संकष्टी महात्म्य
फार पूर्वी यादवकुळात सत्राजित नावाचा एक राजा होऊन गेला. त्याने शंभर वर्षे सूर्योपासना करून सूर्यास प्रसन्न करून घेतले. प्रसन्न होऊन सूर्याने त्याला दिव्य स्यमंतक मणी दिला. हा मणी तेजाने प्रतिसूर्यच होता. या मण्यामुळे राजास दररोज सोने प्राप्त होई. त्यामुळे सत्राजित राजा दररोज सहस्त्र भोजन घालायचा.
सत्राजिताकडील स्यमंतक मण्याविषयी श्रीकृष्णाला समजल्यावर श्रीकृष्णाने सत्राजिताकडे या मण्याची मागणी केली. परंतु स्त्राजिताने तो मणी देण्यास नकार दिला.
पुढे एक दिवस सत्राजिताचा बंधु प्रसेन हा स्यमंतक मणी गळ्यात घालून अरण्यात शिकारीसाठी गेला असता एका सिंहाने त्याच्यावर हल्ला करून प्रसेनाला ठार मारले व तो दिव्यमणी पळविला. पुढे त्या सिंहास जांबुवंत नावाच्या राजाने ठार मारुन तो स्यमंतक मणी आपल्या कन्येच्या गळ्यात बांधला.
इकडे प्रसेन स्यमंतक मणी घेऊन नाहीसा झालेला पाहून सत्राजित राजाने हे कृष्णकारस्थान असल्याचा आरोप केला. ही गोष्ट कृष्णास कळली. आपल्याकडील चोरीचा आळ दूर करण्यासाठी मग कृष्ण प्रसेनाच्या शोधार्थ निघाला.
प्रसेनाला शोधत कृष्ण अरण्यात येऊन पोहोचला. पाहतो तर काय? एके ठिकाणी प्रसेन मरुन पडलेला. जवळच सिंहाच्या पाऊलखुणा उमटल्या होत्या. त्यांचा माग काढीत कृष्ण जांबुवंताच्या गुहेपाशी येऊन पोहोचला व स्यमंतक मणी शोधू लागला. अचानक परपुरुष आपल्या गुहेत शिरलेला पाहून जांबुवंताच्या कन्येने ओरडावयास सुरुवात केली. तिचे ओरडणे ऐकून जांबुवंत तेथे आला. त्याने कृष्णावर हल्ला केला. त्या दोघांचे युद्ध एकवीस दिवस चालले होते. त्यामुळे द्वारकेत घबराट झाली.
गोकुळात नंद-यशोदेला या युद्धाची वार्ता कळली. तेव्हा ते कृष्णाच्या काळजीने व्याकुळ झाले. त्यांनी संकटहर्त्या श्रीगणेशाचे संकष्टी चतुर्थीचे व्रत निष्ठापूर्वक केले.
श्रीगणेशाच्या कृपाप्रसादाने श्रीकृष्णास विजयप्राप्ती झाली. जांबुवंताने स्यमंतक मणी आणि आपली कन्या जांबुवंती श्रीकृष्णास दिली. गोकुळात, द्वारकेत सगळीकडे आनंदीआनंद झाला.
श्रीकृष्णावर स्यमंतक मणी चोरल्याचा आळ आला. त्याचे कारण असे सांगतात. पूर्वी भाद्रपदात गणेशचतुर्थी दिवशी सायंकाळी गोपाळांसह रानातून घरी येताना वाटेत उमटलेल्या गाईच्या खुरांच्या ठशात पावसाचे पाणी साचले होते. त्यापाण्यात कृष्णाने चंद्र पाहिला होता. श्रीगणेशाने चंद्रास दिलेला शाप श्रीकृष्णास अशा प्रकारे भोवला होता. परंतु संकष्टी चतुर्थी व्रताच्या प्रभावाने श्रीकृष्णावरील चोरीचा आळ दूर झाला.
श्रीकृष्णाने स्यमंतक मणी सत्राजिताला परत दिला. सत्राजिताने श्रीकृष्णाची क्षमा मागून आपली कन्या सत्यभामा श्रीकृष्णास दिली.
दर महिन्याच्या कृष्ण चतुर्थीस संकष्ट चतुर्थीचे व्रत करतात. या व्रतामुळे संकटहर्त्या श्रीगणेशाची कृपा लाभते, भक्तांची संकटे दूर होतात आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे.