Get it on Google Play
Download on the App Store

प्रकरण १५

आशिया आणि युरोप खंडातील अनेक जाणकारांचा अभिजीत आणि जॉर्डन सरांवर विश्वास होता. अगदी पणजी येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीच्या अधिका-यांचा देखील अभिजीतला पाठिंबा होता. पण म्हणतात ना, ‘वेळ आली की गाढवाला सुध्दा बाप बनवावं लागतं.तशीच अवस्था जगातील जनतेची झाली होती. इथे त्यांनी ज्यांच्यावर विश्वास ठेवला होता ते गाढव म्हणण्यासारखे मुळीच नव्हते. पण ते आपला सिध्दांत इतरांसमोर उघडपणे मांडत देखील नव्हते. त्यामुळे संपूर्ण जगाकडे दुसरा पर्याय नव्हता. त्यांना व्यक्त होऊन अभिजीतला समर्थन देखील देता येत नव्हते. मृत्यूला झुंज देत संपूर्ण जगाचं लक्ष भारत आणि चीन येथील संशोधकांच्या संशोधनावर लागले होते.

 

भारतामधील दिल्ली येथे संयुगे बनविण्याचं आणि चीनमधील बिजिंग मोहीम आखण्याचं काम सुरु होतं. दोन्ही देशांना संपूर्ण जग आर्थिक आणि लष्करी मदत करतं. रशिया, जर्मनी, इंग्लंड, फ्रान्स असे युरोपीय देश आपल्या ताफ्यातील लढाऊ जेट विमानं या मोहीमेसाठी देतात. पाकिस्तान, अफगानिस्तान, आफ्रिका येथून अणुविस्फोटासाठी लागणारा कच्चा माल आणला जातो. प्रत्येक देश या मोहीमेसाठी काही ना काही मदत करतो. जवळपास 150 लढाऊ विमाने अंटार्क्टिका खंडावर पाठवण्याची तयारी सुरु होते. ही विमानं पृथ्वीच्या वर्तुळाकार भागातून अंटार्क्टिकाच्या सर्व बाजूंनी एकाच वेळी अणुविस्फोट घडवून आणणार होती.

 

परिस्थितीचा विचार करायला गेलं तर वेळ अशी होती की, जगात सर्वांत पहिले अणुविस्फोट घडवणारा अमेरिका या सर्वात शक्तीशाली अणुविस्फोट मोहीमेपासून अलिप्त होता. खरं तर सर्व देशांमध्ये पुन्हा अणुविस्फोट घडवून न आणण्याचे ठरले होते, पण या मोहीमेशीवाय इतर देशांसमोर पर्याय नव्हता. 1942 साली हिरोशिमा आणि नागासाकी या ठिकाणी जेव्हा अणुविस्फोट झाला तेव्हा ही प्रणाली नवीनच आणि अत्यंत लहान होती. तिचा परिणाम मोठा असला तरी ती प्रणाली तेव्हा तितकीशी विकसीत नव्हती. मात्र आजच्या युगात अणुविज्ञानामध्ये अनेक क्रांतीकारी बदल घडले. आण्विक किरणांचा विकास करुन त्यामध्ये मोठा संहार करण्याची क्षमता विकसीत करण्यात आली. आता जर अणुविस्फोट झाला, तर संपूर्ण जगाचा विनाश निश्चित आहे. त्यात इथे एक नाही तर तब्बल 150 अणुविस्फोट होणार आहेत आणि त्यातून होणा-या संहाराची कुणीही कल्पना करु शकत नव्हतं हे माहीत असल्याने अमेरिका या मोहिमेला विरोध करत होता. पण चीन आणि भारत येथे अणुविस्फोटाची तयारी जोर धरत असते.

 

दुसरीकडे अमेरिकेत अभिजीत आणि जॉर्डन सरांच्या नेतृत्वाखाली अमेरिकी सैन्य सर्व नागरिकांना जहाजामध्ये नेण्याची व्यवस्था करतात. ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सर्वच्या सर्व जहाजांमध्ये साठविल्या जातात. यासाठी नागरिकांना कायमचं घर सोडावं लागत असल्याने प्रत्येकज दुःखी असतो. अनेकज तर भावनिक होऊन (सहाजिकच आहे) रडत होते. अशा वेळीअमेरिकेचा प्रत्येक अधिकारी आणि सैनिक शेवटच्या श्वासापर्यंत नागरिकांचं संरक्षण करेल असं मी आपणांस वचन देतोअसं बोलून अमेरिकेचे राष्ट्रपती सर्वांचा विश्वास जिंकून घेतात. त्यातच जॉर्डन सरांना भारतातील त्यांच्या एका गुप्तहेराकडून भारताने तयार केलेल्या संयुगांची माहिती मिळते. जॉर्डन सर लगेचच ही माहिती अभिजीतला देतात. अभिजीत लगेचच ती संयुगे तपासतो आणि त्याला कळून चुकतं की, अंटार्क्टिका खंडामध्ये अणुविस्फोट झाला तरी या आण्विक किरणांचा त्यावर काही परिणाम होणार नाही. महासागरामध्ये मीठाचं प्रमाण जास्त असल्याने चीन आणि भारत यांची मोहीम अयशस्वी ठरेल आणि अणुविस्फोटातून निर्माण होणा-या मोठ्या विनाशाला संपूर्ण जगाला सामोरं जावं लागेल. अभिजीत इतका भावनिक होतो की, लगेचच तो चीन आणि भारत येथील संशोधकांना संपर्क करुन त्यांना मोहीम थांबवायला सांगतो. त्याला जगाबद्दल वाटणारी काळजी प्रामाणिक होती, मात्र सरळ संशोधकांना त्यांची मोहिम थांबवायला सांगणं हा त्याचा सगळ्यात मोठा मुर्खपणा होता आणि त्यामुळे आता ख-या अर्थाने तिस-या  महायुध्दाला सुरुवात होते. अमेरिका विरुध्द संपूर्ण जग असे दोन गट पडतात. संपूर्ण जग अमेरिकेवर आक्रमण करण्याची तयारी करतं, मात्र आधी अंटार्क्टिकावरील मोहीम उरकू आणि नंतर अमेरिकेकडे बघू, असे चीनचे पंतप्रधान म्हणतात.

