वलय - प्रकरण ५०
माया माथूर आपल्या दोन मुलांना पतीकडे सोपवून वॉशरुमकडे निघाली. वॉशरुममध्ये आरश्यात केस आणि मेकप नीटनेटका करत असताना ती थोडी चिंतेत दिसत होती कारण आताशा कातिल तिच्याशी जास्त सलगी करायला लागला होता. तिला खटकेल अशा रीतीने. तिने बरेचदा हसून वेळ मारून नेलेली होती पण आता थोडे जास्त होते आहे असे तिला वाटायला लागले होते. आरशासमोर विचार करता करता बराच वेळ ती शून्य मनाने मेकप सावरत होती. तिला जास्त चिंता याची होती की तिने आपल्या पती पासून सुरुवातीपासून सगळे लपवले होते आणि आता एकदम अती झाल्यानंतर सांगितल्यावर त्याची काय प्रतिक्रिया असेल?
विचारांत असताना समोरच्या काचेवर वाफ जमा झालेली तिला दिसली आणि त्यावर बोटाने इंग्लिश मधून लिहिले जात होते, "टूडे इज युवर लास्ट डे ऑफ वरी!" (आज तुझ्या काळजीचा शेवटचा दिवस आहे!")
ती अचानक दचकली आणि घाबरून ओरडणार एवढ्यात समोरचे ते लिखाण नष्ट होऊन स्वच्छ आरसा दिसत होता.
आपल्या मनातले विचार कुणाला आणि कसे काय कळले आणि अचानक काचेवर कुणी लिहिले आणि माझ्या चिंतेचा आज शेवटचा दिवस? हे काय होते? मला हे कसले भास होत आहेत? अती काळजीमुळे तर नाही ना असे होत?
ती तडक वॉशरुम मधून घाईघाईने निघून अवार्ड शो सुरू असलेल्या ठिकाणी आपले सीट शोधत आली.
तिचे दोन्ही जुळे मुलं कंटाळल्याचे दिसत होते. कारण मायाला जाऊन बराच वेळ झाला होता.
एव्हाना हॉलीवूडची टीम अवार्ड नाईट मध्ये आलेली होती आणि त्यांची चित्रपटाबद्दल जाहिरात करून झाली होती. मात्र काही जण बाहेर व्हॅनीटी व्हॅन मध्येच थांबले होते. त्यांना अशा नाच गाण्यांत इंटरेस्ट नसावा!
स्टेजवर दोन आघाडीच्या अभिनेत्री ज्यांनी हॉलीवूड मध्ये आपले बस्तान बसवले होते त्या आपल्या एकत्र डान्स परफॉर्मन्सने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत होत्या. आजूबाजूला दहा पुरुष आणि स्त्री नर्तक त्यांच्या स्टेप्स डान्स स्टेप्सला फॉलो करत त्यांना मनापासून साथ देत होते. स्टेजवर कॉन्फेटी म्हणजे रंगीबेरंगी कागदांचे तुकडे इकडे तिकडे उधळले जात होते. शो ऐन रंगात आला होता. मग गाणे संपता संपता प्रेक्षकांत बसलेला हॉलीवूडचा एक आघाडीचा अँक्शन हिरो टॉम टींसेल स्टेज वर आला आणि दोघींना डान्स मध्ये जॉईन झाला. प्रेक्षकांत टाळ्यांचा भरपूर कडकडाट झाला.
गाणे संपल्यावर त्याने जोरावर खान कडून माईक घेतला आणि म्हणाला, "आय जस्ट लव्ह धीस डान्स अँड साँग्ज पार्ट इन बॉलीवूड मुव्हीज. सुरुवातीला आम्ही हॉलीवूडवाले तुमच्या या सिनेमात असणाऱ्या डान्स आणि लीप सिंक असणाऱ्या गाण्यांना नावे ठेवायचो, कमी लेखत होतो पण आज? .. आज हॉलीवूड मधील अनेक असे सिनेमे आहेत जे आता चित्रपटांचे थीम साँग बनवायला लागले आहेत, काही चित्रपटांमध्ये तर एखाद दुसरे गाणे पण दिसायला लागले आहे. काही चित्रपटात तर तुमच्या बॉलीवूड मूव्ही सारखा ड्रामा सुध्दा आता दिसतो. आम्हाला वाटायचे तुम्ही आमच्या चित्रपटांची कॉपी करता, पण नाही तुम्हीच नाही आम्ही पण तुमच्या चित्रपटांतील अनेक नावीन्यपूर्ण गोष्टींची कॉपी करतच असतो. कुणी आजपर्यंत हे उघडपणे मान्य नव्हतं करत पण हे खरं आहे!"
