Get it on Google Play
Download on the App Store

प्रकरण ३

एक एक फोटो बघत असताना विमान आफ्रिकेला कधी उतरले हे दोघांनाही कळलं नाही. विमानातील काही प्रवासी उतरतात आणि काही नवे प्रवासी विमानामध्ये येतात. श्रेयाला हे सर्वकाही नवीन असतं. उत्सुकता, आश्चर्य आणि आनंद असे भाव अभिजीतला तिच्या चेह-यावर स्पष्टपणे दिसत असतात. एकटक तो तिच्याकडे पाहतच असतो, तिच्या डोळ्यांची होणारी सततची हालचाल, बाहेरच्या देशातील लोकांकडे मध्येच एकटक पाहत राहणं अभिजीतला खूप गोड वाटतं. न राहवून तो तिला विचारतो, ‘‘डियर,  खुश आहेस ना!’’

 

श्रेया तिच्याच विश्वात हरवलेली असते. अभिजीत काय बोलतोय याकडे तिचं काही लक्ष नसतं. अभिजीत हळूच तिचा हात स्वतःच्या हातात घेतो आणि तिचा हात कुरवळत बसतो. तिला स्वतःच्या विश्वात रमलेलं पाहून अभिजीत थोडा भूतकाळात जातो. त्याला दोघांचं लहानपण आठवतं, दोघे एकत्र खेळत, मस्ती करत, एकमेकांन चिडवत पण दोघांनी कधी कल्पनाही केली नव्हती की ते एकमेकांसोबत विवाहाच्या बंधनात अडकतील. कामात कितीही व्यस्त असला तरी अभिजीतचं तिच्यावरचं प्रेम हे सतत वाढतच होतं. आयुष्यात काहीतरी वेगळं करुन दाखवायचं या सोबतच श्रेयासोबत लग्न करायचं हेदेखील त्याचं स्वप्नंच होतं. शाळेनंतर अभिजीतने आपली वाट निवडली होती, त्याने महासागरातील जीवांवर संशोधन करायचं ठरवलं असतं. श्रेया बी.कॉम. करते, दोघेही वेगवेगळ्या क्षेत्रात, अभिजीतच्या कामाचं स्वरुप पुढे काय असेल हे श्रेयाला चांगलंच ठाऊक होतं, त्याने त्याच्या क्षेत्रात पुढे जावं अशी तिची देखील मनोमन इच्छा होती. म्हणून अभिजीतने हा विषय निवडल्यापासून ती त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करायची. त्याच्या अभ्यासक्रमाची व्याप्ती मोठी असल्याने ती कधीही त्याच्या अभ्यासाच्या मध्ये आली नाही, उलट जेव्हा तो एखादं प्रोजेक्ट अथवा काम करायला असमर्थ असायचा, गोंधळलेला असायचा तेव्हा श्रेयाच त्याचं मनोबल उंचवायची. श्रेयाची हीच गोष्ट तिच्या आणि अभिजीतच्या आईवडीलांना आवडली होती, म्हणून ते दोघांच्याही बाबतीत निश्चिंत होते. अभिजीत आणि श्रेयाने लग्नाचा निर्णय घेतला यात त्यांना काही आश्चर्य वाटले नाही. दोघेही एकमेकांना समजून घेतात यापेक्षा त्यांना जास्त काही नको होतं. अभिजीतचे वडील श्रेयाच्या वडीलांना नेहमी म्हणत, ‘आपला काळ तो वेगळा होता. आपले आईवडील ठरवायचे तसं व्हायचं, निवड आणि शेवटचा शब्दसुध्दा त्यांचाच असायचा. पण आता काळ बदलला आहे. मुलांना त्यांच्या कर्तव्याची आणि जबाबदारीची जाणीव लवकरच होऊ लागली आहे. दोघांनी विचार करुन निर्णय घेतला आहे. यात आपल्यासारख्यांनी कोणताही अहंकार न ठेवता त्यांच्या निर्णयाचं स्वागत करायला हवं. मुळात आपल्याला आपल्या संस्कारांवर विश्वास असायला हवा. आपली मुलं समजुतदार आहेत, आपल्यापेक्षा त्यांची स्वप्ने मोठी आहेत तशा त्यांच्या समस्यासुध्दा मोठ्या आहेत. आपण आपल्या आई-वडीलांचा निर्णय कायम शेवटचा मानायचो. आज आपली मुलं स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायचा प्रयत्न करत आहेत, इतक्या कमी वयामध्ये ते पुढच्या वीस-पंचवीस वर्षांचं नियोजन करत आहेत, आपल्याला खरंच आपल्या मुलांचं कौतुक असायला हवं. कुबड्यांचा आधार घेण्यापेक्षा आपली मुलं आज स्वतःच्या पायावर उभी आहेत.

