Get it on Google Play
Download on the App Store

मसालेभात

असं समजा की तुम्हाला एका लग्नाचं बोलावणं आलं, वधू वराच्या डोक्यावर अक्षता टाकून तुम्ही तडक जेवणाच्या हॉल कडे वळता.

तिथे तुमच्या सारख्या चतुर लोकांची आधीच  गर्दी उडालेली असते. गर्दीतून वाट काढून तुम्ही एका बाजूला सरकता आणि तुम्हाला दिसतात ओळीत मांडलेली पानं आणि त्यात उरलेल्या दोन रिकाम्या खुर्च्या.!!!

तुम्ही पटकन त्यातली एक खुर्ची पकडता आणि स्वतःवरच खुश होत वाढप्यांची वाट बघता.

पानं वाढायला सुरुवात होते, मस्तपैकी बासुंदी, पुरीचा बेत असतो. तुम्हालाही सडकून भूक लागलेली असते, म्हणून बासुंदी वर आडवा हात मारायचे मनसुबे तुम्ही रचता. पण पुरीवाला वाढायला येतो तेव्हा फेरारी च्या वेगाने "पुरी... पुरी... पुरी... पुरी...." असं म्हणत तुम्ही "हो, चार" असं म्हणेपर्यंत दहा पानं पुढे पोहोचलेला असतो.

 जेमतेम एकदा त्याच्या भांड्यात उरलेल्या दोन पुऱ्या मिळवल्यावर तर तो बेपत्ताच होतो. त्याची वाट बघत तुम्ही आपलं बाकीचे पदार्थ संपवण्याच्या मागे लागता. शेवटी बराच वेळ वाट बघूनही तो येत नाही म्हणून तुम्ही मसाले भात वाढणाऱ्याला "हो" म्हणता.

यजमानांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे तुम्हाला काही कळायच्या आत तो तुमच्या पानात मसालेभाताचा डोंगर रचून पुढे निघून जातो. आता एवढा भात कसा संपवायचा हे संकट तुमच्यापुढे उभं रहातं.

तो डोंगर अर्धा पार केल्यावर अचानक पुरी वाला उगवतो आणि तुमच्या मनाची द्विधा अवस्था करून ठेवतो. तिकडे वाटीतली बासुंदी खुणावत असते आणि रस्त्यात अर्धा उरलेला मसालेभात वाट अडवून उभा असतो.

अगोदरच आधीच्या अर्ध्या भाताने पोट तुडुंब भरलेलं असतं. पानात टाकलेलं बरं दिसत नाही म्हणून नेटाने उरलेला अर्धा भात तुम्ही संपवत असता, त्यात पुरी घ्यावी तर लोक अधाशी म्हणतील, वरून भात टाकावा लागेल तो वेगळा. म्हणून वाटीतल्या बासुंदीच्या खाणाखुणांनकडे दुर्लक्ष करून तुम्ही जड मनाने पुरी वाल्याला "नाही" म्हणता.

पोटातला भरता येण्यासारखा प्रत्येक कानाकोपरा मसालेभाताने भरून तुम्ही विजयी मुद्रेने एका हाताचा आधार घेत, जडावलेलं पोट सांभाळत उठता.

 तोपर्यंत हॉल मधली गर्दी कमी झालेली असते. हात धुवायला जातांना तुम्हाला लक्षात येतं की जेवणासाठी पंगत आणि बुफ्फे अश्या दोन्ही व्यवस्था होत्या, आणि बुफ्फे मध्ये पाणीपुरी, दहीवडा, छोले टिक्की, लाईव्ह पाव भाजी काउंटर, पंजाबी, चायनीज, इटालियन, मेक्सिकन, असे अनेक काउंटर्स होते

.....आणि सहज मिळत असलेल्या पंगतीतल्या जागेसाठी तुम्ही हे सगळं घालवलंत .....पण तोवर वेळ निघून गेलेली असते, पोटात हवा शिरायला सुद्धा जागा उरलेली नसते. त्या सगळ्या काउंटर्स चे वास घेत, पोटातल्या मसालेभाताला सांभाळत तुम्ही हात धुवून तिथून बाहेर पडता.

#आयुष्यं पण असंच काहीसं आहे. सजहपणे मिळतंय म्हणून आपण मिळत असलेली पहिली खुर्ची पकडतो आणि तिला  चिकटून बसतो. स्वप्नातली पुरी नशिबात नाही असं समजून मसालेभाताला "हो" म्हणून बसतो, आणि एकदम एक दिवस स्वप्नातली पुरी अवचित आपल्या आयुष्यात अवतरते......

......, पण तोवर मसालेभाताला शब्द दिलेला असतो, म्हणून आपण मसालेभाताशी निभावत बसतो. आणि आयुष्याच्या शेवटी लक्षात येतं की अरेच्या पुरी आणि मसालेभातापलीकडे देखील बघण्यासारखं, करण्यासारखं, चाखण्यासारखं बरंच काही होतं जे आपण सेक्युअर्ड खुर्ची पायी गमावून बसलो !!!

☺☺☺

#तळटीप: वरील गोष्टीचे तात्पर्य '#नोकरी'बद्दल आहे. तुमच्या मनात '#बायको' हा विषय येणे हा निव्वळ योगायोग आहे.

मराठी कथा नि गोष्टी

परम
Chapters
कुटुंब सोहोराब काका शाॅपींग फेस्टिव्हल... मामा गुरूमूर्ती यांचे नोटबंदीवरिल विचार अत्यंत सोप्या शब्दात शंभू तरुण रामस्वामी चोरकाका... #कुटुंब प्रोजेक्टचे व्हॅल्यूएशन सोबत रसायन साबून स्लो हैं क्या? "या सूरांनो चंद्र व्हा...." कोजागरी पौर्णिमा दरमहा पैसे वाचविण्याच्या सात टिप्स... जादूगर ची बायको प्रेम प्रेम आणि विश्वास निरोगी राहण्याचे काही नियम लेखन संकष्टी महात्म्य समाधान श्रीमंतीचं दुसरं नावं मला वाटायच गोष्टी परीक्षण करतानाच्या (supervisionच्या) !! लेखन !! अखेर श्रीखंडाच्या वड्यांची रेसिपी सापडली गोष्टी परीक्षण करतानाच्या लक्ष्मी पंगिरा मधुमालतीचा वेल अप्रूप मसालेभात स्पर्श अखेरचा डाव.... आजी आईचा आत्मा जड झालेले आई-बाप दुर्दैवी मराठीची होरपळलेली पानं... निरोप.. हुरहुर दिवाळीची.... कळीचा नारद जन्याच पोर. ऍपल छत्रपति शिवरायांची एवढ़ी माहिती पाठवत आहे की आजच्या काहींना माहिती नाही.. आरोग्यम धनसंपदा श्रीमंत वृद्धाश्रम