Get it on Google Play
Download on the App Store

वेषधार्‍याच्या भावना - अभंग २५८४ ते २६०८

२५८४

कलिमाजीं दैवतें उघड दिसती फार । नारळ आणि शेंदुर यांचा भडिमार ॥१॥

लटिका देव लटिका भक्त लटिके सर्व वाव । सात धान्याचें धपाटे मागती काय त्यांचा बडिवार ॥२॥

तेल रांधा मागती मलीदा वरती काजळ कुंकूं । फजीतखोर ऐसें देव तयाचें तोडावर थुंकु ॥३॥

एका जनार्दनीं सर्वभावें सोपा पंढरीराव । तया सांडोनी कोण पुसे या देवाची कायसी माव ॥४॥

२५८५

भक्त रागेला तवकें । देव फोडोनि केलें कुटकें ॥१॥

कटकट मूर्ति मागुती करा । मेण लावुनी मूर्ति जडा ॥२॥

न तुटे न जळे कांहीं न मोडे । त्या देवाचे केलें तुकडे ॥३॥

रांडवा म्हणती आगे आई । कैसा देव फोडिला बाई ॥४॥

जवळींच शुद्ध असतां देवो । भक्तांसी पडीला सदेवो ॥५॥

शाळीग्रामक शुद्ध शिळा । हारपलीया उपवास सोळा ॥६॥

चवदा गांठींचा बांधिला दोरा । तोही अनंत नेला चोरा ॥७॥

अनंतासी अंतु आला । भक्ता तेथें खेदु जाहला ॥८॥

एका जनार्दनीं भावो । नाहीं तंव कैंचा देवो ॥९॥

२५८६

देव म्हणती मेसाबाई । पूजा अर्चाकरिती पाही ॥१॥

नैवेद्य वहाती नारळ । अवघा करिती गोंधळ ॥२॥

बळेंचि मेंढरें बोकड मारिती । सुकी रोटी तया म्हणती ॥३॥

बळेंचि आणिताती अंगा । नाचताती शिमगी सोंगा ॥४॥

सकळ देवांचा हा देव । विसरती तया अहंभाव ॥५॥

एका जनार्दनीं ऐसा देव । येथें कैसा आमुचा भाव ॥६॥

२५८७

प्रेमें पूजी मेसाबाई । सांडोनियां विठाबाई ॥१॥

काय देईल ती वोंगळा । सदा खाय अमंगळा ॥२॥

आपुलीये इच्छेसाठीं । मारी जीव लक्ष कोटी ॥३॥

तैसी नोहे विठाबाई । सर्व दीनाची ती आई ॥४॥

न सांडीची विठाबाई । एका जनार्दना पाहीं ॥५॥

२५८८

सांडोनियां विठाबाई । कां रें पूजितां मेसाई ॥१॥

विठाबाई माझी माता । चरणीं लागो इचे आतां ॥२॥

अरे जोगाई तुकाई । इजपुढें बापुड्या काई ॥३॥

एका जनार्दनीं माझीं आई । तिहीं लोकीं तिची साई ॥४॥

२५८९

आलों ऐकोनी खंडोबाची थोरी । वाघा होऊनि मज मागा म्हणती वारी ॥१॥

ठकलों ठकलों वाउगा सीण । वारी मागतां पोट न भरे जाण ॥२॥

सदा वागवी कोटंबा आणि झेंडा । रांडापोरें त्यजिलीं जालों काळतोंडा ॥३॥

गेले दोनी ठाव आतां कोठें उरला वाव । एका जनार्दनीं भेटवा मज पंढरीरावो ॥४॥

२५९०

पूजिती खंडेराव परत भरिती । विठ्ठल विठ्ठल न म्हणती अभागी ते ॥१॥

लावुनि भंडार दिवटा घेती हातीं । विठ्ठल म्हणतां लाजती पापमती ॥२॥

ऐसियासी भाव सांगावा तो कवण । एका जनार्दनी काय वाचा शरण ॥३॥

२५९१

फजितीचे देव मागती घुटीरोटी । आपणासाठीं जगा पीडितो काळतोंडें मोठीं ॥१॥

नको तया देवा आठवा मजसी । विठ्ठल मानसीं आम्हीं ध्याऊं ॥२॥

अविचारी देव अविचारी भक्त । देवाकारणें मारिती पशुघात ॥३॥

एका जनार्दनीं जळो जळो ऐसा देव तो भांड । विठ्ठल विठ्ठल न म्हणे त्याचें काळें तोंड ॥४॥

२५९२

म्हणती देव मोठे मोठे । पूजिताती दगडगोटे ॥१॥

कषाट नेणती भोगिती । वहा दगडातें म्हणती ॥२॥

जीत जीवा करुनि वध । दगडा दाविती नैवेद्य ॥३॥

रांदापोरें मेळ जाला । एक म्हणतो देव आला ॥४॥

नाक घासुनी गव्हार । देवा म्हणती गुन्हेगार ॥५॥

एका जनार्दनीं म्हणे । जन भुललें मुर्खपणें ॥६॥

२५९३

पाषाणाची करूनि मूर्ति । स्थापना करिती द्विजमुखें ॥१॥

तयां म्हणताती देव । विसरुनि देवाधिदेव ॥२॥

मारिती पशूंच्या दावणी । सुरापाणी आल्हाद जयां ॥३॥

आमुचा देव म्हणती भोळा । पहा सकळां पावतसे ॥४॥

ऐशा देवा देव म्हणे न कोणीही । एका विनवी जनार्दनीं ॥५॥

२५९४

प्रतिमेचा देव केला । काय जाणें ती अबला ॥१॥

नवस करिती देवासी । म्हणती पुत्र देई वो मजसी ॥२॥

न कळेचि मुढा वर्म । कैसें जाहलेंसे कर्म ॥३॥

प्रतिमा केलीसे आपण । तेथें कैचे देवपण ॥४॥

देव खोटा नवस खोटा । एका जनार्दनीं रडती पोटा ॥५॥

२५९५

देव दगडाचा भक्त तो मेणाचा । एका दोहींचा विचार कैसा ॥१॥

खरेपणा नाहीं देवाचे ते ठायीं । भक्त अभाविक पाहीं दोन्हीं एक ॥२॥

एका जनार्दनीं ऐसें देवभक्तपण । निलाजेर जाण उभयतां ॥३॥

२५९६

करूनि नवस मागती ते पुत्र । परी तो अपवित्र होय पुढे ॥१॥

नासोनियां धर्म करी वेडेचार । भोगिती अघोर पापमती ॥२॥

सदा सर्वकाळ निंदावें सज्जन । काया वाचा मन परद्रव्या ॥३॥

परनारी देखतां सुख वाटे मनीं । भोगी वित्त हानी पाप जोडे ॥४॥

ऐसिया पामरा दंड तो कोण । तयाचे वदन कृष्णवर्ण ॥५॥

एका जनार्दनीं नवासाचें फळ । कुळीं झाला बाळ बुडवणा ॥६॥

२५९७

जयाचेनि तुटे भवबंधन । तयासी जाण विसरती ॥१॥

करिती आणिकांची सेवा । ऐसे ते अभागी निर्दैवा ॥२॥

मुळींच नाहीं देवपण । तेथें करिती जप ध्यान ॥३॥

विसरूनि खर्‍या देवासी । भुलले आपुल्या मानसीं ॥४॥

सत्य सत्य बुडती जनीं । एका शरण जनार्दनीं ॥५॥

२५९८

वोस घर वस्तीस काह्मा । तैसें देवा कोण पुसे ॥१॥

सांडोनियां पंढरीराणा । वोस राना कोण धांवे ॥२॥

घेती मासांचें अवदान । देवपण कैंचे तेथें ॥३॥

ऐसिया देवासी पुजणें । एका जनार्दनीं खोटें जिणें ॥४॥

२५९९

येउनी नरदेहा भूतातें पूजिती । परमात्मा नेणती महामुर्ख ॥१॥

दगडाच्या देवा सेंदुराचा भार । दाविती बडीवार पूजनाचा ॥२॥

रांडापोरें घेती नवासाची बगाड । नुगवे लिगाड तयाचेनि ॥३॥

आपण बुडती देवा बुडविती । अंतकाळी होती दैन्यावाणें ॥४॥

एका जनार्दनीं ऐसिया देवा । जो पूजी गाढवासम होय ॥५॥

२६००

भजन चालिलें उफाराटें । कवण जाणें खरें खोटें ॥१॥

जवळी असतां देव । भक्तां उपजला संदेह ॥२॥

सचेतन तुळशी तोडा । वाहाती अचेतन दगडा ॥३॥

बेला केली ताडातोडी । लिंगा लाखोली रोकडी ॥४॥

आग्निहोत्राचा सुकाळ । शमी पिंपळासी काळ ॥५॥

तिन्हीं देव पिंपळांत । अग्निहोत्रीं केला घात ॥६॥

मुख बांधोनी बोकड मारा । म्हणती सोमयाग करा ॥७॥

चवदा गांठींचा अनंत दोरी । तो प्रत्यक्ष नेला चोरी ॥८॥

शालिग्राम शुद्ध शिळा । हारपलीया उपवास सोळा ॥९॥

एका जनार्दनीं एक भाव । कुभाविका कैंचा देव ॥१०॥

२६०१

प्रतिमा देव ऐसा ज्याचा भाव । न करी निर्वाहो अंगो अंगीं ॥१॥

असतां सर्वत्र बाहेरी अंतरीं । संतुष्टा भीतरीं म्हणे देव ॥२॥

तेचि ते द्वारका तेचि हें पंढरी । सर्वत्र न धरी तोचि भाव ॥३॥

तीर्थयात्रा करी देवक असे क्षेत्रीं । येर काय सर्वत्री वोस पडलें ॥४॥

पुण्य क्षेत्रीं पुण्य अन्य क्षेत्रीं पाप । नवल संताप कल्पनेचा ॥५॥

एका जनार्दनीं स्वतः सिद्ध असे । नाथिलेंची पिसें मत वाद ॥६॥

२६०२

देव देहीं आहे सर्व ते म्हणती । जाणतिया न कळे गती देव नेणे ॥१॥

ऐसें ते भुलले देवा विसरले । तपताती वहिले करुनी कष्ट ॥२॥

देवाची ती भेटी नाहीं जाहली तया । शिणताती वायां कर्महीन ॥३॥

एका जनार्दनीं जवळी असोनी देव । कल्पनेंन वाव केला मनें ॥४॥

२६०३

सर्वात्मक भरला देवो । तेथें न ठेविती भावो ॥१॥

ऐशी भुललीं कर्मासी । आचरती तीं दोषासीं ॥२॥

सर्व ठायीं व्यापक हरी । कोण द्वेषी कोण वैरी ॥३॥

ऐसे अभागी ते हीन । भोगीताती जन्मपतन ॥४॥

नको ऐसें ब्रह्माज्ञान । एका जनार्दनीं शरण ॥५॥

२६०४

देव सर्वाठायीं वसे । परि न दिसे अभाविकां ॥१॥

जळीं स्थळीं पाषाणीं भरला । रिता ठाव कोठें उरला ॥२॥

जिकडे पाहे तिकडे देव । अभाविकां दिसे वाव ॥३॥

एका जनार्दनीं नाहीं भाव । तंव तया न दिसे देव ॥४॥

२६०५

लटिक्या भावाचें । देवपण नाहीं साचें ॥१॥

भाव नाहीं जेथें अंगी । देव पाहतां न दिसे जगीं ॥२॥

सर्व काळ मनीं कुभाव । जैसा पाहे तैसा देव ॥३॥

लटिकी भंड फजिती । एका जनार्दनीं निश्चिती ॥४॥

२६०६

देहीं असोनियां देव । वाउगा करिती संदेहो ॥१॥

जाय देवळासी स्वयें । मनीं आशा दुसरी वाहे ॥२॥

बैसोनीं कीर्तनीं । लक्ष लावी सदां धनीं ॥३॥

करुं जाय तीर्थयात्रा । गोविलें मन विचारा ॥४॥

ऐशियासी न भेटे देव । एका जनार्दनीं नाही भाव ॥५॥

