३. सुगावा
सुनिल जीआयजी सायन्स ज्युनिअर कॉलेजमध्ये शिकत होता. लोकल बसने तो घराजवळील एका स्टॉपपासून कॉलेजपर्यंत जायचा. बाहेर वावरतांना शक्यतो तो गॉगल लावायचा आणि आजही त्याने लावला होताच. अधूनमधून आपली चित्रकलेची आवड तो जपत होताच. सुनिल म्हणजे विज्ञान आणि कला यांचा अनोखा संगम होता!
आठवड्यातून एक दोन वेळा ठाणे येथे "रिडर्स रेव्हरन्स" नावाच्या सायन्स लायब्ररी आणि स्टडी रूममध्ये तो बरेचदा अभ्यास आणि विज्ञानातील अनेक आवडीच्या विषयांवर रिसर्च करायला जायचा. त्याच्या बॅगमध्ये भरपूर कागदं, विविधरंगी पेन, पेन्सिल, स्केच पेन आणि वह्या असायच्या. त्याने रिसर्च आणि डेव्हलपमेंट क्षेत्रात करियर करायचे आणि सायंटीस्ट बनायचे असे मनाशी ठरवले होते. त्याचा ईमेल सुद्धा sscientist.ssunil@gmail.com असाच होता. ज्यादाचा एक एस (S) टाकावा लागला कारण एका एस सहित आयडी उपलब्ध नव्हती. लायब्ररीतच तो अधून मधून काही चित्रे काढत बसायचा. त्याची काही चित्रे फँटसी प्रकारातील तर काही वैज्ञानिक असायची. आता इंटरनेट आल्याने त्याला रिसर्चसाठी चांगले माध्यम मिळाले होते.
आज सुट्टी होती आणि ही संधी साधून तो ठाण्याला जायला निघाला. तिथे त्याचे काही मित्र सुद्धा होते. त्यांनाही भेटायचा बेत होता. डोंबिवली प्लॅटफॉर्मवर आल्यावर तिकीट काढून लोकल येण्याची वाट पाहू लागला. नेहमीप्रमाणे बऱ्याच लोकांच्या डोक्यावर त्याला कमी जास्त तीव्रतेचे लाल वलय अथवा वर्तुळ दिसायला लागले. हे त्याच्यासाठी नेहमीचं होतं. त्याने कुठेतरी वाचलं होतं की मनुष्य कायम काहीतरी विचार करतच असतो. काही विचार जाणून बुजून तर काही नकळत येतात! बरेचदा अनेक विचार काहीच कामाचे नसतात, निरुपयोगी असतात. पण तरीही ते विनाकारण आपल्या मनात येतच राहतात. त्यापैकी बरेच नकारात्मक असतात पण नंतर ते आपण प्रयत्नांनी नष्ट करू शकतो. प्रॉब्लेम तेव्हा होतो जेव्हा नकारात्मक विचारांची तीव्रता वाढत जाते आणि आपण त्यांना नियंत्रित करण्याऐवजी तेच आपल्याला नियंत्रित करायला लागतात!!
लोकल ट्रेन यायला वेळ होता म्हणून तो वर्तमानपत्रात चेहरा खुपसून बसला. बाजूला बेंचवर युनिफॉर्म घातलेला एक शाळकरी मुलगा दप्तर मांडीवर घेऊन बसला आणि स्मार्टफोनवर काहीतरी करत बसला. सहज लक्ष गेल्यावर सुनिलला त्याच्या डोक्यावर साधे छोटे लाल वर्तुळ दिसले.
"असेल एखादे होमवर्कचे टेंशन त्याला किंवा गेममध्ये लेव्हल जिंकेल की नाही याचे टेन्शन आले असेल!" असे म्हणून सुनिल पुन्हा पेपर वाचू लागला.
त्याच दरम्यान तीन चार खांब सोडून आडोशाला एका बेंचवर क्रिकेटची असते तशी उन्हाची टोपी घातलेला आणि तोंडाला पांढरा रुमाल बांधलेला आणि गॉगल घातलेला माणूस खांबाच्या आडून सुनिलकडे डोळे रोखून बघत होता.
काही वेळाने, "सीएसटी जाणारी स्लो लोकल थोड्याच वेळात येत आहे", अशी घोषणा झाली आणि सुनिल बेंचवरून उठून उभा राहीला. आणि त्याला अचानक सु ss सु ss असा आवाज आला तसे त्याने बाजूला पाहिले तर त्या शाळेतल्या मुलाच्या डोक्यावारचे लाल वर्तुळ स्थिर छोटे न दिसता प्रचंड मोठे प्रखर ज्वाळांसारखे दिसायला लागले होते आणि त्या मुलाच्या चेहऱ्यावर प्रचंड निराशा, विषाद आणि खिन्नता दिसायला लागली. चेहऱ्यावर घामाचे थेंब जमा झालेले दिसत होते. प्रचंड वेगाने काहीतरी मोठा निर्णय घेऊन पटकन काहीतरी चुकीची क्रिया करण्याआधी (जी स्वतःसाठी नाहीतर इतरांसाठी विघातक आणि विनाशक ठरू शकेल) माणूस जसा प्रचंड अस्वस्थ होतो, तसा त्याचा चेहरा झालेला होता!
टोपी, रूमाल आणि गॉगलवाला माणूस अचानक उठून सुनिलकडे येऊ लागला तेव्हाच, "तो शाळकरी मुलगा नेमका रेल्वे स्थानकात लोकल येत होती त्या दिशेने जाईलच आणि रुळांवर लोकलखाली उडी मारेलच!" असे सुनिलला क्षणार्धात प्रकर्षाने वाटले कारण त्या मुलाच्या डोक्यावरचे वर्तुळ अतिशय प्रखर झालं होतं आणि सुनिलचा तो अंदाज अतिशय खरा ठरला.
तो शाळकरी मुलगा आत्महत्येसाठी रुळांकडे वेगाने जायला लागला आणि सुनिल चपळाईने पळत जाऊन त्याच्या समोर जाऊन उभा राहिला आणि त्याला ट्रेनच्या उलट्या दिशेने प्लॅटफॉर्मवर जोरात फेकले. काही लोकांच्या हे लक्षात आलं आणि लोक तिकडे धावले आणि सुनिलच्या धाडसाचे कौतुक करू लागले. फेकला गेल्याने तो शाळकरी मुलगा भांबावला, त्याचा स्मार्टफोन फेकला जाऊन तुकडे झाले आणि थोडा वेळ त्याची शुद्ध हरपली. या सगळ्या प्रकारामुळे सुनिलच्या मागावर असणारा तो गॉगलवाला माणूस काय घडतंय ते बघत बघत हळूहळू फूटोव्हर ब्रिजवर चढला आणि काही वेळ ब्रिजवर उभा राहून कठड्याला टेकून खाली काय चाललं आहे ते बघू लागला.
बरेच जण तिथे आले आणि म्हणू लागले, "हे काय बघावं लागतंय? दुर्दैवी आहे हे सगळं! ज्या पोरांना अजून जीवन म्हणजे काय हे नीटसं कळलं नसतं ती पोरं आपलं जीवन कोवळ्या वयात संपवायला का तयार होतात? का जीवावर उदार होतात?"
एक दोन जण त्या मुलाला दटावून विचारू लागले, "काय रे? घर कुठंय तुझं? शाळेतून पळून आलास? शाळेत सरांनी मारलं? की काही चोरी केली? कितवीत आहेस? परीक्षेत फेल झालास? की कोवळ्या वयात प्रेम केलंस? की मोबाईल व्हीडिओ गेम्सच्या नादात आयुष्य संपावतोय? ड्रग्ज घेतोस?"
तो उत्तरे देण्याच्या मनस्थितीत नव्हता. तेवढ्यात पोलीस तिथे आले, त्यांनी सुनिलचे आभार मानले आणि त्यांचे सोपस्कार पूर्ण करून त्यांनी गर्दीला पुढे जायला सांगीतले. गर्दीतील एकाने सुनिलचा दूर पडलेला गॉगल सुनिलला आणून दिला आणि सुनिलने वेळ न दडवता तो घातला. आपल्यातील शक्तीचा वापर एका जीवाचे प्राण वाचवण्यासाठी झाला याचा आनंद सुनिलला झाला असला तरीही या घडलेल्या घटनेमुळे आणि त्याच्या कारणमीमांसा करण्यात विचार करत बसल्याने त्याला बराच वेळ खूप अस्वस्थ वाटले.
ती लोकल निघून गेली होती. पुढची लोकल येईपर्यंत त्याने थोडासा चहा पिला मग त्याला तरतरी आली आणि मग पुन्हा तो वर्तमानपत्र वाचत बसला. यादरम्यान ब्रिजवरून तो गॉगलवाला माणूस परत खाली उतरला आणि सुनिलचे पूर्ण निरीक्षण करायला लागला. सुनिलचा गॉगल निघाला होता तेव्हा त्याचे चमकदार रंगीत डोळे त्या टोपीवाल्या माणसाच्या नजरेतून सुटले नव्हते. सुनिल नंतर आलेल्या एका लोकलमध्ये ज्या डब्यात चढला त्याच डब्यात टोपीवाला माणूससुद्धा चढला, अर्थात सुनिलच्या नकळत!
सुनिलला दिसणार नाही अशा पद्धतीने तो त्याच्या मागे उभा राहिला अचानक सुनिलला काहीतरी आवाज ऐकू आले. सुनिलने मागे पाहिले पण गॉगलमधून तो माणूस नेमका सुनिलकडे लक्ष ठेवून होता की नाही हे ठरवणं मुश्कील झालं आणि त्याचा चेहरा सुध्दा दिसत नव्हता कारण त्याने तोंडाला पांढरं फडकं बांधलं होतं, टोपी पण घातली होती पण त्याच्या डोक्याभोवती लाल वर्तुळ दिसले म्हणून सुनिलला संशय आलाच! मग सुनिलने त्याच्या ठाण्याच्या मित्राला फोन केला आणि डोंबिवली स्टेशनवर घडलेली घटना थोडक्यात सांगितली तसेच ठाण्याला यायला त्यामुळे उशीर होतोय असे त्यांनी सांगितले!
सुनिलचे फोनवरचे बोलणे ऐकून तो माणूस गर्दीमुळे थोडा सुनिलपासून दूर पुढे सरकला कारण अजून ठाणे यायला वेळ होता. आता तो माणूस सुनिलपासून बराच दूर होता पण लक्ष ठेऊन होता हे सुनिलला जाणवले.
कळवा स्टेशन आल्यावर सर्वजण पाण्याच्या धबधब्यासारखे प्लॅटफॉर्मवर उतरले आणि आता लोकल निघणार तेवढ्यात सुनिलने कळवा स्टेशनवर त्या माणसाला बेसावध ठेऊन उडी मारली. लोकल बरेच अंतर पुढे आल्यावर त्या माणसाला सुनिल गर्दीत कुठेही नसल्याची जाणीव झाली.
कळव्याहून मग पुढच्या लोकलने तो ठाण्याला आला. संध्याकाळी घरी आल्यानंतर घडलेले काहीच त्याने घरी कुणालाच सांगितले नाही. टीव्हीवर फक्त एवढीच बातमी आली होती की प्रसंगावधान राखून एका कॉलेजच्या मुलाने शाळकरी मुलाला आत्महत्या करण्यापासून रोखले.
तो विचार करू लागला, "तो पाठलाग करणारा कोण असेल? जो कुणी असेल तो कधीतरी पुन्हा समोर आला तर? येईलच! आला तर येऊ दे! त्याला घाबरून घरात तर मी बसू शकत नाही! पण माझ्या शक्तीमुळे मला त्या माणसापासून सावध होता आले!"
नकारात्मक घटना घडण्याआधीच वातावरणातील नकारात्मक ऊर्जा आपण डिटेक्ट करू शकतो आणि त्या घटना घडण्यापासून थांबवूसुद्धा शकतो म्हणून त्याने स्वतःचे नामकरण "डिटेक्टिव्ह निगेटिव्ह" असे केले!
वा, शाबास सुनिल राघव साहसबुद्धे, तुमचा आता DN झालाय!
पण थांब DN मित्रा! हरखून जाऊ नकोस!
उद्या इतर कॉमिक्समधल्या सुपरहिरोंसारखे दुहेरी आयुष्य जगावे लागले तर? त्यासाठी तयारी आहे का?
^^^