मग टॉमची फिरकी घेण्यासाठी जोरावर खान म्हणाला, "सो टॉम, व्हॉट डू यू थिंक अबाऊट अॅक्टींग इन लीड रोल इन 'भले आदमी दुल्हन चुरा लेंगे' सिक्वेल? (‘भले आदमी दुल्हन चुरा लेंगे' या चित्रपटाच्या पुढच्या भागात हिरो म्हणून काम करशील का?")
यावर हसत टॉम म्हणाला, "अरे यार, तुम्हारी जनता टकलू हिरो को पसंद नही करेंगी!"
जोरावर म्हणाला, "तो विग लगा लेंगे यार, व्हॉट्स द बिग डील?"
यावर टॉम आणि प्रेक्षक हसायला लागले.
स्टेजच्या मागच्या बाजूला सूरज तयारी करत होता. बेस्ट फिल्म अवार्ड त्यालाच मिळणार होता. तयारी करून प्रेक्षकांत पुढच्या रांगेत बसायचे आणि अवार्डची अनाउन्समेंट झाली की तो घ्याला स्टेजवर जायचे असा प्लॅन होता. कपडे बदलून येण्याआधी तो वॉशरुम कडे जायला निघाला. लॉन मधून तो वॉशरुम कडे जात होता. आता हळूहळू स्टेजवरील मोठ्ठा आवाज कमी कमी होत गेला. आता बरीच शांतता होती.
कोण जाणे त्याला मनात एक प्रकारची अस्वस्थता जाणवू लागली. तसं पाहिलं तर त्याच्या मनाप्रमाणे सगळं चाललं होतं. ओलिव्हीया आणि व्हेरिनिका या दोघींनाही तो एकाच वेळेस मॅनेज करत होता. त्याचा फूडचेनचा बिझिनेस आणि त्याच्या आडून चालणारा ड्रगचा बिझिनेस व्यवस्थित चालू होता.
रागिणीला मार्गातून मोकळे करण्यात त्याला यश आलेले होते आणि पोलिस, कोर्ट काहीही सिद्ध करू नव्हती आणि तिची आत्महत्या सिद्ध झाली होती. अनेक फ्लॅट आणि एक बंगला मुंबईसारख्या शहरात त्याच्या मालकीचा होता. करोडो रुपये त्याने कमावले होते. त्याचे चित्रपट हीट होत होते आणि आता तर आज त्याच्या चित्रपटाला अवार्ड मिळणार होता. सुख म्हणतात ते हेच का?
वॉशरुम मध्ये गेल्यावर त्याने आरशात पाहिले. त्याने आपली बॉडी चांगली मेंटेन केली होती. एकदा आरशात आपले सिक्स पॅक एब बघायचा मोह त्याला आवरला नाही. त्याने वरचे कपडे काढले आणि आरशासमोर टॉपलेस झाला.
परदेशात असताना त्याच्या ठराविक गर्लफ्रेंड व्यतिरिक्त ब्राझिलमधील बिझिनेस निमित्ताने त्याच्या संपर्कात येणाऱ्या अनेक श्रीमंत मुलींनी फक्त त्याच्या एकूण व्यक्तिमत्त्वावर आणि विशेष म्हणजे त्याच्या सिक्स पॅकवर फिदा होऊन एका रात्रीसाठी तरी त्यांच्यासोबत त्याने सेक्स करावा अशी विनंती केली होती आणि त्यासाठी त्या पैसे मोजायला सुध्दा तयार होत्या. त्यामुळे सुखावून त्याने चारेक जणींची ऑफर स्वीकारली सुध्दा होती आणि इच्छा एकेका दिवशी पूर्ण केली होती. मात्र नंतर नंतर त्याने अशा गोष्टी बंद केल्या.
हे सगळे आठवून तो सुखावला आणि एकटक स्वतःकडे आरशात बघत उभा राहिला.
त्याच्या सिक्स पॅकवर केस मोकळे सोडलेल्या रागिनीचा पुसट चेहरा आकार घेऊ लागला आणि तेव्हा मात्र तो दचकला आणि मागे सरकला. सिक्स पॅक वर जणू काही तो चेहरा गोंदला जात होता. हा चेहरा अचानक असा कसा गोंदला गेला? तो चेहरा हसायला लागला. कुत्सितपणे त्यांचेकडे बघायला लागला आणि गायब झाला.
घाबरून पूर्ण चेहरा घामाने भरल्यानंतर त्याने पटापट घाईने कपडे अंगावर चढवले आणि वेगाने तो अवार्ड फंक्शनच्या ठिकाणी जायला निघाला.
