Get it on Google Play
Download on the App Store

२७. आव्हान

नेटवर्किता सांगू लागली, "आमच्या व्हायरसिक सरांनी नुकतेच जगभर विविध क्षेत्रांतील कंपनीतून वेगवेगळ्या कारणास्तव कामावरून काढून टाकलेल्या जवळपास तीन लाख कर्मचाऱ्यापैकी पन्नास हजार जणांना सोशल मिडीयाच्या माध्यमांतून डमी अकाऊन्ट बनवून संपर्क साधला आणि आमच्या टीममध्ये काम दिले. त्यांना आधी होता तितकाच पगार आम्ही देणे सुरु केले आणि ते जिथे आहेत तिथेच राहून आमच्यासाठी काम करू लागले. ते असे लोक होते ज्यांना जॉब गेल्यानंतर नंतर पुढे कुठेच नोकरी मिळाली नव्हती आणि ते व्यवसायसुद्धा सुरु करू शकत नव्हते त्यामुळे स्वत:चा आणि कुटुंबाचा आत्मघात करायला निघाले होते."

 

आता स्क्रीनवर लाल रंगाचा एक व्यक्ती आणि त्याच्या अवतीभोवती काळ्या रंगाचे इतर व्यक्ती दिसत होते. ते एक प्रतिकात्मक चित्र होते ज्यात त्या लाल मानवाकृतीने इतर आकृत्यांना जणू शरण दिली होती.

 

"शास्त्रज्ञ, डॉक्टर, संशोधक आणि इतर असे सर्व लोक जे जगभर अन्यायकारक पद्धतीने लोकांचे व्यवसाय किंवा नोकऱ्या नष्ट करण्यास प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कारणीभूत ठरत आहेत त्या सर्वांना आम्ही आता नष्ट करणार आहोत कारण आता टीम मध्ये जास्त लोक जॉईन झालेत!"

 

"आमच्या सरांना पृथ्वीवरच्या या सर्व ठराविक सजीव निर्जीव गोष्टी नष्ट करून दुसरीकडे एक प्रतिसृष्टी उभारायची आहे, ज्यात निसर्गाशी आत्मीयतेने वागणारी माणसे आणि प्राणी असतील. सरांचेच सगळे ऐकणारी सजीव सृष्टी तिथे असेल. आम्ही भग्न करत असेलल्या इमारती, वास्तू बघून निसर्गावर अतिक्रमण केल्याची आणि विज्ञानाच्या नादात मानवतेचा पैलू विसरल्याची तुम्हाला सतत आठवण येत राहील. शास्त्रज्ञ, डॉक्टर, संशोधक यांनी लावलेले सगळे शोध आम्ही नष्ट करून, काहींना गायब करून आमच्या सोबत आमच्या प्रतिसृष्टीत नेऊ तर काहीना आम्ही इथेच जीवे मारू. ज्यांना प्रतिसृष्टीत नेऊ तेथे त्यांना पूर्ववत करू आणि त्यानंतर ते आमच्या सरांचेच ऐकतील आणि त्यांचे दास होतील! आणि हे सगळे आम्ही तुमचेच संशोधन, तंत्रज्ञान, विज्ञान वापरून करणार आहोत. जसे आम्ही सुजित लहाने याने बनवलेले हवेपासून अतिशुद्ध एक लिटर पिण्याचे पाणी आणि एक लिटर पेट्रोल बनवणारे मशीन चोरून पाण्याची तहान कायम भागवत आहोत आणि पेट्रोल विकून पैसा उभारत आहोत. पेट्रोल स्वतःसाठीसुद्धा वापरत आहोत. तसेच ताकामिशी क्योदाई यांचे क्रांतिकारक अदृश्य स्क्रीन आणि रोबोट आमच्याकडे आता पाणी भरत आहेत. असे अनेक क्रांतिकारक शोध जगापुढे येण्याआधीच आम्ही हायजॅक केले. आमच्याकडे काम करणारे नोकरी गमावलेले कुशल तंत्रज्ञच आणि डॉक्टर्स आता त्यांच्या ज्ञानाचा उपयोग तुम्हाला शह देण्यासाठी करत आहेत. आमच्याकडे जगातील सर्वात कुशल हॅकर्स आहेत. तेच आमच्यासाठी सायबर गुन्हे करून तुमच्या सारख्या अपराधी लोकांच्या अकाउंटमधून पैसे ऑनलाईन चोरून आमच्या अकाऊंटमध्ये टाकत आहेत. तेच हॅकर्स 'वाईट लोक येतील..' हा एस एम एस सर्वांना पाठवत आहेत आणि तुमची आयटी डिपार्टमेंट अजूनही शोध लावू शकली नाही की हे एस एम एस येतात कोणत्या सर्व्हर वरून?? लोहा लोहे को काटता है यानुसार आम्ही विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करून आमचे ध्येय साध्य करणार!"

