समाधि योग - अभंग २८६१ ते २८८६
२८६१
पूजन तो एक पुरे । वाचे स्मरे रामनाम ॥१॥
नको गंधाक्षता तुळशी । मुखीं नाम अहर्निशीं ॥२॥
धूप दीप नैवेद्य तांबूल । सदा वाचे नाम बोल ॥३॥
आर्ती धूपार्ती अक्षता । राम गाऊं निःसीमता ॥४॥
एका जनार्दनीं शरण । सहज पूजा घडे जाण ॥५॥
२८६२
सहजची पूजा पुरे । श्रम वाउगांची उरे ॥१॥
आठवीन वेळोवेळां । केशवा माधव गोपाळा ॥२॥
मंत्रस्नान विभूती । मुखीं राम जपविती ॥३॥
नाहीं आणीक काम । वाचे म्हणे रामनाम ॥४॥
एका जनार्दनीं बरवी । पूजा करीन देवदेवीं ॥५॥
२८६३
देवांचें पूजन । घडतां रामस्मरण ॥१॥
हेचि एका पूजा सार । वायां कासया पसर ॥२॥
करुं बैसे देवपूजे । मनीं भाव आन दुजे ॥३॥
ऐसें पूजेचें लक्षण । सांगें एका जनार्दन ॥४॥
२८६४
बरवी ती पूजा । जेणें पावे अधोक्षजा ॥१॥
मुखीं नाम वाहे टाळी । पूजा केली उत्तम हे ॥२॥
तुळशीमाळा गोपिचंद । पूजा छंद हाची मनीं ॥३॥
व्रत करी एकादशी । जाग्रण निशीं सर्वदा ॥४॥
एका जनार्दनीं तुष्टें देव । पूजा भाव तेणें पावें ॥५॥
२८६५
देवपुजा करी आदरें । अतीत आलिया न बोले सामोरें ॥१॥
कासया पूजन दांभिक । तेणें देवा नोहे सुख ॥२॥
अतीतासी देणें पूजा । तेणें संतोषें पावे पूजा ॥३॥
एका जनार्दनीं पूजा । ऐसी न करी गरुडध्वजा ॥४॥
२८६६
डोळियांनें रूप पहावें साचार । मुखानें उच्चार रामनाम ॥१॥
हृदयीं आठव नाम तें वसावें । करें पैं अर्पावे संतचरण ॥२॥
पदें प्रदक्षणा करी तीर्थाटन । हेंची पैं कारण पूजनाचें ॥३॥
एका जनार्दनीं ऐशी करी पूजा । तेणें गुरुराजा तोष पावे ॥४॥
२८६७
जीव शिव दोन्हीं एकचि आसनीं । पूजी अवसानीं सर्वकाळ ॥१॥
कामक्रोध यांचा मानूनि विटाळ । पूजन सर्वकाळ बरें होय ॥२॥
परद्रव्य परस्त्री येथें आसक्त नोहे मन । तेणें जनार्दन पूजा पावे ॥३॥
एका जनार्दनीं ममता टाकुनी । संतांचे चरणीं पूजन करी ॥४॥
२८६८
आपुली पूजा आपण करावी । ही जंव ठावी राहटीं नाहीं ॥१॥
कासया ती पूजा जाणिवेचा शीण । त्याहुनी अज्ञान बरा दिसे ॥२॥
एका जनार्दनीं ज्ञानाज्ञानें । पुजावें श्रीचरण विठोबाचे ॥३॥
२८६९
नाना तें चरित्र श्रीहरीचे वाचे । आठवावें साचें अघहरणा ॥१॥
केशव माधव अच्युत गोपाळ । गोविंद गोकुळपाळ वाचे वदा ॥२॥
वामन श्रीरामकृष्णातें आठवा । हृदयीं साठवा वेळोवेळां ॥३॥
एका जनार्दनीं ऐसा जया हेत । तो वसे जगांत जगरूप ॥४॥
२७७०
हृदयींच स्नान हृदयींच ध्यान । हृदयींच भजन सर्वकाळ ॥१॥
हृदयींच दान हृदयींच धर्म । ह्रुदयींच नेम सर्व जोडे ॥२॥
हृदयींच कथा पुराण श्रवण । हृदयींच चिंतन सर्व सदा ॥३॥
हृदयींचा दिसे एक जनार्दनीं । हृदयींच एकपणीं बिंबलासे ॥४॥
२८७१
हृदयींचे देव हृदयींच भक्त । हृदयींच होत पूजा सर्व ॥१॥
ह्रुदयींच ध्यान हृदयीं जें मन । हृदयीं तें आसन देव वसे ॥२॥
ह्रुदयीं ते भुक्ति ह्रुदयीं ते मुक्ति । हृदयीं सर्वस्थिती देव जाणों ॥३॥
एका जनार्दनीं हृदयींच पाहाल । तें सुख घ्याल हृदयामाजीं ॥४॥
२८७२
हृदयस्थ जया नाहीं ठावा देव । पूजा करती वाव सर्वभावें ॥१॥
जाणावा अंतरीं मानावा हृदयीं । पहावा सर्वांतरीं परमात्मा ॥२॥
एका जनार्दनीं व्यापक सर्वांठायीं । भरुनीं उरला ठाई जेथें तेथें ॥३॥
२८७३
देवासी तो पुरे एक प्रेमभाव । पूजा अर्चा वाव सर्व जाणा ॥१॥
मनापासूनियां करितां कीर्तन । आनंदें नर्तन गातां गीत ॥२॥
रामकृष्णहरि उच्चार सर्वदा । कळिकाळ बाधा तेणें नोहे ॥३॥
एका जनार्दनीं हाचि पैं विश्वास । सर्वभावें दास होईन त्याचा ॥४॥
२८७४
सप्रेमें करितां भजन । तेणें घडती कोटी यज्ञ ॥१॥
प्रेम सार प्रेम सार । वायां भार कुंथेचा ॥२॥
प्रेमेंविण न भेटे देवो । अवघा वावो पसारा ॥३॥
एका जनार्दनीं प्रेम सार । तुटे वेरझार येणें जाणें ॥४॥
२८७५
बह्मांडाची दोरी । हालवी जो एक्याकरीं ॥१॥
भूतीं परस्पर मैत्री । तीं ऐक ठायीं असतीं वरी ॥२॥
पंचप्राणांचें जें स्थान । तये कमळीं अधिष्ठान ॥३॥
एका जनार्दनीं सुत्रधारी । बाहुली नाचवी नानापरी ॥४॥
२८७६
मिथ्या मायेच्या धाकासाठीं । योगी रिगाले कपाटीं ॥१॥
आसन घालूनियां जाण । आकळिती पंचप्राण ॥२॥
क्षुधेनें खादली भूक । तृषा तहान प्याली देख ॥३॥
बुद्धी सुबुद्धि धरूनि हातीं । आकळितसे इंद्रियवृत्ती ॥४॥
शांतीचेनि बळें । संकल्प त्यागिले सकळ ॥५॥
ऐशी योगाची कहाणी । शरण एका जनार्दनीं ॥६॥
२८७७
प्राणपानांची मिळणी । शक्ति चेतवी कुंडलिनी ॥१॥
ती आधारशक्ति अचाट । चढे पश्चिमेचा घाट ॥२॥
कुंडलिनी चालतां वाटा । चुकल्या आधिव्याधींच्या हाटा ॥३॥
साधितां उल्हाट शक्ति उलटे । उघडलें ब्रह्मारंध्राचें कपाट ॥४॥
शरीराकारें ते बोलिली । एका जनार्दनीं पुतळी ॥५॥
२८७८
समुद्र क्षोभे वेळोवेळीं । योगिया क्षोभेना कोण्हाकाळीं ॥१॥
समुद्रा भरितें पर्वसंबंधे । योगी परिपूर्ण परमानंदें ॥२॥
समुद्र सर्वदा तो क्षार । तैसा नव्हे योगीश्वर ॥३॥
समुद्रीं वरुषतां घन । जीवनीं मिळतसे जीवन ॥४॥
योगियांची योग स्थिती । सदा परमार्थ भक्ती ॥५॥
एका जनार्दनीं शरण । योगियांचें जें योगचिन्ह ॥६॥
२८७९
सर्प बिळामाजीं रिगें । हें तो देखतीक सवेगें ॥१॥
तैसा योगियांचा योग । सर्पापरी भूमी व्यंग ॥२॥
दावितां आचारू । हासताती लहान थोरू ॥३॥
म्हणती एक कर्मठ । ऐक म्हणती योगभ्रष्ट ॥४॥
एक निंदिती वंदिती । ऐशी आहे योगस्थिती ॥५॥
यापरीस उत्तम साधन । एका जनार्दनीं शरण ॥६॥
२८८०
प्राण रक्षणापुरतें । योगी मागती भिक्षेतें ॥१॥
तैसा साधावा हा योग । जेणें साधे अंतरंग ॥२॥
रिघोनी कमळिणीपाशीं । भ्रमर लोंधे अमोदासी ॥३॥
