Get it on Google Play
Download on the App Store

प्रकरण २१

जहाजाचा नाविक ते जहाज एका ठिकाणी स्थिर उभं ठेवतो. सर्व सैनिक आणि जहाजावरील काही उत्साही माणसं संपूर्ण जहाजावर सोलर पॅनेल बसवण्याचं काम सुरु करतात. काही सैनिक ब्रुसबरोबर एका छोट्या नावेने पाण्यात जाऊन मासे आणि खाण्यासाठी इतर गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करतात. जहाजामध्ये जेवणाचा एक मोठा कक्ष होता. साधारणपणे ५०० माणसं जेवू शकतील इतका मोठा. त्या कक्षामध्ये सर्व कम्प्युटर्स ठेवण्यात येतात. हार्डवेअर इंजिनियर आणि ते काम येत असलेली इतर तरुण मुलं सर्व कम्प्युटर एकमेकांना लॅनद्वारे जोडून घेतात. अभिजीत, कप्तान थॉमस आणि जेन प्रदीर्घ वेळ प्रोग्रामरच्या माणसांबरोबर चर्चा करतात. प्रोग्रामर्सना मदत करायची इच्छा असते, पण अभिजीत सांगत असलेलं काम करायला ते सतत नकार देत होते.

 

प्रोग्रामर, ‘‘सर, बोलणं सोपं आहे... पण करायला गेलं तर ते अशक्यच आहे... त्यापेक्षा आपण दूसरा एखादा मार्ग काढू...’’

 

अभिजीत, ‘‘नाही... सध्या तरी मला दुसरा मार्ग दिसत नाहीये... आणि जरी दुसरा मार्ग असता तरी मी हाच मार्ग निवडला असता...’’

 

जेन, ‘‘तुम्ही सगळे लगेच हार कशी मानता? एकदा प्रयत्न करुन पाहूया तरी...’’

 

जेनच्या बोलण्याने प्रोग्रामर थोडे सकारात्मक होतात. अभिजीतला त्यांच्याकडून नव्याने गुगल सर्च इंजिन तयार करायचं असतं. गोष्ट कठीण असली तरी ती अशक्य नव्हती. प्रोग्रामरसोबत बसून तो गुगलची नव्याने जुळवणी सुरु करतो. वेगवेगळे कोड टाकतो. ८२ हॅकर्सपैकी ३६ हॅकर्सना जावा, ओरॅकल, ए.एस.पी.एक्स. अशा प्रकारची कम्प्युटरची भाषा येत होती. सतत चार दिवस काम करुन अशक्य वाटणारी गुगलचं नवं सर्च इंजिन ते सुरु करतात. संपूर्ण जहाजावर बसवलेल्या सोलर पॅनलमूळे सर्व कम्प्युटर्सना वीज मिळत होती. सर्व यंत्रे व्यवस्थित कामं करत होती. आता अभिजीत सर्व हॅकर्सना त्यांच्या कम्प्युटरसमोर बसायला सांगाते आणि सर्व कम्प्युटर्स व्यवस्थित चालत आहेत की काही अडचण आहे हे देखील विचारतो. दोन-चार कम्प्युटर्समध्ये थोडी अडचण असते. मात्र हार्डवेअर इंजिनियर ती लगेचच दुरुस्त करतो. अभिजीत सर्व हॅकर्सना अवकाशात सोडलेल्या सॅटेलाईट्स एकत्र जोडायला सांगतो. म्हणजेच, जहाज एका ठिकाणी स्थिर असल्याने सॅटेलाईटच्या संपर्कात राहणं त्यांना सोपं जात होतं. आणि एकाच वेळी जर पृथ्वीबाहेर असलेल्या अवकाशातील सर्व सॅटेलाईट्सवर नियंत्रण मिळवता आलं तर अभिजीतसाठी अनेक गोष्टी सोप्या होणार होत्या.

 

सर्व हॅकर्स आपल्याकडून 100 टक्के प्रयत्न करत होते. त्यांनी एकेक करुन नासा, इस्त्रो, जर्मनी, चीन, रशिया, फ्रान्स अशा सर्व देशांच्या सॅटेलाईट्सवर नियंत्रण मिळवलं. अभिजीत त्या सर्वांना पृथ्वीच्या वेगवेगळ्या बाजूंनी सॅटलाईट्सद्वारे फोटो काढायला सांगतो जे पुढील दोन तासांत अभिजीतच्या कम्प्युटरवर स्पष्टपणे दिसतील. त्याप्रमाणे पृथ्वीबाहेरील वेगवेगळ्या भागांतून सॅटेलाईट्सद्वारे पृथ्वीचे फोटो काढण्यात येतात आणि अवघ्या दोन तासांत ते सर्व फोटो अभिजीतच्या कम्प्युटरवर स्पष्टपणे दिसतात. गणितीय आकडेमोड करुन अभिजीत एका निर्णयावर येऊन पोहोचतो. सर्व हॅकर्सला काम थांबवायला सांगून तो माईकद्वारे जहाजामध्ये घोषणा करतो.

