Get it on Google Play
Download on the App Store

१: जन्मापासून सुरुवात

ही गोष्ट सुरू होते अंदाजे वीस वर्षांपूर्वी. तेव्हा नुकतीच दूरसंचार क्षेत्रातील क्रांतीची सुरुवात होती. मुंबई लोकल ट्रेन्समध्ये डिस्प्ले नव्हते आणि पुढील स्टेशन कोणते येणार हे लोकलमध्ये आयते सांगण्यासाठी कोणताही मंजुळ आवाज मदत करत नव्हता. टीव्ही चित्रपट क्षेत्रात विविध बदलांचे वारे वाहत होते. जागतिकीकरणामुळे भारतामध्ये अभूतपूर्व बदल होऊ लागले होते. सगळीकडे सायबर कॅफे पावसाळ्यातील कावळ्याच्या छत्रीप्रमाणे वाढलेले होते. पाश्चात्य जीवनशैली कधी नव्हे एवढी सर्वसामान्य भारतीयांच्या समोर येऊ लागली होती. वेगाने त्याचा अंगीकार आणि अंधानुकरण होऊ लागले होते. अजून लँडलाईन फोनचे महत्व कमी झालेले नव्हते. सगळीकडे एक रुपयात बोलण्यासाठी लाल कॉइनबॉक्स फोन होते. एक पडदा आणि मल्टीप्लेक्स या दोन्ही चित्रपटगृहांची चलती होती.

 

सायन्स आणि टेक्नॉलॉजीने कधी नव्हे एवढी प्रगती सुरू केली होती. ती प्रगती एक्सप्रेस अशी सुसाट धावायला लागली होती की तिला कोणत्या स्टेशनवर थांबायचे हेच कदाचित समजत नव्हते म्हणून ती अविरत धावत होती. तिने विविध स्टेशनवर निसर्गाने लावलेले सावधगिरीचे लाल झेंडेपण आपल्या धावण्याच्या धुंदीत दुर्लक्षित केले.  मार्गात अनेक स्टेशनवर न थांबल्याने तीने कुणाकुणाला नाराज केले आणि कुणाला नाही याची तर गणतीच नव्हती आणि तिला याची फिकीर पण नव्हती.

 

जोडीला कृत्रिम बुद्धिमत्ता एक्सप्रेस पण या सायन्स टेक्नॉलॉजीच्या प्रगती एक्सप्रेसला समांतर धावू लागली आणि तिला मागेही टाकू लागली होती. तीही आधीच्या एक्सप्रेसची जुळी बहीणच! तिचीही तीच वृत्ती! काही ठिकाणी दोघीही एक्सप्रेसचे ट्रॅक एकमेकांत मिसळू लागले होते. ही सगळी नव्या सहस्त्रकातील आधुनिक विज्ञानाची झेप पाहिली तर असे वाटायला लागले होते की जणू काही भविष्यात शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ मंडळी नवनवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आपल्या पृथ्वीमध्येच बदल करून तिला रोबोटीक पृथ्वी बनवतील की काय जी विविध उपकरणांच्या बटनांच्या इशाऱ्यावर फिरेल किंवा फिरायचे थांबेल? की मग आकाशातील आपली जागा बदलेल? कोण जाणे?

तर अशाच या वेगवान बदलांच्या काळात राघव साहसबुद्धे हे डोंबिवलीतील पीडीएफ नावाच्या बँकेतील कॅशियर होते. त्यांचे मूळ गाव सज्जन गाव. गावाच्या नावाप्रमाणे त्या गावातील सर्वच जण सज्जन नसले तरी बहुतेक जण सज्जन होते. शिक्षणानंतर विविध परीक्षा देऊन राघव यांना बँकेत नोकरी मिळाली आणि आता ते कॅशियर होते. त्यांचे लग्न धमकपूरच्या राधाबाई हिच्याशी झाले. राघव यांचे आई वडील गावी शेती सांभाळत आणि त्यांचा लहान भाऊ माधव तिथेच त्यांच्याजवळ राहत होता. दोघांची लग्न झालेली बहीण सुमन ही मध्य प्रदेशात रहात होती.

