वलय - प्रकरण २९
इकडे रागिणी सूरजच्या ब्राझीलहून परत येण्याची वाट बघत होती. संध्याकाळ झाली होती. स्वतःसाठी स्वयंपाक बनवून ती जेवली. मग सूरजला कॉल करण्याचा प्रयत्न केला पण तो कॉल उचलत नव्हता. मग झोपतांना सहज बातम्या बघाव्या म्हणून तिने टीव्ही लावला.
'फ्रेश न्यूज- आप तक, आपके घर तक!" हे चॅनेल सुरु होते. "फिल्मी खुलासा" या कार्यक्रमात निवेदक ओरडून ओरडून सांगत होते:
"फेमस हॉरर सिरीयल की फेमस ऐक्ट्रेस रागिणी के बारे में एक बडा खुलासा! एक ऐसा सच जो आजतक किसीको नही था पता! देखीये थोडीही देर में!"
बेडवर झोपलेली रागिणी अचानक उठून बसली. तिला धक्काच बसला.
"हे चाललंय काय या चॅनेलचं! काय सांगणार आहेत ते माझ्याबद्दल? मला तर डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये! आतापर्यंत मी फिल्मी पत्रकारांना माझ्या पूर्वीच्या जीवनाबद्दल माहिती सांगणे शिताफीने टाळले होते. मात्र या चॅनेलला अचानक कुणी माझ्याबद्दल सांगितलं आणि काय सांगितलं? नक्कीच राहुल असणार! त्याला पैसे देऊन सुद्धा त्याने जे करायचे तेच केले वाटते!"
पुढे निवेदक सांगू लागला:
"दरअसल ये रागिणी भाग गयी थी अपने घर से! बिना अपने हजबंड को बताये! क्या फिल्म इंडस्ट्री में आनेके लिए कोई इस हद तक जा सकता है? हमारे जर्नालिस्टने ये भी खुलासा किया है की शादी से पहले रागिणी के दो लडकों के साथ रिश्ते थे और इतना ही नही ..."
पुढे ऐकवले जात नव्हते. रागिणीच्या मनात संताप, आश्चर्य आणि पराकोटीचा अनपेक्षित धक्का या तीन भावना एकत्र झाल्या आणि त्याचा परिणाम म्हणजे तिने रिमोट टिव्हीकडे जोराने भिरकावले. टीव्ही खळकन फुटून बंद पडला. तिने पुन्हा सूरजला कॉल केला असता त्याचा नंबर स्विच ऑफ होता.
ओह नो! आता काय करू मी? रागिणी अस्वस्थपणे येरझारा घालू लागली. मला या शहरात दुसरं कोण आहे? जवळचं? सूरजशिवाय? आता तिला प्रश्न पडला की ही बातमी पाहून सूरजच्या आधी त्याच्या वडिलांनी, डी. पी. सिंग यांनी तिला बोलावले तर? त्यांना तिने तिच्या पूर्वायुष्याबद्दल काहीच सांगितले नव्हते आणि त्यांनीही काही विचारले नव्हते कारण त्यांची वागणूक प्रोफेशनल होती. ते कामाशी काम या वृत्तीचे होते. पण आता मात्र गोष्ट वेगळी होती कारण ती आता त्यांच्या मुलाची गर्लफ्रेंड होती. त्याचेसोबत रहात होती. पण त्यांना कॉल करण्याऐवजी प्रथम सूरज आल्यानंतर त्याच्या सोबत बोलूया असा विचार तिने केला....
yyyy