Get it on Google Play
Download on the App Store

वलय - प्रकरण ३७

राजेश एकटाच लिफ्टमध्ये चढला.

सुनंदाला त्याच्यासोबत आली नाही.

तो लिफ्टमध्ये एकटाच!

नंबर्सऐवजी आकाराने मोठे होत जाणारे स्टार!

लिफ्टच्या दरवाज्याचे बटण.. दार उघडले गेले. दरवाज्यासमोर रागिणी!

घाबरल्याने पुन्हा दरवाजा बंद!

मोठा स्टार असलेले बटन!

लिफ्टचा अनाकलनीय वेग आणि हेलकावे!

अचानक जोराचा धक्का, लिफ्ट थांबली!

दार उघडले गेले..

अंधूक प्रकाशात एक दाढी असलेली वृद्ध व्यक्ती!

चेहरा क्लियर दिसत होता!

येस! हे तर सुपरस्टार अमित श्रीवास्तव!

त्यांनी लिफ्टमधून राजेशला बाहेर येण्यासाठी मदतीचा हात पुढे केला!

मग खांद्यावर एक नाजूक हात?

कुणाचा हात आहे? बघूया तर खरं?

तेवढ्यात राजेश स्वप्नातून जागा झाला.

सकाळचे पाच वाजले होते!सुपरस्टार अमित श्रीवास्तव! त्यांचा आजपर्यंत एकदाही इंटरव्ह्यू घेण्याचा प्रसंग राजेशला आला नव्हता. ते खूप बिझी स्टार होते. नुसते स्टार नाही तर ते सुपरस्टार होते. स्वप्नात त्यांनी मला मदतीचा हात दिला? का? माझ्या सध्याच्या संघर्षात त्यांची मला मदत होईल असा त्याचा अर्थ घ्यायचा का? तो पाठीवरचा हात कुणाचा? सुनंदाचा? नसावा कारण ती तर लिफ्टमध्ये आली नव्हती!

विचार करत करत राजेश उठला. ब्रश करून त्याने चहा घेतला आणि गॅलरीत जाऊन तो विचार करू लागला. सुनंदाविना रिकामे घर भकास वाटत होते.

सुरुवातीला अनिच्छेने लग्न केले असले तरी राजेश सुनंदाचा संसार नंतर रुळावर आला असे वाटत असतानाच काकूंच्या कालवलेल्या विषाने तोही संसार अधांतरी लटकत होता. सकाळी झोपेतून उठल्यानंतरच्या सुनंदाच्या हालचाली, चाहूल सगळे त्याला आठवायला लागले. कदाचित सुप्रियाचे हृदय मी तोडले म्हणून तर मला अशा प्रसंगातून जावे लागत नाही ना? पण मी सुप्रियाशी ब्रेकप घेतला ते त्यावेळेस योग्य होतं असं मला वाटतं!

कदाचित आज माझा बदला आणि संघर्ष अंतिम टप्यावर पोहोचतोय ते बघायला ती असती तर?

ती सोबत असतांना सुद्धा मी इथपर्यंत पोहोचू शकलो असतो का?

ती बरोबर म्हणत होती का?

पण त्यावेळेस समजा सुप्रियाशी लग्न केलं असतं

आणि आईचा सुनंदाशी लग्न करण्याचा तगादा त्याच वेळेस रोखला असता तर?

पण तो सुनंदावर अन्याय नसता का झाला?

वचन मोडले नसते का गेले?

पण सुप्रियावर तरी अन्याय कसा झाला असू शकतो?

ती तर लग्न करून इटलीत सेटल झाली आहे!

मग मी आता काय करू?

अन्याय तर माझ्यावर झाल्यासारखा वाटतोय, नियतीचा!!

* * *

सकाळी दहा वाजता समिरणचा फोन आला.

"अरे! लेखक साहेब आहेत कुठे? कशी काय चालली आहे सुट्टी? एन्जॉय करतोय का बायकोसोबत?"

"अ हो हो! म्हणजे ... हो हो!"

"चला बरंय! अरे मी तुला यासाठी कॉल केला आहे की एक गुड न्यूज आहे आपल्या चित्रपटासाठी!"

