शयनकक्ष किंवा बेडरूम
घराचा कर्ता पुरुष आणि स्त्री जेथे झोपतात किंवा आराम करतात ती बेडरूम वास्तूतील महत्त्वाचे दालन आहे. दिवसभराच्या धावपळीचा, श्रमाचा परिहार या खोलीत होतो. शांतपणे आराम आणि झोप झाली तर मनुष्य उत्साही राहतो. शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम असल्याने मनुष्य प्रगती करतो.
बेडरूम नेहमी वास्तूच्या दक्षिण, पश्चिम दिशेला असावे. पलंग किंवा बेड शयनगृहात दक्षिणे दिशेकडील नैऋत्य कोपऱ्यात ठेवावी. शक्य नसल्यास पश्चिमेकडे पलंग व पाय उत्त्तरेकडे असावेत. पूर्वेकडे डोके केल्यासही चालते.
बेडरूम मध्ये देवघर नसावे. ईशान्येला पलंग ठेवू नये आणि त्या दिशेला पाय करू नयेत. बेडरूमच्या आग्नेय वा दक्षिणेस दरवाजा नसावा.
दक्षिण भिंतीला खेटून जड कपाट वा लाकडी फर्निचर करावे. अॅटॅच बाथरूम असेल उत्तर किंवा पश्चिम दिशेला बनवावे.
रंगसंगती चांगली असावी. गुलाबी, पोपटी असे रंग निवडावेत. अतिप्रखर उजेड नसावा. असला तर खिडकीला पडदा लावावा. पडद्याचा रंग रंगसंगतीशी मिळताजुळता असावा. वस्तू व्यवस्थित ठेवाव्यात. शयनगृहात प्रसन्न निसर्गचित्र, राधा-कृष्ण, शिव-पार्वती अशी चित्र लावू शकतो. इतर प्रकारची चित्रे किंवा कॅलेंडर लावू नये.
ड्रेसिंग टेबल किंवा कपाटाच्या आरशात पलंगावर झोपलेल्या माणसाचे प्रतिबिंब दिसणार नाही याची दक्षता घ्यावी. मुलांसाठीची बेडरूम पश्चिम दिशेला असावी.
मनमोहक अशी अंतर्गत सजावट असावी. अडगळ ठेवू नये. माळा नसावा आणि असल्यास त्यावर अडगळ ठेवू नये. मोडक्या तोडक्या वस्तू फेकून द्याव्यात.