 

मात्र आण्विक स्फोटांमुळे जगाला धोका असल्याने अमेरिका आणखी आक्रमक होते, अर्जेंटिनाजवळून अंटार्क्टिकाकडे जाणा-या गुप्त मार्गाची माहिती फक्त अभिजीत आणि त्याच्या टीमला होती म्हणून इतर देशांच्या विमानांना मध्येच नष्ट करण्यासाठी अभिजीत अमेरिकी सैन्याला सुचवतो आणि त्याबाबत आखणी देखील करतो. पण बर्मुडाजवळ समुद्राखालून जाणा-या रस्त्याची माहिती फक्त अभिजीतला असल्याने जॉर्डन सर अभिजीतला देखील सैनिकांसोबत जाण्यास सांगतात. पहिल्यांदाच अभिजीत त्यांचं ऐकत नाही.

 

इथे जग संकटात आहे, जगाला वाचवायचं असेल तर मला इथे राहणं महत्त्वाचं आहे म्हणून मी अंटार्क्टिकाच्या दिशेने जाणार नाही.असं तो स्पष्ट शब्दांत सांगतो. खरं तर त्याला त्याच्या शेवटचे क्षण श्रेयासोबत घालवायचे असतात. श्रेयासोबतच त्याला त्याचं पुढचं आयुष्य जगायचं असतं. एकदा महासागरामध्ये जाऊन मृत्यूच्या दारातून वाचलेला असल्याने तो अंटार्क्टिकावर जायचं टाळतो. जॉर्डन सरांना देखील अभिजीतचं बोलणं पटतं, ते दुस-या कामासाठी निघून जातात.

 

आयुष्यभर आपल्या कामासाठी झटत असलेला अभिजीत पहिल्यांदाच स्वार्थी निर्णय घेतो. तो अंटार्क्टिकाच्या दिशेने गेला असता तर त्याचा नक्कीच फायदा झाला असता. मात्र श्रेयासाठी तो अंटार्क्टिकावर जाण्याचं टाळतो. कुठेतरी त्याचंही त्याच्या जागी बरोबर असतं, सर्व नातेवाईकांचा मृत्यू झालेला असताना त्याला श्रेया आणि श्रेयाला तो, असे ते दोघेच असतात. लग्नानंतर दोन दिवस देखील तो तिच्यासोबत पुर्णवेळ नव्हता. आता जगाचा अंत होत आहे तर शेवटचे क्षण तरी आपण तिच्यासोबत असावं असं त्याला वाटतं. जॉर्डन सरांनी अभिजीतला लढाऊ विमानांची माहिती घ्यायला सांगितली होती. अभिजीतच्या हातात त्या विमानांच्या इंजिनच्या आकृत्या असतात. नेहमीच्या सवयीप्रमाणे अभिजीत चुकून म्हणतो, ‘‘अल्बर्ट, मला विमानांची माहिती सांग...’’

 

अल्बर्टचा मृत्यू झाल्याचं त्याच्या लगेचच लक्षात येतं. थोडा वेळ तो गप्पच राहतो. आपला जीव वाचावा म्हणून त्याने स्वतःचा जीव गमावला, का? तर त्याला माहित होतं की, मी वाचलो तर जगाला या परिस्थितीतून वाचवू शकतो. इतका विश्वास होता त्याचा माझ्यावर? आणि मी काय करतोय? स्वतःच्या जबाबदारीपासून दूर पळतोय. नाही, असं नाही व्हायला पाहिजे. अल्बर्टचं बलिदान मी असं वाया जाऊ देणार नाही. मी अंटार्क्टिकावर जाणार आणि परिस्थितीवर मात करुन इथे पुन्हा येऊन श्रेयाला भेटून दाखवणार, मग काहीही होवो.

