Get it on Google Play
Download on the App Store

मामा

गणपतीचा आदला दिवस. सगळीकडे मांडव पडलेले. रामेश्वर चौक, तुळशीबाग, नेहरू चौक, बाबू गेनू रस्ता, मंडई  सर्वत्र माणसांचा पूर लोटलेला. गर्दी कापत मी आणि माझी मैत्रीण  विश्रामबागवाड्याकडून चालतोय.  

तुळशीबागेत शिरलो. तुळशीबाग गणपतीचा मांडव ओलांडून आम्ही फुल बाजाराच्या दिशेने निघालो. रामेश्वर चौकात पाय ठेवायला जागा नव्हती. मंडईच्या टोकापासून दगडूशेठ दत्त मंदिरापर्यंत रस्त्याच्या मध्येच कमळ, केवडा, दूर्वा विकणाऱ्यांची दुतर्फा लाईन लागली होती. धडधाकट पुरुष, तरुण, मुले खांद्यावर कमळाचे भारे घेऊन, हातात केवड्याची कणसे घेऊन हटकत होते. ऊन मी म्हणत होते.   नेहमीच्या फुलविक्याकडे शिरलो. त्याच्याशी जरा गप्पा मारल्या. तीन चार दिवसांची फुले घेतली. यादीप्रमाणे सगळी फुले घेतली होती. फक्त कमळ आणि केवडा राहिले होते. समोरच कमळ विकणारे बादलीत कमळ घेऊन बसले होते.

'कमळ कसे दिले?'

'वीस रुपये'

कुठून आवाज आला म्हणून बघितले तर खांद्यावरची बदली खाली ठेऊन एक मध्यमवयीन माणूस बोलत होता. पाच साडेपाच फूट उंची. उन्हाने पार रापलेला चेहरा. कष्टाची जात ओळखू येते खरंच असा. हाडंकाडे झाला होता. अपार दमलेला चेहरा. दाढीचे खुंट वाढलेले. चेहऱ्यावर आशा,  खांद्यावर गमछा छाप एक फडके. बादली खाली ठेऊन बाबा उभा राहिला. त्याचे ते मणके ताठ ठेवून उभे राहणे एकदम नजरेत भरले.

"दोन कमळे द्या मामा."
मामांनी बादलीत हात घातला.
"मामा तुमच्या हातांनी काढा. तुमच्या घरच्या देवाला तुम्ही द्याल तशी काढा".
मामांनी वर पाहिले. ते मनापासून हसले.
बादलीत हात घालून त्यांनी दोन टपोरी कमळे काढून दिली.
"किती झाले?"
"चाळीस"
मी हातात काढून ठेवलेले सुट्टे पैसे त्यांना दिले.

 त्यांनी बादली उचलली. त्यांच्या हालचालीतून ते थकले आहेत खूप हे कळत होते. न राहवून मी त्यांना हाक मारली.
"मामा"
ते मागे वळले.
"सकाळपासून खाल्लंय का काही तुम्ही?"
ते कसेनुसे हसले
"न्हाई"
"वडापाव खाणार?"
"हो खाईन".
"चला मग".
आम्ही दोघी आणि मामा वडापावच्या शोधात निघालो. चालत चालत बाबू गेनू पार्किंगच्या दिशेने येत असता उजव्या बाजूला अलीकडे एक बऱ्यापैकी हॉटेल दिसले.  हॉटेलचा रागरंग बघून मामा दरवाज्यात थबकले.  आम्ही मामांना घेऊन आत शिरलो. एक टेबल पकडून बसलो. मामा भिरभिरल्या नजरेने सगळीकडे बघत होते.

"मामा काय खाणार?"
"काय सांगाल ते म्याडम. आम्हाला काय कळतंय इथलं"
माझ्या घशात दाटले.
"मामा जेवणार का?"
मामांनी माझ्याकडे बघितले. एक क्षण त्यांचे डोळे ओले झाले.
"जेवतो की".
"काय सांगू तुम्हाला जेवायला?"
"डाळ भात किंवा डाळ रोटी सांगा."
 मामांसाठी दोन बटर रोटी आणि डाळ फ्राय सांगितले.

"मामा कुठले तुम्ही?"
"आम्ही परभणीचे"
"इकडे काम शोधताय का?"
"हो. आमची एक एकर जमीन आहे तिकडे. आम्ही तीन भाऊ आणि आमचे संसार असे एकत्र राहतो. एक एकरात तीन घरे कशीबशी चालतात. मोठा भाऊ अपंग आहे. तो तिथेच असतो."
"मग तुम्ही इकडे कुठे?"
"आम्ही माती मजूर म्हणून आलो. खड्डे खणून देतो. माती वाहतो. आता इकडे गणपती म्हणून आलो पुण्याला. इकडे खूप असतंय गणपतीचे असे सांगितले आम्हाला."
"मग कमळे कुठून आणली?"
"तिकडे खाडीतून आणली." बगलेत अंगठे घालून मामा म्हणाले, "एव्हढ्या पाण्यात शिरलो कमळ तोडायला. हनुवटीपर्यंत पाणी लागले मग थांबलो.  आठ वाजल्यापासून कमळ इकतोय."

माझा आवाज बंद. संभाषण अडकलेच.

"इथे कोण कोण आलाय?"
"बायको आणि सून आलोय. बाकीचे घरचे पण असेच कुठे कुठे गेलेत मजुरीला."
"मग तुम्ही राहता कुठे इथे?"
"जागा मिळेल तिथे. कधी फूटपाथवर झोपतो. कधी रेल्वे टेसनात जातुय झोपायला. बायको आणि सून पण माझ्याबरोबर तिथेच येत्यात."
"मग जेवणापुरते तरी पैसे सुटतात का नाही?"
"कधी सुटत्यात. कधी नाही. दिवसभर काम करतो. माती उचलतो.   सांजच्याला दीड-दोनशे सुटत्यात.

वेटर त्यांचे जेवण घेऊन आला. मी मामांना जेवायला वाढले. मामांनी पानाला नमस्कार केला. रोटी मोडून डाळीत तुकडा बुडवून तोंडात घातला आणि त्यांचा घास अडकला. खांद्यावरच्या फडक्यात तोंड खुपसून त्यांनी हुंदके देऊन रडायला सुरुवात केली. मी आणि मैत्रिणीने एकमेकींकडे बघितले. दोघींचेही डोळे भरून आले होते. मी मामांच्या हातावर थोपटले.
"मामा भरल्या ताटावर रडू नये. जेऊन घ्या."
"आज तुम्ही भेटला म्याडम. कोणाला काय पडलंय हिते? सकाळधरुन घसा सुकला. थांबलो तर विकले जाणार नाही कमळ म्हणून तसाच फिरतूय बगा"
"जेऊन घ्या मामा."

मामांनी डोळे पुसले. त्यांनी जेवायला सुरुवात केली. दुसरी रोटी झाल्यावर मी विचारले.

"मामा अजून रोटी सांगू का?'

"नको म्याडम", मामा पोटावर हाताने थोपटून म्हणले, "आमची भूक एव्हढीच असतीय बगा".

सुरीने नस कापावी तसा या वाक्याने काळजावर चर्र्कन खोल चरा उठला.

"बरं मग बायको आणि सुनेचे काय?"
"आता माझे खायचे पैसे वाचले. त्यात त्यांना खायला घालतो."
आम्ही उरलेली डाळ, भात, चार बटर रोटी आणि अजून एक डाळ असे पार्सल करून मामांबरोबर दिले.
"मामा गरम आहे. गेलात की लगेच खाऊन घ्या."

बोलता बोलता बिल देऊन आम्ही हॉटेलच्या दारात आलो. ध्यानी मनी नसताना अचानक मामा आमच्या पाया पडले. आम्ही पटकन मागे सरकलो.  
"मामा आम्ही लहान. आमच्या पाया नका पडू. आशीर्वाद द्या."
"भले करेल माउली तुमचे" असे म्हणून मामा डोळे पुसत वळले आणि गर्दीत मिसळले.

