१८. जहाजावर
ती स्त्री नेत्रा होती. डॉ नेत्रा रघुरामन. "संपूर्ण हॉस्पिटल" मधले डॉक्टर संपन्न सूत्रे यांची मैत्रीण, आय स्पेशालिस्ट! ज्यांच्याकडे लहानपणी सुनिलला दाखवले होते. दोन्ही डॉक्टर सुनिलच्या फॅमिलीचे चांगलेच परिचयाचे होते.
"मला माहित आहे सुनिल तुला धक्का बसला असेल!" नेत्रा म्हणाली.
"न नक्कीच! गेल्या काही दिवसात जे घडतंय ते सगळंच अतिशय वेगात आणि अनाकलनीय पद्धतीने घडत आहे!", सुनिल श्वास रोखून म्हणाला.
"होय आणि यापुढे आणखी काही अनाकलनीय पण अभद्र आणि तेही वेगाने घडण्याआधी आपल्याला आपला वेग वाढवायचा आहे आणि ते घडणं टाळायचं आहे!", नेत्रा कमालीच्या चिंतेच्या सुरात पण अधिकारवाणीने म्हणाली.
ते चौघेजण एकमेकांकडे आश्चर्याने बघू लागले.
नेत्रा म्हणाली, "मी तुम्हाला सगळं काही सांगते तुम्ही समोर नीटपणे बसून घ्या!"
सर्वजण रूम मधल्या सोफ्यावर बसले. नेत्रा मात्र उभीच होती.
नेत्रा पुढे सांगू लागली, "जयवंत जसकर यांचा एक महत्त्वाचा मेसेज माझ्या गॅजेटवर आता आलेला आहे. माझ्याजवळ हाताला बांधलेले वेगळ्या फ्रिक्वेन्सी बँडमध्ये ऑपरेट होणारे एक मोबाईल सारखे गॅजेट आहे. हे गॅजेट तुम्हालाही लवकरच देण्यात येईल. फक्त आपल्या संस्थेचे अधिकृत मेंबर्सच या गॅजेट्सवर मेसेज पाठवू शकतात. इतर कोणालाही ते वाचणे, ऐकणे आणि डिकोड करणे शक्य होत नाही. त्या मेसेज संदर्भात आणि इतर काही गोष्टींचा उलगडा करण्याआधी मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की आपण निघालो त्याच दरम्यान आपल्यासारखीच आणखी एक लाल काळी गाडी आणखी एका ठिकाणाहून निघाली होती. त्या गाडीतसुद्धा आपल्यासारखेच असे पाच जण होते म्हणजे ड्रायव्हर वगळता पाच जण! ते पाच कोण होते माहिती आहे तुम्हाला?"
सर्वजण एकमेकांकडे पुन्हा आश्चर्याने बघायला लागले.
"ती पाच जण होते आपणच!"
"आपणच म्हणजे?"
"त्या गाडीत आपल्या पाचही जणांचे हुबेहूब मुखवटे घातलेले इतर पाच जण म्हणजे पाच अगदी खरे वाटणारे विशिष्ट प्रकारच्या मेणापासून बनवलेले पुतळे होते, ड्रायव्हर वगळता! मग आपण विशिष्ट प्रकारच्या तंत्रज्ञानाने बनवलेल्या आपल्या गाडीचा वेग आपण इतका वाढवला की त्यांना त्या वेगाशी स्पर्धा करता आली नाही आणि आपली गाडी वेगाने सबवे मधून बाहेर पडून गेटवेकडे मार्गस्थ झाली सुद्धा! पण दरम्यान सबवे मध्ये आपला पाठलाग करणाऱ्या त्या गाडीच्या पुढे ती दुसरी डुप्लिकेट काळी लाल गाडी आली आणि त्यांना चकवत सबवे मधून बाहेर काढत तिच्या मागे नेत त्यांना वेगळ्याच रस्त्यावर आणले!"
