हा रस आनंदाचा । घोष काला ...
हा रस आनंदाचा । घोष काला हरिनामाचा ।
कोण दैवाचा । भाग्य लाहे येथील ॥१॥
पुण्य पाहिजे बहुत । जन्मांतरींचें संचित ।
होईंल करित । आला अधिकारी तो ॥२॥
काय पाहतां भाई । हरुषें नाचों घनघाई ।
पोटभरी कांहीं । घेतां उरी नेठवी ॥३॥
जें सुख दृष्टी आहे । तेंच अंतरीं जो लाहे ।
तुका म्हणे काय । कळिकाळ बापुडें ॥४॥