प्रकरण ६
सकाळी लवकरच अभिजीतची संपूर्ण टीम आणि अमेरिकन नौसेनेतील अधिकारी मेजर रॉजर्ड लेक्चर रुममध्ये उपस्थित असतात. आपल्या टीममधील सर्वांना पाहून अभिजीतला बरं वाटतं. तो मेजर रॉजर्ड यांची त्याच्या टीमसोबत ओळख करुन देतो. अभिजीतच्या टीममध्ये पाणबुडी चालवणारा कप्तान ब्रुस, रडार ऑपरेटर मोहम्मद, बाहेरील जगासोबत सांकेतीक भाषेमध्ये संपर्क करणारा त्सेन्ग चू, मरीन इंजिनियर जेन, सॅटेलाईट सांभाळणारी बार्बरा, संशोधन करणारे अभिजीत, स्टिफन आणि त्यांचा सहाय्यक अल्बर्ट अशा नऊ जणांची ही टीम असते. अभिजीतच्या टीममध्ये प्रत्येकाने जीवविज्ञान, भौतिकी, रसायनशास्त्र, भूविज्ञान, इलेक्ट्रॉनीय, चित्रकला या सगळ्या विषयांचं ज्ञान संपादित केलं होतं. एखादी व्यक्ती उपलब्ध नसेल तर दुसरी व्यक्ती त्या व्यक्तीचं काम करु शकते इतकी अभिजीतने आपल्या टीममध्ये लवचिकता आणलेली होती. ‘इंटरनॅशनल काउन्सिल फॉर द एक्स्प्लोरेशन ऑफ द सी’ मध्ये हे सर्वजण एकत्रच रुजू झाले होते. तेव्हापासून म्हणजे पाच वर्षांपूर्वीपासून ते सर्वजण एकत्र काम करत होते.
अभिजीत, ‘‘मित्रांनो, आज आपण एका मोठ्या आणि गंभीर मोहिमेसाठी इथे एकत्र आलो आहोत. आपण ज्या मोहिमेसाठी जाणार आहोत तिथून पुन्हा येण्याची शक्यता शुन्याच्या बरोबरीची आहे. जर आपल्यापैकी कुणाला या मोहिमेमध्ये यायचं नसेल तर त्याने आत्ताच तसं सांगावं. न येण्याचं कारण देखील मी समजू शकतो, प्रत्येकाला आपला आणि आपल्या कुटूंबाचा विचार करण्याचं पुर्ण स्वातंत्र आहे.’’ कोणीही हात वर करत नाही. अभिजीत पुढे बोलू लागतो, ‘‘पुन्हा विचार करा. नंतर कुणालाही ही मोहिम अर्ध्यावर सोडता येणार नाही.’’ तरीही कोणी काही बोलत नाही.
बार्बरा, ‘‘आपल्याला आता काय करावं लागेल?’’
अभिजीतला तिची उत्सुकता पाहून बरं वाटतं. मेजर रॉजर्ड आणि टीममधील प्रत्येक जण मोहिमेवर जाण्यासाठी उत्सुक असतो.
अभिजीत, ‘‘आपण संपूर्ण मोहिम महासागराच्या आतमधून करणार आहोत, यासाठी अमेरिकी नौसेना आपल्याला पाणबुडी देणार आहे... पाणबुडीची माहिती आपल्याला असली तरी आपला संपूर्ण प्रवास हा महासागरामधूनच होणार आहे तर सर्वप्रथम आपल्याला महासागर म्हणजे काय, या संकल्पनेची माहिती पुन्हा एकदा घ्यावी लागेल... इथे प्रत्येकजन त्याबाबत ज्ञानी आहे याची मला पूर्ण कल्पना आहे... तरीही मला कोणत्याही बाबतीत धोका पत्कारायचा नाहीये... यासाठी आपल्यामध्ये सर्वात कमी ज्ञान असलेल्या अल्बर्टला मी काल महासागराविषयी माहिती घ्यायला सांगितली... मेजर रॉजर्ड यांनादेखील महासागराविषयी महत्त्वपूर्ण माहिती आहे, तरीही पुन्हा एकदा उजळणी करणं आपल्यासाठी महत्त्वाचं नसलं तरी गरजेचं आहे... अल्बर्ट आता आपल्याला महासागराविषयीची माहिती देईल आणि आपण ती व्यवस्थितपणे ऐकू म्हणजे प्रत्येकाला व्यवस्थित माहिती मिळाली असं मी समजेन... तर अल्बर्ट...!!’’
