बोलविला देह आपुलेनी हातें...
बोलविला देह आपुलेनी हातें । हुतासिली भूतें ब्रम्हा अग्नि ॥१॥
येक वेळ केलें सकळ कारण । आतां नारायण नारायण ॥२॥
अमृतसंजीवनी निवविली खाई । अंगें तया ठायीं हारपलीं ॥३॥
एकादशी केलें जाग्रण उपवास । बारावा दिवस भोजनाचा ॥४॥
अवघीं कर्में केलीं क्लशस्फोटापाशीं । संबंध एकेंसी उरला नामा ॥५॥
तुका म्हणे आतां आनंदी आनंदु । गोविंदीं गोविंदु विस्तारला ॥६॥