Get it on Google Play
Download on the App Store

प्रकरण १९

जहाजाच्या रडारवर देखील पाणबुडी दिसत होती. काही सैनिक मोठ्या दुर्बिणीमधून पाणबुडीचा अंदाज घेतात. ते जहाज ब्राझिलचं असतं. जहाजाचे कप्तान थॉमस पाणबुडीसोबत संपर्क करण्याचा प्रयत्न करतात, मोहम्मद त्यांना ताबडतोब प्रतिसाद देतो. कप्तान थॉमस त्यांना जहाजावर येण्याचं निमंत्रण देतात. पाणबुडी जहाजाच्या जवळ पोहोचल्यावर पाण्याच्या वर येते. अभिजीत आणि मेजर रॉजर्ड पाणबुडीबाहेर येऊन सैनिकांना पाण्यात दोर सोडायला सांगतात. सैनिकांनी आधीच तशी तयारी केलेली असते. ते जहाजामधून दोरखंड आणि त्यालाच लागून असलेली एक शिडी पाण्यात सोडतात. इतक्यात त्या सैनिकांजवळ दोन लहान मुली येतात. खाली कोण आहे हे त्या डोकावून बघतात तर, त्यांचे वडील मेजर रॉजर्ड त्यांना दिसतात. वडील जिवंत आणि सुखरुप असल्याचं पाहून त्यांना अत्यानंद होतो आणि त्या मोठ्याने ओरडू लागतात.

 

‘‘डॅडा... डॅडा...’’

 

ओळखीचा आवाज ऐकू आल्याने मेजर रॉजर्ड वर बघतात, त्यांना त्यांच्या मुली जहाजावर सुखरुप असल्याच्या दिसतात. मुलींना पाहून ते देखील भलतेच खुश होतात. ते देखील मोठ्याने ओरडू लागतात.

 

‘‘प्रेस्ता... जिनिया... मी सुखरुप आहे... बघा मी तुमच्यासमोर उभा आहे... आता मी कायम तुमच्यासोबतच राहणार आहे... लव यु माय एंजल्स...’’

 

मेजर रॉजर्ड यांना कधी आपण आपल्या मुलींना भेटतोय आणि त्या दोघींना कडेवर घेऊन त्यांचे मुके घेतोय, असं झालं होतं. सैनिकांनी पाणबुडीपर्यंत सोडलेली शीडी आणि दोरखंड पकडून मेजर रॉजर्ड आणि अभिजीत सर्वांना जहाजावर जायला सांगतात. मोहम्मद, जेन, स्टिफन आणि ब्रुस एकेक करुन वर जातात. बार्बरा आतमधून काही पेपर्स घेऊन येते. ते पेपर घेऊन तिला वर जाता येत नाही, अभिजीत ते पेपर्स आपल्या हातात घेतो आणि तिला वर जायला सांगतो. बार्बरा, तिच्या पाठोपाठ अभिजीत आणि मेजर रॉजर्ड सर्वात शेवटी असे ते तिघे जहाजावर जाऊ लागतात. मेजर रॉजर्ड वर येत असताना सतत आपल्या मुलींकडेच बघत असतात. मुलीदेखील त्यांची वर येण्याची वाट पाहत असतात. वर जात असताना अचानक बार्बराचा तोल जाऊन पाय घसरतो आणि बार्बरा 30 फूट उंचीवरुन पाण्यात पडते. अभिजीतच्या हातात पेपर्स असल्याने तो तिला पकडू शकला नाही वा पाण्यात उडी मारु शकला नाही. पण मेजर रॉजर्ड यांनी लगेच पाण्यात उडी मारली. अभिजीत तसाच मध्ये थांबून राहीला. जहाजावरुन सैनिकांनी ओरडून त्याला वर यायला सांगितलं तेव्हा तो जहाजावर पोहोचला. पेपर्स एका सैनिकाकडे देऊन तो खाली पाहू लागला. पोहता येत असून देखील बार्बराला हातपाय हलवता येत नव्हते. मेजर रॉजर्ड पोहत तिच्यापर्यंत पोहोचतात आणि तिला पकडून पाण्याबाहेर काढतात. दोघेही सुखरुप दिसल्याने अभिजीतच्या जीवात जीव येतो. तो थोडा बाजूला होतो तोच मेजर रॉजर्ड यांच्या मुली आरडा ओरडा करु लागतात. अभिजीत लगेचच खाली बघतो. शार्क माशांनी त्या दोघांवर हल्ला केलेला असतो. काहीच करता येत नव्हतं, उशीर झाला होता. तीन शार्क मासे तिथे आले होते. त्यांनी त्या दोघांच्या शरीराचे तुकडे केले होते. जहाजाखालच्या पाण्याचा थोडा भाग त्यांच्या रक्ताने लाल रंगाचा झाला होता.

 

मेजर रॉजर्ड यांच्या मुलींच्या डोळ्याची पापणी देखील हलत नव्हती. त्या नुसत्या स्तब्धपणे उभ्या होत्या. इतके दिवस आपल्या वडीलांची चिंता त्यांना होती. वडीलांच्या आठवणीने कित्येक रात्री त्या रडत होत्या. आज वडीलांना डोळ्यासमोर पाहून त्यांना देखील बरं वाटत होतं. पण त्यांना याची कल्पनाच कुठे की, हा आनंद काही क्षणापूरताच होता. वडील जिवंत असण्याची आशा होती तेव्हा त्या समुद्राच्या पाण्याकडेच डोळे ठेवून होत्या, आज नाहीतर उद्या आपले वडील नक्कीच येतील. नियतीने देखील असा खेळ खेळला की, इतक्या जवळ येऊन देखील मेजर रॉजर्ड यांना त्यांच्या मुलींना मिठीत घेता आलं नाही. नियती इथेच थांबली नाही, अभिजीतने सैनिकांनामुलींना आत घेऊन जाअसं सांगितलं. तोवर जहाजाचे कप्तान थॉमस तिथे आले होते. अभिजतने त्यांना जहाजावर मेजर रॉजर्ड यांच्या मुली कशा, हे विचारलं.

