११. दूरदर्शन
दरम्यान एक घटना घडली. सुनिलच्या गॅलरीतील पोपटाच्या पिंजऱ्यात तो वेगळाच भुंगा नेहमीच यायला लागला. तो घरातही घोंगावायचा, पण कुणी त्याला हकलायला लागले की तो लगेच पोपटाजवळ जाऊन खेळायचा. एकदा रखमा मावशीने वर्तमानपत्राच्या घडीचा जोरदार फटका त्या भुंग्याला मारलाच आणि तो भुंगा कोलमडत कोलमडत भिंतीवरून खाली घसरून जमिनीवर पडणार एवढ्यात त्याने पुन्हा जोरदार उसळी घेतली आणि उडून गेला.
रखमा काही वेळाने जवळच्या बाजारात गेली असतांना घरी कुणीच नव्हते तेव्हा तो भुंगा पुन्हा आला आणि पोपटसोबत खेळू लागला. पोपटाने म्हणजे फिनिक्सने त्याला एकदा चोचीत करकचून पकडले पण चोचीतून सुटण्याच्या धडपडीत असतांना तो भुंगा अचानक स्फोट होऊन पेटला आणि त्याचे तुकडे तुकडे झाले. पोपटाची चोच संपूर्ण जळाली आणि अर्धी तुटून पडली, तोंड भाजले गेले आणि तो पोपट यातनांनी ओरडू लागला. रखमा घरी आल्यावर त्या पोपटाने भुंगा जळाला, भुंगा जळाला असे सांगून प्राण सोडले. पण राखमाला काही समजेना. तिला वाटले पोपट वेडा झाला, भुंगा कसा काय जळेल?
पोपट भुंगा पळाला ऐवजी जळाला असे म्हणतोय असे राखमाला वाटले आणि भुंग्याच्या नादात कोणत्या तरी आसपासच्या विजेच्या ताराला पोपट चिकटला असणार आणि भाजला गेला असणार असा तिने निष्कर्ष काढला. पोपट पिंजऱ्यात नेहमीच बंद नसायचा. तो बाहेर फिरून पुन्हा गॅलरीत यायचा. घरातल्या सगळ्यांना वाईट वाटले पण कुणालाही कळलेच नाही की पोपट कसा मेला!
* * *
रणजित यांनी सुनिलला एक फिजिकल फिटनेस ट्रेनर दिला होता. पोलिसांसाठी जी ट्रेनिंग देतात त्या प्रकारचा! गेल्या वर्षापासून सुनिल व्यायामाकडे आणि फिटनेसकडे चांगले लक्ष देत होता कारण त्याला मिळालेल्या शक्तीमुळे त्याची जबाबदारी वाढली होती आणि त्याचा सामना यापुढे नेहमी अनेक वाईट तसेच निगेटिव्ह प्रवृत्तींशी नक्की होणार होता, त्यामुळे फिजिकल फिटनेस आवश्यक होतं. तसं पाहिलं तर प्रत्येकाच्या आयुष्यात फिटनेसचे महत्व आहेच, मग तो कोणत्याही क्षेत्रातला कुणीही व्यक्ती का असेना! शिवाय रोज किमान अर्धा तास सुनिल सूर्यनमस्कार, झुंबा डान्स, योगासने आणि प्रणायाम करायचा.
दरम्यान त्याने रणजित यांच्या सांगण्यावरून पोलीस डिपार्टमेंटच्या आयटी सेक्शनच्या काही परीक्षा दिल्या आणि आयटी विभागात त्याला पोलीस डिटेक्टिव्ह हा जॉब मिळाला. पोलीस डिपार्टमेंट त्याचेवर खुश होते कारण मूळ कामाव्यतिरिक्त त्याची शक्ती वापरून तो गुन्हेगाराला अचूक ओळखू शकत होता. तसेच त्याची चित्रकला चांगली असल्याने गुन्हेगारांच्या वर्णनावरून सहजपणे चित्र काढून देऊ शकत होता ही ज्यादाची मदत होती. मात्र फक्त रणजित यांनाच त्याच्या विशेष शक्तीबद्दल माहिती होते. तथापि एकाच ठिकाणी काम करूनही त्या दोघांची रोज भेट होईलच असे आवश्यक नव्हते! सुनिलचे करियर रणजित यांच्या देखरेखीखाली हे सगळं होत असल्याने या जॉबबद्दल घरच्यांना काही चिंता नव्हती.
* * *
कॉलेजमध्ये असतांना सुद्धा पोरींवरून भांडणे आणि मारामाऱ्या होऊ शकणार असतील किंवा एखाद्या साध्या निष्पाप आणि अभ्यासू मुलाची रॅगिंग होणार असेल तर ती अनेकदा टाळण्यात सुनिल त्याच्या निगेटिव्ह गोष्टी डिटेक्ट करण्याच्या शक्तीमुळे यशस्वी झाला होता. कॉलेजच्या होस्टेलवरसुद्धा सुनिल बरीचशी भांडणे, राडे, मारामाऱ्या टाळण्यात यशस्वी व्हायचा.
सुनिल जिथे असेल तिथे आसपास शांतता असायची. एखादा व्यक्ती काहीही नकारात्मक करायला जाणार त्याच्या आतच तो शक्य तिथे त्या व्यक्तीशी संभाषण सुरू करून त्या व्यक्तीला विविध प्रश्न विचारून त्याच्या मनातले काढून घ्यायचा, तो काहीतरी निगेटिव्ह गोष्ट करणार आहे हे त्यांचेकडून काढून घ्यायचा आणि त्या व्यक्तीला इतर चांगला पर्याय सुचवून बघायचा. त्याची ही पद्धत बऱ्याच प्रमाणात बहुतेक वेळेस यशस्वी झाली. त्यासाठी सुनिल नियमितपणे एका मानसोपचारतज्ञाचा सल्ला घ्यायचा. रणजित यांनीच त्याचे नाव सुनिलला सुचवले होते. गुन्हेगारांची मानसिकता समजून घेणे हा त्यामागचा उद्देश!
रणजित आणि सुनिलने आणखी एक गोष्ट केली होती जी फक्त रणजित आणि सुनिल या दोघांनाच माहिती होती. ती म्हणजे त्यांनी पोलीस डिपार्टमेंटला मदत करणाऱ्या वेषांतर करण्यात एक्स्पर्ट असलेल्या एका व्यक्तीशी सुनिलची भेट घालून दिली होती. त्याने सुनिलला वेषांतर करण्याचे आणि आपल्या मूळ रूपात कधीही इतरांना ओळखू न देण्याचे वेगवेगळे धडे दिले होते. सुनिलला विविध प्रकारचे अनेक मास्क त्यांनी दिले होते. ते विशिष्ट पदार्थांपासून बनलेले लवचिक मास्क व्यक्तीला संपूर्णपणे बदलून टाकत होते जणू काही कायमची प्लास्टिक सर्जरी केली आहे! कारण, रणजित आणि सुनिल या दोघांना असे वाटत होते की सुनिल एखाद्या गुन्हेगाराला गुन्हा करण्याच्या आधी डिटेक्ट करून पकडल्यानंतर त्या गुन्हेगाराने पुन्हा त्याला ओळखायला नको, यासाठी बहुतेक वेळेस प्रत्येक ठिकाणी जातांना सुनिल वेगवेगळे मास्क घालत असे. त्यामुळे गुन्हेगारांनी त्याला गाठून त्रास देण्याची शक्यता सध्यातरी नव्हती.
काही गोष्टी सुनिल स्वतःही एकट्याने करायचा त्यापैकी बऱ्याच गोष्टी रणजित यांना माहीत नव्हत्या. पण अशा वेळेस गुन्हेगारांना एकट्याने पकडताना तो जर संकटात सापडला तर रणजित यांना फोन करून मदतीला बोलावून घ्यायचा!
