वलय - प्रकरण ३४
शेवटी राजेश मोहिनीला सोबत स्वतःच्या गाडीत घेऊन निघाला. ती अर्धवट धुंदीत राजेशच्या बाजूला बसली होती. मोहिनीने "यंग गर्ल" हा परफ्यूम लावला होता. त्याचा सुवास अगदी छान, मस्त आणि मादक होता. अगदी फक्त लेडीजला शोभेल असा!
थोडी कमी शुद्धीत असल्याने ती त्याला जास्त चिकटून बसली होती आणि त्यामुळे तिच्या शरीराचा गंध राजेशच्या शरिराला हळूहळू लागत होता. घरी जायला आधीच उशीर झाला होता त्यात अजून आता मोहिनीला सोडून आल्यानंतर आणखी वेळ होणार होता.
त्याने आतापर्यंत अनेक कथांमधून असे प्रसंग चितारले होते की रात्री कारमध्ये एक सुंदर तरुणी असतांना कार खराब होते, मग ते दोघेजण रात्र एका अज्ञात बंगल्यात घालवतात, मग पाऊस येतो, विजांचा कडकडाट होतो, मग ती तरुणी तरुणाला बिलगते आणि मग "ते" घडते किंवा मग रात्री तरुणी तरुणाच्या फ्लॅट वर थांबते आणि मग "ते" घडते अशा प्रकारचे अनेक प्रसंग लिहिले होते. मनातल्या मनात तो ते प्रसंग आठवून हसत होता. खऱ्या जीवनात असे घडत नाही! विशेषत: एक चांगली मैत्रीण सोबत असतांना??
मग एका लेखकाच्या दृष्टीकोनातून तो विचार करू लागला: तरुण तरुणी योगायोगाने कारमध्ये एकत्र आल्यावर खऱ्या जीवनात नेमके काय घडते किंवा घडू शकते? असा विचार करत असतांनाच त्याने एका शॉर्टकट मार्गाने गाडी वळवली कारण शॉर्टकट मारूनसुद्धा अजून अर्धा तास मोहिनीच्या फ्लॅटवर जायला लागणार होता आणि मग तेथून निघून अंदाजे रात्री अडीच वाजेपर्यंत तो घरी पोहोचणार होता...
बराच वेळ गाडी चालवत चालवत आता एक निर्जन रस्ता लागला होता. उद्या रत्नाकरचा माग काढायचा आणि काय काय करायचे याचा तो गाडी चालवतांना विचार करत होता.
रत्नाकारला त्याने जाब विचारायचे ठरवले की "मित्रा माझी कथा का चोरलीस? चोरलीस ते एका दृष्टीने चांगले केले की मला माझ्या लेखनाची पत कळली की माझ्या लेखनावर चित्रपट सुद्धा बनू शकतो! पण मित्रा, चोरी ती शेवटी चोरीच! अशा अनेक लेखकांच्या कथांची चोरी तू केली असशील! माझ्या प्रयत्नांनी मी येथपर्यंत पोहोचलो पण ते सगळे लेखक ज्यांच्या कथा तू चोरल्या असशील त्यांनी काय केले असेल? त्यांचे किती नुकसान झाले असेल?"
स्ट्रीट लाईटच्या प्रकाशात समोरच्या काचेतून चार माणसं काठ्या घेऊन अगदी रस्त्याच्या मधोमध उभी असलेली त्याला दिसली. त्याने गाडीचा वेग कमी केला पण तरीही ती माणसे रस्त्यातून बाजूला होईनात. ती सगळी माणसं दारू पिलेली दिसत होती असे एकंदरीत त्यांच्या अडखळत चालण्यावरून दिसत होते. राजेशने हॉर्न वाजवला पण ते रस्त्याच्या मधून तसूभरही बाजूला झाले नाहीत. शेवटी राजेशला गाडी थांबवावीच लागली कारण उलट्या बाजूने पटकन वळून परत जाण्याऐवढा रस्ता काही रुंद नव्हता.
आता काय करायचे या विचारात असतांनाच त्यातला एक माणूस मोहिनीच्या बाजूच्या खिडकीजवळ येऊन म्हणाला, "खोलो दरवाजा. इस लडकी को बाहर निकालो, बाहेर काढ तिला साल्या! पळवून नेतोस काय मुलींना रात्री? आमच्या हवाली कर तिला! अशा सेक्सी मुलींवर आमचा हक्क आहे!"