हॉटेलचा स्टाफ, बाकीचे कस्टमर आमच्याकडे बघत होते. एकदोन कौतुकाच्या नजराही त्यात होत्या.

आमचे मात्र आवाज बंद होते. गाडी काढून घरी येईपर्यंत आम्ही दोघी शांत होतो. काय म्हणायचे होते त्याला ते आम्हाला उमगले होते.

हे सगळे लिहायचा उद्देश मात्र सुविचार इत्यादी नाहीये. या गोष्टीला आज तीन आठवडे तरी झाले असतील. पण कुठेतरी जे तुटलंय ते सांधले गेलेले नाहीये अजून. यात आम्ही काही फार मोठे केले त्या दिवशी असेही खरंच नाही. आमच्या सणाला काम करून चार पैसे मिळतील म्हणून त्याचे सण आणि घरदार सोडून आलेल्या माणसाला मी, 'तुमच्या घरच्या देवाला तुम्ही जशी कमळे काढाल तशी द्या' म्हणते, इतकी मुर्दाड मी झाले याची माफी कुठे मागायची ते कळत नाहीये खरंच.पण जे झाले ते मनात रुतलंय ठाम.

आमची भूक एव्हढीच असतीय बगा या वाक्याचा घाव फार मोठा आहे. आत्तासुद्धा हे वाक्य लिहिताना माझे डोळे भरून आले आहेत. आज त्यांच्या भुकेची सोय आमच्या दोघींच्या हातून झाली. पण त्यांच्या उद्याचे काय ह्या प्रश्नाने पोटात पडलेला खड्डा भरून येत नाहीये. असहाय्य राग सुद्धा नाहीये.

मामांसारखे किती लोक देशोधडीला लागले असतील कुणाला ठाऊक?       

बगलभर पाण्यात उभे राहून, कमळ तोडून दिवसभर कोरड्या घशाने पळून पळून शंभर रुपयांसाठी टाचा झिजवणाऱ्या माणसाबरोबर वीस रुपयांसाठी घासाघीस करणारेही बघितले त्या दिवशी. नाटके करतात हो असेही म्हणणारे आहेतच की.

पण आज जेवायला बसले की एखादा घास तरी अडतो. कानात तोंडात फडके कोंबून दिलेले हुंदके ऐकू येतात. डोळे भरतात.

आपली भूक केव्हढी ते कळते.

आणि हाच सल जात नाहीये, जाणार नाही म्हणून लिहावे लागले....

© प्राजक्ता काणेगावकर

मराठी कथा नि गोष्टी

परम
Chapters
कुटुंब सोहोराब काका शाॅपींग फेस्टिव्हल... मामा गुरूमूर्ती यांचे नोटबंदीवरिल विचार अत्यंत सोप्या शब्दात शंभू तरुण रामस्वामी चोरकाका... #कुटुंब प्रोजेक्टचे व्हॅल्यूएशन सोबत रसायन साबून स्लो हैं क्या? "या सूरांनो चंद्र व्हा...." कोजागरी पौर्णिमा दरमहा पैसे वाचविण्याच्या सात टिप्स... जादूगर ची बायको प्रेम प्रेम आणि विश्वास निरोगी राहण्याचे काही नियम लेखन संकष्टी महात्म्य समाधान श्रीमंतीचं दुसरं नावं मला वाटायच गोष्टी परीक्षण करतानाच्या (supervisionच्या) !! लेखन !! अखेर श्रीखंडाच्या वड्यांची रेसिपी सापडली गोष्टी परीक्षण करतानाच्या लक्ष्मी पंगिरा मधुमालतीचा वेल अप्रूप मसालेभात स्पर्श अखेरचा डाव.... आजी आईचा आत्मा जड झालेले आई-बाप दुर्दैवी मराठीची होरपळलेली पानं... निरोप.. हुरहुर दिवाळीची.... कळीचा नारद जन्याच पोर. ऍपल छत्रपति शिवरायांची एवढ़ी माहिती पाठवत आहे की आजच्या काहींना माहिती नाही.. आरोग्यम धनसंपदा श्रीमंत वृद्धाश्रम