची आणि विविध मोबाईल अप्लिकेशनची मदत घेतली. राजेश सोबत ब्रेकप झाला हे एका अर्थाने बरे झाले असे तिला वाटले.

कदाचित जे राजेश म्हणाला होता तेच बरोबर होते की: "हे बघ! प्रॅक्टिकली विचार कर सुप्रिया. तू आणि मी दोघेही या बेभरवशाच्या क्षेत्रात एकत्र येऊन भरवशाचा संसार नाही करू शकत."

सुप्रिया फक्तच करियरिस्ट नव्हती तर तिला वर्क लाईफ बॅलन्स हवा होता. एका गोष्टीसाठी दुसऱ्या गोष्टीचा बळी द्यायची तिची इच्छा नव्हती. म्हणून लग्न वगैरे सारख्या जीवनातल्या महत्वाच्या गोष्टी वेळेवरच व्हायला हव्या असे तिला वाटे.

बेडवर विचारांत असतांनाच तिला अचानक आठवले:

फ्रेंडबुक? येस! आज फ्रेंडबुकचा फडशाच पडते मी!

असा विचार करून ती बेडवरून उठली आणि मोबाईल जवळ घेऊन बेडवर मोठ्या मऊ उशीला टेकून बसली. बघूया काय काय अपडेट्स आलेत? 1250 नवीन नोटिफिकेशन्स आलेले होते! ओह गॉड! किती दिवस झाले चेक केले नाही!

तिचे आणखी एक फेसबुक पेज सुद्धा होते तेही ती स्वतः मॅनेज करत असे आणि एक होते स्वतःचे फ्रेंडबुक अकाउंट! फ्रेंडबुकवर कुठेच तिने स्वतःचा मोबाईल नंबर कधीच दिला नव्हता. भारत सोडतांना तिने जुना नंबर कायमचा बंद केला आणि भारतात एक नवीन पोस्टपेड नंबर घेतला होता. तो आणि इटलीत आणखी एक नंबर ती घेणार होती. तिने तिचे स्टेटस अपडेट केले- "मॅरीड टू सुबोध केतगांवकर!"

त्याबरोबरच तिने फेसबुक वरचे आपले नांव बदलले- प्रिया केतगांवकर. सुबोधनेही नुकताच ऑफिसमधून त्याचे स्टेट्स बदलले. तेव्हा मेसेंजरवर राजेशसुद्धा तिला ऑनलाइन दिसला. त्याचे प्रोफाइल तीने चेक केले तेव्हा तिला दिसले की त्याने सुद्धा एका तासांपूर्वीच त्याचे स्टेटस "मॅरीड टू सुनंदा!" असे केले होते. काय योगायोग असतो एकेक! तिला आश्चर्य वाटले. आणि ही जी कोण सुनंदा आहे ती मात्र फ्रेंडबुकवर नव्हती.

तिचे स्वतःचे नवे स्टेटस बघून राजेशला काय वाटेल असा विचार तिच्या मनाला शिवून गेला आणि राजेशकडून कधी सुनंदाबद्दल काहीच ऐकले नव्हते. आणि मुळात माझ्यासोबतच काय पण राजेश लग्नालाच तयार नव्हता मग त्याने अचानक घाईत लग्न का केले असावे? असे विचार तिच्या मनात येऊ लागले. एनिवे तुला काय करायचे ते जाणून घेऊन, सुप्रिया! ऑनलाइन असल्याने कदाचित राजेश तिच्याशी चॅट सुरु करू शकतो असे वाटून ते टाळण्यासाठी तिने इंटरनेट बंद केले आणि बेडवर आडवी झाली. राजेश सोबतचे अनेक प्रसंग तिला आठवायला लागले पण तिने ते विचार झटकन बाजूला सारले.

सुप्रियाचा इटली देशातला पहिला आठवडा नव्या शहराची ओळख करून घेण्यात गेला. सुबोधने घरातल्या टीव्हीवर लोकल इटालियन चॅनेल्स सोबतच इंडियन आणि इंटरनॅशनल चॅनेल्सचे पॅक (कार्ड) सुद्धा घेतले होते. ते महाग होते पण त्याच्या रसिक वृत्ती साठी आणि सुप्रियाच्या एकूणच पुढच्या संभाव्य करियरसाठी ते आवश्यक होते. त्यायले भारतीय कार्यक्रम सिलेक्टेड होते आणि त्याच्या वेळा या भारतात ते कार्यक्रम टेलिकास्ट होण्याच्या वेळांपेक्षा वेगळ्या होत्या. सुबोधकडे घरी ब्रॉडबँड वायफाय आणि एक लॅपटॉप होता, लँडलाईन फोन होता. सुप्रियाचा स्वतःचाही लॅपटॉप तिने सोबत आणलेला होता आणि सुबोधचा ऑफिसचा लॅपटॉप वेगळा होता.

एके दिवशी सुप्रियाने चॅनेल बदलता बदलता "चार थापडा सासूच्या" सिरीयल मधली बदललेली सून पाहिली. वैशाली विचारे. तिने सुप्रिया करत असलेला रोल चांगलाच निभाऊन नेला होता. एकूण काय, तर सुप्रिया गेल्याने सिरीयल थाबली नव्हती किंवा सिरीयलचे नुकसान झाले नव्हते हे महत्वाचे!

वलय (कादंबरी)

Nimish Navneet Sonar
Chapters
लेखकाचे मनोगत सिद्धेश प्रभूगांवकर यांची प्रस्तावना वलय - प्रकरण १ वलय - प्रकरण २ वलय - प्रकरण ३ वलय - प्रकरण ४ वलय - प्रकरण ५ वलय - प्रकरण ६ वलय - प्रकरण ७ वलय - प्रकरण ८ वलय - प्रकरण ९ वलय - प्रकरण १० वलय - प्रकरण ११ वलय - प्रकरण १२ वलय - प्रकरण १३ वलय - प्रकरण १४ वलय - प्रकरण १५ वलय - प्रकरण १६ वलय - प्रकरण १७ वलय - प्रकरण १८ वलय - प्रकरण १९ वलय - प्रकरण २० वलय - प्रकरण २१ वलय - प्रकरण २२/२३ वलय - प्रकरण २४ वलय - प्रकरण २५ वलय - प्रकरण २६ वलय - प्रकरण २७ वलय - प्रकरण २८ वलय - प्रकरण २९ वलय - प्रकरण ३० वलय - प्रकरण ३१ वलय - प्रकरण ३२ वलय - प्रकरण ३३ वलय - प्रकरण ३४ वलय - प्रकरण ३५ वलय - प्रकरण ३६ वलय - प्रकरण ३७ वलय - प्रकरण ३८ वलय - प्रकरण ३९ वलय - प्रकरण ४० वलय - प्रकरण ४१ वलय - प्रकरण ४२ वलय - प्रकरण ४३ वलय - प्रकरण ४४ वलय - प्रकरण ४५ वलय - प्रकरण ४६ वलय - प्रकरण ४७ वलय - प्रकरण ४८ वलय - प्रकरण ४९ वलय - प्रकरण ५० वलय - प्रकरण ५१ वलय - प्रकरण शेवटचे (५२) लेखकाची साहित्यिक ओळख