अल्बर्ट लगेचच आपल्या जागेवरुन उठतो आणि आपल्या हातातील नोंदवही घेऊन तो प्रोजेक्टरजवळ जाऊन उभा राहतो. प्रोजेक्टरवर तो जगाच्या नकाशाचे सॅटेलाईट चित्र उभं करतो. हातातील नोंदवहीकडे पाहत मग तो बोलायला सुरुवात करतो.
‘‘अभिजीत सरांनी सांगितल्याप्रमाणे महासागरावरील काही महत्त्वाच्या गोष्टींची माहिती मी जमा केली... महत्त्वाची म्हणण्यापेक्षा आपल्या सामान्य ज्ञानासाठी हवी असलेली काही ठराविक माहिती मी घेतली... तर आपण राहत असलेल्या पृथ्वीच्या संपूर्ण पृष्ठभागावर पाणी, बर्फ व जमीन यांचे आवरण आहे... त्यापैकी सुमारे ७१ टक्के भाग खा-या पाण्याच्या प्रचंड जलाशयाने व्यापलेला असून त्याला आपण ‘महासागर’ म्हणतो... प्रत्येक गोलार्धातील पाणी व जमीन यांच्या प्रमाणाचा विचार केल्यास दक्षिण गोलार्धात पाणी व जमीन यांनी व्यापलेल्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर जवळ-जवळ ५:१ आहे तर उत्तर गोलार्धात ते ३:२ आहे. यामुळे अशीही कल्पना करता येते की, पृथ्वी हाच एक प्रचंड महासागर असून खंडे ही त्यामधील बेटे आहेत... महासागर हे पृथ्वीचे सर्वांत ठळक वैशिष्ट्य असून आपण सोयीसाठी याचे भौगोलिक दृष्ट्या विभाग पाडले आहेत... याच्या प्रमुख खंडांशी तुल्य अशा विभागांनाही ‘महासागर’ म्हणतात... उदाहरण द्यायचं झालं तर हिंदी महासागर, पॅसिफिक महासागर आणि या महासागराच्या उपविभागांना ‘समुद्र’ म्हणतात…
समुद्रापेक्षा आपल्याला सध्या महासागराकडे लक्ष द्यायचं आहे... आपल्या पृथ्वीवर अटलांटिक पॅसिफिक, हिंदी, आर्क्टिक व अंटार्क्टिक हे परंपरागत प्रमुख महासागर मानले जातात... यांपैकी आर्क्टिक व अंटार्क्टिक काहींच्या मते स्वतंत्र महासागर नसून आर्क्टिक हा अटलांटिकचाच भाग आहे, तर अंटार्क्टिका खंडाभोवतीचा अंटार्क्टिक महासागर हा पॅसिफिक, अटलांटिक व हिंदी महासागरांच्या विस्तारलेल्या शाखांचा बनलेला आहे...काल जेव्हा मी इतिहासाताली काही नोंदी तपासल्या तेव्हा त्यात असं लिहिण्यात आलं होतं की, १९५३ मध्ये स्वीकारण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय संकेतानुसार आर्क्टिक हा चौथा महासागर मानला जातो... महासागरांलगतचे समुद्र आता त्यांचेच भाग मानले जातात... पॅसिफिक महासागर हा सर्वांत मोठा म्हणजे जवळजवळ अटलांटिक व हिंदी महासागरांच्या एकत्रित क्षेत्रफळाएवढा असून त्याचे क्षेत्रफळ पृथ्वीच्या 1/3 क्षेत्रफळाहून अधिक आहे... हा सर्वांत खोलही आहे... यातील सर्वांत खोल भाग ग्वॉमच्या आग्नेयीस असलेला ‘चॅलेंजर डीप’ हा असून याची खोली समुद्रसपाटीखाली ११,०३४ मीटर आहे... पॅसिफिक शब्दाचा अर्थ शांत असून त्याप्रमाणे महासागर शांत दिसत असला, तरी सर्वांत भयाणक वादळे, ज्वालामुखींचे उद्रेक व भूकंप यात होत असतात...हिंदी महासागरातील सर्वांत खोल ठिकाण, सूंदा खंदक ७,७२५ मीटर जावाच्या दक्षिणेस आहे... सर्वसाधारणपणे या महासागरातील वारे मंद असतात मात्र कधीकधी यात टायफूनसारखी वादळे होतात... याच्या विषुववृत्ताच्या उत्तरेकडील भागात हंगामानुसार वा-यामध्ये व वा-यानुसार प्रवाहांमध्ये बदल होतात...अटलांटिक हा हिंदी महासागरापेक्षा थोडा मोठा असून आपली मोहिम या महासागरामध्ये असणार आहे... यातील सर्वांत खोल प्वेर्त रीको खंदकाची खोली ८,६४८ मीटर आहे... यात मोठी वादळे होत असली, तरी शांत असणारी मोठी क्षेत्रेही यात येतात... शिवाय याच्या किना-याची लांबी हिंदी व पॅसिफिक यांच्या किना-यांच्या एकत्रित लांबीपेक्षा जास्त आहे व जगातील बहुतेक म्हत्त्वाच्या नद्या याला येऊन मिळतात. आर्क्टिकमधील सर्वांत जास्त खोली ५,४५० मीटर आढळली आहे. जमिनीलगतचा याचा बराचसा भाग वर्षभर बर्फाने आच्छादिलेला असतो... गंमत म्हणजे...’’
