चोरकाका...
बाबाची लाडो होती ती..
साडेचारवर्षांची असेल.
थोडीशी हट्टी.
बाकी जगासाठी प्रचंड हट्टी.
पण बाबासाठी थोडीशीच.
तिनं काही मागितलंय अन् बाबानं दिलं नाही..
पाॅसीबलच नाही..
जरा मनाविरूद्ध झालं की गालफुगी.
बाबा बिचारा लगेच ऊन्हात ठेवलेल्या कॅडबरीसारखा मेल्ट व्हायचा.
फार लाडवून ठेवलंयस तिला...
आई , आजी , आबा सगळ्यांचं म्हणणं.
बाबा तरी काय करेल बिचारा ?
सारखा टूरवर असायचा .
चार पाच दिवसांनी घरी आला की ..
तो आणि त्याची लेक.
तिच्यासाठी काय वाट्टेल ते करायची तयारी असायची त्याची.
तिचा बर्थ डे ऊद्या.
तिनं सांगितलं म्हणून बाबा खास शूज घेवून आला तिच्यासाठी.
लाईटवाले..
म्याव म्याव वाजणारे.
पाऊल टाकलं की लाईट लागायचे.
म्याव म्याव बोलू लागायचे ते शूज.
तो टूरवरून घरी आला..
दारातूनच त्याच्या लेकीनं भोऽऽ केलं.
दोघांची गळाभेट.
जणू चौदा वर्षांच्या वनवासानंतरच भेटतायेत दोघं.
बाबानं शूजचा बाॅक्स दिला.
ब्रह्मांड बघितल्यासारखा तिचा प्रफुल्ल चेहरा.
त्यामानाने शूज स्वस्तातच पडले.
चेहर्यावरचं ते अनमोल हसू.
मग पन्नास पाप्यांचा थँक्स गिव्हींग सेरेमनी.
पुढचा तास घरभर ती लाईटवाली छोटी पावलं म्याव म्याव करत होती.
कुशीत ते बूट घेवून झोपली त्याची सिन्ड्रेला.
तिचा सगळा जीव त्या शूजमधे एकवटलेला.
आजीच्या ष्टोरीतल्या राक्षसाचा जीव जसा पोपटाच्या डोळ्यात,
डिट्टो तस्सा..
सकाळ झाली.
ऊठल्या ऊठल्या सगळ्यांनी तिला बर्थ डे विश केलं.
आजीनं ओवाळलं..
तिचे शूज घालून ती तय्यार.
चल बाबा फिरायला जाऊ..
बाबा तिला घेवून काॅलनीच्या गणपतीमंदिरात...
ती बाप्पाच्या पाया पडली.
चांगली बुद्धी दे..
तिचं आणि तिच्या बाबाचं एकच मागणं.
प्रसाद घेवून दोघं बाहेर आली.
गायब..
सिन्ड्रेलाचे एक नाही दोन्ही शूज गायब.
बाबाच्या पोटात मोठ्ठा गोळा.
अर्थक्वेकची भिती..
तिच्या चेहर्यावरचं हसू क्षणात गायब..
डोळ्यातून अश्रूंचा बदादा धबधबा.
नोबितासारखा..
न थांबणारा.
बाबानं रडू दिलं तिला..
शेवटी धबधबा आटला.
बाबा म्हणाला.
"चोरकाकांनी नेले तुझे शूज.
त्यांना पण तुझ्यासारखीच एक गोड मुलगी आहे.
ती पण हटून बसली तुझ्यासारखीच.
आत्ताच्या आत्ता मला शूज हवेत.
आता इतक्या सकाळी सकाळी दुकानं कुठली ऊघडायला.
मीच म्हणलं मग.
आमच्या परीचे घेवून जा..
ती नाही म्हणायची नाही..
शहाणी आहे ती.."
दोन मिनटं परी गप्प.
मग तिला पटलं.
आपण शहाणी मुग्गी आहोत
रोने का नही.
बाबाच्या खांद्यावर बसून ती घरी निघाली.
बाबानं प्राॅमिस केलेलं.
आजच्या आज नवीन शूज घेवून देणार.
ईटस् ओक्के बाबू.
भेटणार्या प्रत्येक माणसाला परी मनापासून तिची ष्टोरी सांगत होती.
माझे शूज चोरकाकांनी नेले आहेत म्हणून.
घरी गेल्यावर तेच...
सगळ्यांची नजर बाबाने वाचली.
डोळे मिटून ...
परीच्या बापाचा ऊद्धार करणारी.
तरीही..
परीच्या समजूतदारपणाच्या या छोट्याशा छटेनेही सगळे खुष.
ऊसपें दस जोडी जूते कुर्बान करने को तैयार ...
साडेदहा वाजले.
बाबा परीला घेवून शूज घ्यायला निघाला.
तेवढ्यात आबांची हाक.
एक कॅरीबॅग.
त्यातून परीचे तेच शूज प्रगट झाले.
सगळ्या ओठांचे चंबू.
एक फाटका माणूस आला.
म्हणाला , तुमच्या नातीला सांगा ,
"चोरकाकांनी गिफ्ट दिलेत ."
परी आनंदाने नाचू लागली.
लाईटस्ची झगमग.
म्याव म्यावचं ब्यॅग्राऊंड म्युझीक.
सगळं घर चोरकाकांच्या रिटर्न गिफ्टवर जबरा खूष.
थँक्स चोरकाका...