वलय - प्रकरण ३५
ही बातमी मोहिनीला कळताच तिनेसुद्धा पटकन तयारी केली, टीशर्ट आणि जीन्स घातली, हातात माईक घेतला आणि घाईघाईत बाजूला पडलेले राजेशचेच ब्लेझर घालून रागिणीच्या फ्लॅटकडे कॅमेरामनसोबत पोहोचली.
ती कॅमेऱ्यासमोर पाहून बोलत होती आणि बातम्या देत होती. राजेश तेथे नंतर पोहोचला. तोही बातम्यांचे डिटेल्स घेत होता. राजेशचे ब्लेझर घालून मोहिनी बातम्या देत असतांना टीव्हीवर सुनंदा आणि तिची काकू बघत होत्या. तिने काकूला त्या ब्लेझरबद्दल सांगितले. काकूंच्या म्हणण्याप्रमाणे झाले. सुनंदाचा संशय पक्का झाला की राजेश पार्टीनंतर मोहिनीच्या फ्लॅटवर थांबून मग घरी आला होता. काकूंना आयते कोलीत मिळाले. त्यांनी आणखी तिच्या मनात विविध संशयपिशाच्चे टाकली. सुनंदाने संतापाच्या भरात राजेशला कॉल केला पण "आपण कॉल करत असलेला नंबर उत्तर देत नाही" असा आवाज येत होता...
"आता सुनंदाचा कॉल उचलून उपयोग नाही, घरी गेल्यावरच जे काय व्हायचे ते होईल कारण तिने नक्की ब्लेझर मोहिनीच्या अंगावर टीव्हीत पाहिले असावे", असा विचार करून राजेशने घटनास्थळी काय होतेय याकडे लक्ष देणे जास्त पसंत केले. तशात लगबगीने मोहिनीने राजेशला त्याचा ब्लेझर शुटिंग चालू असतानाच परत केला. हेही सुनंदाने बघितले आणि टीव्ही बंद करून टाकला आणि दोघीजणी चहा पिता पिता खलबते करू लागली..
सूरज खूप दुःखात बुडालेला दिसत होता. राजेशला तर काहीच कळेनासे झाले. त्याला वाटत होते की रागिणीच्या आत्महत्येला तोच अप्रत्यक्षरीत्या कारणीभूत आहे. पण नंतर दुसरे मन त्याला सांगू लागले की त्याने सूरजचे जे बोलणे फोनवर ऐकले ते नुसते ऐकून सोडून देण्याइतका तो माणूसकीहीन नव्हता कारण सूरज जे काही बोलत होता ते केवळ त्याचे खासगी मॅटर म्हणून सोडून देण्यासारखे नक्की नव्हते. त्याने त्यावेळेस योग्य वाटले ते केले. विचारांतून बाहेर निघत त्यानंतर त्याचे पत्रकार म्हणून असलेले काम त्याने केले. पोलीस आलेले होते. पंचनामा वगैरे सुरु होता. मोहिनीच्या निरोप घेऊन त्याने घटनास्थळातून काढता पाय घेतला.
राजेशला या क्षणी जरा एकांत हवा होता. शांत एके ठिकाणी बसून याला योजना आखायच्या होत्या. रत्नाकर रोमदाडे शक्यतो के के सुमन सोबत क्वचितच दिसायचा. नाहीतर एरवी राजेशने अनेक पार्ट्या किंवा शोज मध्ये किंवा टेलिकास्ट मध्ये टीव्हीवर नक्की त्याला ओळखले असते पण काल तर तो प्रत्यक्ष समोर येऊन हातातून निसटला होता.
घटनास्थळाहून राजेश तडक सारंगच्या रूमवर गेला. दरम्यान त्याने सुनंदाला कळवायला फोन केला की तो काही कारणास्तव घटनास्थळाहून सरळ सारंगकडे जातोय पण दोन तीन वेळा ट्राय करूनही ती फोन उचलत नव्हती. काकूंचा फोन पण त्याने ट्राय केला पण कुणीही उचलला नाही. आता जर तो घरी गेला असता तर भांडणामुळे आणखी मूड खराब झाला असता. आता भांडण होणारच आहे तर रात्रीच होऊ दे, तोपर्यंत मी माझे रत्नाकर संशोधनाचे काम आटोपतो असा विचार त्याने केला आणि सारंगच्या घरी पोहोचला.
सारंगला फोन केल्यावर त्याला कळले की सारंगची पत्नी (बँकेत नोकरी करत असल्याने) घरी नव्हती आणि सारंगही आज घरी नव्हता मात्र सारंग त्याला एवढा मान द्यायचा की राजेशला त्याने बिनधास्त शेजाऱ्यांकडून चाबी घेऊन घरी बसायला सांगितले. सारंगला राजेशने थोडक्यात सगळी कल्पना दिली आणि आज दिवसभर शांततेसाठी त्याला सारंगच्या घरी थांबायचे आहे असे सांगितले.