 

अभिजीत अंटार्क्टिकावर जाण्यास तयार होतो. त्याच्यसोबत जेन, स्टिफन, बार्बरा, मोहम्मद, त्सेन्ग चू आणि ब्रुसदेखील लगेचच तयार होतात. अमेरिकी नौसेनेचे अधिकारी मेजर रॉजर्ड देखील त्यांच्याबरोबर येण्याची तयारी दर्शवतात. अभिजीत नव्या मोहीमेवर निघतो. त्याआधी तो श्रेयाला भेटतो. जग संकटात असल्याने कधी कुणाचा मृत्यू होईल सांगता येत नव्हतं, अभिजीतला यापुढे पाहता येणार नाही या भितीने ती त्याच्या मिठीत जाते. अभिजीतदेखील तिला पुन्हा भेटण्याचं खोटं वचन देतो. त्याला माहित असतं, आपण ज्या मोहीमेवर जात आहोत तेथून पुन्हा येणं अशक्य आहे. कमीत कमी मी येण्याच्या आशेने तरी ती काही दिवस व्यवस्थित जगेल.

 

अमेरिकी नौसेनेने पाणबुडीची दुरुस्ती केलेली असते. आता ही पाणबुडी नव्या मोहीमेसाठी तयार असते. पाणबुडीच्या आतमध्ये जात असताना अभिजीतला अल्बर्टची उणीव प्रकर्षाने जाणवते. सर्वजण आपापल्या जागेवर जाऊन बसतात. पाणबुडी पुन्हा एकदा त्या खवळलेल्या समुद्रामध्ये, मृत्यूच्या जबड्यात जाते आणि दुसरीकडे 150 जेट एकाच वेळी नवीन संयुगे घेऊन अंटार्क्टिकाच्या दिशेने उड्डाण करतात. विमानांच्या अंटार्क्टिका मोहिमेच्या प्रत्येक सेकंदाची माहिती प्रत्येक वृत्तवाहिनीवर येत होती. कुणी रेडिओ, तर कुणी इंटरनेटवर या बातम्या ऐकत आणि बघत होते. श्वर, अल्लाह, येशु आणि होते नव्हते त्या सर्व देवतांचे स्मरण केले जात होते. कुणाचे हात तर कुणाचे पाय थरथरत होते. विमानं जसजशी अंटार्क्टिकाच्या जवळ जात होती तसतशी प्रत्येकाच्या हृदयाची धडधड वाढत होती. काही बोललं जातच नव्हतं, फक्त शांतता होती. आणि त्या शांततेमध्ये विमानांच्या मोहिमेची सुचना ऐकू येत होती. विमानं अंटार्क्टिकापासून फक्त 200 कि. मी. दूर असतात, फक्त 15 मिनिटानंतर पृथ्वीचा दक्षिण गोलार्ध अणुविस्फोटांच्या आवाजाने भेदरुन जाणार होता, तो समुद्रामध्ये चक्रिवादळ सुरु झालं. विमानांना समोरचं काही दिसत नव्हतं तरीही परिस्थिती नियंत्रणामध्ये होती. सर्व विमानं एकमेकांच्या संपर्कात होती.

 

थोड्या वेळाने वादळाचा जोर वाढू लागला. सर्व वैमानिकांनी अणुविस्फोट करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे असं समजून अणुबॉम्ब पाण्यात टाकण्यास सुरुवात करणार तोच रशियाचं एक जेट जोरात जर्मनीच्या एका जेटवर आदळतं. जर्मनीचं ते विमान इतर विमानांवर नियंत्रण ठेवत होतं. त्यामुळे सर्व विमानांचा एकमेकांशी आपोआप संबंध तुटतो. सर्व विमानं चक्रिवादळामध्ये अडकून एक-एक करुन पाण्यात पडतात. जणू काही ती लढाऊ विमानं नसून लहान मुलांनी कागदापासून तयार केलेली विमानं आहेत. असं करता करता सर्वच्या सर्व 150 विमानं अंटार्क्टिकाच्या जवळ पाण्यामध्ये वाहून जातात. चीन आणि भारताने ठरवलेली ही मोहिम अपयशी ठरते. संपूर्ण जग पुन्हा एकदा दुःखात लोटलं जातं.

 

आता जहाजांमध्ये जाऊन उपयोग तरी काय? समुद्राला, येणा-या त्सुनामीला कोणीही थांबवू शकत नाही. विनाश अटळ आहे. संपूर्ण जग लवकरच पाण्याखाली जाणार आहे. पृथ्वी पुर्णपणे जलमय होणार आहे. माणसासोबतच प्राण्यांच्या अनेक जाती नष्ट होणार आहे. ही झाडं, हे पशूपक्षी, या इमारती, हे उंचच्या उंच टॉवर्स, काहीच शिल्लक राहणार नाही. जगबूडी होणारचफ्रान्सचे एक धर्मगुरु हे विधान करतात आणि संपूर्ण जगावर अश्रुंचा पुर येतो.