Get it on Google Play
Download on the App Store

वलय - प्रकरण ४१

हॉलीवूड आणि बॉलीवूड यांच्या एकत्र प्रयत्नातून जो एक जागतिक कथा असलेला भव्यदिव्य चित्रपट तयार होणार होता आणि ज्याची भारतीय पातळीवरील कलाकार निवडीसाठी एकमेव भव्य ऑडिशन “मॅडम” मध्ये टप्प्याटप्प्याने होणार होती. त्याचा डिरेक्टर आणि प्रोड्युसर होता, "पीटर ब्लूमबर्ग" आणि कास्टिंग डायरेक्टर होता, "केंट पॉल".

चित्रपटाची स्क्रिप्ट जवळपास तयार होती, पण नेमकी कथा काय आहे याची पुसटशी कल्पना ठराविक लोक वगळता कुणालाही नव्हती. ते अतिशय गुप्त ठेवण्यात आले होते. या दोघांनी मिळून आणि वेगवेगळे असे जवळपास आठ हॉलिवूड सुपरहिट आणि भव्य चित्रपट बनवले होते आणि हा त्यांचा आतापर्यंतचा एक अतिशय महत्वाकांक्षी प्रोजेक्ट होता. हे दोघेजण भारतात इतर हिंदी डिरेक्टर सोबत प्रसिद्ध मराठी डायरेक्टर "श्यामकांत निळजे" यांच्याशी सम्पर्क साधून होते कारण त्यांच्या "गावरान गोष्ट" या मराठी चित्रपटाला “हॉस्कर” आणि “गोल्डन डॉल” पुरस्कार मिळाला होता आणि तो चित्रपट या दोघांना खूप भावला होता.

हा चित्रपट 4K ultra HD म्हणजे थ्रीडीच्या पलीकडे जाऊन फोरडी तंत्रज्ञानाने बनणार होता आणि एकूणच या चित्रपटाची हवा आणि आवाका पाहता, जगभरातील मनोरंजन क्षेत्रातील व्यक्तींना या भव्य प्रोजेक्ट मध्ये थोडा का होईना सहभाग हवा होता आणि ज्यांना कोणत्या न कोणत्या कारणाने चित्रपटाचा भाग होता येणार नव्हता ते एकतर निराश तरी झाले नाहीतर त्यांनी चित्रपटाविषयी आणि चित्रपटाशी निगडित व्यक्तींचा द्वेष करणे किंवा त्यांची बदनामी करणे असे खेळ खेळण्याचे मनोमन ठरवले.

लंडनमधील जगप्रसिद्ध नाट्यभूमीतून केंटने तीन कसलेले कलाकार निवडले.

मग चायना, फ्रांस, जर्मनी अशा देशातून विविध कलाकार, गायक, संगीतकार आणि तंत्रज्ञ निवडीनंतर अभिनयसमृद्ध इटालियन चित्रपटसंस्कृतीकडे ते दोघे वळले.

आणखी एक युनिट यूएसए मधील लॉस एंजिल्स आणि नॉर्थ अमेरिकेत कार्यरत होते. इटलीतील भव्य थ्रीडी चित्रपट बघून फ्रांको बोनूकी याला विचारणा करण्यात आली.

फ्रांको जास्त प्रसिद्ध कलाकार नव्हता आणि म्हणून तो या प्रोजेक्टसाठी जास्त वेळ देऊ शकणार होता.  फ्रांकोच्या मनात एक भारतीय चेहरा होता- सुप्रिया जिचा एक्सप्रेसिव्ह आणि बोलका चेहरा त्याने सिनेसीत्ता मध्ये पहिला होता आणि तेव्हापासूनच त्याने तिला त्याच्या सिनेमात एक रोल दिला होता आणि सोबतच एक डबिंग आर्टिस्ट म्हणून काम मिळवून दिले होते.

आता सुप्रियाने या भव्य हॉलिवूड चित्रपटात काम करावे असे त्याला मनापासून वाटत होते आणि त्यासाठी त्याने केंट कडे विनंती केली होती. तिच्या आवाजाच्या क्लिप्स पाहून आणि इंग्रजीतील स्पष्ट उच्चार ऐकून केंटने तिला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. हे व्हीटोरिओला कळवल्यानंतर त्याने सुप्रियाचा फोन ट्राय केला पण तो सायलेंट वर होता कारण ती रेडिओच्या प्रोग्राम मध्ये बिझी होती. मग व्हीटोरिओने सुबोधला फोन लावण्याचे ठरवले..

