Get it on Google Play
Download on the App Store

जन्याच पोर.

गावच्या जत्रेचा आज शेवटचा दिवस होता. जन्याच चार वर्षाच पोर जत्रेला जाण्यासाठी हटून बसल होत. आजूबाजूची सारी पोरं जत्रेला जाऊन आली होती ...खेळणी, भिंग्र्या,  घेऊन खेळत होती, चिक्की , गूळ - दाण्याचे लाडू खात होती......जन्याकडे एक फुटकी कवडी देखील न्हवती...पोराला जत्रेला नेल तर त्याला काय घेऊन द्यायच ह्या चिंतेत पोराला रोज "उद्याचाला जावू" अस सांगून वेळ मारून नेत होता....पण आज पोर हट्टालाच पेटल होत कांही केल्या ऐकेना ....जन्याचा संयम सुटला..पोराच्या फाटकन् कानफटाखाली जाळ काढला ...आईविना पोरक पोर रडत रडत झोपी गेल ...संध्याकाळ झाली .....उपाशी  झोपलेल पोर उठल…डावा गाल सुजलेला...आजीकडे भाकर तुकडा मागू लागलं……!
खुरमुंडी घालून बसलेल्या जन्यान पाहिल.....काळजांत कसनुस झाल त्याच्या ..... ताडकन्  उठला,  पोराला घेतल खांद्यावर अन तडक् निघाला ....."आर, कुट निगाला बाबा " ?? म्हातारीन  कळवळून विचारल. "जत्रेला."  लांब लांब ढेंगा  टाकीत जन्या  निघाला ...एकच आशा होती ....भाल्या पाटलाची .....त्याच्या घरी पोहोचला....." वैनी, भाल्या हैका ?" ..... " भावजी, ते बारक्याला घेवून गेले नव्ह  जत्रेला " .....जन्याचा अंदाज खरा ठरला होता .....भाल्या त्याचा मित्र होता वेळप्रसंगी पैशाची मदत करणारा ....खांद्यावर पोराला घेतलेला जन्या जत्रेच्या गर्दीत भाल्याला शोधू लागला !
जत्रेतली दुकान पाहून जन्याच पोर हरखून गेल ...हे घे, ते घे म्हणत ....बापाकडे  हट्ट करू लागल .....जन्या वेड्या सारखा भाल्याला शोधू लागला.....  बाप आपल्यासाठी काही घेत नाही हे लक्षांत आल्यावर पोर रडकुंडीला  आल...! इतक्यात जन्याला भाल्या दिसला ..त्याच्या बारक्याला फुगा घेवून देत होता ....जन्यान पटकन खांद्यावरून पोराला उतरवल म्हणाला, " थांब इथ, आलोच मी." पोर दुकानांतली रंगीबेरंगी खेळणी बघत उभ राहील ....जन्यान धावत जावून भाल्याला गांठल ...." एक  धा रुपये उधार देतो का बाबा, पोरग लय अडून बसलय न्हव" .. " अरे, घे की पोराला आनल्यास न्हव, घे !! जन्याने  भाल्याने पुढे केलेली दहाची नोट घेतली .. आता पोराला एक दोन खेळणी घ्यायचं ठरवत जन्या, धांवत दुकानापाशी  आला ....बघतो तर काय ..पोरग गायब ....!
इकडे तिकडे विचारल, गर्दीत कोणाच कुठे लक्ष असणार ....जन्याचा जीव उडाला ...जेमतेम चार वर्षाच पोर कुठे गेल....गर्दीत चेंगरल तर ...जन्या भिरभिरला.....कावरा बावरा जन्या पोराला शोधू लागला ....तेवढ्यात  भाल्याच समोर आला ...."अरे, पोर सापडना रे बाबा, हरवल बघ गर्दीत".... "गाढवा, सोडला कसा रं तू त्याला ?....भाल्यान आपल्या पोराला उचलून घेतल आणि तो देखील जन्याच्या पोराला शोधू लागला..." जन्या, तू बघ तिकड मी बघतो इथ ..असेल इथच जवळ" ....जन्यान मान डोलावली अन दोघंही दोन दिशांना पोराला शोधू लागले....इतक्यात भाल्याला फ़ुगेवाल्याच्या मागे मागे जाणार जन्याच पोर दिसल.....पटकन् पुढ होत त्यान त्याचा हात पकडला ... "आरं कुठ चालला बाळा..तुझा बाप  शोधून राहिला न तुला "....पोराचा हात पकडून  भाल्या मागे वळला .....पोर देखील भानावर आल…!! 
आता भाल्याला जन्या कुठे दिसेना.... स्वत:च  बारक खांद्यावर आणि जन्याच पोर हाताशी धरून बावचळलेला  भाल्या वेड्यासारखा जन्या कुठे दिसतोय का पहात उभा राहिला... आपला बाप हरवला ह्या जाणिवेने पोराचा धीर सुटू लागला ...हळू हळू ते रडायला लागल…आता भाल्याला सुचेना काय कराव....तो पोराला समजावू लागला, " आर येईल बघ  तुझा बाबा, आसल बघ  इथच कुठे "....जसजसा वेळ जावू लागला तस तस पोरग जास्तच रडू लागल... भाल्या त्याची समजूत काढत म्हणाला, “चल, तुला फुगा देतो”…...”मला नकू फुगा ...मला बाबा पाहिजे”..!! ...परत भाल्या म्हणाला , “चल तुला लाडू घेवून देतो” ...”नकू , मला बाबाच पाहिजे”…!! भाल्या एकेक नव्या नव्या वस्तूंची नाव घेवू लागला ..पण पोरान एकच ठेका धरला “मला बाबाच पाहिजे” ...!!
दुपारी बाबाच्या माराने सुजलेला गाल, भिंगरी, फुगा, चिक्की , गूळदाण्याचे  लाडू  पाच मिनिटांपूर्वी हव्या असलेल्या सगळ्या गोष्टी त्या चार वर्षाच्या पोराला एका क्षणांत नकोशा झाल्या ....आपला बाबा हरवला ह्या जाणिवेन पोर व्याकुळ होवू लागल ...हमसून हुमसून रडू लागलं... भाल्याला कांही सुचेना ..जन्याला शिव्या घालत तो जागच्या जागीच उभा राहिला....! एवढ्यांत कुठून तरी घामाघूम झालेला, भेदरलेला, जन्या गर्दीतून नेमका भाल्याच्या  समोर येऊन उभा राहिला. भाल्या बरोबर उभं असलेल आपल रडणार पोर बघून मटकन् खालीच बसला...पोराने भाल्याचा हात सोडला आणि जन्याच्या गळ्यांत जावून पडला ! जन्या कसाबसा उभा राहिला ....जन्याला शिव्या घालत भाल्या म्हणाला, " जावा आता घराला...आणि आपल्या बारक्याचा हात धरून निघून गेला..!!
जन्या आता भानावर आला होता घट्ट गळामिठी घातलेल्या पोराला परत परत विचारत होता " काय घेतो  बाबा , चक्री, फुगा, पिपाणी, लाडू ??”  ...जन्याच्या खिशांत दहा रुपयाची नोट अजूनही तशीच होती ....पोरग म्हणत होत " नकू, मला कायबी नकू " आणि बापाच्या गळया भोवतीची मिठी घट्ट घट्ट करत होत....जन्या त्याच्या डोक्यावरून हात फिरवत परत परत विचारत होता "काय पायजे सांग बाबा " पोर म्हणाल , "घरला जावूया"....!!  