कोरडेंक काष्ठ भेदूनि जाय । तो कमळदळीं गुंतोनि राहे ॥४॥
एका जनार्दनीं योग । ऐसा साधावा अनुराग ॥५॥
२८८१
चार मुद्रा आणि समाधी त्या चारी । दिसती चक्राकारी स्वरुप हें ॥१॥
चहूं समाधीचें पाहीं हें देखणें । विकळतां तेणेंक सहजीं व्हावी ॥२॥
जिकडे पाहतां तिकडे स्वरूपचि दिसे । तयामाजी ठसे आणिक बिंब ॥३॥
मसूरप्रमाण शून्य महा तें कारण । गुरुमुखें खूण जाणावी पैं ॥४॥
साचार स्वरूपाची मेळवणी केली । परात्पर ठेली हेंचि ज्योती ॥५॥
त्याच वस्तूसाठीं भांडती पुराणें । वेद शास्त्रें येथें मौनावलीं ॥६॥
गुह्मा हें पंचक देखोनी समाधी । बोलोनियां वेदीं निश्चयो केला ॥७॥
एका जनार्दनीं स्वरूप उरलें पाहीं । द्वैत गेलें पायीं सद्गुरूच्या ॥८॥
२८८२
कैसे झालें देवदर्शन । देवा पाहतां आहे कोण ॥१॥
डोळा उघडॊनियां पाहे । पैल देव दिसताहे ॥२॥
पैल देव तो मी भक्त । दोहींसी कोण आहे देखत ॥३॥
एका जनार्दनीं पाहे । पाहणें पाहतां देवाचि आहे ॥४॥
२८८३
दुबार बाहुली वस्तुरूप झाली । पाहतां सोहं मेळी चिदांनंद ॥१॥
अधमात्रा स्थान नयनींच प्रमाण । मसुरेसमान हा वर्ण जेथें ॥२॥
सुषुम्ना कुंडलिनी कासीया सांगातिनी । निश्चिती तें नयनीं बिंदुरूप ॥३॥
एका जनार्दनी पाहे डोळियां भीतरीं । सबाह्म अभ्यंतरीं तरीच दिसे ॥४॥
२८८४
स्वाहिताकारणें विचार न कळे । संध्येंचें हें मुळ आम्ही जाणों ॥१॥
अर्ध बिंबीं सूर्य धरूं माध्यान्हासी । अस्तु जातां त्यासी अर्घ्य देतो ॥२॥
नासिकेचें अग्र सुषुम्ना विंदान । करी प्राणायाम वेगळाची ॥३॥
साहीं चक्र जप वर्णदळीं संकल्प । पूजा तर्पणयुक्त मंत्र सहज ॥४॥
त्रिपुटीपासोनि डोळिया वंदन । रक्त श्वेत गुण पीत भासे ॥५॥
आर्धाकीं पाहे अणुरेणु सरी । गगन शून्याकारी विखुरलें ॥६॥
विराजली संध्या बैसली जे बाळा । चंद्र सूर्य कळा लाजविल्या ॥७॥
हृदयापासोनी नाबेहेचा नेट । मनीं बळकट पुष्टी व्हावी ॥८॥
मूळबंधापासूनि दिधली आटणी । हृदयीं कुंडलिनी सिद्ध संघ ॥९॥
दाही दिशा करी प्रदक्षिणा वेडा । गगनीं बीज सडा माजिविलें ॥१०॥
एका जनार्दनीं संध्या हेंचि रीती । सहस्त्रदळीं ज्योति निजबिंदु ॥११॥
२८८५
विधियुक्त नोहे संध्यास्नान । तेणें घडें पतन कल्पकोटी ॥१॥
रेचक पूरक कुंभक ब्रहाटक । प्राणायाम देखन साधेचि ॥२॥
मूळ मंत्र न्यास विधि बीज । न घडतां सहज दोष लागे ॥३॥
हृदय कवच शिखा शिरीं । नेत्र अस्त्रादिक फटकारीन साचे ॥४॥
एका जनार्दनीं यातायाती । पुढें फजिती जन्मोजन्मीं ॥५॥
२८८६
निर्लज्ज होऊनि नाचे महाद्वारी । वाचें वदे हरी सर्वकाळ ॥१॥
व्रत करी सदा नामाचें पारणें । अखंड तें तेणें रामकृष्ण ॥२॥
पंढरीची वारी घडे सर्वकाळ । कीर्तन कल्लोळ मुखीं सदा ॥३॥
एका जनार्दनीं भजनीं सादर । सर्व वेरझार खुंटे त्याची ॥४॥