अभिजीत, ‘‘ओके अल्बर्ट, थॅंक्स. तू बसू शकतोस. जेन, आतापर्यंत जेवढ्या महत्त्वाच्या सागरी मोहिमा झाल्या, त्याच्या नोट्स तू काढल्यास का?’’
जेन, ‘‘हो. तुझ्या मते मी आता त्या इथे वाचून दाखवाव्यात का?’’
अभिजीत, ‘‘नक्कीच, आपल्यासाठी ते महत्त्वाचं आहे... यातून प्रत्येकाच्या ज्ञानात भर पडेल...’’
अल्बर्ट आपल्या जागेवर जाऊन बसतो आणि जेन प्रोजेक्टरजवळ जाऊन उभी राहते. तिने तिच्या नोट्सची व्हिडीओ बनवलेली असते, आपला पेन ड्राईव्ह प्रोजेक्टरला लावून ती महासागरातील मोहिमांबद्दल माहिती देते.
‘‘ओके तर आपण अंटार्क्टिका खंडावर जाणार आहोत, हा प्रवास खडतर असला तरी त्यासाठी सध्याच्या युगात आपण विमान, जहाज आणि पाणबुडी यांपैकी कोणत्याही साधनाने जाऊ शकतो... मात्र अंटार्क्टिका खंडावर गेल्या काही महिन्यांपासून ज्या घटना घडत आहेत, त्यामुळे आपल्याला गुप्तपणे तिथे जायला हवं, म्हणून आपण पाणबुडीच्या सहाय्याने तिथे जाणार आहोत... पाणबुडीबाबत आपल्याला माझ्यापेक्षा अमेरिकी नौसेनेचे मेजर रॉजर्ड सर व्यवस्थित माहिती देऊ शकतील... मी आपल्याला आतापर्यंत समुद्र आणि महासागरामध्ये घेण्यात आलेल्या मोहिमांची थोडक्यात माहिती देते... बघायला गेलं तर प्राचीन काळापासून माणसाचा अन्न पदार्थ मिळविण्यासाठी समुद्राशी संबंध आला आहे. नंतर मासेमारी, व्यापार, संपत्तीचा शोध या हेतूंनी समुद्रप्रवास करण्यात येऊ लागला... इ. स. पू. सुमारे १,००० वर्षांपूर्वीपासून ते कोलंबसाच्या काळापर्यंत पृथ्वी सपाट तबकडीसारखी असून तिच्याभोवती ‘ओशिअॅनस’ नावाचा जलाशय आहे, असा समज होता... त्यामुळे काही प्रमाणात समुद्रपर्यटनावर मर्यादा पडल्या होत्या... प्राचीन, ग्रीक, फिनिशियन, रोमन व अरबी लोकांना समुद्राविषयी कुतूहल होते व त्यांनी त्याविषयी भौगोलिक माहिती मिळविली होती... मी अगोदरच सुचना देऊन ठेवतेय, पुढे जाऊन तुम्हाला हे थोडं रटाळ वाटेल, पण त्यामुळे प्रत्येकाला समुद्र, महासागर आणि आपल्या पृथ्वीचा इतिहास थोडक्यात कळेल...’’
अभिजीत स्मितहास्य करतो. जेन आपली व्हिडीओ सुरु करते. संगणकावर अॅनिमेशनच्या सहाय्याने चित्रांच्या हालचाली सुरु होतात. चित्रांना उद्देशून जेन पुढे बोलू लागते.