"सुबहा दिवानी दिवानी दिवानी
शाम सुहानी सुहानी सुहानी
रात शराबी शराबी शराबी
हो जाती है,
जब तुम
जब तुम
जब तुम
मेरे साथ
होती हो हो हो ss"
या गाण्यावर एक नवी नटवी नटी नाचत होती. तिचा या वर्षी पहिलाच चित्रपट रिलीज झाला होता त्यामुळे ती खूप फॉर्मात होती. इथे चांगला परफॉर्मन्स केला तर आणखी चित्रपट मिळतील हे तिला माहित होते.
डान्स संपल्यानंतर लगेचच सूरजच्या अवार्डची अनाउन्समेंट झाली. थोड्या घाबरलेल्या आणि गोंधळलेल्या स्थितीतच तो स्टेजवर चढला आणि त्याने अवार्ड घेतला.
जोरावर खान म्हणाला, "सर आप रागिणी के बारे मे कुछ कहना चाहेंगे? आज आपके साथ वो होती तो उन्हे कैसा लागता आपके इस अवार्ड के बारें में?"
सूरजचे लक्ष नव्हते. समोर प्रेक्षकांत त्याला प्रत्येक सीटवर रागिणी बसली आहे असे दिसू लागले. जोरावरला उत्तर न देताच तो खाली उतरला आणि आपल्या चेहऱ्यावरील अस्वस्थता लपवण्यासाठी अगदी शेवटी एका रिकाम्या असलेल्या रांगेत रिकाम्या खुर्चीवर घाईघाईने जाऊन बसला.
अवार्डकडे बघत असताना त्याला बाजूला रिकाम्या खुर्चीवर रागिणी बसली असल्याचे दिसले. तिचा चेहरा खूप भेसूर होता. तिने त्याच्या नजरेत नजर धरली. ती नजर खूप जहरी होती. तिच्या अशा अवताराने सूरजला घाम फुटलेला असतांना रागिणीच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद जाणवत होता...
***
अमितजी राजेशला सोबत घेऊन स्टेजजवळ असलेल्या हॉलीवूड अभिनेत्यांच्या व्हॅनीटी व्हॅन मधे घेऊन गेले.
फ्रांको बोनुकीशी राजेशची लेखक म्हणून ओळख करून दिल्यानंतर ते एका लेडीच्या येण्याची वाट बघू लागले कारण या हॉलीवूड चित्रपटाच्या भारतातील विभागाची ती प्रमुख होती.
कोणत्या कामाकरता कुणाकुणाला निवडायचे, कुणाला नाही हे ठरवण्याचे अधिकार तिला होते.
थोड्याच वेळात ती व्हॅनमध्ये आली.
"राजेश, प्लीज मीट मिसेस प्रीसिला बोनुकी! प्रोजेक्ट हेड!"
तिच्याकडे बघताच राजेशच्या अंगात अचानक वीज चमकल्यासारखे झाले. ही नक्की सुप्रिया आहे, मी चुकणार नाही ओळखतांना तिला!! क्षणभर तो अवाक होऊन बघत राहिला. सुप्रिया उर्फ प्रिसिलाच्या डोळ्यात राजेशबद्दल स्पष्टपणे द्वेष जाणवत होता. अर्थात त्यांच्या या क्षणभराच्या नजरकैदेबद्दल अमितजी आणि फ्रँको याला शंका यायला काही कारण नव्हते, कारण त्यांना काहीही माहिती नव्हते! तिच्या डोळ्यातील अंगार बघून आणि तिची एकूण नजर पाहून राजेश तेथेच गर्भगळीत झाला...
त्याला आठवले, ब्रेकपच्या वेळेस सुप्रिया म्हणाली होती:
"पण, हे बघ राजेश. आपण एकाच क्षेत्रात आहोत. कामानिमित्त आपली भेट होतच राहाणार. सो लेट्स बी प्रोफेशनल! आपल्या वैयक्तिक गोष्टी कामाच्या आड येऊ द्यायच्या नाहीत. नाहीतर त्यामुळे दोघांचेही नुकसान होईल!"
आणि तिचा हा नियम पहिल्यांदा तिनेच मोडला होता, सिरीयल सोडून देऊन आणि राजेश पासून दूर निघून जाऊन! पण आता त्याने पाहिलेली सुप्रिया काहीतरी वेगळीच होती!!! मध्यंतरी एका स्थानिक वर्तमानपत्रात सुप्रियाच्या नवऱ्याच्या मृत्यूबद्दल त्याने छोटीशी बातमी वाचली होती. हिचे नाव प्रीसिला बोनुकी म्हणजे इटालियन माणसाशी हिने लग्न केले? आणि तेही फ्रांको बोनुकी याचेशी?