 

व्हिडीओ बघतांना अनेक जणांना हे खोटे वाटले तर काहींनी टर उडवली. काहीना वाटले हे फक्त भीती पसरवण्यासाठी काहीतरी खोटेनाटे दावे करत आहेत. अशी प्रतिसृष्टी कुठे बनवता येते का? काहीतरीच काय? पण व्हिडीओ अजून बाकी होता!

 

त्या व्हिडीओमध्ये नेटवर्किता पुढे म्हणाली, "आणि हो... मला माहिती आहे हे सगळे ऐकून तुम्हाला खोटे वाटेल म्हणून आता मी तुम्हाला जे सांगते आहे ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. कदाचित संपूर्ण पृथ्वीच सरकू शकते!"

 

असे म्हणून तिने स्क्रीनवर बिग बॅंग थियरी दर्शवणारी एक आकृती आणली आणि तिने पुढचा भाग सांगण्यासाठी युनिक्सा हिला बोलावले आणि ती खुर्चीवर जाऊन बसली.

 

युनिक्सा उभी राहून सांगू लागली, "संशोधकांच्या मते, हे विश्‍व 12 मूलभूत कणांपासून बनले आहे. या कणांचे विभाजन होत नाही. सुमारे चौदा अब्ज वर्षांपूर्वी एका छोट्या बिंदूतून मोठा स्फोट होऊन विश्‍वाची निर्मिती झाल्याचे "बिग बॅंग' सिद्धान्त सांगतो. ज्या वेळी हा स्फोट झाला, त्या वेळी अवकाश, ऊर्जा, पदार्थ हे सारे एका बिंदूत सामावेलेले होते. मग त्याचे प्रसरण होत गेले आणि मूलकणांची निर्मिती झाली. अणूमध्ये प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्‍ट्रॉन असे अनेक कण आहेत, पण प्रोटॉन, न्यूट्रॉन यांसारखे कण हे त्यापेक्षाही लहान कणांपासून बनलेले आहेत ज्यांना आपण मूलकण म्हणू. ऊर्जेचे द्रव्यात रूपांतर होताना त्याला वस्तुमान प्राप्त होते! हा मोठा स्फोट व्हायला कारणीभूत उर्जेला अमर्यादितपणे उद्दीपित करणारा एक धनभारीत (पॉझिटिव्ह चार्ज') मूलकणच होता."

 

पुढे स्क्रीनवर एका प्रयोगशाळेचे चित्र आले.

 

"विश्‍वाच्या निर्मितीचे रहस्य जाणण्यासाठीच्या प्रयोगाला युरोपियन सेंटर फॉर न्यूक्‍लिअर रिसर्चमध्ये (CERN सर्न) 2008 ला सुरवात झाली. जीनिव्हाजवळील या प्रयोगशाळेत 'लार्ज हॅड्रॉन कोलायडर'मध्ये 'प्रोटॉन'च्या दोन कणांची टक्कर घडवून आणण्यात आली. 'बिग बॅंग' सिद्धान्तानुसार विश्‍वाच्या निर्मितीला कारक असलेल्या महास्फोटाची छोटी आवृत्ती स्थिती प्रयोगशाळेत निर्माण करण्यात जगभरातील शास्त्रज्ञांना 30 मार्च 2010 रोजी यश आले. जीनिव्हा येथील 'लार्ज हॅड्रॉन कोलायडर' (एलएचसी) प्रयोगशाळेत प्रोटॉनच्या दोन किरणांच्या टकरीत सातशे अब्ज इलेक्‍ट्रॉन व्होल्ट ऊर्जा निर्माण झाली. याच प्रयोगशाळेत आमचे सर 2009 पर्यंत काम करत होते पण नंतर प्रयोगाच्या पद्धतीबद्दल इतर वैज्ञानिकांशी वाद होऊन त्यांनी हा प्रयोग सोडला. त्यांच्या समर्थनार्थ आणखी काही जणांनी तिथली नोकरी सोडली!"