 

‘‘अर्जेंटिना नेव्ही कॅम्पमधील सैनिकांच्या कुटूंबियांसोबतच तुमचं कुटूंब अमेरिकी नौसेनेच्या अधिका-यांनी अर्जेंटिना येथील जहाजावर सुरक्षित होतं... मात्र ते जहाज काही अंतरावर गेल्यानंतर समुद्राच्या लाटा इतक्या भयाणक होत गेल्या की ते जहाज पाण्यात वाहून गेलं... जहाजामधले काही नागरिक या मुलींबरोबर त्या जहाजाच्याच एका लाकडी तुकड्यावर पाण्यावर तरंगत असलेले आम्हाला दिसले... आमच्या सैनिकांनी लगेचच त्या सर्वांना जहाजावर घेतले...’’ कप्तान थॉमस.

 

‘‘म्हणजे? त्या जहाजाचा अपघात झाला? माझी पत्नी श्रेया?’’ अभिजीत पूर्णपणे घाबरुन जातो.

 

‘‘जहाजामधून काही शेतकरी आणि मासेमार वाचू शकले... जॉर्डन सर, तुमच्या संस्थेचे काही अधिकारी, तुमची पत्नी श्रेया, स्टिफनची पत्नी रोडा आणि इतरही काही संशोधक त्या जहाजामध्ये होते... पण त्या अपघातात वाचलेल्या व्यक्तींमध्ये आम्हाला त्यांपैकी कोणीही सापडू शकलं नाही...’’

 

सगळं एकदम शांत होतं. पाण्याचा आवाज एकाएकी थांबतो. आकाशात विहार करणा-या पक्ष्यांचा आवाज बंद होतो. कप्नात थॉमस काय बोलताहेत ते अभिजीतला काही ऐकू येत नाही. अचानक काळोखात गेल्यासारखं त्याला वाटतं. आपण एका बंदिस्त पेटा-यात आहोत. आपण आत शिरल्यानंतर कुणीतरी हा पेटारा बंद केला असं त्याला वाटतं. सगळीकडे काळोख, समोर फक्त अंधार असतो. विचार, कल्पना सगळं सगळं थांबतं आणि त्याच्या डोळ्यातून पाण्याचा थेंब चटकन खाली सरकतो. अभिजीतला स्वतःवरच हसू येतं. श्रेयाला शेवटचं भेटून आपण पाण्यात गेलो, माहीत होतं पुन्हा भेट होणार नाही, तरी मी गेलो. एक महिन्यानंतर खूप काही बदललं होतं. संपूर्ण जग पाण्याखाली आलं होतं. श्रेया जिवंत नाही यावर त्याचा पुर्ण विश्वास बसला होता. मग नौसेनेकडून आलेल्या ई-मेल मूळे उगाचच आशेवर राहिलो आणि श्रेया जिवंत असल्याची खोटी आशा मनात निर्माण झाली. इथे आलो तर त्याहीपेक्षा भयाणक झालं. श्रेया तर मिळाली नाहीच, पण तिच्या मृत्यूची बातमी घेऊन कप्तान थॉमस यांना यावं लागलं आणि माझे सहकारी मेजर रॉजर्ड यांना त्यांच्या लहान मूलींसमोर आपले प्राण गमवावे लागले. बार्बराला देखील आम्ही गमावलंय. जगाचा शेवट होत चाललाय आणि आता एकेक करुन प्रत्येक माणूस मरणार आहे. काल श्रेया, रोडा आणि जॉर्डन सर गेलेत, त्याआधी अर्ध जग गेलं, आज मेजर रॉजर्ड आणि बार्बरा उद्या कदाचित आमचा शेवटचा दिवस असेल. हताश होऊन अभिजीत कप्तान थॉमस यांच्याबरोबर जहाजातील डॉक्टरांच्या कक्षामध्ये जातो.

 

पाणबुडीमधून बचावलेले ब्रुस, जेन, स्टिफन, मोहम्मद आणि अभिजीत डॉक्टरांच्या त्या कक्षामध्ये उपचार घेतात. डॉक्टर त्यांना दोन दिवस बेडरेस्ट करायला सांगतात. म्हणजे त्यांनी पलंग सोडून जाता कामा नये. पलंगावर पडून जो तो आपल्या मृत्यूची वाट पाहत होता. मोहम्मदने तर डॉक्टरांना सरळ प्रश्न केला होता, ‘आज नाहीतर उद्या आपण सगळे मरणार आहोत, मग आता आमच्यावर उपचार करुन उपयोग तरी काय?’ तेव्हा डॉक्टरांनी खूप चांगलं उत्तर दिलं होतं, ‘डॉक्टरचं काम हे जहाजाच्या कप्तानासारखं आहे... जहाजाची संपूर्ण जबाबदारी त्याची असते... जोपर्यंत जहाज बूडत नाही, तोपर्यंत तो ते वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करतो... त्याला आपले प्राण गमवावे लागले तरी, तसंच आमचं आहे... फरक एवढा की, आम्ही कप्तानाऐवजी डॉक्टर आहोत आणि आमच्याकडे जहाजाऐवजी माणसं आहेत. जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत आम्ही तुम्हाला वाचवायचाच प्रयत्न करु...