ते लोकल गुंड आहेत हे ओळखून राजेश गाडीचे काच खाली सरकवून आवाजात उसने अवसान आणि हिम्मत आणून खोटे खोटे म्हणाला, "माझ्याकडे बंदूक आहे, चुपचाप बाजूला हो आणि जाऊदे आम्हाला! नाहीतर मी गोळी घालेन एकेकाला! मी घाबरत नाही कुणाला! खून करून टाकीन मी तुमचा!"
तो आणि इतर गुंड हसायला लागले.
राजेशला न जुमानता त्या गुंडाने मध्ये हात घालून दरवाजा उघडला आणि मोहिनीला गाडीबाहेर खेचले. गुंडांजवळ काठ्या आणि चाकू होते. हे अगदीच अनपेक्षित आणि अचानक झाल्यामुळे राजेशपण पटकन दरवाजा ढकलून गाडीबाहेर आला. इतर तिघांनी मिळून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला पण तो चपळाईने गाडीच्या मागच्या बाजूला गेला आणि डिक्की उघडून त्यातील कॅमेराच्या स्टिक बाहेर काढून तो त्या चौघांकडे पळाला.
मोहिनी अर्धवट शुद्धीत असल्याने तिचा प्रतिकार कमी पडत होता. गुंडांपैकी दोघांनी तिला पकडून ठेवले आणि एका गुंडाने डोक्यातून आपण बनियन काढून टाकतो तसा तिचा टिशर्ट ओढून काढला. ओढतांना तिने विरोध केल्याने तो फाटला. आता फक्त मोहिनीच्या छातीवर एक छोटीशी ब्रा होती. ते तिच्याशी लगट करायला लागणार तोपर्यंत राजेश स्टिक घेऊन तिथे वेगाने आला आणि त्याने गुंडांना आव्हान दिले.
राजेश - "सोड तिला!"
गुंड1- "तूच सोडून दे तिला आमच्याकडे आणि चुपचाप गाडीत बसून घरी जा. नाहीतर तुझा मुडदा घरी जाईल!"
गुंड2- "अशे मस्त मस्त मस्त कपडे घालून ही गाडीतून रात्री बेरात्री तुझ्याबरोबर फिरते आहे आणि तू रे? मूर्खां! जंटलमन सारखा तिच्या शेजारी नुसता बसून राहिलास आणि निमूटपणे गाडी चालवत होतास?"
गुंड3- "तुझ्या जागी आम्ही असतो तर तिला केव्हाचा...जाऊ दे! तुझ्यासारख्याला सांगून काय उपयोग रे नामर्द माणसा! आता तिला आता आम्हीच सगळे मर्द गडी मिळून...!!!"
गुंड2- "या रस्त्याने जी पण मुलगी रात्री जाते ना ती आमच्या तडाख्यातून सुटत नाही! एकटी असो की दुकटी!"
राजेश स्टिकने प्रहार करायची योग्य संधी शोधत होता.
तो मिस्कीलपणे म्हणाला, "तिची हरकत नसेल तर ती येईल तुमच्याबरोबर! काय गं मोहिनी जायचं आहे का तुला त्यांचेबरोबर? ते म्हणतात की ते खूप तगडे मर्द गडी आहेत! तुझी हरकत नसेल तर जा तू त्यांचे सोबत! मला काहीच प्रॉब्लेम नाही"
त्यांना अनपेक्षित बोलण्यात अडकवून तो काठीचा झटका त्यांना मारण्याची संधी शोधत होता. हे मोहिनीलाही कळत होते. पण ती अर्धवट शुद्धीत होती.
मोहिनी नशेत हेलकावे खात म्हणाली, "नाही राजेश! मला या चार नामर्दांबरोबर कुठेच जायचे नाही आहे! पण मला यांना सगळ्यांना कुठेतरी पाठवायचे नक्की आहे! काय रे नामर्दांनो? जाणार का? "
राजेश, "कुठं गं? कुठं पाठवायचं म्हणतेस यांना?"
"यमाच्या रेड्यावर बसवून नरकात पाठवायचं आहे यांना! तिथे उकळत्या तेलाच्या कढईत चौघांना नंगे करून तळतील!" असे म्हणून तिने लहान मुली सारख्या टाळ्या वाजवल्या.
गुंड त्यामुळे भयंकर चिडले.
राजेश, "ठिक आहे! तू कशाला घेऊन जातेस? मीच पाठवतो त्यांना तेथे! साधारण अर्धा तास बेदम मारले की हे नक्की मरून जातील! मग डायरेक्ट नरकात!"
असे म्हणून त्याने संधी साधून चपळाईने अचानक हमला करून त्याच्या हातातली स्टिक जोरारोराने फिरवली आणि गुंडांच्या हातातील चाकू आणि काठ्या खाली पाडल्या.
ते चारही जण चवताळले. एकाने मोहिनीला घट्ट धरून ठेवले आणि इतर तिघांनी राजेशवर लाथा बुक्क्यांचा प्रहार करायला सुरुवात केली. राजेशनेपण प्रत्येकावर प्रत्युत्तर म्हणून लाथा बुक्क्यांनी जोरजोरात प्रहार करून त्यांना खाली पाडले. एकेक जण पुन्हा पुन्हा आला पण राजेशने चपळाईने त्यांना बेदम मारले.
असे म्हणतात की अशा अटीतटीच्या प्रसंगी सामान्य माणसात सुद्धा असामान्य ताकद येते! तशीच काहीशी ताकद राजेशच्या अंगात संचारली होती. चार गुंडांपैकी एकाच्या जबड्यावर राजेशची लाथ बसली आणि तो ओरडत खाली पडला. तोपर्यंत चौथ्याने मोहिनीला सोडले आणि इतर तिघांच्या मदतीला धावला. राजेश तिघांवर सतत प्रहार करत होता.
इतर तिघे सावरत असतानाच त्या चौथ्याने एक काठी उचलली आणि राजेशकडे जोरात भिरकावली. राजेशने उडी मारून काठी पकडली आणि चपळाईने कारच्या छतावर चढला आणि काठीसहित त्याने त्या चौथ्या गुंडावर उडी मारली आणि त्या चौथ्या गुंडासहित राजेश इतर तिघांच्या अंगावर पडला. मग चपळाईने उठून राजेशने आजूबाजूला जेही सापडेल जसे की दगड, धोंडे, काच त्या सगळ्यांचा उपयोग केला आणि एकेकावर हल्ला केला.
राजेशला या सगळ्या प्रकरणात बरेच खरचटले.
गुंड मार खाऊन कण्हत पडले असतांना राजेश म्हणाला, "हे तर फार लेचेपेचे गरीब गुंड निघाले मोहिनी! गुंडानो, तुम्हीही काय याद राखाल की एका लेखकाच्या हातून मार खाल्ला! पेन ने लिहून लिहून, कॉम्प्युटरवर टाईप करून करून आम्हा लेखकांचा जरा हातांचा व्यायाम जास्तच होतो मग हात अशे स्ट्रॉंग बनतात! तुम्हाला आता सोडून देतो! तुमच्या नरकात जायची वेळ आता अजून आलेली नाही! पण लवकरच येईल!"
ते गुंड पुन्हा सावरेपर्यंत तेथून निघणे सोयीस्कर होते कारण जास्त प्रकरण वाढवले तर सहाही जणांपैकी कुणाच्याही जीवावर बेतू शकले असते म्हणून राजेश आणि मोहिनी पटकन गाडीत जाऊन बसले. राजेशने जवळपास मोहिनीला खेचूनच पटकन गाडीत बसवले आणि त्याने गाडी जवळच्या एका मोकळ्या मैदानातून विरुद्ध दिशेने वळवली आणि मार्ग बदलला.
ते गुंड पुन्हा उठून उभे राहिले आणि कारवर दगडफेक करू लागले पण तोपर्यंत कार बरीच पुढे निघून गेली होती.
मोहिनीने राजेशनचे मनापासून आभार मानले आणि नंतर कारमध्ये या प्रसंगाबद्दल दोघेही एकमेकांशी फारसे बोलले नाहीत. गाडी चालवत असतांना मोहिनीच्या सौंदर्याकडे त्याचे अचानक लक्ष गेले. एवढ्या जवळून त्या सौंदर्याकडे बघतांना क्षणभरासाठी राजेशचे भान हरपले कारण सुनंदाव्यतिरिक्त त्याने इतर दुसऱ्या कुणा स्त्रीचे असे अर्ध-अनावृत्त आणि इतके रेखीव सौदर्य आणि तेही इतक्या जवळून बघितले नव्हते - अगदी सुप्रियाचे सुद्धा!
दुसऱ्या क्षणीच त्याने स्वत:ला सावरले आणि आपली नजर मोहिनीच्या छातीवरून बाजूला केली.
