वलय - प्रकरण ३१
काही दिवस मुंबईबाहेर असल्याने डी. पी. सिंग हे रागिणीबद्दलच्या टीव्हीवरील गौप्यस्फोटाबाबत मौन बाळगून होते. मौन बाळगण्याचे आणखी एक कारण म्हणजे ते सूरज ब्राझीलहून परतण्याची वाट बघत होते. तो कालच आला होता. मात्र मुंबईत पोहोचल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते सूरजशी फोनवर बोलले तेव्हा मी सगळे बघतो, तुम्ही चिंता करू नका असे आश्वासन सूरजने त्यांना दिले होते.
कालांतराने एका हिंदी टिव्ही शोच्या सक्सेस पार्टीला जुहू येथील फाईव्ह स्टार हॉटेल "गोल्डन सिटीझन" मध्ये रविवारी संध्याकाळी रागिणी, सूरज, डी. पी., सुभाष भट, पत्रकार म्हणून राजेश, तसेच सोनी बनकर, तिच्या शो मधील इतर कलाकार यांच्यासह सिने क्षेत्रातील अनेकांना आमंत्रण होते. एव्हाना सोनी बनकर रियालिटी शो जिंकली होती. जवळपास महत्वाची अशी सगळी टीव्ही फ्रॅटर्निटी आणि काही प्रमाणात बॉलिवूड मधील मंडळी सुद्धा येणार होती. ती सक्सेस पार्टी आयोजित केली होती सर्वाधिक टीआरपी मिळवणाऱ्या एका ऐतिहासिक टीव्ही मालिकेच्या निर्मात्यांनी!! कारण त्यांच्या "चक्रवीर राजा विक्रमसेन!" या शोचे नुकतेच दोनशे भाग पूर्ण झाले होते.
प्रथम टीव्हीवरील त्या न्यूजने अस्वस्थ झालेली रागिणी पार्टीला यायला तयार नव्हती पण सूरजने आग्रह केला. विशेष म्हणजे तो रागिणीच्या भूतकाळाचा गौप्यस्फोट करणारा टीव्ही जर्नालिस्ट "सुधीर श्रीवास्तव" पण तेथे येणार होता. त्या टीव्हीवरील कार्यक्रमाबद्दल जास्त टेन्शन घेऊ नको असे सूरजने रागिणी सांगितले तसेच सूरजने त्या पत्रकारावर लीगल ऍक्शन घ्यायचे ठरवले होते. पण जर का त्याने माफी मागितली तर प्रकरण मिटवून टाकू असे रागिणीला सांगितले. असे अनेक धक्के सेलिब्रिटीजना पचवावे लागतात असे तो म्हणाला. ती शेवटी पार्टीला तयार झाली होती.
पण कितीही केले तरी त्यादिवशीनंतर आजतागायत ती एका अनामिक दडपणाखाली होती. आतापर्यंत तिने शिताफीने पत्रकारांपासून लपवलेले सत्य नेमके सूरज ज्यादिवशी ब्राझीलला गेला त्यानंतरच कसे काय पत्रकारांना समजले? राहुलने तर नाही ना हे सगळे केले? पण सूरजला राहुलबद्दल सांगितल्यानंतर राहुलचा फोन येणे बंद का झाले? सूरजने त्याला धमकावले असावे! त्यामुळेच राहुलने टीव्ही चॅनेलला माझे पूर्वायुष्य सांगितले असेल!!
पार्टीच्या दिवशी संध्याकाळी कारमध्ये मुंबईतील रस्त्यांवर सूरजची कार धावत होती. सूरजसोबत रागिणी बसली होती-
"एनिवे रागिणी, राहुलचा फोन तुला पुन्हा आला होता का?"
"नाही!"
"पुन्हा फोन आलाच तर आपण काही ठोस ऍक्शन घेऊ! तसे मी त्याचा फोटो माझ्या काही विश्वासू सहकाऱ्यांना दाखवून काही माहिती मिळतेय का हे गुप्त रीतीने तपास करायला सांगितलंय. पोलिसांत गरज पडली तरच जाऊया! कारण पोलिसांचा उगाच ससेमिरा मागे लागतो, यु नो!"
यानंतर रागिणी काही न बोलता शांत विचार करत राहिली. म्हणजे अजून तरी सूरज राहुलशी डायरेक्ट बोलला नाहिए तर! सूरज ब्राझीलहून आल्यानंतर थोडा बदलला आहे असे तिला वाटल्यावाचून राहवले नाही. पण कामाच्या व्यापामुळे तसे असेल म्हणून तिने दुर्लक्ष केले. बराच वेळ कुणी कुणाशी बोलत नव्हतं…
"गोल्डन सिटीझन" च्या टेरेसवर म्हणजे बाराव्या मजल्यावर खास मोठे पार्टी लाऊंज होते. ते आजच्या पार्टीसाठी बुक केले होते. जसा अंधार पडायला लागला तसे टीव्ही आणि बॉलिवूड मधील चमकते वलयांकित तारे एकेक करून पार्टीत यायला सुरुवात झाली.