अमितजीच्या विनंतीला फ्रँकोने तर लगेच होकार दिला पण प्रिसिला म्हणाली, "मी दोन दिवसात निर्णय कळवते!" तिचा इंग्लिशचा उच्चार पण थोडा थोडा भारतीयच वाटत होता, म्हणजे ही नक्की सुप्रिया आहे, यात वादच नाही! मात्र तिच्या वेशभूषेत आणि केशभूषेत अमुलाग्र बदल झालेला दिसत होता. इतका बदल की जवळचे नातेवाईक किंवा मित्र मैत्रिणी वगळले तर तिला कुणीही युरोपियन समजणार हे नक्की!
उद्यापासून हॉलीवूडच्या त्या भव्य चित्रपटासाठी मॅडम अकादमी मध्ये ऑडिशन सुरू होणार होते आणि त्याची सुध्दा प्रमुख सुप्रियाच होती. असे कसे घडले? नियतीचा हा कसला डाव? राजेश भीतीयुक्त विचारात पडला.
जुजबी बोलून आणि चेहऱ्यावरील अस्वस्थता लपवत अमिताजींसोबत शक्य तितक्या लवकर व्हॅनीटी व्हॅन मधून राजेश बाहेर पडला. तो बाहेर पडेपर्यंत आणि पूर्ण परत जाईपर्यंत प्रिसिला त्याचेकडे एकटक नजरेने बघतच राहिली होती. तिच्या डोळ्यात एक प्रकारचा अंगार दिसत होता. कसलीतरी गरम ठिणगी दिसत होती.
राजेश परत येऊन नंतर सुनंदाच्या बाजूला येऊन बसला आणि कार्यक्रम पाहू लागला.
काही वेळानंतर कार्यक्रम संपला. सगळे अवार्ड देऊन झाले होते. आयोजक आता पटापट आवरा आवर करुन जाण्याची तयारी करत होते. प्रेक्षक उठून निघून गेले. मात्र शेवटच्या रांगेत प्रेक्षकांत एकजण निश्चल बसूनच आहे असे हिरो उमंग कुमारच्या लक्षात आले. त्या व्यक्तीच्या पेहरावावरून दुरूनच त्याने ओळखले की तो सूरज असावा!
उमंग कुमार त्याचेकडे पोहोचत होता तरीही सूरज खुर्चीवरून अद्याप उठला नव्हता आणि अगदी हालचाल न करता निश्चल पडून होता त्यामुळे उमंग कुमारला कसलीतरी अभद्र शंका आली. त्याला उठवायला म्हणून उमंग कुमार त्याच्या खुर्चीजवळ गेला तेव्हा अवार्ड पायाजवळ खाली पडून त्याचे दोन तुकडे झालेले त्याला दिसले. उमंगला आश्चर्य वाटले!
"ज्या धातूचा हा अवार्ड बनवला आहे तो धातू, अवार्ड नुसता खाली पडल्यावर फुटला कसा? कमाल आहे!"
असे म्हणून त्याने सूरजला हात लावून उठवण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या हाताच्या थोड्याशा धक्क्याने सूरज खुर्ची वरून खाली कोसळला...
ही बातमी कळताच घरी जायला निघालेले अनेकजण परत आले. दिनकर सिंग आणि त्यांची पत्नी यांना हे ऐकून शॉक बसला . ते पळत पळतच तेथे आले. सूरजचा असा अंत झालेला पाहून त्या दोघांना अपार दु:ख झाले. रिताशाला सुद्धा रडू येत होते.
नंतरच्या डॉक्टर आणि पोलिस यांच्या एकूण तपासानंतर सूरज हार्ट अटॅकने मेल्याचे सिद्ध झाले. काहीतरी अनपेक्षित बघून मनावर अचानक सहन न करण्याजोगे प्रचंड दडपण आल्याने मृत्यू झाला असे डॉक्टर म्हणाले. बऱ्याच जणांना वाटले की अवार्ड मिळण्याच्या आनंदामुळे असे झाले तर काहींना एका वाईट माणसाचा अंत झाल्याने आनंद वाटला.
काही दिवसानंतर कातील खान काही काळाकरता तडकाफडकी परदेशात निघून गेला त्यामुळे माया माथूरला आनंद झाला. तसेच अवार्डच्या रात्री आरशात तिला मिळालेला मेसेज शेवटी खरा ठरला आणि मायाची धारणा पक्की झाली की सूरजच्या मृत्यूसंदर्भात नक्की मेलेल्या रागीणीच्या आत्म्याचा संबंध असावा!