वेद उद्भवे त्रिकांड । कंब...
वेद उद्भवे त्रिकांड । कंबुकंठ शोभा दंड ।
आपाद प्रचंड । वैजयंति साजिरी ॥१॥
आयुधमंडित चारी भुजा । दशांगुळें उदार हस्त वोजा ।
भक्तपाळण गरुडध्वजा । भक्तराजा हें नाम ॥२॥
नाना भूषणें मणगटीं । दंड सरळ चंदन उटी ।
बाहु सरळ मयूरवेटी । केयूरांगद मिरवती ॥३॥
रम्य हनुवटी साजिरी । दंतपंक्ति विराजे अधरीं ।
नासिक ओतींव कुसरी । शुकाचिये परी शोभलें ॥४॥
नेत्र आकर्ण कमळाकार । भोंवया व्यंकटा भाळ विस्तार ।
उटी पिवळी टिळक कस्तूर । शोभा अपार मुगुटाची ॥५॥
माथां धरिला किरीट । मयूरपिच्छ लाविले दाट ।
हिरे घन एकवट । नीळकंठ मस्तकीं ॥६॥
अनेक भ्रमर सुवास । सेविताती आमोदरस ।
तुका म्हणे त्या भाग्यास । पार नाहीं पाहत्या ॥७॥