 

राघव राधा यांना सुनिल अनिल ही दोन मुलं. सुनिलपेक्षा अनिल मोठा!

 

डॉक्टर संपन्न सूत्रे यांच्या "संपूर्ण हॉस्पिटल" मध्ये जेव्हा सुनिलचा जन्म झाला तेव्हा त्याचे डोळे डॉक्टरांना वेगळेच भासले. ते डोळे घारे, तपकिरी किंवा काळे असे नसून प्रिझम (त्रिकोणी लोलक) मधून प्रकाश पाठवल्यानंतर जसे वेगवेगळे रंग दिसतील तसे काहीसे दिसत होते. या मुलाला रंगांधळेपणा अथवा रातांधळेपणा होईल किंवा याची दृष्टी अधू असेल असे त्यांना वाटले. तशी पुसटशी शंका त्यांनी सुनिलच्या आई वडिलांना बोलून दाखवली.

 

पण नंतर काही दिवसांनी नियमित चेकपसाठी जात असताना राघव राधा यांनी सुनिलला नीट दिसत असल्याचे डॉक्टरांना सांगितले, कारण बाळ विविध दिशेने जाणाऱ्या, हलणाऱ्या वस्तूंना व्यवस्थित प्रतिसाद देत त्या दिशेने डोळे वळवत होतं. त्यामुळे आता चिंता मिटली होती, मात्र वेगवेगळ्या दिशेने पाहिल्यास विविध रंगात आळीपाळीने चमकणारे त्याचे ते दोन डोळे हे डॉक्टरांसाठी कोडं होतं. पण या डोळ्यांच्या रंगांव्यतिरिक्त इतर कोणताही शारीरिक प्रॉब्लेम त्या बाळात नव्हता आणि अर्थातच वेगळा रंग हासुद्धा काही प्रॉब्लेम नव्हता. बाळ, बाळाची दृष्टी आणि नजर नॉर्मल असल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं तेव्हा राघव राधा आणि एकूणच नातेवाईकांनी सुटकेचा निःश्वास टाकला. मात्र सुनिलचे डोळे हे शेजारपाजारी आणि नातेवाईकांमध्ये चर्चेचा आणि आकर्षणाचा विषय ठरले. कधीकधी काहींच्या द्वेषाचे कारण सुध्दा ठरले.

डॉक्टर संपन्न सूत्रे यांनी त्यांची मैत्रीण आय स्पेशलिस्ट डॉक्टर नेत्रा रघुरामन यांच्याशी सुनिलच्या चमकणाऱ्या रंगीत डोळ्यांबद्दल चर्चा केली. डॉक्टर नेत्रा यांनी निष्कर्ष काढला की कदाचित या मुलाला फार तर कलर ब्लाइंडनेस असू शकतो कारण इतर बाबतीत डोळे नॉर्मल होते. त्या पुढे म्हणाल्या की यासंदर्भात त्या नक्की रिसर्च करतील. डॉक्टर नेत्रा अनेकदा परदेशात जायच्या, कॉन्फरन्स अटेंड करायच्या. अनेकदा तर संपन्न सूत्रे यांना नेत्रा यांचेबद्दल संशय येऊ लागला होता कारण देशात परदेशात विविध कॉन्फरन्ससाठी जातांना नेत्रा यांचा स्वत:चा छुपा अजेंडा असायचा, त्या काही अज्ञात लोकांना भेटत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते, पण ते उघडपणे नेत्रा यांना बोलले नाहीत कारण कदाचित त्या गोष्टी नेत्रा यांच्या खासगी असतील, व्यवसायाशी संबंधित नसतीलही! आणि त्या गोष्टी डॉक्टर म्हणून नेत्रा यांच्यासोबत काम करतांना अडसर ठरत नव्हत्या. त्यामुळे संपन्न सूत्रे यांनी दुर्लक्ष केले.

 

तर असं हे सुनिल नावाचं बाळ मोठं होत गेलं. एकदा संपूर्ण अपार्टमेंटमधील लाईट गेली. तेव्हा ते बाळ अंधाराला जराही न घाबरता मजेत खेळत असल्याचं आई वडिलांना नंतर टॉर्चच्या उजेडात दिसलं. बरीच बाळं अंधार झाला की घाबरून रडतात पण हे बाळ तसं नव्हतं.

 

अंधाराला मोठी माणसे आणि जाणती मुले का घाबरतात? कारण त्यांनी लहानपणापासून वेगवेगळ्या काल्पनिक भीतीदायक गोष्टी ऐकलेल्या, वाचलेल्या किंवा पाहिलेल्या असतात आणि बरेचदा त्यातील सर्व भीतीदायक प्राणी किंवा भुते ही अंधारातूनच येत असतात अशी धारणा झालेली असते. अंधार म्हणजे अज्ञात! अंधार म्हणजे दृष्टीस काहीही न दिसणे, काहीच आकलन न होणे आणि ज्ञात गोष्टींपेक्षा अज्ञाताची आपल्याला नक्कीच भीती वाटते, नाही का? पण लहान बाळांचे तसे नसते. त्यांच्या मनात अंधाराबद्दल कसलाच पूर्वग्रह नसतो म्हणून बाळ अंधारात रडलेच पाहिजे असे नाही. पण अचानक अंधार झाल्याने आसपास असणारी जवळची माणसं विशेषत: मम्मी आणि पप्पा हे समोर दिसणं बंद झालं या कारणास्तव बाळ रडू शकतं पण हे सुनिल बाळ पक्कं होतं, अंधारात रडायचंच नाही!

 

अर्थात भूक लागली असेल किंवा काही बिनसलं असेल तर सुनिल बाळ अंधार असो वा उजेड असो, भयंकर मोठमोठ्याने रडून घर डोक्यावर घायचं. मग अनिल दोन चार खेळणी आणून त्याच्या समोर धरायचा. त्यापैकी गुदगुल्या केल्यावर म्यांव म्यांव करणारी खेळण्यातली मांजर पाहिली की सुनिल खुदकन हसायचा! अनिलला आपल्या लहान भावाच्या चमकदार रंगीत डोळ्यांचे आश्चर्य वाटे. तसेच आपला लहान भाऊ अंधारात घाबरत नाही हे कौतुक तो त्याच्या सगळ्या मित्रांना सांगत सुटे!!

 

हळूहळू हे सुनिल बाळ मोठं होत गेलं. रांगायला लागलं. पप्पा ऑफिसमधून घरी आल्या आल्या ते पप्पांना पायाजवळ धरून उभं राहायचं आणि कडेवर घ्यायला गोड विनंती करायचं. ही विनंती बघून पटकन पप्पा बाळाला कडेवर घेऊन त्याचे भरपूर मुके घ्यायचे. मग लगेच अनिलसुद्धा हातातली खेळणी टाकून यांच्याकडे यायचा मग तेही त्याला छातीशी कवटाळायचे. मग राधा स्वयंपाक बनवायची आणि सर्व कुटुंब आनंदाने जेवण करून झोपून जायचं.

 

राघवसाठी एक बरं होतं की ते राहात होते डोंबिवलीत आणि बँकसुद्धा डोंबिवलीतच होती, फक्त ईस्ट आणि वेस्ट एवढाच फरक होता. त्यामुळे रोजच्या ऑफिसच्या कामासाठी लोकल प्रवास नव्हता ही खूप दिलासादायक बाब होती.

 

एकदा राघव यांना दिवसभर ऑफिसमध्ये खूप वर्कलोड झाला तशात त्यांचेकडून काही चुका झाल्या आणि काही कारणास्तव एक दोन सहकार्‍यांसोबत त्यांचा वादविवाद सुद्धा झाला. त्यावरून बँक मॅनेजर राघव यांना खूप बोलला होता पण राघव यांनीसुद्धा दोन चार शब्द त्यांना सुनावले आणि त्यादिवशी कामात जास्त त्यांचे मन लागले नाही. संध्याकाळी थोड्या नाराज आणि बिघडलेल्या मनस्थितीतच ते घरी येऊन त्यांनी बेल वाजवली.

 

टिंग डिंग!!

 

दरवाजा उघडताच सुनिलचं लक्ष पप्पांकडे गेलं आणि हातातील खेळणे खाली टाकून त्याने रांगत पाप्पांकडे जाण्याचा प्रयत्न केला आणि अचानक रडू लागला. आधी तो अगदी चांगला खेळत होता. त्याचे खाऊन आणि दूध घेऊन झाले होते. अगदी हसत-खेळत मजेत बाळ बसलं होतं. काहीच प्रॉब्लेम नव्हता. नेहमीप्रमाणे सुनिलला कडेवर घेण्यासाठी पप्पांनी हात पुढे केले पण आज वेगळेच घडले. सुनिल अचानक मोठ्याने रडत यांच्या विरुद्ध दिशेने रांगत किचनमध्ये आईकडे जाऊ लागला आणि आईच्या पायाला धरून उभा राहून रडत त्याने आईला कडेवर घेण्याची विनंती केली. आईच्या कडेवरून ते गोड बाळ कधी घाबरत पप्पांकडे बघत होतं तर कधी आईला घट्ट पकडून घेत होतं!

 

राघव म्हणाले, "आजचा दिवस चांगला गेला नाही. ऑफीस मध्ये वाद झाले, आता घरी आलो तर हा सुनिल असा रडतोय, काय झालं त्याला काही दुखतं आहे का?"

राधाने उत्तर दिलं, "अहो, काहीच झालं नाही त्याला. चांगला ठणठणीत गोपाळ आहे तो! चला विसरा ऑफिस मधलं सगळं आणि जेवून घ्या बरं!"

राघव, "बरं, अनिल कुठे आहे दिसत नाही?"

राधा, "तो खाली गेलाय रखमा आणि इतर मुलांसोबत खेळायला!"

रखमा त्यांची गावाकडून आलेली घरकाम करणारी मावशी!

राघव, "रखमा आहे तर मग काही टेंशन नाही, चल वाढ आता गरमागरम! अनिलने खाल्लं का काही?"

"होय, जेवला तो!"

गरम खिचडी, कढी, आवळ्याचं लोणचं, पापड असा बेत होता. सुनिल बाळ थोड्या वेळाने शांत होऊन कडेवरून खाली उतरून दोघांजवळ बसलं आणि पापड खाऊ लागलं आणि मग पप्पांच्या मांडीवर जाऊन बसलं.

असेच दिवस जात होते, सुनिल अनिल दोघे मोठे होत होते.

^^^

 

डिटेक्टिव्ह निगेटिव्ह

Nimish Navneet Sonar
Chapters
१: जन्मापासून सुरुवात २. जाणीव ३. सुगावा ४. ती दिसली ५. सायन्स फेस्टिव्हल ६. पुलावरचा घात ७. एक नवी सुरुवात ८. स्मृतिबंधन ९. पहिले प्रेम १०. ताकामिशी क्योदाई ११. दूरदर्शन १२. भटकंती १३. नरिमन टर्निंग पॉईंट १४. सुटका १५. संकट १६. तो आणि ती १७. प्रवास सुरू १८. जहाजावर १९. चाहूल २०. उलगडा २१. पाठलाग २२. परिवर्तन २३. सुपर नेचर कडे २४. सुपर नेचर २५. तयारी २६. वाईट हेतू २७. आव्हान २८. प्लॅनिंगचा मुखवटा २९. प्रस्थानम् ३०. पुन्हा पुलावरचा घात? ३१. दिसतं तसं नसतं ३२. शक्ती प्रदर्शन ३३. चकवा ३४. त्यांना आमंत्रण ३५. हाडाचा लढवैय्या ३६. नरिमन ऍक्शन पॉईंट ३७. तो येतोय ३८. युद्ध आमुचे सुरू ३९. प्लॅन्डी ४०. अपहरण ४१. गीता आणि नीता ४२. महायुद्ध ४३. वादळ शांत! लेखकाचे मनोगत लेखक परिचय प्रकाशनपूर्व आलेल्या इतर काही प्रतिक्रीया लेखिका मेधा इनामदार (पुणे) यांचा अभिप्राय राहुल दवे (कॅलिफोर्निया) यांची प्रस्तावना अक्षर प्रभू देसाई (कॅलिफोर्निया) यांची प्रस्तावना आदित्य भागवत, ठाणे यांचा अभिप्राय सिद्धेश प्रभुगांवकर, पुणे यांचा अभिप्राय