"काय आहे ती न्यूज समिरण?"

"अरे! मी अमितजींना आपल्या एका आगामी मराठी चित्रपटांत पाहुणा कलाकार घेतो आहे कारण त्यांना माझे पूर्वीचे चित्रपट आवडलेत आणि त्यांनी स्वतःच एका पार्टीत मला विचारले की समिरण मला तुझ्याबरोबर काम करायची इच्छा आहे! ऐकलं का? स्वतः अमितजी!"

राजेशचा प्रथम कानांवर विश्वासच बसेना. आपल्याला पडलेले स्वप्न??

"अरे! काय विचारात पडलास राजेश? मी खरं तेच सांगतोय! पुढे तर ऐक! मी त्यांना म्हटलं की सर मी माझे हे भाग्य समजतो की तुमच्यासारखा सुपरस्टार माझ्या चित्रपटात काम करायला उत्सुक आहे आणि त्यांच्या पंधरा मिनिटांच्या रोलसाठी तुला लिखाण करायचे आहे तेही त्यांचेशी चर्चा करून!"

"काय सांगतोस समिरण?" खरंच, ग्रेट न्यूज दिलीस!"

समिरण पुढे म्हणाला,

"आणि माहितीये का? ते आपल्या मराठी चित्रपटाला फायनान्स पण करणार आहेत. तसेच ते एक हिंदी चित्रपट काढत असून मला दिगदर्शक म्हणून घेणार आहेत आणि तुला लेखक म्हणून घायचं मी आधीच त्यांचेकडून कबूल केलंय! आणि त्या चित्रपटासाठी त्यांच्या मुलाला – अभिजितला लीड रोलमध्ये घायचे आहे! अभिजितसाठी सशक्त व्यक्तिरेखा लिहिणे हे आता तुझे कौशल्य आहे रे बरं का राजेश! त्यांच्या मुलाला एका हिट चित्रपटाची आवश्यकता आहे! तर मग बोल केव्हा भेटतोस मला राजेश?"

पुढच्या दहा मिनिटांत राजेश वेगाने समिरणकडे निघालासुद्धा आणि कार चालवत असतांना त्याचा मनात एक प्लॅन तयार होत होता!

yyyy

वलय (कादंबरी)

Nimish Navneet Sonar
Chapters
लेखकाचे मनोगत सिद्धेश प्रभूगांवकर यांची प्रस्तावना वलय - प्रकरण १ वलय - प्रकरण २ वलय - प्रकरण ३ वलय - प्रकरण ४ वलय - प्रकरण ५ वलय - प्रकरण ६ वलय - प्रकरण ७ वलय - प्रकरण ८ वलय - प्रकरण ९ वलय - प्रकरण १० वलय - प्रकरण ११ वलय - प्रकरण १२ वलय - प्रकरण १३ वलय - प्रकरण १४ वलय - प्रकरण १५ वलय - प्रकरण १६ वलय - प्रकरण १७ वलय - प्रकरण १८ वलय - प्रकरण १९ वलय - प्रकरण २० वलय - प्रकरण २१ वलय - प्रकरण २२/२३ वलय - प्रकरण २४ वलय - प्रकरण २५ वलय - प्रकरण २६ वलय - प्रकरण २७ वलय - प्रकरण २८ वलय - प्रकरण २९ वलय - प्रकरण ३० वलय - प्रकरण ३१ वलय - प्रकरण ३२ वलय - प्रकरण ३३ वलय - प्रकरण ३४ वलय - प्रकरण ३५ वलय - प्रकरण ३६ वलय - प्रकरण ३७ वलय - प्रकरण ३८ वलय - प्रकरण ३९ वलय - प्रकरण ४० वलय - प्रकरण ४१ वलय - प्रकरण ४२ वलय - प्रकरण ४३ वलय - प्रकरण ४४ वलय - प्रकरण ४५ वलय - प्रकरण ४६ वलय - प्रकरण ४७ वलय - प्रकरण ४८ वलय - प्रकरण ४९ वलय - प्रकरण ५० वलय - प्रकरण ५१ वलय - प्रकरण शेवटचे (५२) लेखकाची साहित्यिक ओळख