२६०७

ब्रह्मा एक परिपूर्ण । तेथें नाहीं दोष गुण ॥१॥

पराचा देखती जे दोष । तेचि दोषी महादोषी ॥२॥

ब्रह्मीं नाहें दोष गुण । पाहती ते मुर्ख जाण ॥३॥

जे गुणदोषी देखती । एका जनार्दनीं नाडती ॥४॥

२६०८

मी तेचि माझी प्रतिमा । तेथें नाहीं आन धर्मा ॥१॥

तेथें असे माझा वास । नको भेदे आणि सायास ॥२॥

कलियुगीं प्रतिमेपरतें । आसना साधन नाहीं निरुतें ॥३॥

एका जनार्दनीं शरण । दोन्हीं रूपें देव आपण ॥४॥

श्रीसंतएकनाथ गाथा - भाग तिसरा

Shivam
Chapters
कलिप्रभाव - अभंग २५७४ ते २५८३ वेषधार्‍याच्या भावना - अभंग २५८४ ते २६०८ ब्राह्मण - अभंग २६०९ ते २६१३ विद्यावंत - अभंग २६१४ वेदपाठक - अभंग २६१५ ते २६१८ पुराणिक - अभंग २६१९ ते २६२५ संन्यासी - अभंग २६२६ ते २६३५ जपी तपी - अभंग २६३६ ते २६४१ योगी - अभंग २६४२ तीर्थीं - अभंग २६४३ ते २६४४ महंत - २६४६ ते २६४६ मुक्त - अभंग २६४७ वैराग्य - अभंग २६४८ ते २६५४ गोसावी - अभंग २६५५ ते २६६० गुरु - अभंग २६६१ ते २६६५ मानभाव - अभंग २६६६ ते २६६७ फकीर - अभंग २६६८ अर्थी - अभंग २६६९ आशाबद्ध - अभंग २६७० संत - अभंग २६७१ ते २६७२ फडकरी - अभंग २६७३ भजनी - अभंग २६७४ ते २६७५ पुजारी - अभंग २६७६ कथेकरी - अभंग २६७७ ते २७०० कथेकरी - अभंग २७०१ ते २७२० कथेकरी - अभंग २७२१ ते २७४० कथेकरी - अभंग २७४१ ते २७६० कथेकरी - अभंग २७६१ ते २७८० कथेकरी - अभंग २७८१ ते २८०८ समाधि योग - अभंग २८०९ ते २८२० समाधि योग - अभंग २८२१ ते २८४० समाधि योग - अभंग २८४१ ते २८६० समाधि योग - अभंग २८६१ ते २८८६ देह - अभंग २८८७ ते २९१० देह - अभंग २९११ ते २९३० देह - अभंग २९३१ ते २९५० देह - अभंग २९५१ ते २९७० देह - अभंग २९७१ ते २९९० देह - अभंग २९९१ ते ३०१२ स्त्री - अभंग ३०१३ ते ३०२५ स्त्री - अभंग ३०२६ ते ३०४१ धन - अभंग ३०४२ ते ३०५१ विषय - अभंग ३०५२ ते ३०७५ विषय - अभंग ३०७६ ते ३०८२ संसार - अभंग ३०८३ ते ३१०० संसार - अभंग ३१०१ ते ३१२० संसार - अभंग ३१२१ ते ३१४० संसार - अभंग ३१४१ ते ३१७७ मुमुक्षूंस उपदेश - ३१७८ ते ३२०० मुमुक्षूंस उपदेश - ३२०१ ते ३२२० मुमुक्षूंस उपदेश - ३२२१ ते ३२४० मुमुक्षूंस उपदेश - ३२४१ ते ३२६० मुमुक्षूंस उपदेश - ३२६१ ते ३२८० मुमुक्षूंस उपदेश - ३२८१ ते ३२९२ उद्धवास बोध - अभंग ३२९३ ते ३२९४ मनास उपदेश - अभंग ३२९५ ते ३३१० मनास उपदेश - अभंग ३३११ ते ३३३० मनास उपदेश - अभंग ३३३१ ते ३३४३