आजकाल टीव्ही पण बॉलिवूड इतकाच ग्लॅमरस झाला असल्याने एकेकाळी छोट्या पडद्याला नाकारणारे अनेक बॉलिवूड मधील लोक टीव्ही पार्ट्यांना आवर्जून हजेरी लावत. डिनर जॅकेट, डेंनीम जॅकेट, जीन्स पॅन्ट, शेरवानी, स्लीवलेस टीशर्ट , ग्रे, ग्रीन, ब्लु ब्लेझर्स अशा अनेक प्रकारच्या पोशाखात टीव्ही तसेच बॉलिवूड मधली पुरुष कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळी, गीतकार, संगीतकार, गायक मंडळी अवतरत होती. ऐतिहासिक आणि पौराणिक सिरीयलचे कलाकार मात्र थोडे वेगळ्या वेशात आले होते कारण शूटिंग साठी जुन्या काळातील व्यक्तिरेखांप्रमाणे त्यांना तसे राहाणे भाग होते. कुणी टक्कल केलेले तर कुणी केस वाढवलेले असे सगळेजण आले होते.
तर स्त्रियांपैकी काहीजणी सलवार, स्लीव्हलेस टॉप, जीन्स, लो कट् ब्लाऊज आणि मुद्दाम कमरेखाली नेसलेल्या साड्या, तर काहीजणी अतिशय शॉर्ट स्कर्ट आणि खूप मोठा क्लिव्हेज दाखवणारे शॉर्ट टॉप, पार्टी गाऊन्स, वन पीस टॉप, वन पीस गाऊन अश्या प्रकारचे कपडे घालून आणि हातात पर्स आणि महागडे मोबाईल मिरवत येत होत्या. अनेक ग्लॅमरस स्त्रिया एकेक करून पार्टीत येत होत्या. त्यांनी वापरलेल्या वेगवेगळ्या सेंट्सचा सुवास त्या पार्टीला एक वेगळीच अनुभूती देत होता. काही स्पॉन्सर बिझिनेसमॅन मंडळींनीही हजेरी लावली होती. सोनी बनकर अंगाला घट्ट आणि फिट बसणारा, तिचे स्त्रीत्व दर्शवणारे अंग उठून दिसेल असा स्लीव्हलेस टॉप आणि अतिशय छोटी पण हिप्सचा गोलाकार ठळकपणे दर्शवणारी जिन्सची पॅन्ट घालून आली होती. त्यामुळे तिच्या गोऱ्या उघड्या पुष्ट पायांकडे आणि मांड्याकडे सगळ्या पार्टीतील पुरुषांची नजर होती. काही स्त्रिया तिला लाभलेले असे सौंदर्य पाहून मनातल्या मनात जळून नाक मुरडत होत्या. सोनी बनकर या पार्टीत तिच्या रियालिटी शोमधील कोस्टार "भूषण ग्रोवर" याच्यासोबत पोहोचली होती.
सोनीच्या चेहेऱ्यावरचा नेहमीचा अल्लडपणा आणि उच्छृंखलपणा ओसंडून वाहात होता आणि तो तिच्या कपड्यांशी मॅच होत होता. भूषण ग्रोवरचे दणकट बाहू पकडून पार्टीत येतांना तिला खूप गर्व आणि आनंद वाटत होता.
सुभाष भट त्यांची साडी घातलेली पत्नी रजनी घोसाळकर सोबत नुकतेच पोहोचत होते. सुभाष भटना आज सोनी बनकरला त्यांच्या आगामी हॉरर, थ्रिलर म्युझिकल चित्रपटात घेण्याबद्दलची औपचारिक घोषणा करून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का द्यायचा होता. तशी BEBQ च्या प्रोड्यूसरने थोडी पूर्वकल्पना सोनीला दिली होतीच!
पार्टीत स्टार्टर्स आणि सॉफ्ट ड्रिंक सर्व्ह केले जात होते. रागिणी आणि सूरज "ऑन द वे" होते तर राजेश घरून निघण्याच्या बेतात होता. तो बहुदा अश्या पार्ट्यांना हाफ स्लीव्ह ग्रे टी शर्ट आणि जीन्स घालायचा पण यावेळेस त्याने ग्रीन ब्लेझर निवडले जे त्याने नुकतेच ऑनलाइन मागवले होते खास अशा पार्ट्यांसाठी ज्यात तो फिल्मी पत्रकार म्हणून जात असे.