या सगळ्या गडबडीत तिचा फाटलेला टीशर्ट त्या ठिकाणी जमिनीवरच राहिला होता, हे तिच्या लक्षात आले. राजेशची नजर लक्षात आल्यानंतर मोहिनीने दोन्ही हातांनी आपली छाती झाकली. मग राजेशने गाडी थांबवून तिला अंग झाकायला मागच्या सीटवर ठेवलेला त्याचा ग्रीन ब्लेझर दिला आणि तो तिच्याकडेच राहू द्यायला सांगितला कारण तिच्या सोसायटीत सीसीटीव्ही कॅमेरे होते. ती तशा अवस्थेत फ्लॅटवर परत जाऊ शकली नसती. तीला तिच्या फ्लॅटवर दोन वाजता सोडल्यानंतर राजेश घरी तीन वाजता पोहोचला.
सुनंदा जागीच होती. तिने दार उघडले. हॉल मध्ये काकू झोपलेल्या होत्या. खरचटलेले त्याने अँटिसेप्टिकने धुतले, तोंडावर पाणी मारले. मग तो बेडरूम मध्ये गेला. नाईट लॅम्प चालू होता. पटकन नाईट पॅन्ट घालून तो हळूच झोपायला सुनंदाजळ सरकला. पांघरूण घेतले. झालेला प्रसंग त्याला आठवला.
"जास्त पिलेल्या मोहिनीला एवढ्या रात्री तिच्या घरी सोडण्याची जबाबदारी मी उचलली खरी पण नसत्या प्रसंगातून निभावलो हे बरे झाले!" असा विचार तो करत होता आणि त्याने सुटकेचा निश्वास टाकला.
रागिणीच्या जीवनात जे चाललं होतं ते ऐकून त्याला आश्चर्य वाटत होते आणि आपण काल रागिणी आणि मोहिनी दोघांना अनपेक्षितरीत्या मदत करण्यास कारणीभूत झालो याबद्दल त्याला एक चांगली फिलिंग आली आणि रत्नाकरचा शोध तर अचानक लागला पण या गडबडीत तो आपल्या हातातून मात्र निसटला याचे त्याला वाईट वाटत होते.
त्याला आता झोप लागणे अशक्य होते. सारंग सोमैयाला बोलावून त्याच्या मदतीने रत्नाकरला पकडून त्यांचेकडून छडा लावलाच पाहिजे असे त्याने ठरवले आणि ते काम उद्याच सुरु करायला हवे असे त्याने मनोमन ठरवले. सकाळ कधी होते याची तो वाट पाहू लागला.
सुनंदा जागीच होती, ती हालचाल करू लागली आणि तिच्या एकंदर हालचाली आणि हावभावांवरून वाटत होते की तिला आता लगेच राजेशसोबत सेक्स हवा होता पण राजेशच्या मनात एकूणच घडलेल्या प्रसंगांबद्दल आणि रत्नाकरचे निसटणे याबद्दल जे काही चाललं होतं त्यामुळे त्याला आता सेक्सची मुळीच इच्छा नव्हती. तिने दहा मिनिटे त्याच्या अंगावर सगळीकडे तिचा हात फिरवून पाहिला, तिच्या अर्धनग्न शरीराचा त्याला ती स्पर्श करू लागली. पण त्याच्या तुटक आणि अलिप्त हालचालीवरून तिला त्याची अनिच्छा कळली. मग तिने प्रयत्न सोडले आणि थोडे दूर सरकून झोपली.
राजेशला आठवत होते की सुनंदासोबत रात्रीचे सुखाचे क्षण फार कमी वाट्याला आले होते. सुरुवातीलाच तिचे वडील वारल्यानंतर काही दिवस असेच गेले, मग त्यानंतर रूम शोधल्यानंतर तिला मुंबईत आणले आणि दोघांचे सूर जुळणार तेव्हढ्यात ही काकू अचानक येऊन धडकली. मग त्यांच्यातले ते सुखाचे क्षण फारसे वाट्याला आले नाहीत. फक्त काही दिवसांपूर्वी एकदा काकूला मुंबईमधल्याच एका दूरच्या नातेवाईकाकडे मुक्कामी पाठवले ते दोनचार दिवस आणि रात्र त्यांचा सेक्स कधी नव्हे तेवढा उत्कट झाला होता ज्याद्वारे ते दोघेजण प्रथमच समाधानी झाले होते... आणि त्यानंतर आता??
ही आजची रात्र!!