गाडीतून राजेशने लॅपटॉप काढले, आणि सारंगच्या फ्लॅट मध्ये गेला. लॅपटॉप ऑन केला. किचन मध्ये जाऊन कॉफी बनवली. फ्रिजमधून ब्रेड काढून त्याचे सॅन्डविच बनवले आणि कॉफीचे झुरके घेत सारंगच्या फ्लॅटच्या टेरेसवर खुर्ची टाकून बसला. रागिणीची न्यूज त्याने लॅपटॉपवर तयार करून एडिटरला पाठवली. आता शांतपणे तो पुढे काय करायचे याचा विचार करू शकणार होता. मग त्याने लॅपटॉप बाजूला ठेवला आणि समोरच्या स्टूलवर पाय टेकवून दोन्ही हात मानेमागे घेऊन डोळे बंद करून विचार करत बसला...
बराच वेळ विचार केल्यानंतर मग त्याने लॅपटॉपवर सर्च करून रत्नाकरची माहिती काढली, त्याचा पत्ता शोधून काढला. सारंगला कॉल करून त्याने रत्नाकरची माहिती काढायला सांगितले होते. त्यासाठी सारंगने त्याच्या मासिकासाठी रत्नाकरचा इंटरव्ह्यू घायचा ठरवला. सारंग त्याच दिवशी अपॉइंटमेंट घेऊन रत्नाकरला भेटायला त्याच्या ऑफिसमध्ये गेला. सारंग ज्या मासिकासाठी काम करत होता त्यात मुलाखत छापून येणे म्हणजे हमखास प्रसिद्धी असे समीकरण होते. इंटरव्ह्यू दरम्यान अनेक प्रश्न विचारून रत्नाकरची खासगी माहिती काढली. एकंदरीत रत्नाकरच्या बोलण्यावरून असे वाटत होते की त्यालाच एखाद्या इंटरव्ह्यूची आणि जास्त प्रसिद्धीची गरज होती. सध्या के के सुमन एका सिनेमाच्या शूटिंगसाठी लोकेशन शोधण्यासाठी आणि परमिशन घेण्याकरता परदेशात गेलेला होता.
मग सारंगने रत्नाकरकडून एक गोष्ट कबूल करवून घेतली की राजेशसुद्दा त्याचा काही दिवसांनी इंटरव्ह्यू घ्यायला येणार आहे आणि त्यावेळेस सोबत केकेच्या मुलाला पण सोबत असू द्या असे सारंगने सुचवले. रत्नाकारला जास्तीत जास्त प्रसिद्धी हवी होती म्हणून तो हो म्हणाला कारण रत्नाकर आणि के के चा मुलगा मिळून त्यांच्या एका आगामी चित्रपटासाठी स्टोरी लिहीत होते आणि स्टोरी जवळपास पूर्ण होत आली होती असे रत्नाकरने सारंगला सांगितले होते.
अशा प्रकारे रत्नाकारबद्दल बरीच माहिती सारंगने राजेशला फोनवर कळवली. या आणि इतर माहितीच्या आधारे सारंग आणि राजेश मनात वेगवेगळे प्लॅन बनत होते. रात्री सारंगच्या घरी बराच विचारविनिमय केल्यानंतर दोघांनी संगनमताने एक प्लॅन तयार केला आणि रात्रीचे जेवण केल्यानंतर राजेश आपल्या घरी जायला निघाला. गाडीत त्याच्या मनात मिक्स फिलिंग्ज होत्या. रागिणीची आत्महत्या, सुनंदाचे संशय घेणे, रत्नाकारचा लागलेला शोध, मोहिनी आणि त्याचेवर बेतलेला रात्रीचा प्रसंग आणि आता घरी गेल्यावर सुनंदाला तोंड द्यावे लागेल...
घरी पोहोचल्यावर त्याने बेल वाजवली. कुणीच दार उघडले नाही. त्याने स्वतःकडच्या चवीने दरवाजा उघडला. घरात सर्वप्रथम दर्शन देणाऱ्या काकू आता दिसत नव्हत्या आणि हाक मारल्यावर सुनंदाचाही ओ येत नव्हता. समोर टेबलवर एक चिठ्ठी पडलेली होती. त्यात काकूंच्या हस्ताक्षरात लिहिले होते.
"सुनंदाने कायम माहेरी जाण्याचा निर्णय घेतला आहे...
जर तुम्ही पत्रकार, लेखन आणि सिनेमा जगतापासून दूर जाऊन ऑफिसमधे 9 ते 5 वेळेतली नोकरी शोधल्यास ती परत येण्याचा विचार करेल!'' - सुनंदाची काकू!