याच वेळेस इटलीत एक घटना घडली. इटली देशातील कार्यरत असलेल्या एका दहशतवादी संघटनेने आपल्या मागण्यांसाठी रोम शहरातील एका बिझिनेस सेंटर जवळ ठेवलेल्या डस्टबिनमध्ये शक्तिशाली स्फोट केला. इमारतीच्या काही भागाला आग लागली. अनेक जण मारले गेले. स्फोट होतांना त्यातून अनेक छर्रे उडाले आणि अणकुचीदार पत्रे आग लागून हवेत वेगाने उडाले. जवळून एक ट्रेन जात होती आणि नेमका त्याच वेळेस हा स्फोट झाल्याने, त्या स्फोटाच्या वेगाने आणि जळते पत्रे डब्यावर आदळल्याने डब्याला आग लागली.

गरम हवेच्या झोताने डबा हळूहळू रुळावरून घसरू लागला. घाबरून डब्यातील लोक पटापट उड्या मारू लागले. ट्रेनमध्ये मोबाईलवर बातम्या वाचत सुबोध उभा होता. अचानक खिडकीतून एक जळता अणकुचीदार पत्रा त्याचेकडे आला आणि खिडकीची काच फुटली आणि त्याच्या अंगात घुसला. इतर लोकांप्रमाणे काय करायचे ते न कळून इमर्जन्सी एक्सिटच्या खिडकीतून सुबोधनेही उडी मारली आणि सुबोधसाहित ते सर्वजण बाजूच्या रुळांवर पडले. त्या रुळावर उलट्या दिशेने भरघाव वेगाने एक ट्रेन आली त्याखाली हे सगळे चिरडले गेले. सुबोधच्या दूर फेकल्या गेलेल्या मोबाईलवर व्हीटोरिओचा कॉल आला पण तो उचलायला सुबोध जिवंत नव्हता...

एफएम रेडिओच्या ऑफिस मध्ये रेडिओवर सुप्रिया प्रोग्रॅम अंकरिंग करत असतांना तिच्या प्रोग्राम कोओर्डीनेटरने तिला गाणे मध्येच थांबवून ट्रेन दुर्घटनेची अनौन्समेंट करायला सांगितली. अनौन्समेंट करता करता ज्या मृत व्यक्तींची ओळख पटली होती त्यात सुबोधचे नाव ऐकून ती बेशुद्ध झाली. रेल्वे रुळांवर सुबोधचे आयडी कार्ड सापडले असल्याने त्याच्या मृतदेहाची ओळख पटली होती.

yyyy

वलय (कादंबरी)

Nimish Navneet Sonar
Chapters
लेखकाचे मनोगत सिद्धेश प्रभूगांवकर यांची प्रस्तावना वलय - प्रकरण १ वलय - प्रकरण २ वलय - प्रकरण ३ वलय - प्रकरण ४ वलय - प्रकरण ५ वलय - प्रकरण ६ वलय - प्रकरण ७ वलय - प्रकरण ८ वलय - प्रकरण ९ वलय - प्रकरण १० वलय - प्रकरण ११ वलय - प्रकरण १२ वलय - प्रकरण १३ वलय - प्रकरण १४ वलय - प्रकरण १५ वलय - प्रकरण १६ वलय - प्रकरण १७ वलय - प्रकरण १८ वलय - प्रकरण १९ वलय - प्रकरण २० वलय - प्रकरण २१ वलय - प्रकरण २२/२३ वलय - प्रकरण २४ वलय - प्रकरण २५ वलय - प्रकरण २६ वलय - प्रकरण २७ वलय - प्रकरण २८ वलय - प्रकरण २९ वलय - प्रकरण ३० वलय - प्रकरण ३१ वलय - प्रकरण ३२ वलय - प्रकरण ३३ वलय - प्रकरण ३४ वलय - प्रकरण ३५ वलय - प्रकरण ३६ वलय - प्रकरण ३७ वलय - प्रकरण ३८ वलय - प्रकरण ३९ वलय - प्रकरण ४० वलय - प्रकरण ४१ वलय - प्रकरण ४२ वलय - प्रकरण ४३ वलय - प्रकरण ४४ वलय - प्रकरण ४५ वलय - प्रकरण ४६ वलय - प्रकरण ४७ वलय - प्रकरण ४८ वलय - प्रकरण ४९ वलय - प्रकरण ५० वलय - प्रकरण ५१ वलय - प्रकरण शेवटचे (५२) लेखकाची साहित्यिक ओळख