पाच मिनिटांनी काहीतरी संशय येऊन सुनंदाने अचानक तोफेसारखा त्याच्यावर शाब्दिक हल्ला चढवला,
"तुम्ही आलात ते मी बेडरूम मधून पहिले. तुमच्या अंगावर ब्लेझर नव्हते. ब्लेझर कुठे गेले? आणि तुमच्या सेंटचा वास वेगळाच येतोय. जातांना असा वास नव्हता काही! कुठे गेला होतात का पार्टीनंतर?"
राजेश अतिशय सौम्यपणाचा आव आणून म्हणाला, "ओह नो! अगं ब्लेझर विसरलोच वाटतं पार्टीत! ठीक आहे! मी कुणाकडून तरी मागवून घेईन ते उद्या परवा. अगं आणि वास तोच तर आहे, कुठे बदललाय! तुझं आपलं काहीतरीच! सारखा संशय घेतेस!"
मोहिनीला रात्री तिच्या घरी सोडायला गेलो होतो हे चुकूनही तिला समजता कामा नये नाहीतर तोफेऐवजी हायड्रोजन बॉम्बचा सामना करावा लागेल याची त्याला जाणीव होती.
त्याचे स्पष्टीकरण न पटल्यासारखे तोंड करून म्हणाली, "आता झोपा! उद्या बोलू! खरं खोटं काय ते उद्या पाहू! काकूंसमोरच तुमची खबर घेते मी उद्या!"
हे ब्लेझर प्रकरण आपल्याला भोवणार असे वाटत असतांनाच सुनंदाचे शाब्दिक वादळ अनपेक्षितपणे अचानक शांत झालं पण ते दुप्पट वेगाने केव्हातरी येणारच होते हे राजेशला माहिती होते पण, "आजच्यापुरते वाचलो म्हणजे किमान मला आता उद्याचा रत्नाकर रोमदादडेचा प्लॅन आखता आखता विचार करत करत झोपेचे सोंग घेता येईल!" असे म्हणून राजेशने तोंडावर पांघरून घेतले आणि रत्नाकर रोमदाडे आणि के के सुमनला नामोहरम करण्यासाठी प्लॅन आखू लागला.
सुनंदा झोपून गेली होती आणि घोरायला लागली होती. तासभर वेगवेगळे प्लॅन त्याच्या मनात आले, पण बेडवर पडून राहणे त्याला असह्य झाले, तो उठला आणि फ्रिजमधून पाणी प्यायला. मग जवळच्या पुस्तकांच्या कपटाजवळ जाऊन त्याने एखाददुसरे पुस्तक काढले, लॅम्प लावला आणि बाजूच्या टेबल खुर्चीवर बसून वाचू लागला. सकाळ होईपर्यंत त्याला कसातरी वेळ काढायचा. त्याला सगळ्या जुन्या घटना आठवायला लागल्या.
बराच वेळ तो वाचत बसला. सकाळचे पाच वाजले. वाचण्यात लक्ष लागत नव्हते. बाजूला टेबलवर त्याचा मोबाईल त्याने ठेवला होता. त्यात एक न्यूज नोटिफिकेशन आले.
सहज म्हणून त्याने ते पहिले त्यात लिहिले होते –
"प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री रागिणी राठोडची तिच्या बॉयफ्रेंडच्या फ्लॅटच्या गॅलरीतून उडी मारून रात्री आत्महत्या! अजून डिटेल तपशील उपलब्ध झाला नाही."
राजेशला शॉक बसला. त्याने रागिणीला सूरज फोनवर असलेल्या गोष्टी सांगितल्यानंतर ते दोघे भांडताना त्याने पहिले होते. पण म्हणून त्याचा शेवट काय आत्महत्येत व्हावा?
"सुनंदा, उठ! मी जरा जाऊन येतो! एक बातमी कव्हर करायची आहे, एक आत्महत्येची केस आहे!" असे म्हणून तयारी करून राजेश जायला निघाला.
"अहो, थांबा जरा, आताच तर आले आणि लगेच चालले कुठे?" सुनंदा थांबवत म्हणाली. काकू पण उठल्या होत्या. त्या मोठमोठ्याने आवाज करत गुळण्या करत होत्या पण त्यांचे लक्ष पूर्णपणे त्या दोघांकडे होते.
"टीव्ही वर बातम्या लाव आणि बघ! मी तुला नंतर फोन करतो. आता मला जाऊदे!", असे म्हणून राजेश निघालासुद्धा!
yyyy