Get it on Google Play
Download on the App Store

प्रकरण ४

सकाळी जरा लवकरच उठून अभिजीत स्क्रिप्स इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीच्या प्रयोगशाळेत जातो. ही कॅलिफोर्निया येथील महासागरावर संशोधन करणारी एक संस्था असते. अर्जेंटिना येथे त्यांची एक शाखा असते. तिथल्या अधिका-यांसोबत चर्चा करुन अभिजीत लगेचच कामाला लागतो. तत्पुर्वी त्यांच्या संस्थेच्या व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे जॉर्डन सरांसोबत त्याची चर्चा होते.

 ‘‘हाय जॉर्डन सर...’’

 

‘‘नाईस टू सी यू अभिजीत... बरं झालं सुट्ट्या संपवून तू लगेचच रुजू झालास... लग्नानंतर आता कसं वाटतंय?’’

 

‘‘खूप छान वाटतंय सर...’’

 

‘‘हं.... सुरुवातीला प्रत्येकाला असंच वाटतं... एनीवे, भारतामधलं काम झालं का?’’

 

‘‘हो सर, मी पणजी इथल्यानॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीमध्ये गेलो होतो. आपण सांगितल्याप्रमाणे ही संस्था भारताभोवतालच्या समुद्रांविषयी व हिंदी महासागराविषयी माहिती मिळविणे, देशाच्या फायद्यासाठी समुद्राचा उपयोग करुन घेण्याची क्षमता मिळविणे, सागरी उपकरणयोजनेत स्वंयपूर्णता मिळविणे आणि आकडेवारी  व माहितीचे संकलन करणे व ती इतरांना पुरविणे, अशी कार्य करते यासाठी संस्थेचे आठ विभाग कार्य करतात. महासागरविज्ञानाच्या भौतिकीय, रासायनिक, जैव व भूवैज्ञानिक शाखा तसेच सागरी उपकरणयोजना, सागरी प्रदूषण, महासागर अभियांत्रिकी योजना व आकडेवारी हे विभाग महत्त्वपूर्ण कार्य करतात.आर. व्ही. गवेषणीसागरकन्याही सर्व मोसमांत संचार करु शकणारी  जहाजे संस्थेजवळ आहेत. अत्याधुनिक प्रयोगशळा, उपकरणे व निवास यांनी ती सुसज्ज आहेत. यांच्या सफरींमुळे अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि मध्य हिंदी महासागर यांच्याविषयीच्या माहितीत महत्त्वपूर्ण भर पडत असते. या संस्थेने युनेस्को, आय ओ सी, इंटिग्रेटेड ग्लोबल ओशन स्टेशन सिस्टिम (आय जी ओ एस एस), इंटरनॅशनल फाउंडेशन फॉर सायन्स (स्टॉकहोम), जागतिक आरोग्य संघटना इ. आंतरराष्ट्रीय संस्था-संघटनांशी सहकार्य केले आहे. शिवाय युनायटेड नेशन्स एन्व्हायरन्मेंट प्रोग्रॅम (यू एन ई पी), इंडो-सोव्हिएट मॉन्सून एक्स्पिरिमेंट (आय एस एस ई एक्स), मॉन्सून एक्स्पिरिमेंट(एम ओ एन ई एक्स) इ. आंतरराष्ट्रीय मोहिमांत संस्थेने भाग घेतला आहे.’’

 

‘‘वेल डन, बरीच माहिती घेतलीस. बरं, तिथले हेड ओशन रिसर्चर यांनी तुला आपल्या कामी येईल अशी काही माहिती दिली का?’’

 

‘‘हो सर, त्यांनी त्यांचा पुर्ण रिपोर्ट मला नकाशा आणि इतर आकृत्यांसहीत दाखवला. त्यांचा रिपोर्ट पाहिल्यापासून माझ्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे.’’

 

‘‘काय रिपोर्ट दिला त्यांनी...?’’

 

‘‘ज्याप्रकारे अंटार्क्टिका खंडाजवळ असलेल्या आपल्या स्वयंचलीत जहाजांद्वारे महासागरातील ज्या हालचाली आपल्या निदर्शनास आल्या होत्या अगदी तशाच हालचाली त्यांना पॅसिफिक महासागरामध्ये आढळून आल्या. ऑस्ट्रेलिया आणि न्युझिलंडची सीमा न ओलांडणारे काही जीव त्यांना बंगालच्या उपसागराजवळ आढळून आले. विशेष म्हणजे अटलांटिक महासागरातील पाण्याचे काही गुणसूत्र त्यांना अंदमानजवळील प्रयोगशाळेत आढळून आले. हिंदी महासागरामध्ये देखील समुद्री जीव स्थलांतर करत असल्याचा रिपोर्ट त्यांच्याकडे होता. हे सर्व नक्की कोणत्या गोष्टीचे संकेत देत आहेत याचा मला काही अंदाज येत नाहीये सर...’’