नेत्रा पुढे म्हणाली, "तुमच्यावर हॉस्पिटलमध्ये हल्ला झाला, तो ज्यांनी केला त्यांचे साथीदार आणखी हॉस्पिटलच्या इमारतीच्या आसपास टपून बसलेले असावे कारण हॉस्पिटल मधून तुम्ही वाचल्याने त्यांचा प्लॅन बी सुरू झाला असावा. म्हणजे आपल्या गाडीचा पाठलाग सुरू झाला होता. कारण यांत्रिक सापांना कंट्रोल करणाऱ्या म्हणजे तुमच्यावर हल्ला करणाऱ्या त्या माणसाने तुम्ही लाल काळ्या गाडीतून पळून जात असल्याचे त्या प्लॅन बी वाल्या गाडीला सांगितले असावे!"
"बापरे, हे इतकं सगळं घडलं आणि ते कशासाठी?", सायली भीतीयुक्त आश्चर्याने विचारत होती.
"या मागची कारणे जेवढी मला माहिती आहेत ती मी तुम्हाला सांगणारच आहे. पण त्यापूर्वी मी जे सांगत होते ते पूर्ण करते. तर, त्यांना पद्धतशीरपणे चकवण्यासाठी आपणही तयार होतो. त्यामुळे एक डुप्लिकेट काळी लाल गाडी सबवे मध्ये तयार होती आणि आणखी आपल्या गाडीसारख्या गाड्या अनेक ठिकाणी आपण तयार ठेवल्या होत्या. कारण आपल्या जवळही प्लॅन बी, सी, डी होते. मी सांगितले त्यानुसार सबवे मध्ये त्या पाठलाग करणाऱ्या गाडीच्या समोर आता आपल्या गाडीसारखी पण डुप्लिकेट गाडी होती, आपल्या सगळ्यांच्या चेहेऱ्याचा मास्क घातलेल्या पुतळ्यावाली! म्हणून आपण इथे आता जहाजावर सुरक्षित आहोत!"
"आणि पुढे त्या गाडीचे काय झाले?'
"होय सांगते. आपले मिशन सक्सेसफुल झाल्याचा मला मेसेज आला. त्यानुसार असे घडले की, डुप्लिकेट गाडी अतिशय वेगाने पुढे जात होती. तिचा पाठलाग करणाऱ्या गाडीमध्ये ड्रायव्हर व्यतिरिक्त दोन माणसे होती. मग आपल्या डुप्लिकेट गाडीने अचानक यू टर्न घेतला आणि त्या पाठलाग करणाऱ्या गाडीच्या समोर वेगाने जाऊ लागली. आपल्या डुप्लिकेट गाडीच्या ड्रायव्हरने लाल काळया गाडीतून वेगाने ठरल्याप्रमाणे उडी मारून स्वतःचा जीव वाचवला आणि दोन्ही गाड्या एकमेकांवर वेगाने आदळून प्रचंड स्फोट झाला आणि पाठलाग करणाऱ्या गाडीतील लोक मारले गेले. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही चौघे वाचलात आणि तुमचे पुतळे मारले गेले! आणि आपल्या गाडीच्या ड्रायव्हरला घ्यायला आपला एक माणूस बाईकवर आला होता!"
"तुम्हीपण वाचलात ना नेत्रा डॉक्टर. स्वतःचा जीव धोक्यात घालून आम्हाला तुम्ही वाचवले! तुमचे आभार कसे मानावे हेच कळत नाही", सुनिल कृतज्ञपणे म्हणाला. बाकीच्यांनी सुद्धा संमती दर्शवली.
"होय ते माझे कामच आहे आणि मला माहित आहे तुमच्या मनात आता वेगळ्या शंकाकुशंका आणि प्रश्नांची मालिका सुरू झाली असेल. त्या सगळ्या गोष्टींची उत्तरे मी देणार आहे. किंबहुना ते सगळे तुम्हाला आता लवकरात लवकर सांगणे आवश्यकसुद्धा झालेलं आहे. पण त्याआधी थोडे फ्रेश व्हा, खाऊन घ्या. कारण दरम्यान मला जहाजावर काही महत्वाच्या सूचना द्यायच्या आहेत आणि वेगवेगळे मेसेज करायचेत. मग आपण थोड्यावेळाने बोलू. जयवंत जयकर यांचा जो मेसेज आलेला आहे त्यातून आणखी एका गोष्टीचा उलगडा झालेला आहे तोही मी तुम्हाला सांगेनच!"
असे म्हणून नेत्रा त्या रूम मधून बाहेर निघून गेली.
^^^