* * *
एकदा ज्वेलरीच्या दुकानात अनिलच्या लग्नासाठी सर्वजण खरेदी करायला गेले होते. वधू-वर यांच्यासाठी आणि इतर काही जणांसाठी वेगवेगळे दागिने निवडले जात होते. सीसीटीव्ही प्रत्येक ज्वेलरी शॉपमध्ये अत्यावश्यक झालेले आहेत, परंतु सीसीटीव्हीचे मॉनिटर करणाऱ्याचे लक्ष थोडेही इकडे तिकडे झाले तर सीसीटीव्ही स्क्रीन समोर असूनही एखादा चोर दागिना शिताफीने आणि हातचलाखीने चोरण्यात यशस्वी होतो. चोरीला गेल्यानंतर सीसीटीव्हीने कळतं. पण आजकाल योग असा येत होता की जिथे सुनिल असतो तिथे त्याला एखादी तरी निगेटिव्हिटी सापडतच होती किंवा याउलट म्हणायचे झाले तर जिथे निगेटिव्हिटी असेल आणि पुढे काहीतरी चुकीचं घडणार असेल किंवा गुन्हा घडणार असेल तिथं योगायोगाने सुनिल असायचाच!!
तीन लेडीज वेगवेगळ्या काउंटरवर जाऊन, 'हा दागिना दाखव, तो दागिना दाखव!' असे करत तिथल्या कर्मचाऱ्यांना खूप गोंधळात टाकत होत्या. सुरुवातीला कर्मचाऱ्यांना संशय आला, पण तीनही लेडीज सफाईदारपणे इंग्रजी बोलत होत्या तसेच कपड्यांवरून त्या अगदी मॉडर्न आणि वागणुकीवरून सभ्य आणि सुशिक्षित वाटत होत्या, त्यामुळे डायरेक्ट त्यांना रोखण्याची हिम्मत कोणत्याही कर्मचाऱ्याची होत नव्हती. इकडे अनिलच्या लग्नासाठी खरेदी सुरू असताना सुनिललला कसला तरी आवाज आला आणि त्याने मागे वळून बघीतले तेव्हा त्याला तीन लेडीज पैकी दोघींच्या डोक्यावर प्रचंड लाल ज्वाळा असलेले सर्कल दिसले. डोक्यातून निघणाऱ्या विशिष्ट तीव्र नकारात्मक किरणांना सुनिल लाल रंगात बघू शकत होता आणि त्याची फ्रिक्वेन्सी फक्त सुनिलच्याच कानांना ऐकू येत होती.
सुनिलची खात्री पटली की यापैकी दोन्ही जणी आता वस्तू चोरण्याच्या जाणीवेने अस्वस्थ झाल्यात आणि लाल वर्तुळ ज्वलंत झाल्याने आता त्या एखाद दुसरा दागिना उचलून लपवणार आणि काढता पाय नक्की घेणार एवढ्यात हळूच सुनिल उठला आणि त्याने सीसीटीव्ही मॉनिटर करणाऱ्या व्यक्तीचे ठिकाण काउंटरवरच्या एका माणसाला विचारले. त्याआधी त्याने तिन्ही महिला असलेल्या काऊंटरवरच्या व्यक्तीला डोळ्यांनी त्या महिलांकडे लक्ष ठेवा असे खुणेने सांगून सावध केले.
मग सुनिल आणि सीसीटीव्ही मॉनिटर करणारा व्यक्ती हे दोघेजण बराच वेळ सीसीटीव्ही स्क्रिनवर लाईव्ह बघत बसले. त्या दुकानात सुनिलची ओळख होती त्यामुळे सीसीटीव्ही जवळ सुनिलला बसू दिले गेले आणि सुनिलच्या म्हणण्याप्रमाणे झाले.
दोनपैकी एका महिलेने डायमंड नेकलेस खिशात घातला आणि तेही कोणाच्याही नकळत! काउंटरवरील माणसालाही ते दिसून आले नाही इतक्या शिताफीने आणि जलद गतीने! तेव्हा सुनिल आणि सीसीटीव्ही मॉनिटर हे दोघे रूम मधून पळून काऊंटरवर आले आणि बरोबर त्या महिलेने लपवलेला डायमंड नेकलेस शोधला. सीसीटीव्ही फुटेज सगळ्यांना त्या मॉनिटरिंग व्यक्तीच्या मोबाईलवरून दाखवले, जेणेकरून तिथे उपलब्ध असलेल्या इतर ग्राहकांची खात्री झाली. सुनिलने खुणेने काऊंटरवरच्या माणसाला सांगितले की माझे नाव सांगू नका, मी हे ओळखले हेही सांगू नका, आपली चोरी पकडली गेली यातच मिळवलं!!
* * *
नंतर एकदा सुनिल नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला, जॉगिंगला गेला होता. उजव्या बाजूला काही जेष्ठ नागरिक चालले होते. पळत पळत परत पुढे गेल्यानंतर एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यामध्ये असलेले मंगळसूत्र चोरण्यासाठी एक चोर मॉर्निंग वॉकच्या बहाण्याने वेगाने चालत चालत तिच्या मागे मागे जावू लागला होता. त्याच्या डोक्यावर लाल सर्कल दिसल्याने आणि हाय फ्रिक्वेन्सी आवाज ऐकू आल्याने सुनिलने ओळखले की याचा बेत महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरण्याचा दिसतो आहे. वेगाने पण आवाज न करता पळत जाऊन सुनिलने त्याच्या पायात पाय अडकून पडण्याचे नाटक केले आणि त्या चोरालाही खाली पाडले. यामुळे घाबरून ती ज्येष्ठ महिला पुढे निघून गेली. सुनिल आणि तो भावी चोर एकमेकांना सॉरी म्हणत म्हणत उठले, चोर थोडा चिडलेला दिसला. सुनिलने त्याला बोलण्यात गुंतवले आणि ज्येष्ठ महिलेला बरेच दूर जाऊ दिले. ती ज्येष्ठ महिला दिसेनाशी झाल्यानंतर मग सुनिलने त्या चोराला जाऊ दिले. थांबवणार कसे आणि थांबवून जाब विचारणार तरी काय? कारण त्याने अजून चोरी केली नव्हती! परंतु पुढे चोरी करण्याचा बेत रद्द झाला कारण ती महिला तोपर्यंतघरी निघून गेली होती. सुनिलला माहिती होते की ती महिला नेमकी कुठे राहाते त्या गल्लीपर्यंत तिला जाऊन सुनिलने दिसेनासे होऊ दिले. चोर चरफडत पुढे निघून गेला!!
* * *
यानंतरही अनेक निगेटिव्ह घटना घडण्याआधी तिथे सुनिल उपस्थित होता जसे -
एटीएम बाहेर संशयित होता, एका ज्येष्ठ नागरिकाचे पैसे चोरण्याआधी आवाज करून घटना टाळली. नेमका तिथे सुनिल पैसे काढायला आलेला होता.
दारुसाठी पैसे दिले नाही म्हणून बापाला मारण्याआधी घटना टळली कारण सुनिल नेमका त्या घराजवळून जात होता तर त्याला अचानक निगेटिव्ह वास आला! असा वास आजपर्यंत त्याने कधीही घेतलेला नव्हता! आता वासाची शक्ती पण त्याला आलेली होती.
रात्री एकदा मित्रांसोबत पावभाजी गाडीवर पैसे कमी जास्त देण्याच्या वादातून मारामारी होणार त्याआधी सुनिलने घटना संवाद फिरवून टाळली. पावभाजीच्या वासात तो निगेटीव्हीटीचा वास त्याला नेमका ओळखता आला.
एकदा सुनिलने भर ट्रॅफिकमध्ये ट्राफिक पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या एका माणसाला त्यापासून परावृत्त केले. त्या पोलिसाने काल त्याला नियम तोडल्याबद्दल पैसे घेतल्याचा राग त्याच्या मनात आजही ताजा होता.
तसेच रात्री उशीरा एके ठिकाणाहून परत येत असतांना भुयारी मार्गात रात्री एका महिलेवर सामूहिक बलात्कार शिताफीने टाळला. त्याने आधीच चार जणांची नियत ओळखून त्या महिलेला काहीतरी कारण सांगून पर्यायी मार्ग वापरायला प्रवृत्त केले. कारण त्याला या निगेटिव्ह घटनेचा वास आणि आवाज आला आणि नंतर प्रखर ज्वाळाची वर्तुळे दिसली. म्हणजे अयोग्य पद्धतीची नकारात्मक अनियंत्रित घातक वासना सुद्धा त्याला आता लाल वर्तुळाच्या स्वरूपात दिसू शकत होती.
एका क्रीडा मंत्र्यांच्या सभेत तो नेता भाषण देत असतांना त्याच्या अंगावर गर्दीत एकाने कडक क्रिकेटचा बॉल मारून फेकायच्या आत घटना सुनिलने टाळली कारण नेमका सुनिलत्या माणसाच्या मागे होता आणि त्याने त्या माणसाला तो बॉल नेत्याच्या तोंडावर अगदी शिताफीने नेम धरून फेकायच्या बेतात असतांनाच 'बघू कोणत्या कंपनीचा बॉल आहे?' म्हणून बघायला मागितला आणि त्याला बराच वेळ बॉल दिलाच नाही.
* * *
एका महिलेने घरच्या भांडणातून स्वतःच्या मुलीला पुलावरून खाली नदीच्या पाण्यात फेकण्याचा आत घटना टळली कारण त्यावेळेस नेमका बाईकवरून सुनिल तिथून जात होता आणि ती महिला लगबगीने त्याला निगेटिव्ह विचारांनी जातांना दिसली आणि ती पुलाच्या कठड्यावर चढायच्या आतच तिला बोलण्यात गुंतवून आणि धाक दाखवून तिथून घरी जायला भाग पाडले.
आता सूर्य अस्ताला झुकत चालला होता. हा पूल मुंबईतील एका उपनगरातील होता आणि तेथून मित्राला भेटून सुनिल घरी निघाला होता. थोडी गाडी बाजूला लावून पुलाच्या कठड्यावर हात ठेऊन खाली पाण्याकडे बघत उभा राहिला. उजव्या हाताला बांधलेले घड्याळ आणि त्यातला 6 आकड्याच्या जागी बसवलेला चमकणारा स्फटिक दिसत होता. त्या स्फटिकाकडे बघत तो विचार करू लागला:
"अशा किती नकारात्मक घटनांचा साक्षीदार मला बनावं लागणार? ही नकारात्मकतेची डिटेक्टिव्हगिरी मला स्वतःलाच एक निगेटिव्ह माणूस तर बनवणार नाही ना? या सगळ्यांचा माझ्या मनावर नकळत एक ताण येत चालला आहे. बरेचदा रात्री झोप येत नाही! माझ्या ज्ञानाचा आणि विशिष्ट शक्तीचा उपयोग मला समाजाच्या आणि देशाच्या भल्यासाठी करता येतोय याचा आनंद आहे पण..."
"पण चिंता करू नको", नदीच्या पाण्यातून आवाज आला.
"कोण?” सुनिलने विचारले.
"विसरलास? मी रंगिनी!"
नदीच्या पाण्यातून आणि आजूबाजूच्या अनेक सजीव निर्जीव वस्तूंमधून विविध रंग निघाले आणि संपूर्ण सृष्टी रंगमय झाली. आता त्या रंगीत जगात पुन्हा सुनिल आणि सुंदर रंगिनी अधांतरी तरंगत होते!
"मला मार्गदर्शन कर रंगिनी, मला कधी कधी भीती वाटते या सगळ्यांची!"
"भीती? काढून टाक! मनात शंका ठेऊ नको आणि आता माझे ऐक. आता तुझ्या मनातली भीती काढायला मी आलेली नाही. ते काम तुला स्वतःला करायचं आहे. इतरांच्या मनातील नकारात्मक गोष्टींचा सकारात्मक विचारांत रूपांतर करणारा तू, स्वतःच नकारात्मकतेकडे झुकत चालला आहेस?"
"तसं होतंय खरं! आणि माझ्या मनात निगेटिव्ह विचार सुरू असतांना मी स्वतःला आरश्यात पाहिलं तरी मला माझ्या डोक्याभोवती लाल वर्तुळ दिसत नाही!"
"अर्थातच दिसणार नाही कारण अदृश्य किरणं आरसा डिटेक्ट करू शकत नाही. स्वतःचे निगेटिव्ह वर्तुळ बघायची तुला गरजच काय?"
"मला माहीत आहे, तशी गरज नाही कारण मला स्वतःला महित असेल की मी काय विचार करतोय ते पण तरीही समजा बघायचे तर?"
"असे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुझाच क्लोन तुझ्यापासून वेगळा होऊन तुला तुझ्या समोरून बघेल!"
खरे तर सुनिल तसे सिलेक्टिव्ह निगेटिव्हीटी डिटेक्ट करणारे उपकरण बनवू शकत होता जे त्याची स्वतःची निगेटिव्हीटी इतरांना सांगेल जे त्याने रणजित यांच्या साठी शक्य असूनही बनवले नव्हते.
"होय खरं आहे. ते जाऊ दे. मला सांग मी असा इतरांच्या नकारात्मक लहरींचा माझ्यावर नकारात्मक परिणाम होण्यापासून स्वतःला कसा वाचवू?"
"त्याकडे तटस्थपणे बघायला शिक! असाच तुझा काल्पनिक क्लोन तयार कर जो या सगळ्यांपासून मनाने, भावनेने आणि बुद्धीने निराळा असेल, तटस्थ असेल. जमेल हळूहळू तुला! तो क्लोन हवेतून तुला कुठेतरी बघेल, तो क्लोन तू असशील आणि खऱ्या सुनिलकडे तो एक वेगळी व्यक्ती म्हणून बघेल. बरं ते असू दे! खरे तर तुला एका जोडीदाराची साथीदाराची नितांत गरज आहे जी तुला समजून घेईन आणि तुम्ही दोघे एकमेकांना पूरक असाल!"
"खरंच? कोण असेल ती? अशीच कुणीतरी विशेष सुपर पॉवर असलेली?"
रंगिनी हसली.
"मी काही त्रिकालदर्शी भविष्यवेत्ती स्त्री नाही. टाईम डायमेंशन किंवा काळ मिती जीव आहे ना ती असते त्रिकालदर्शी! पण अर्थातच ती कुणाला भविष्य सांगत फिरत नाही, पण तुला तुझ्या तोडीची जोडीदार मिळेलच यात शंका नाही, असो!"
थोडे थांबून ती पुढे म्हणाली, "मी तुला आज हे सांगण्यासाठी आलेय की तुला मिळालेल्या शक्तीचा उपयोग तू कमी काळात इतक्या अनेक चांगल्या कामासाठी केलास की आता त्याहीपुढे जाऊन तुझ्या डोळ्यांना आणखी एक शक्ती मिळाली आहे!"
"आणखी एक शक्ती म्हणजे आणखी एक जबाबदारी?", मनातल्या मनात सुनिल आश्चर्याने आणि साशंकतेने स्वतःला विचारू लागला!
"ती कोणती शक्ती?", सुनिलने विचारले.
"तू मनात जसजसा विचार करशील तसतशी तुझी दृष्टी हवे तेवढया दूरवरचे बघू शकेल!"
"म्हणजे?"
"म्हणजे, तुला आधी प्रकाशाचे नियम थोडक्यात सांगते जे तुला आधीच माहिती असतील! वस्तू आपल्याला दिसतात कारण वस्तूंवरून परावर्तीत होणारा प्रकाश आपल्या डोळ्यांपर्यंत सरळ रेषेत पोचतो, बरोबर?"
"हो, विज्ञानाचा अगदी बेसिक नियम आहे हा!"
"आता पुढे ऐक! पृथ्वी गोल असल्याने आणि प्रकाश किरणे सरळ प्रवास करत असल्याने जास्त दूरवरचे बघायला आपल्याला मर्यादा येतात!"
"हो खरे आहे ते! अथांग समुद्रावरचे दूरचे जहाज काही वेळेस दृष्टीच्या आवाक्यात असूनही आपल्याला दिसत नाही कारण पृथ्वी गोल आहे!"
"बरोबर, पण समजा कल्पना कर की पृथ्वी अगदी हायवेसारखी किंवा अमर्यादित सपाट पृष्ठभागावर पसरवलेल्या गालीच्या सरळ सरळ पसरलेली असती तर तुला किंवा कुणाही माणसाला सामान्य दृष्टीने अगदी जास्तीत जास्त शक्य तेवढ्या दूरपर्यंतच्या वस्तू दिसल्या असत्या, इतक्या दूरच्या की उदाहरणार्थ जिथे पोहोचेपर्यंत आकाशातले विमान दूर जातांना शेवटी अदृश्य होते किंवा दृष्टीआड होते. कारण आपले व्हिजन हे त्रिकोणाकृती किंवा एखाद्या त्रिकोणी शंकूसारखे काम करते! यात एकच अडचण आहे ती म्हणजे अशा काही जवळच्या वस्तू उदाहरणार्थ उंच बिल्डिंग वगैरे ज्या दूरच्या वस्तूंची प्रकाशकिरणे सामान्य डोळ्यांपर्यंत पोहोचू देणार नाहीत!"
दीर्घ श्वास आणि उसासा टाकून सुनिल हणाला, "होय, बरोबर आहे! मग मला मात्र त्या सगळ्या वस्तू दिसतील का?"
"हो, तू एखाद्या दिशेने चेहरा करून जसजशी मनात अंतर वाढवत आणि मोजत कल्पना करत जाशील तसतसे तेवढ्या दूरवरचे तुला दिसण्यासाठी जवळच्या अनावश्यक बिल्डिंग, झाडे किंवा अडथळा आणणाऱ्या वस्तू तेवढ्याकरता तुझ्यासाठी अदृश्य होत जातील आणि प्रकाश किरणे तुला दिसण्यासाठी वाकतील, म्हणजे पृथ्वीच्या समांतर गोल प्रवास करतील तुझ्या डोळ्यांपर्यंत येण्यासाठी! आणि तू स्थिर असतांना तुझा दृष्टीकोन म्हणजे अक्षरशः दृष्टीला मर्यादा लावणारा तो घन आकाराचा कोन तुझ्याकडे सरकत जाईल म्हणजे कोणतीही वस्तू तुझ्या दृष्टीकोनातून दृष्टीआड होणार नाही!"
"पण हे कसे शक्य आहे? प्रकाश किरणे कशी काय वाकतील?"
"मी जशी रंग मिती जीव आहे तशीच आणखी एक प्रकाश मिती जीव पण असते. आम्ही आमच्या काही गोष्टी नियंत्रित करू शकतो, प्रकाश किरणांनाही करू शकतो! आम्ही सगळ्या मिती एकमेकांत काही सूत्रांनी बांधलेले आहोत आणि तुझ्यासारखे काही जीव पण विविध मितींच्या एका सूत्राने बांधले आहेत! गरज पडली तर तुझ्या सारख्या काही डायमेंशन स्पेसिज किंवा मिती प्रजाती साठी प्रकाश किरणं पृथ्वीच्या परिघाला समांतर प्रवास करायला आम्ही भाग पाडू शकतो! काय समजलास?"
श्वास रोखून हे सगळं सुनिल ऐकत होता कारण त्याचा अंदाज बरोबर निघाला होता की सगळ्या मिती एकमेकांशी कसल्यातरी फॉर्मुल्याने कनेक्टेड आहेत आणि तो स्वत: एक डायमेंशन स्पेसिज आहे!
"म्हणजे मी मिती प्रजाती आहे?"
"होय! रंग, आवाज, वास, नकारात्मकता आणि प्रकाश या सगळ्या मितीचे असलेले मिश्रण आहेस तू! अशा अनेक प्रकारच्या मितींचे विविध मिश्रण असलेले स्पेसिज जगात आहेत! तुझी भेट होईलच गरज असेल तेव्हा त्यांचेशी! गोल पृथ्वीवर अनंतपणे दूर बघण्याचा तुझा प्रश्न सुटला आणि तू जो भाग दूरदृष्टीने बघशील त्याचा आवाज सुद्धा तुला ऐकू येतील आणि वास सुद्धा जाणवतील! म्हणजे पंचेंद्रीये नेहमीप्रमाणे काम करतील. बरेचदा तुला तुझ्या चेहऱ्याची दिशा बदलावावी लागेल, गरजेनुसार! तुझ्या मेंदूचा गोंधळ टाळण्यासाठी! अन्यथा तू एकाच दिशेला उभा राहून सुद्धा 360 डिग्री सर्कल मधील अनंत गोष्टी पाहू शकतोस!"
"बापरे, ही तर खूप मोठी शक्ती आणि जबाबदारी आहे!"
"होय, म्हणजे आता कितीही दूर कुठेही नकारात्मक घटना घडत असल्या तर तुला लाल वलयाच्या रुपात दिसतील आणि जवळपास असतांना ध्वनी आणि वास मदतीला येतील!"
ती पुढे म्हणाली, "आणि आता राहिला प्रश्न अमर्याद आकाशात बघण्याचा तर तेही तू याचप्रमाणे बघू शकशील! पण ही दृष्टी तू पुढे पुढे सरकवत असतांना तू जिथे उभा असशील तिथले भान तुला ठेवायला हवे नाहीतर संकटात सापडू शकतोस! आणि हो, या शक्तींचा वापर तू चुकीच्या गोष्टींसाठी करायला सुरुवात केली की एकेक करून या शक्ती तुझ्यातून कमी व्हायला लागतील आणि ज्याच्यावर चुकीचा प्रयोग करशील त्याला या शक्ती हळूहळू मिळायला सुरुवात होईल, लक्षात असू दे! आता मी निघते, पुन्हा भेटूच!!", असे सांगून रंग मिती वेगाने निघून गेली आणि सुनिल पुन्हा पुलाच्या कठड्यावर हात देऊन उभा होता! एवढं सगळं होइपर्यंत काळ थांबला होता! कदाचित रंग मितीने काळ मितीला विनंती केली असावी!! त्याने घड्याळाकडे पाहिले, डायल उघडले आणि स्फटिकाला स्पर्श केला, आणि त्याच्या शक्ती बंद केल्या.
खिशातील गॉगल डोळ्यांना लावला आणि गाडीवर बसून गाडी स्टार्ट करतांना हसत म्हणाला, "म्हणजे मी आता दूरदर्शन पण झालो!' आणि पुलावरून त्याची गाडी "दूर" निघून गेली!!
गाडी चालवताना त्याने एक मात्र मनाशी पक्के ठरवले की या नव्या शक्तीबद्दल कुणालाच सांगायचे नाही, अगदी रणजित यांना सुद्धा नाही!
^^^