प्रकरण १७
आतमध्ये जो तो आपल्याच विचारात होता. कोणीही कुणाशी काही बोलत नाही. सगळं संपलं होतं, आता जायचं तरी कुठे? आणि का? कुणासाठी जायचं? आपण मोहीमेवर होतो तेव्हा संपूर्ण जगाचा अंत झाला.
पाणबुडीमधली वीजदेखील संपते. मेजर रॉजर्ड बार्बराला सोलर पॅनल चालू करायला सांगतात, ज्याने पाणबुडीमध्ये विजेची निर्मिती होईल. बार्बरा पाणबुडीमधील सर्व सोलर पॅनल चालू करते. थोड्या वेळाने पाणबुडीमध्ये पुन्हा वीज येते. अन्नदेखील संपलं होतं. भुक तर सर्वांनाच लागली होती.
‘‘आपण तरी का वाचलो? आपण सुध्दा मरायला हवं होतं... कमीत कमी हा दिवस तरी पाहता आला नसता...’’ मोहम्मद उदास स्वरात म्हणतो.
जेन खुर्चीवर पडते , ‘‘खूप भूक लागलीये... माझ्यात चालण्याची देखील क्षमता नाहीये...’’
अभिजीत, मेजर रॉजर्ड आणि ब्रुस एकमेकांकडे पाहतात. अभिजीत मोहीमेचा प्रमुख असल्याने, मेजर रॉजर्ड सैन्यातील वरिष्ठ अधिकारी असल्याने आणि ब्रुस पाणबुडीचा कप्तान असल्याने सर्व जबाबदारी त्या तिघांची होती. परिस्थितीचं गांभीर्य समजून तिघेही स्वतःला सावरतात.
‘‘आपल्याला पाणबुडीच्या बाहेर जायला हवं... कदाचीत काही खायला मिळेल...’’ ब्रुस म्हणतो.
‘‘काय खाणार आपण? आपल्या कुटूंबातील सदस्य ज्या समुद्रामध्ये मेलेत, त्या समुद्रामधून आपण काय खाणार? आपल्या कुटूंबाचं रक्त त्या पाण्यात मिसळलं आहे...’’ स्टिफन.
‘‘असं नाही स्टिफन, आता आपण जिवंत आहोत...आपल्याला काहीतरी करायला हवं...’’
‘‘अच्छा... मग काय करायचं आपण?..’’
‘‘स्टिफन, तू जरा शांत बस... इथे आमच्यावर तुम्हा सर्वांची जबाबदारी आहे...’’
स्टिफन गप्प बसतो. पण त्याचे ‘मग काय करायचं आपण?’ हे शब्द अभिजीतला खूप टोचतात. खरंच, काय करायचं आपण?
ब्रुस आणि मेजर रॉजर्ड पाणबुडीबाहेर अन्न मिळवण्यासाठी जातात. दोघेही पाणबुडीवर बसूनच असतात. आता नक्की करायचं तरी काय? पाण्यात उडी मारली तर मोठे मासे आपल्या शरीराचे लचके तोडतील. इथे बसूनही काही उपयोग नाही. भुकेने मरण्यापेक्षा उन्हाच्या तिव्रतेनेच मरु, असं त्या दोघांना वाटू लागतं. पाणबुडीच्या वरचा भाग देखील गरम झाला होता. त्या दोघांना चटके बसत असतात, पण रिकाम्या हाताने पाणबुडीत जायचं नाही असं त्यांनी ठरवलेलं असतं. साधारण दोन ते अडीच तास थांबल्यावर दूर त्यांना एक मोठी पिशवी तरंगत असल्याचं दिसतं. ते अंतर साधारण शंभर मीटर इतकं होतं. ब्रुस पाण्यामध्ये उडी मारतो. पोहत तो त्या पिशवीपर्यंत जाऊन पोहोचतो. पिशवी दाबताच त्याला आतमध्ये काही मऊ असल्याचं जाणवतं. पुन्हा पोहत तो पाणबुडीपर्यंत येतो. मेजर रॉजर्ड त्याला पाण्यातून बाहेर काढतात. दोघे ती पिशवी उघडून बघतात तर त्यात पावाच्या लाद्या आणि काही फळं असतात. शेंगदाणे आणि इतर काही पदार्थ असे असतात जे भरपूर दिवस टिकू शकतील. दोघांना प्रश्न पडतो, ही पिशवी आपल्यापर्यंत तरंगत आलीच कशी? जेव्हा जगबुडी झाली तेव्हा पाण्याच्या प्रवाहासोबत ही पिशवी पाण्याखाली असायला हवी होती. ते त्या पिशवीच्या बाहेरचा भाग जरा व्यवस्थित बघू लागतात. त्या पिशवीवर ब्राझिलच्या सैन्यदलाचा शिक्का मारलेला होता. दोघे ताबडतोब ती पिशवी घेऊन खाली जातात. आतमध्ये जेन, बार्बरा आणि मोहम्मद भुकेने बेशुध्द झालेले असतात. मेजर रॉजर्ड ती पिशवी अभिजीतला दाखवतात. अन्न मिळालं यापेक्षा इतरही काही मानव जिवंत असण्याची त्यांना आशा वाटते. जेन, बार्बरा आणि मोहम्मदला शुध्दीवर आणत अभिजीत त्यांना पिशवीतील पदार्थ खायला देतो. भुक सर्वांनाच लागलेली होती. इतकी की, त्यांनी संपूर्ण पिशवीच संपवून टाकली. आता मात्र सर्वांना जरा बरं वाटत होतं. पिशवीवर असलेल्या ब्राझिलच्या सैन्यदलाच्या शिक्क्यामुळे अभिजीतने अंदाज बांधला. कदाचित जगबुडी होण्याची जाणिव झाल्याने आपण सांगितल्यानुसार ब्राझिलच्या सैन्यदलाने काही नागरिकांना त्यांच्या जहाजामध्ये घेतलं असेल. जहाज इथून जात असताना चुकून त्यातली एक पिशवी पाण्यात पडली असेल. पिशवी पूर्णपणे बंद असल्याने आणि आतमध्ये हवादेखील असल्याने ती पिशवी पाण्यावरच तरंगत राहिली. याचा अर्थ आपल्याशिवाय आणखी काही माणसं जिवंत आहेत.
