प्रकरण १२
अभिजीत समुद्राकडे बघतच असतो. लाटांचा आकार मोठा झाला होता, समुद्र चांगलाच खवळलेला होता. वादळ येण्याची शक्यता असल्याने सगळे हेलिकॉप्टर्स वेगाने अंटार्क्टिकाच्या दिशेने निघतात. वाटेत सर्व संशोधकांवर उपचार केले जातात. डॉ.वेन जिन्तो यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्याकडे जास्त लक्ष दिलं जातं. ते अर्ध्या तासानंतर डोळे उघडतात. अभिजीत त्यांच्या बाजूलाच बसलेला असतो. आपण जीवंत आहोत यावर त्यांचा विश्वास बसत नाही.
‘‘अभिजीत..?’’
‘‘हो, डॉक्टर...आपण अगदी बरोबर ओळखलंत... आराम करा... आता तुमच्या प्रकृतीमध्ये हळूहळू सुधारणा होत आहे...’’
‘‘विश्वासच बसत नाही... इतक्या मोठ्या तडाख्यातून मी सुखरुप कसा काय येऊ शकलो?’’
‘‘आम्हाला तुमचं जहाज दिसलं होतं...’’
‘‘माझे इतर साथीदार सुखरुप आहेत ना?’’
‘‘माफ करा सर, आम्ही पोहोचेपर्यंत त्या सर्वांचा मृत्यू झाला होता...’’
डॉ. वेन जिन्तो दुःखी होतात. आपल्या साथीदारांना गमावल्यामुळे त्यांच्या डोळ्यांतून अश्रु येतात. त्यांच्या तोंडून शब्द निघत नाही, तरीही शरीरातील पूर्ण शक्ती एकवटून ते म्हणतात, “जे घडलं ते भयाणक घडलं... मात्र जे घडणार आहे ते याहीपेक्षा भयाणक घडणार आहे...’’
‘‘म्हणजे? मला आपल्या बोलण्याचा अर्थ समजला नाही...’’
हेलिकॉप्टरमधील एक सैनिक त्यांच्याजवळ येतो आणि त्यांना काही न बोलण्याची सूचना करतो.
डॉ. वेन जिन्तो, ‘‘उपचार करुन काही उपयोग नाही... आता नाही तर उद्या मला मरण येणारच आहे...’’
अभिजीत, ‘‘असं नका म्हणू सर... जगाला आपल्यासारख्या विख्यात संशोधकांची गरज आहे...’’
डॉ. वेन जिन्तो, ‘‘खूप उशीर झाला आहे...’’
अभिजीत त्या सैनिकाला जाण्यास सांगतो.
डॉ. वेन जिन्तो थोडं थांबत थांबत बोलू लागतात, ‘‘आम्ही... आशियाई देशातील काही संशोधक... आणि वैज्ञानिक... अंटार्क्टिकावर संशोधनासाठी गेलो होतो... तिथे बर्फाचे 5 कि. मी. उंच थर होते... थंडी खूप होती... म्हणून आम्ही सर्व तयारी करुन... गेलो होतो... तिथे उतरल्यावर आम्हाला... वेगळाच अनुभव आला... आम्ही... या आधी सात वेळा... अंटार्क्टिका खंडावर गेलो होतो... सुर्याची किरणे... नेहमीप्रमाणे नारंगी रंगाची दिसत होती... आकाशाचा रंगदेखील तसाच होता... मात्र थंडी जाणवत नव्हती... बर्फावर पाय ठेवताच... आमचे पाय आतमध्ये रुतले गेले... कमरेपर्यंत भरलेल्या... आणि कच-याने तुडूंब असलेल्या... नाल्यातून चालतो... त्याप्रमाणे आम्ही चालत होतो... आम्हाला तिथे वेगाने बर्फ वितळत असल्याचं दिसलं...’’
‘‘पण सर, अचानक तिथे जाण्याचं काही कारण?’’ अभिजीत त्यांना मध्येच थांबवत विचारतो.
‘‘दोन... आठवड्यांपासून आमच्या यंत्रणेमध्ये बिघाड असल्याने... यंत्रणा दुरुस्त करण्यासाठी आम्हाला मोहीमेवर यावं लागलं... वाटेतच समजलं की... सर्व देशांच्या यंत्रणांमध्ये बिघाड झाला आहे... आम्ही पुन्हा मागे फिरलो... आशिया खंडातील भारत, जपान आणि श्रीलंकेमधील... शास्त्रज्ञांबरोबर आम्ही पुन्हा नव्याने मोहीम सुरु केली... वाटेतच आम्हाला सर्व देशांच्या यंत्रणा... कोलमडून पडल्याचे दिसले...’’
अचानक हेलिकॉप्टरला जोराचा तडाखा बसतो. सगळे एकदम हादरुन जातात. समुद्रामध्ये वादळ आल्याने त्यांच्या हेलिकॉप्टरला पुढे जाता येत नव्हतं. इतर हेलिकॉप्टर एकमेकांशी संवाद साधतात तेव्हा त्यांना दक्षिण जॉर्जिया बेटाजवळ असल्याचे कळते. हेलिकॉप्टर दक्षिण जॉर्जियाच्या दिशेने वळवली जातात. वादळातून बाहेर निघाल्यावर अभिजीत जेव्हा डॉ. वेन जिन्तो यांच्याकडे पाहतो तर त्यांनी प्राण सोडलेले असतात. अभिजीत त्यांच्या हाताची नस तपासून पाहतो तेव्हा त्यांचा मृत्यू झाल्याची त्याला खात्री पटते.
वादळाचा सामना करत सर्व हेलिकॉप्टर्स कसेतरी दक्षिण जॉर्जियाजवळ पोहोचतात. निसर्गाचं रौद्र रुप त्यांना इथेदेखील दिसतं. दक्षिण जॉर्जियामध्ये मुसळधार पाऊस सुरु असतो. अर्धा जॉर्जिया पाण्याखाली आला होता. लष्कराकडून तिथेदेखील मदतकार्य सुरु होतंच. मात्र तिथे पोहोचल्यामुळे त्यांना अर्जेंटिनाला जाणं सोयीचं होतं, वादळाचा आणि लाटांचा जोर ओसरल्यानंतर हेलिकॉप्टर अर्जेंटिना येथे उतरतात. अमेरिकी नौसेनेचं एक छोटंसं जहाज तेथे आलेलं असतं. पाणबुडी अमेरिकी नौसेनेच्या जहाजाकडे सुपूर्द करण्यात येते. उपस्थित सैनिक अभिजीत आणि त्याच्या साथीदारांना स्ट्रेचर (रुग्णाला त्यावर झोपवून नेता येतं) वरुन ताबडतोब जवळच्या रुग्णालयामध्ये नेण्यात येतं. मृत्यूच्या जबड्यातून ते सर्व सूखरुप आलेले असतात, मात्र अल्बर्ट आणि डॉ. वेन जिन्तो यांचा मृत्यू डोळ्यासमोर झाल्याने अभिजीत खूप खूप दु:ख होते. सततचा प्रवास आणि अंटार्क्टिकाजवळ थंड पाण्यात पोहल्यामुळे अभिजीतची प्रकृती जास्त बिघडली होती. त्यातच तो हेलिकॉप्टरमध्ये असल्याने त्याच्या संपूर्ण शरीराला वेदना होत होत्या. रुग्णालयात नेत असताना वाटेतच अभिजीत बेशुध्द झाला.