अंधार दाटू लागला होता जत्रेतल्या दुकानांतले पेट्रोमॅक्सचे  दिवे उजळू लागले होते ...जन्या आपल्या चार वर्षांच्या काटकुळ्या पोराला थोपटत थोपटत घरच्या रस्त्याला लागला होता..जत्रेचा गलका मागे पडला होता ...दोघंही रिकाम्या हाती पण हवं ते मिळाल्याच्या समाधानात उपाशी पोटी घरी परतत होते ....!!

......प्रदीप अधिकारी.

मराठी कथा नि गोष्टी

परम
Chapters
कुटुंब सोहोराब काका शाॅपींग फेस्टिव्हल... मामा गुरूमूर्ती यांचे नोटबंदीवरिल विचार अत्यंत सोप्या शब्दात शंभू तरुण रामस्वामी चोरकाका... #कुटुंब प्रोजेक्टचे व्हॅल्यूएशन सोबत रसायन साबून स्लो हैं क्या? "या सूरांनो चंद्र व्हा...." कोजागरी पौर्णिमा दरमहा पैसे वाचविण्याच्या सात टिप्स... जादूगर ची बायको प्रेम प्रेम आणि विश्वास निरोगी राहण्याचे काही नियम लेखन संकष्टी महात्म्य समाधान श्रीमंतीचं दुसरं नावं मला वाटायच गोष्टी परीक्षण करतानाच्या (supervisionच्या) !! लेखन !! अखेर श्रीखंडाच्या वड्यांची रेसिपी सापडली गोष्टी परीक्षण करतानाच्या लक्ष्मी पंगिरा मधुमालतीचा वेल अप्रूप मसालेभात स्पर्श अखेरचा डाव.... आजी आईचा आत्मा जड झालेले आई-बाप दुर्दैवी मराठीची होरपळलेली पानं... निरोप.. हुरहुर दिवाळीची.... कळीचा नारद जन्याच पोर. ऍपल छत्रपति शिवरायांची एवढ़ी माहिती पाठवत आहे की आजच्या काहींना माहिती नाही.. आरोग्यम धनसंपदा श्रीमंत वृद्धाश्रम