 

‘‘एक्सक्युज मी सर...’’ हवाई सुंदरी अभिजीतला उठवते.

 

अभिजीत डोळे उघडत, ‘‘यस?’’

 

‘‘सर, आता काही क्षणांत आपण अर्जेंटिना येथे पोहोचणार आहोत.’’

 

अभिजीत श्रेयाकडे बघतो. ती देखील झोपलेली असते. हवाई सुंदरी तिला उठवायला जाते तेव्हा अभिजीत तिला अडवतो आणिमी उठवेन तिलाअसं इशा-याने सांगतो. ती हवाई सुंदरी तेथून निघून जाते. अभिजीत श्रेयाकडे एकटक पाहत असतो. झोपेत ती एका निरागस बाळाप्रमाणे दिसत होती. नुकतंच जन्माला आलेलं बाळ, ज्याला बाहेरच्या जगाची काहीच कल्पना नाही, प्राणी-पक्षी काही, काहीच माहीत नाही, पूर्णपणे अज्ञानी, नुकत्याच उमललेल्या कळीसारखी, विमानामध्ये पुन्हा एकदा सुचना केली जाते. आवाजाने श्रेया जागी होते. अभिजीत तिच्याकडे बघून स्मितहास्य करतो आणि हळूच तिचे गाल खेचत म्हणतो, ‘‘चला मॅडम, घरी जाऊन झोप काढा, आता आपल्याला उतरायचंय.

 

अजेंटिना येथील विमानतळावर विमान उतरतं. दोघे विमानतळाबाहेर येतात. अभिजीत टॅक्सीच्या शोधात असतो तेच श्रेयाची नजर एका माणसाकडे जाते. अभिजीतकडे बघून ती विचारते, “ए अभी, ती माणसं आपल्याला घ्यायला आलीत का?’’

 

अभिजीत तिथे बघतो तर, स्टिफन आणि अल्बर्ट तिथे उभे असतात. त्यांच्या हातातवेलकम न्युली मॅरीड कपल मिस्टर अभिजीत अॅन्ड मिसेस श्रेयाअसं मोठ्या अक्षरात लिहिलेला बोर्ड होता. त्या दोघांना पाहून अभिजीतला आनंदच होतो. धावतच तो त्या दोघांना भेटतो, तिघेही एकमेकांना मिठीत घेतात. श्रेयादेखील तिथे येते.

 

अभिजीत, ‘‘व्हॉट अॅन अमेंझिग सरप्राईझ...!! तुम्ही दोघे इथे कसे?’’

 

स्टिफन, ‘‘असंच, म्हटलं तुला सरप्राईज द्यावं. हाय वहिनी, कशा आहात?’’

 

श्रेया हसतच म्हणते, ‘‘हाय... थोडी गोंधळलेली आहे...’’

 

अभिजीत, ‘‘श्रेया, हा माझा सहकारी स्टिफन आणि हा माझा असिस्टंट अल्बर्ट. स्टिफन आणि मी, आम्ही एकत्रच प्रोजेक्ट करायचो, अल्बर्ट नुकताच रुजू झालाय...’’

 

अल्बर्ट, ‘‘अभिजीत सरांनी सुट्टी घेतली म्हणून जॉर्डन सरांनी आम्हा दोघांना इथे पाठवलं. म्हणाले अभिजीत येईपर्यंत काही दिवस तुम्ही माहिती घेऊन ठेवा. अभिजीत आल्यावर त्याला मला रिपोर्ट करायला सांगा आणि मग लगेच कामाला लागा...’’

 

स्टिफन, ‘‘सगळं इथेच बोलणार आहेस का? प्रवास करुन आलेत ते, अगोदर घरी चल...’’

 

अल्बर्ट आणि स्टिफन अभिजीतच्या हातून सामान घेतात.

 

अभिजीत, ‘‘मग तुमची राहण्याची व्यवस्था कशी?’’