 

‘‘खरंच, आता मलादेखील प्रश्न पडू लागले आहेत. गेल्या 200 वर्षांमध्ये इतक्या जलदगतीने अशी कोणतीही घटना घडल्याचे पुरावे नाहीत. मुळात अशा घटना घडल्याच नाही पाहिजेत, खरंतर ही धोक्याची सुचना आहे. युनेस्कोने दिलेल्या अहवालानुसार आपण विचार केला तरसंपूर्ण पृथ्वी खूप मोठ्या संकटात सापडणार आहेही गोष्ट नाही म्हटलं तरी खरी आहे.’’

 

‘‘सर, मला वाटतं तुम्ही लवकरात लवकर आमच्यासाठी अंटार्क्टिका खंडाजवळ जाण्याची व्यवस्था करावी. जोपर्यंत मला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं मी मिळवत नाही, तोपर्यंत मलादेखील स्वस्थ बसता येणार नाही. आता वाटतं, उगाचच मी लग्नासाठी इतकी मोठी सुट्टी घेतली.’’

 

‘‘सुट्टीचं राहू दे. तू नव्हतास तेव्हा देखील आपलं काम सुरळीतपणे चालूच होतं. मला फक्त हे पहायचं होतं, तू अंटार्क्टिका खंडावर जाण्यास मानसिकदृष्ट्या तयार आहेस का?’’

 

‘‘हो सर, फक्त आपण हुकूम द्यावा.’’

 

‘‘ठिक आहे, लवकरच मी तुला याबाबत सुचना करतो. तुला संशोधन करण्यासाठी आणखी कोणकोणत्या गोष्टी लागणार आहेत?’’

 

‘‘सर, मला माझी पाणबुडी आणि माझी संपूर्ण टीम हवी आहे.’’

 

‘‘आर यू शुअर?’’

 

‘‘हो सर, आमचं ट्युनिंग एकमेकांशी चांगलं असलं तरी माझ्या टीममधील सर्वजण त्या ठिकाणी जाण्यास उत्सुक आहेत, प्रत्येकाने तिथल्या हालचालींवर बहूतेक सर्व प्रकारची माहिती घेतली आहे. माझी टीम सोबत असेल तर आपल्याला एकदम परफेक्ट रिपोर्ट्स मिळतील.’’

 

‘‘ओके मी आजच तुझ्या टीमला अर्जेंटिनाच्या दिशेने जायला सांगतो. अमेरिकी सैन्याशी चर्चा करुन मी लवकरच तुला पुढील मोहिमेबद्दल सांगतो. तोपर्यंत प्रयोगशाळेतील आपल्या सर्व टार्गेट्सचे रिपोर्ट तयार करुन ठेव.’’

 

‘‘ओके सर, थॅंक्स.’’

 

व्हिडीओ कॉन्फरन्स आपोआप बंद होतो. अभिजीत कॉन्फरन्स रुममधून प्रयोगशाळेच्या दिशेने जातो. अल्बर्ट आणि स्टिफन प्रयोगशाळेमध्ये समुद्रातील पाण्याचे मिश्रण काही विशिष्ट द्रव्यांमध्ये करत होते. केमिकल्स प्रतिबंधक आवरण घालून अभिजीत देखील आतमध्ये जातो. स्टिफन करत असलेलं प्रयोग पाहून तो विचारतो,

 

‘‘काही प्रोगेस झाली का?’’

 

स्टिफन, ‘‘मला प्रश्न पडलाय, हिंदी महासागरातल्या पाण्यावर रिसर्च करत असताना मला त्यात अटलांटिक महासागरातील जिवाणू दिसताहेत.’’

 

अल्बर्ट, ‘‘खूप गोंधळ आहे सर, एक वेळ असं वाटतं, तिन्ही महासागरांमधील पाणी एकत्र करुन नंतर ते वेगवेगळ्या परिक्षण नळ्यांमध्ये टाकण्यात आलं.’’

 

अभिजीत, ‘‘माझं डोकंसुध्दा काहीच काम करत नाहीये, जॉर्डन सरांसोबत बोलणं झालं. लवकरच आपल्याला अंटार्क्टिकावर जावं लागणार आहे.’’

 

स्टिफन-अल्बर्ट एकत्रच, ‘‘काय?’’

 

अभिजीत, ‘‘हो, जॉर्डन सरांसोबत माझं बोलणं झालं आहे. आपल्यासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे आपलीच टीम तिथे जाणार आहे. सर आजच आपल्या टीमला इथे पाठवणार असल्याचं सांगितलं.’’

 

स्टिफन, ‘‘ते सगळं ठिक आहे, पण अचानक अंटार्क्टिका?’’

 

अभिजीत, ‘‘हो, का? काही प्रॉब्लेम आहे का?’’

 

स्टिफन, ‘‘प्रॉब्लेम म्हणजे? प्रॉब्लेमच प्रॉब्लेम आहे. जॉर्डन सरांनी तुला पूर्ण माहिती दिली नाही वाटतं.’’

 

अभिजीत, ‘‘कसली माहिती?’’

 

स्टिफन, ‘‘तू लग्नासाठी सुट्टी घेतलीस त्याच्या काही दिवसांनी अंटार्क्टिकामध्ये खूप मोठं वादळ आलं. तिथे असलेली जितकी केंद्रं होती, सर्व उद्ववस्त झालीत. तिथल्या प्राण्यांनी तर नॅशनल जिओग्राफी कंपनीच्या स्वयंचलीत कॅमे-याचे तुकडे तुकडे करुन टाकले. सध्या तिथली अवस्था बर्मुडा ट्रॅंगल सारखी झाली आहे. हरवलेल्या सैनिकांना शोधण्यासाठी गेलेल्या तुकड्यादेखील परत आल्या नाहीत...’’ अभिजीत, ‘‘एक मिनीट, इतक्या मोठ्या घटना घडल्या आणि मला कोणीही काहीच माहिती दिली नाही?’’

 

अल्बर्ट, ‘‘सॉरी सर, मध्येच बोलतोय. आम्ही तुमच्याकडे माहिती पाठविली होती, जॉर्डन सरांनी तुम्हाला माहिती द्यायला मनाई केली. एव्हाना, त्याबाबतची कोणतीही बातमी त्यांनी तुमच्यापर्यंत पोहोचू दिली नाही.’’

 

स्टिफन, ‘‘आम्ही तुला अगोदरच सावध करणार होतो, पण जॉर्डन सरांचे आदेश होते म्हणून आम्हाला गप्प बसावं लागलं... कालच तुला सांगणार होतो, पण वहिनी सोबत होत्या आणि प्रवास करुन नुकताच आला होतास म्हणून आम्ही काही बोललो नाही.’’

 

अल्बर्ट, ‘‘सर, आता तुम्ही जॉर्डन सरांसोबत बोलणार आहात का?’’

 

अभिजीत, ‘‘नाही, आता जर मी त्यांच्यासोबत बोललो तर त्यांना कळेल की तुम्ही दोघांनी मला हे सर्व सांगितलं आहे. मी त्यांना आता काही विचारत नाही. बघूया त्यांच्या मनात नक्की काय चाललंय... अंटार्क्टिकावर मी आपल्या इतर साथीदारांसोबत जातो. तुम्ही दोघं इथेच थांबा.’’

 

स्टिफन, ‘‘का? नाही, आजिबात नाही. आतापर्यंत आपण सोबत काम केलंय, यापुढे सुध्दा एकत्रच करायचं... काही असो, मी तुझ्याबरोबर अंटार्क्टिकावर येतोय...’’

 

अल्बर्ट, ‘‘हो... मी सुध्दा...’’

 

अभिजीत, ‘‘ऐका माझं, तिथे खूप धोका आहे...’’

 

स्टिफन, ‘‘धोका आहे तर तू कशाला जातोस? श्रेया वहिनीचा विचार नाही केलास का?’’

 

अभिजीत, ‘‘तिचा विचार करतोय मी, पण या क्षणाला मला संपूर्ण जगाचा विचार करायचा आहे. तुम्हा दोघांना नाही माहित माझ्या मनात नक्की काय चाललंय... समजा माझा अंदाज बरोबर निघाला तर संपूर्ण जग मोठ्या संकटात सापडणार आहे...’’

 

स्टिफन, ‘‘ते तर आम्ही समजूनच चाललोय, मागच्या आठवड्यात अमेरिकी नौसेनेचे काही अधिकारी इथे आले होते. त्यांनी आम्हाला सुचना दिली होती की अंटार्क्टिकावर नक्की कोणत्या गोष्टी घडत आहेत याबाबत काही सांगता येत नाहीये. सॅटेलाईट काही काम करत नाही, कोणतेही जहाज किंवा पाणबुडी तिथे पोहोचू शकत नाही. ही एक धोक्याची सुचना आहे आणि कदाचित यासाठी तुम्हाला तिथे जावं लागत असेल तर त्याबाबत बाहेर काही सांगू नका. युनेस्को आणि संपूर्ण जगाने काही काळासाठी तिथल्या भागात जाण्यास बंदी घातली आहे. त्यांच्या मते अंटार्क्टिका खंडावर निर्माण झालेली वादळं तत्पुरती आहेत, वादळं शांत झाल्यावर त्यांनी तिथे जायला सांगितलंय. आपण तिथे जात असू तर आपल्याला तिथलं काम अत्यंत गुप्तपणे करावं लागणार आहे. या कामात आम्ही तुमच्यासोबत आहोत.’’

 

‘‘परिस्थिती खूपच गंभीर आहे.’’ एवढं बोलून अभिजीत एकाएकी गप्प होतो.

 

थोडा वेळ विचार करत तो, स्टिफन आणि अल्बर्ट एकमेकांकडे पाहत असतात. प्रयोगशाळेत इतकी शांतता असते की, समुद्राच्या लाटा स्पष्टपणे ऐकू येत होत्या. अभिजीत लगेचच काहीही न बोलता कॉन्फरन्स रुमच्या दिशेने जातो. अचानक अभिजीत तिथे का गेला हे त्या दोघांनाही समजलं नाही. तो नक्की जॉर्डन सरांसोबत बोलायला गेला हे त्यांना माहित होतं. पण नक्की काय बोलायला गेला हे त्या दोघांना माहित नव्हतं. अभिजी बाहेर येण्याची वाट पाहण्याखेरीज त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता.