प्रकरण ७
(प्रकरण ७ आणि ८ केवळ माहिती देण्यासाठी पुस्तकामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. आपल्याला खालील माहिती वाचायची नसेल तर आपण प्रकरण ९ वाचू शकता. सदर दोन प्रकरणे वगळल्याने कथानकामध्ये कोणताही बदल होत नाही.)
‘‘आपल्याला हव्या असलेल्या माहितीसाठी मी शिकत असताना बनवलेली ही व्हिडीओ आपणा सर्वांना दाखवत आहे, ज्यामुळे आपणा सर्वांना माहिती मिळवणं सोपं जाईल... व्हिडीओमध्ये आपण पाहत आहात की, इ. स. पू. सातव्या शतकात फिनिशियन खलाशी आफ्रिका खंडाला वळसा घालून गेल्याचा उल्लेख हिरोटोम्सने केला आहे... इ.स.पू. पाचव्या शतकात भूमध्य समुद्राच्या पूर्वेकडील समुद्राची आधिक माहिती मिळत गेली व त्यामुळे हेकाटीअसने तयार केलेल्या जगाच्या नकाशाचे स्वरूप किंचित बदलले... अलेक्झांडरच्या भारत देशावरील स्वारीमुळे कॅस्पियन समुद्र, इराणचे आखात व अरबी समुद्र यांच्याविषयी आधिक माहिती उपलब्ध झाली... इ.स.पू. चौथ्या शतकाच्या उत्तरार्धात ग्रीक प्रवासी व भूगोलवेत्ता पिथियस भूमध्य समुद्राच्या पलीकडे उत्तर धृववृत्तापर्यंत गेला होता... त्याने स्पेन, गॉल व ब्रिटिश बेटे यांच्या किना-यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केलेला... गुरुत्वाकर्षणाच्या नियमांची माहिती नव्हती तेव्हा त्याने भरती-ओहोटी, तिचे कालबद्ध आंदोलन व तिचा चंद्राच्या कलांशी असलेला संबंध यांचे वर्णन केले होते... अक्षांश ठरविण्याचाही त्याने प्रयत्न केला... त्यानंतर १०० वर्षांनी ऑपीअनने प्रथमच मासे आणि मासेमारी यांविषयी लेखन केले... हिपाक्रस, एराटॉस्थीनीझ इत्यादींच्या कार्यामुळे पृथ्वीवरील ठिकाणांचा अचूकपणे निर्देश करता येऊ लागला... टॉलेमीने हिंदी महासागराच्या आफ्रिका व चीन या दोन सीमा प्रथमच नकाशात दर्शविल्या... इ. स. १,००० च्या सुमारास व्हायकिंग लोक अटलांटिक पार करुन अमेरिकेस गेले होते, असे. न्यू फाउंडलंड व न्यू इंग्लंड येथे आढळणा-या पुराणशिल्पांच्या आधारे मानतात...’’
आता जेन थ्रीडी तंत्राचा वापर करते. ज्यामुळे ती सांगत असलेल्या सर्व गोष्टी प्रत्यक्षात घडत आहेत आणि सर्वजण त्या प्रत्यक्षात अनुभवत आहेत असा भास होत होता.
‘‘माझा असा अंदाज आहे की, महासागर विज्ञानाच्या इतिहासातील दुसरा टप्पा पंधराव्या शतकात सुरू झाला... या शतकात पोर्तुगालमध्ये राजपुत्र हेन्रीने नौकानयनविषयक विद्यालय सुरू करून समुद्राच्या संशोधनाकडे लोकांना आकर्षित केले...१४९७ साली वास्को-द-गामा आफ्रिकेला वळसा घालून भारताकडे येण्यास निघाला... कोलंबसने अमेरिकेचा शोध लावला, तर व्हास्को नुन्येथ बॅल्बोआ याने पनामातील टेकडीवरून पहिल्यांदाच पॅसिफिकचे दर्शन घेतले...१५१९ साली फर्डिनंड मॅगेलनची मोहीम सुरू झाली व केप ऑफ गुड होपला वळसा घालून ती १५२२ मध्ये स्वदेशी परतली... त्याने शोधलेल्या सामुद्रधुनीला मॅगेलन सामुद्रधुनी म्हणण्यात येऊ लागले... दक्षिण आमेरिका व अंटार्क्टिका यांच्यामधील जलाशयाची कल्पना या तुकडीला आली नाही मात्र फ्रान्सिस ड्रेक या इंग्रज समन्वेषकाला ती आली, म्हणून त्याला त्याचे नाव देण्यात आले…
मार्टिन फ्रॉबिशरया ब्रिटिश समन्वेषकाने कॅनडालगतचा उपसागर शोधल्याने त्याला फ्रोबिशर उपसागर असे नाव पडले, तर जॉन डेव्हिस हा आर्क्टिक समन्वेषक ज्या सामुद्रधुनीतून पुढे गेला, तिला त्याच्यावरुन डेव्हिस सामुद्रधुनी म्हणण्यात येऊ लागले... यानेच फॉकलंड बेटे शोधली... हेन्री हडसन या इंग्रज नाविकाने चार मोहिमांत भाग घेतला आणि हडसन नदी व हडसन उपसागर यांचा शोध लावला... विल्यम बँफिनने बॅफिन उपसागराचा शोध लावला, अनेक मोहिमांत भाग घेणारा हा इंग्रज नाविक उत्तरेस ७७०४५’ अक्षवृत्तापर्यंत गेला व नंतर दोन शतके याच्या उत्तरेस कोणताही मनुष्य प्राणी जाऊ शकला नाही. त्याने चंद्राच्या वेधांच्या आधारे सर्वप्रथम रेखावृत्त निश्चित केले... पुढे रेखांश दर्शविणारी अचूक उपकरणे उपलब्ध झाली...१७३१ साली कोणादर्शक या उपकरणाचाही शोध लागला... अशा प्रकारे या शतकात समुद्रावरील स्थान निश्चित करता येणे शक्य झाले... व्हीटुस बेरिंग या डॅनिश नाविकाने कॅमचॅटका ते अलास्का असा प्रवास केला... परतीच्या प्रवासात त्याचा ज्या बेटावर मृत्यू झाला, त्याला बेरिंग बेट म्हणतात... त्याने बेरिंग समुद्र व बेरिंग सामुद्रधुनीचा शोध लावला...’’ जेनचं लेक्चर ऐकून ब्रुसला खरंतर डुलकी लागली होती. तरीही जेन आपलं बोलणं पुढे चालू ठेवत होती.