 

अल्बर्ट, ‘‘जॉर्डन सरांनीस्क्रिप्स इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीला अगोदर तशी सुचना केली होती. काहीतरी मोठी गोष्ट होणार आहे वाटतं. अमेरिका, चीन, रशिया या देशांमधून आणि युनेस्को संस्थेमधूनसुध्दा काही ऑफिसर्स आले होते. बहुतेक आपल्याला चार ते पाच महिने इथे रहावं लागणार आहे. त्यासाठीस्क्रिप्स इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीकडून आपली राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. इन्स्टिट्यूटच्या जवळच आपल्या वसाहती आहेत.’’

 

बोलता बोलता चौघेही गाडीमध्ये बसतात. गाडी स्क्रिप्स इन्स्टिट्यूटच्या संशोधन कार्यायलाजवळील वसाहतीसमोर थांबते. स्टिफनची पत्नी रोडा आणि अल्बर्टचे आईवडील त्यांच्या स्वागतासाठी उभेच असतात. गाडीतून उतरल्यानंतर रोडा श्रेयाला अलिंगन देते. अभिजीत आणि श्रेया दोघे अल्बर्टच्या आईवडीलांच्या पाया पडतात.

 

‘‘अरे बेटा, हे कशासाठी?’’ अल्बर्टची आई म्हणते.

 

‘‘आमच्याकडे पध्दत आहे. मोठ्या माणसांच्या पायाला हात लावून त्यांचा आशिर्वाद घ्यायचा.’’ कट्टर भारतीय असल्याचे भाव चेह-यावर आणत श्रेया अल्बर्टच्या आईला सांगते. गाडीतून सामान बाहेर काढल्यानंतर सगळे अभिजीतच्या घरी जातात. संस्थेकडून अभिजीतला पहिल्या मजल्यावरची खोली देण्यात येते. तिथल्या खिडकीमधून बाहेर पाहिलं तर समोरस्क्रिप्स इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीआणि त्याच्या पुढे दुरपर्यंत पसरलेला विशाल समुद्र दिसतो. संशोधन करण्यासाठी लागणा-या सगळ्या गोष्टी अल्बर्टने अगोदर घरात आणलेल्या असतात. रोडा आणि श्रेया पहिल्या भेटीतच चांगल्या मैत्रिणी होतात. आंघोळ करुन श्रेया स्वयंपाकघरात जाते तर रोडा तिथे जेवण तयार करत असते.

 

‘‘अगं रोडा, तू कशाला त्रास करुन घेतेस? समोरच्या हॉलमध्ये जा. सगळ्यांसाठी मी बनवते काहीतरी.’’

 

‘‘यात त्रास कसला? आत्ताच तर तू प्रवास करुन आलीस. जरा आराम करायला नको का? तू बस, मी आणते तुम्हा सगळ्यांसाठी नाश्ता, मगाशी सगळं कापून ठेवलं होतं, फक्त शिजवायचं बाकी होतं. कॉर्न स्पेशल डिश आहे. तुला नक्की आवडेल.’’

 

श्रेया तिचं काही ऐकत नाही. ती देखील स्वयंपाकघरात थांबते. दोघी एकमेकींशी गप्पागोष्टी करत नाश्ता बनवतात आणि सगळे एकत्र नाश्ता करतात. सगळे आपापल्या घरी गेल्यानंतर अभिजीत भारतामध्ये श्रेयाच्या आणि त्याच्या आईवडीलांना थ्रीजीने आपण व्यवस्थित पोहोचलो, प्रवास व्यवस्थित झाला असं सांगतो. श्रेयादेखील काही वेळ आपल्या आईवडील आणि सासु सास-यांसोबत बोलते. फोन ठेवल्यानंतर अभिजीत श्रेयाकडे एकटक बघतो, तिचा हात घट्ट पकडून तिला आपल्या दिशेने खेचत तो तिच्या ओठांचे चुंबन घेतो. श्रेया लगेचच त्याला प्रतिसाद देते. लग्नानंतर त्या दोघांना आता काय तो एकांत मिळाला असतो.एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करत प्रणयक्रिडा करुन दोघेही थोडा वेळ विश्रांती करतात. रात्री सगळे बाहेर फिरायला जातात.नायगारहून उंच व रुंद ईग्वासू धबधबा व पँपास अशी ठिकाणे पाहून श्रेया स्तब्धच होते. रात्रीची ती रोषणाई तिला खूप आवडू लागते. रोडा, स्टिफन, अल्बर्ट आणि त्याचे आईवडील यांच्या सहवासात तिला परकेपणाची जरादेखील जाणीव होत नाही.