Get it on Google Play
Download on the App Store

45 बोधकथा


काही दिवसांपूर्वी एक पुस्तक चाळत असताना सहज एक बोधकथा वाचनात आली .ती पुढील प्रमाणे ----
भोज राजा आपल्या दरबारात बसून मंत्र्यांबरोबर गप्पा मारीत असतो .एवढ्यात एक पहारेकरी निरोप घेऊन आला कि बाहेर कुणीतरी राजाला भेटण्यासाठी आले आहे.भोजराजाला कुणीही येऊन भेटू शकत असे. भोज राजाने पहारेकऱ्याला भेटीला आलेल्या गृहस्थाना दरबारात घेऊन येण्यास सांगितले .दरबारात ते गृहस्थ आले . त्यांचा पोशाख अत्यंत साधा होता .कपडेही फार लांबून आल्यामुळे मळलेले असावेत .थोडीशी दाढी वाढलेली होती .रूपही फारसे आकर्षक नव्हते.थोडक्यात त्या गृहस्थांबद्दल चांगले मत होण्यासारखे  रूप किंवा कपडे नव्हते. गरीब भिक्षुक पैसे मागण्यासाठी आला असावा असे भोजराजाला वाटले .जरा वेळाने भोजराजाने त्याला काय पाहिजे म्हणून विचारले .त्या ग्रहस्था बरोबर बोलताना केव्हा एक तास गेला ते राजाला  कळले नाही .निरोप घेऊन ते ग्रहस्थ जाण्यासाठी निघाले .भोज राजा आसनावरून उठून त्या ग्रहस्थांबरोबर गप्पा मारीत त्यांना पोचवण्यासाठी  दरवाज्यापर्यंत गेला.त्या गृहस्थांनी राजाला विचारले की मी मगाशी आलो त्यावेळी तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष केले . आता तुम्ही आसनावरून उठून दरवाजापर्यंत आला असे का ?राजा म्हणाला की अापण जेव्हा कुणालाही प्रथम भेटतो त्यावेळी त्याचा पोशाख व रूप यावरून त्यांची पारख करतो.नंतर मात्र त्यांची बुद्धिमत्ता व ज्ञान या वरून पारख करतो .तुम्ही आला त्या वेळी तुमची पारख रूप व कपडे यावरून झाली.तासभराच्या गप्पा नंतर मी तुमचे ज्ञान व बुध्दिमत्ता यांच्या सौंदर्याने  प्रभावित झालो म्हणून आदराने तुम्हाला दरवाज्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आलो.
तात्पर्य --प्रथम मत कपडे व सौंदर्य नंतरचे मत  ज्ञान व बुद्धिमत्ता यांचे सौंदर्य .
बोधकथा वाचल्यानंतर माझ्या मनात जे विचारतरंग आले ते पुढील प्रमाणे.
येणाऱ्या माणसांकडे पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या मनात निर्माण होणारे तरंग एकाच प्रकारचे असतील का ?अर्थात निरनिराळे असतील .आलेल्या गृहस्थांकडे मंत्र्यांपैकी प्रत्येकाने दुर्लक्ष केले असते का ?जो हेर आहे ज्याच्या जवळ वेषांतर कौशल्य आहे त्याला त्याने वेषांतर केले असल्यास ते लक्षात येइल .इतरांच्या ती गोष्ट लक्षात येणार नाही  .तो त्या दृष्टीने त्याचे निरीक्षण करील व सावध राहील .जो सेनापती आहे त्याला त्या व्यक्तीच्या चालण्यावरून तो एक सैनिक तरी आहे किंवा सैन्यामध्ये होता कि नाही हे लक्षात येईल . जो सुरक्षा रक्षक आहे त्यांच्या मनात हा राजावर हल्ला करण्यासाठी आलेला नाही ना असा विचार येईल .त्या दृष्टीने तो सतर्क असेल .याप्रमाणे निरनिराळ्या लोकांच्या मनात त्यांच्या त्यांच्या संस्काराप्रमाणे व धारणे प्रमाणे निरनिराळे विचार येतील .दुर्लक्ष करण्याजोगा इथपासून ते लक्षपूर्वक पाहण्यासारखा इथपर्यंत निरनिराळे विचार अनेकजणांच्या मनात येऊ शकतील . कुणालाही पाहिल्यानंतर पाहणाऱ्यांच्या मनात एकच विचार येणार नाही .विविध विचार येतील .ही व्यक्ती दरिद्री ,श्रीमंत, भेकड ,पोशाखी, शूर ,धीट ,आक्रमक , सावध, इ.असावी अश्या प्रकारचे  अनेक विचार येऊ शकतील.म्हणजेच प्रत्येकाचे मूल्यमापन निरनिराळे असेल .कदाचित ती व्यक्ती या सर्वाहून सर्वस्वी भिन्न असण्याचा  संभवही असेल . जी गोष्ट प्रथम पाहिल्यानंतर मनात येणाऱ्या विचारांची ;तीच परिस्थिती त्याच्या जवळ गप्पा मारल्यानंतर होणार्‍या मताची असेल . प्रदेश, आर्थिक स्तर ,सांस्कृतिक वातावरण ,देश काळ जात धर्म यामध्ये जसा बदल होईल तसा मूल्यमापनाच्या कसोटय़ांमध्ये ही बदल होत जाईल . त्याप्रमाणे विचारातही आणि मूल्यमापनातही बदल होईल .सुरुवातीच्या बोध कथेतील  राजा बदलत गेलो, राजाचे व्यक्तिमत्त्व बदलत गेलो,  तर त्यांची आलेल्या गृहस्थांशी होणारी वर्तणूकही बदलत जाईल . निरनिराळ्या कालखंडांत त्याचप्रमाणे प्रदेशांत ,कसोट्यांमध्ये फरक असतो .प्रदेश ,काल , सांस्कृतिक वातावरण ,आर्थिक स्थर ,इत्यादी प्रत्येकाचा आपल्या धारणेवर परिणाम होत असतो . गणिताच्या भाषेमधे बोलावयाचे झाल्यास अनेक व्हेरिएबल्स मध्ये प्रत्येक वेळी एक व्हेरिएबल स्थिर ठेवून व इतरांमध्ये क्रमशः बदल घडवून कसकसे विचारात बदल होतील ते पहाणे मनोरंजक ठरेल  . मूल्यमापन हे व्यक्तिसापेक्ष व परिस्थितीसापेक्ष असते .अशा परिस्थितीमध्ये एखादी व्यक्ती अशाच प्रकारची आहे असे म्हणता येईल का ?ती व्यक्ती मला अशी अशी वाटते एवढेच म्हणता येईल आणि असे जर असेल तर आपण ठामपणे एखाद्या घटनेबद्दल व्यक्तीबद्दल  कसे काय बोलू शकतो?आपल्याजवळ असलेली माहितीही बहुतेकवेळा एकांगी किंवा अर्धवट स्वरूपाची असते.आपण ब्रेन वॉशिंग म्हणून फार आरडाओरडा करीत असतो . परंतु प्रत्यक्षात प्रत्येकाचे परिस्थिती नुसार सतत ब्रेन वॉशिंग होत असते हे आपल्या लक्षात आले आहे काय ?ब्रेन वॅाशिंग यापेक्षा मला ब्रेन रि-- कन्स्ट्रक्शन , ब्रेन बिल्डिंग, मेंदू पुनर्रचना,  हे शब्द जास्त योग्य वाटतात.लहानपणापासून अनेक बाजूंनी प्रत्येकाची धारणा निर्मिती,धारणा रचना,धारणा विकास , होत असतो. असे असेल तर योग्य अयोग्य, ग्राह्य अग्राह्य, स्वीकारार्ह अस्वीकारार्ह, धि:कारार्ह स्वागतार्ह ,असे वर्गीकरण ,अश्या चिठ्ठ्या ,आपण कशा काय लावू शकतो? असे वर्गीकरण व्यक्तीसापेक्ष परिस्थितीसापेक्ष कालसापेक्ष असेल . (अर्थात आपल्या धारणेनुसार अशा चिठ्ठ्या आपण लावत असतो किंवा नेहमी आपल्यापैकी प्रत्येकजण लावीत असतो )  जर एखाद्याला आपण जे करतो ते अयोग्य त्याज्य वाटेल तर तसे वर्तन तो कसे काय करील? अनेक बाजू पैकी प्रत्येक बाजूला कोणी ना कोणी असेल आणि तो त्याचे ठामपणे समर्थन करीत असेल .आणि ज्याच्या त्याच्या जागी जो तो योग्य असेल. याची जाणीव झाल्यावर मनुष्य आपोआपच मूक होतो . योग्य अयोग्य चांगले वाईट याबद्दल  निरनिराळ्या लोकांच्या कसोट्या भिन्न असतात .अशा वेळी योग्य अयोग्य याचा निर्णय आपण करू शकत नाही .हे लक्षात आल्यावर ,इतराना तावातावाने बोलताना , लिहित असताना, आचरण करताना पहाताना, तो आपल्या मनात उठणारे तरंग पाहू लागतो.इतरांच्या मनात उठणारे तरंगही त्याच्या लक्षात येऊ लागतात .दोष द्यावा किंवा प्रोत्साहन करावे असे त्याला आतूनच वाटत नाही . प्रत्येकाच्या विचारांची अपरिहार्यता  ,त्याचप्रमाणे वर्तणुकीची अपरिहार्यता ,त्याच्या लक्षात येऊ लागते.एकूणच जीवनाची अपरिहार्यता त्याच्या लक्षात येते व तो मौनी बाबा होतो .प्रत्येक वेळी तो आपल्या मनात उठणारे तरंग पाहत राहतो .(यालाच साक्षित्व किंवा निवडशून्य जागृतता असे म्हणता येईल ).
१६/८/२०१८©प्रभाकर पटवर्धन 
 

विचारतरंग

प्रभाकर पटवर्धन pvpdada@gmail.com
Chapters
1 अनाग्रह योग  2 अपेक्षा 3 अहंकार (निरहंकार) 4 आनंदाची गुरुकिल्ली  5 आपण कशाच्या शोधात आहोत ? 6 आपण कसे ऐकतो व कसे ऐकले पाहिजे 7 आपण कुठे असतो ? 8 एक होता ससा व एक होते कासव 9 साधू 10 एकनाथ महाराज 11 कंटाळा 12 क्रोध 13 क्षणभंगुर 14 खरा बलवान कोण 15 खरे स्वातंत्र्य 16 गुरूची आवश्यकता आहे काय 17 चक्रवर्ती 18 जादूचा चेंडू 19 जीवनाची अपरिहार्यता 20 ज्ञात व अज्ञात 21 ज्ञानसागर 22 टीका 23 तुझे रूप चित्ती राहो तुझे मुखी नाम 24 तू माझा सांगाती 25 दिवा स्वप्न व कठोर परिश्रम 26 दुःख क्लेश इत्यादी 27 दृष्टिकोन - काका कालेलकर 28 देवदास 29 देैव व प्रयत्न 30 द्वेष मत्सर असूया राग इत्यादी विषयी- 31 धर्म 32 धारणा 34 नार्सिसस 35 निरहंकारी शंकराचार्य 36 परमेश्वर 37 पोकळी 38 प्रतिक्रिया 39 प्रार्थना एकाग्रता व ध्यान 40 प्रेम 41 फूटपटया 42 बदल 43 बदला बद्दल 44 बहिर्मन व अंतर्मन 45 बोधकथा 46 भगवान 47 भीति 48 भूतकथा 49 मानसिक गोंधळा विषयी 50 मी कोण? 51 मृत्यूची भीती 52 मोह व भीति 53 राष्ट्राभिमान 54 रिकामपणाची बडबड 55 विश्वास 56 शरण जाणे 57 शांततेचे महत्त्व (आजोबा व त्यांचा नातू ) 58 शिक्षण ज्ञान व सत्य 59 शिस्त 60 श्रद्धा 61 संकट 62 संत उमर आणि भटका माणूस 63 सत्य व असत्य 64 संबंधमयता 65 समज व समंजसपणा 66 समर्थन ६७ समस्या ६८ साधू व विंचू ६९ सुख व दुःख ७० स्मरण ७१ स्वनिरीक्षण व जागृतता ७२ स्वर्ग आणि नरक ७३ स्वशॊध ७४ स्वावलंबन ७५ हिमनग ७६ कलियुग ७७ दिव्य दृष्टी ७८ काळोख ७९ मीचे दृढीकरण