अभिजीत विचारांमध्ये हरवलेला असताना बार्बरा मोठ्याने ओरडते. सगळे तिच्याकडे बघतात. सौर उर्जेच्या सहाय्याने पाणबुडीमध्ये वीज आली होती. म्हणून बार्बराने कॉम्पुटर चालू केला होता. पाण्याखाली असल्याने त्यांची संदेश यंत्रणा विस्कळीत झाली होती. मात्र पाणबुडीमध्ये अशी प्रणाली होती की, एखाद्या वेळी बाहेरील जगाशी संपर्क होत नसेल तर आलेले संदेश कॉम्पुटरमधल्या एका प्रणालीमध्ये साठवले जायचे. त्यामध्येच त्यांना एक मेल अमेरिकी नौसेनेच्या संरक्षण खात्याकडून आला होता. त्यामध्ये लिहिलं होतं,
‘अभिजीत आणि मेजर रॉजर्ड यांना मोहीम रद्द करुन मागे फिरण्याचे आदेश देण्यात येत आहेत. अभिजीत आणि त्याच्या टीममधील सर्वांनी लवकरात लवकर अर्जेटिना येथील लष्करी जहाजामध्ये यावे. आपल्या कुटूंबियांना आणि इतर सहका-यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. सर्व जहाजं कॅनडाच्या दिशेने चालवण्यात येतील.’
आणखी काही मेल होते, त्यांमध्ये लिहिण्यात आलं होतं,
‘आपल्याला हा मेल उशीरा मिळत असेल तर आपण कॅनडाच्या दिशेने प्रवास करावा. अमेरिकी नौसेना आपल्याला रडारावर शोधत आहे.’ ‘आशिया खंडातील संशोधकांनी तयार केलेले संयुग अंटार्क्टिकापर्यंत पोहोचू शकले नाही. पहिल्या टप्प्यात पाठवण्यात आलेली विमानं मोठ्या वादळामध्ये उध्दवस्त झाली आहेत. चीन आणि भारत यांची मोहीम अपयशी ठरली आहे.
‘आपली पाणबुडी रडारवर दिसत नाही.परंतू आपल्या सिस्टममध्ये मेल जतन केले जात असल्याचं आमच्या मुख्य कार्यालयात समजत आहे. शक्य तितक्या लवकर संपर्क करण्याचा प्रयत्न करावा.’
मेल वाचल्यानंतर अभिजीतसोबत सर्वांच्या डोळ्यातून आनंदाश्रु येतात. आपले कुटूंबीय जिवंत आहेत. सगळे सुखरुप आहेत, त्यांना काही झालेलं नाही या विचाराने सगळे एकमेकांना आलिंगन देतात. बार्बराला कॉम्पुटरवर काहीतरी दिसतं. ‘‘अभिजीत, जरा हे बघ...’’ सगळे पुन्हा कॉम्पुटरच्या जवळ जातात.
‘‘शेवटचा मेल आपल्याला 10 ऑक्टोबरला आला होता आणि आज सगळं व्यवस्थित असतं तर आजची तारीख आहे 7 नोव्हेंबर, याचा अर्थ या सर्व घटनेला जवळजवळ एक महिना उलटून गेला आहे.’’
सगळ्यांचे चेहरे पुन्हा गंभीर होतात. जवळजवळ एक महिना हे सर्वजण काही न खाता-पीता जिवंत राहिले तरी कसे? जिवंत आहोत ना! हेच आपल्यसाठी खूप मोठं आहे, असं समजून अभिजीत आणि सर्वजण आपल्या कुटूंबियांचा शोध घेण्याची तयारी सुरु करतात.
मोहम्मद आणि जेन लगेचच रडार यंत्रणेतील बिघाड दुरुस्त करु लागतात. स्टिफन दिशादर्शक दुरुस्त करतो. बार्बरा आणि अभिजीत जहाजामधील वीजेचा प्रवाह आणि सर्व सर्किट पुन्हा तपासतात. इंजिनमध्ये पुरेसा विद्युत साठा उपलब्ध होतो. ब्रुस आणि मेजर रॉजर्ड पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज घेतात, पाणबुडीबाहेर जाऊन काही ना काही खाण्याची व्यवस्था करतात. लवकरच सगळे मिळून रडार यंत्रणा, दिशादर्शक आणि पाणबुडीमधील सर्किट दुरुस्त करतात. उत्तरेकडे त्या सर्वांचा प्रवास सुरु होतो. आपल्या कुटूंबीयांना एकदा तरी बघता यावं या इच्छेने सर्वजण काम करत होते. कधी एकदा श्रेया दिसतेय आणि कधी मी तिला मिठीत घेतोय असं अभिजीतला वाटू लागतं. असे सात ते आठ दिवस निघून जातात. मात्र दुरपर्यंत साधी एक होडीदेखील दिसत नाही. सर्वांच्या आशा मात्र कायम राहतात.