 

‘‘मागे आलेल्या महाकाय प्रलयानंतर संपूर्ण जग पाण्याखाली आलं असा आपला अंदाज होता... म्हणजे पुर्ण पृथ्वी जलमय झाली असं आपल्याला वाटत होतं... आपणा सर्वांना सांगण्यास आनंद होत आहे की, आपला हा समज पुर्णतः खोटा होता, जगबूडीनंतर पाण्याचा जोर ओसरुन नवी पृथ्वी आता आहे त्याच स्थितीमध्ये पुढची 2,000 वर्ष तरी असणार आहे... जहाजावर असलेल्या काही प्रशंसनीय कम्प्युटर हॅकर्स, प्रोग्रामर यांच्या मदतीने नव्या पृथ्वीचा नकाशा आता आपल्याकडे आहे... त्यानूसार यु.एस.ए., कॅनडा, चीनचा पुर्वेकडील भाग आणि पश्चिम युरोप आणि रशिया या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमिन उपलब्ध झाली आहे... आपण सध्या कॅनडापासून जवळ असल्याने लवकर आपण जमिनीवर पोहोचणार आहोत...’’

 

संपूर्ण जहाजावर एकच जल्लोष सुरु होतो.अभिजीत पुन्हा बोलू लागतो.

 

‘‘मित्रांनो, जगबुडीनंतर आपल्याप्रमाणेच आणखी काही माणसं जीवंत असण्याचा अंदाज आहे... आपल्या सर्वांना या नव्या पृथ्वीमध्ये सर्वकाही नव्याने सुरु करायचं आहे... ही पृथ्वी आपल्या जुन्या पृथ्वीपेक्षा कितीतरी वेगळी आहे... आपण आता ज्या पृथ्वीवर आहोत तिचा 90 टक्के भाग पाण्याने तर 10 टक्के भाग जमिनीने व्यापलेला आहे... त्यामध्ये सुध्दा अंटार्क्टिका आणि जंगलं पाहिली तरी आपणा सर्वांना राहण्यासाठी जमिनीचा मोठा भाग उपलब्ध आहे... मात्र आता आपल्याला जिवंत रहायचं असेल तर एकमेकांबरोबर रहावं लागेल आणि काही दिवस आपल्याला माझ्या आणि कप्तान थॉमस यांच्या सुचनांचं पालन करुन आम्हाला सहकार्य करावं लागेल... आपणा सर्वांकडून सहकार्याची अपेक्षा करतो...’’

 

अभिजीतचं बोलणं संपताच जहाजातील लहान मुलांपासून ते वयोवृध्दांपर्यंत सर्वजण टाळ्या वाजवून अभिजीत आणि त्याच्या सहका-यांचं अभिनंदन करतात. आपल्या खोलीमध्ये गप्प असलेला स्टिफन असो, मेजर रॉजर्ड यांच्या मुली असो, सैनिकांसोबत पाठीमागे उभा असलेला ब्रुस असो किंवा अभिजीतच्या बाजूला उभे असलेले कप्तान थॉमस असो, सर्वजण अगदी उत्साहाने टाळ्या वाजवतात. अनेकांच्या डोळ्यातून आनंदाश्रुदेखील येतात.

 

खरी परीक्षा तर आता असते. जहाज एकाच ठिकाणी स्थि ठेवून अभिजीतने नवा गुगल हब तयार केला होता. मात्र जर जहाज त्या ठिकाणाहून पुढे-मागे हललं तरी तो पूर्ण संपर्क तुटणार होता. जहाजामध्ये माणसांच्या तुलनेत लहान होड्या देखील कमी होत्या. त्यात जास्त दिवस एकाच ठिकाणी जहाज ठेवणं शक्य नव्हतं. जहाजामधील संपूर्ण अन्नसाठा संपलेला होता. ब्रुस आणि इतर सैनिक पाण्यातून जे मासे आणतील, तेच मासे खाऊन सगळे जगत होते. तेव्हा अभिजीतने हॅकर्सना जगामध्ये इतर ठिकाणी कुठेही जहाज दिसत आहेत का ते पहायला सांगितलं. हॅकर्सकडून थोड्या वेळाने निरोप येतो, आपला जहाज वगळला तर, पृथ्वीच्या उत्तर भागामध्ये सात आणि दक्षिण भागामध्ये दोन जहाज स्पष्टपणे दिसत आहेत. अभिजीत त्यांना सर्व जहाजांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करायला सांगतो. त्याप्रमाणे तीन जहाजांमध्ये यशस्वीपणे संपर्क होतो. एक जहाज कॅनडाचं असतं तर मेक्सिको आणि कोलंबिया या देशांची जहाजं एकत्रच असतात. तिन्ही जहाजं अभिजीतच्या जहाजापासून 600 ते 1,000 कि.मी.अंतरावर असतात. त्या जहाजांची अवस्था देखील वेगळी नसते. अन्नाचा तुटवडा त्या जहाजांमध्ये देखील असतो. तरीही जमिनीवर जाता येईल या आशेने हे तिन्ही जहाजं कप्तान थॉमस यांच्या जहाजाजवळ येतात.