राजेशने कपाळावर हात मारला आणि सोफ्यावर बसला. आता शांत बसायांचे आणि गावाकडून आईचा फोन आलाच तर बघू काय करायचे ते असा विचार करून त्याने ती चिठ्ठी व्यवस्थित घडी करून एका प्लास्टिकच्या चौकोनी डबीत ठेवली आणि बेडखाली ठेऊन दिली. त्यावर उशी ठेऊन रात्रभर तो सुनंदाच्या बदललेल्या वागणुकीबद्दल आणि त्याला कारणीभूत असलेल्या काकूंचा विचार करत होता. काकूंचा काहीतरी बंदोबस्त करायला हवा पण त्याआधी मिशन रत्नाकर रोमदाडे!
सुनंदा काही दिवस माहेरी राहील आणि शेवटी अविचाराने घेतलेला तिचा निर्णय चूक आहे हे लक्षात येईल आणि ती परत येईल असा विचार करून तो उशिरा रात्री झोपला कारण त्याच्या मनात अनेक विचारांचा कल्लोळ चालला होता....त्याचे मन खूप थकले होते!....
राजेश एकटाच लिफ्टमध्ये चढला कारण सुनंदाला त्याने विनंती केली होती पण ती त्याच्यासोबत आली नाही. लिफ्टमध्येही दुसरं कुणी नव्हतं. 6 व्या मजल्याचे बटण दाबायला त्याने हात पुढे केला तेव्हा त्याला तेथे आकडे दिसत नव्हते. त्याऐवजी आकाराने मोठे होत जाणारे स्टार होते. क्षणभर काय करावे हे न सुचल्याने त्याने इकडेतिकडे पहिले आणि लिफ्टमधून उतरून जायचे ठरवले आणि लिफ्टच्या दरवाज्याचे बटण दाबले.
दार उघडले गेले. दरवाज्यासमोर केस मोकळे सोडलेली रागिणी उभी होती. अतिशय घाबरल्याने त्याने पुन्हा दरवाजा बंद केला आणि सगळ्यात मोठा स्टार असलेले बटन दाबले. लिफ्टने अचानक खूप वेग घेतला आणि ती विचित्र पद्धतीने हेलकावे खाऊ लागली आणि राजेशला समजेनासे झाले की ही लिफ्ट नेमकी वर जातेय की खाली जातेय किंवा मग जमिनीला समांतर रेल्वेसारखी पळतेय?
अचानक एक जोराचा धक्का देऊन लिफ्ट थांबली. दार उघडले गेले आणि समोर अंधूक प्रकाशात एक पांढरी दाढी असलेली वृद्ध व्यक्ती उभी होती पण त्याचा चेहरा दिसत नव्हता. तरीपण त्याला चेहरा ओळखीचा वाटत होता पण नेमका तो कोण आहे हे समजत नव्हते एवढ्यात त्या व्यक्तीने राजेशला मदत करण्यासाठी हात पुढे केला. राजेश त्याच्या हातात हात देणार तेवढ्यात लिफ्टमधून मागच्या बाजूने राजेशच्या खांद्यावर एक नाजूक हात पडला आणि मागे वळून बघणार तेवढ्यात राजेश दचकून स्वप्नातून जागा झाला. त्याचा चेहरा घामाने डबडबला होता. सकाळचे पाच वाजले होते. नंतर दहा मिनिटे तो त्या स्वप्नाचाच विचार करत राहिला. आपल्याला असे स्वप्न का पडले असावे? फ्रिजमधून थंड पाणी काढून तो प्यायला आणि त्याने स्वप्नाचा विचार सोडून दिला आणि ब्रश करायला सुरुवात केली. आज तयार होऊन राजेशला रत्नाकरचा इंटरव्ह्यू घ्यायला जायचे होते. तयारी करून राजेश रत्नाकारच्या ऑफिसकडे निघाला. रत्नाकारला त्याने तसे कळवले आणि मग सारंगला फोन लावला.
"सारंग, मी पहिला इंटरव्ह्यू घ्यायला निघालोय. बाकी सगळे ओके ओके आहे ना?"
"होय राजेश. सगळे ओके ओके आहे. ऑन ट्रॅक आहे!"
"ठीक आहे. आपण यापुढील घडामोडींचे अपडेट रेग्युलरली एकमेकांना देत राहू! चल बाय!"
राजेशने रत्नाकरची अर्धा तास मुलाखत घेतली. या इंडस्ट्रीत तो आणि केके कसे आले हे त्याने जाणून घेतले.
मग राजेशने त्याच्या मनात तयार असलेल्या वेगवेगळ्या कथांचे विषय तोंडी रत्नाकरला सांगण्याचे आमिष दाखवले पण त्यासाठी रत्नाकरला राजेशसोबत डिनर आणि ड्रिंक्स घ्यायला यावे लागेल असे कबूल करवून घेतले. हे सगळे केके परदेशातून परत यायच्या आधी राजेशला उरकायचे होते.
yyyy