 

"या प्रयोगशाळेत आमचे सर एका विशिष्ट हेतूने आले होते. त्याआधी बरीच वर्षे आमच्या सरांची नोकरी गेली होती, ते एका सरकारी अणु संशोधन कंपनीत होते. आॉटोमेशनमुळे त्यांची नोकरी गेली. पेन्शन होते पण त्यांना ते घेऊन आरामात राहणे किंवा दुसरी नोकरी शोधणे पसंत नव्हते. तशातच त्यांच्या कुटुंबातील आणि नात्यांतील अनेक सदस्यांची सुद्धा नोकरी गेली, कुणाची आॉटोमेशनमुळे तर कुणाची आर्टिफिशियल इंटेलिजन्स मुळे! त्यांच्या कुटुंबातील तीन जणांनी  निराशेतून आत्महत्या केली! भारतात आणि जगभर निरपराध लोकांच्या जॉब जाण्याच्या अनेक घटनांनी त्यांचे लक्ष वेधले. आमचे सर निराश झाले, पण त्यांनी हार मानली नाही. आतापर्यंतच्या अनुभवच्या आधारे त्यांनी अभ्यास केला, वेगवेगळ्या परीक्षा दिल्या, ओळखींचा वापर केला आणि थेट सर्न मध्ये प्रवेश मिळवला कारण त्यांच्या मनात काहीतरी वेगळेच चालले होते!"

 

"सर्न मध्ये प्रयोगाच्या पद्धतीबद्दल इतर वैज्ञानिकांशी वाद होऊन त्यांनी हा प्रयोग 2009 साली सोडला त्यांनी आपल्या पद्धतीने गुप्तपणे आणखी एक प्रयोगशाळा स्थापली. त्यात त्यांनी असा यशस्वी प्रयोग केला की त्यात छोट्या स्वरूपातील खरोखरची आकाशगंगा तयार करण्यात यश आले! त्याला आम्ही 'सुपर बिग बॅंग' नाव दिले. नंतर नोकरी गमावलेल्या पण हुशार लोकांना हाताशी धरले. त्यांनी मग आणखी एक उलटा प्रयोग केला. जसे 'सुपर बिग बॅंग' सिद्धान्तानुसार ऊर्जेचे द्रव्यात रूपांतर होताना त्याला वस्तुमान प्राप्त झाले तसेच त्यांनी असा प्रयोग यशस्वी केला ज्यात जग नष्ट होऊ शकेल! म्हणजे असे कण शोधले ज्याद्वारे वस्तुमानाचे पुन्हा उर्जेत रुपांतर झाले. पण छोट्या प्रमाणावर! त्याला आम्ही 'सुपर बिग कोलॅप्स' असे नाव दिले. म्हणजे आता आमच्याकडे दोन प्रकारचे उद्दीपित करणारे कण (कॅटॅलिस्ट) तयार झाले. एक धनभारीत मूलकण आणि दुसरा ऋणभरीत (निगेटिव्ह चार्ज) मूलकण!!  छोट्या प्रमाणावर हा प्रयोग आधी यशस्वी झाला. त्यातून मिळालेल्या कणांतून आम्ही निर्जीव वस्तू नष्ट करू शकलो म्हणजे त्यांचे उर्जेत रुपांतर झाले. ती सुप्त स्वरूपात तोपर्यंत राहील जोपर्यंत तिला पुन्हा वस्तुमानात रुपांतरीत करत नाही!  याच सिद्धांतावर आधारित मग सजीवांवर पण प्रयोग करता येईल का असा विचार आमच्या सरांच्या मनात आला. मग त्यांनी काही हुशार वैद्यकीय तज्ञांना हाताशी घेऊन असा व्हायरस तयार केला जो मानवी पेशीतील न्युक्लीयसचे स्ट्रक्चर किंवा बांधणी अस्थिर करेल आणि हळूहळू सर्व पेशी त्यामुळे आक्रसून नष्ट होतील मात्र मेंदूतील न्यूरल नेटवर्कवर याचा परिणाम व्हायला नको होता. अथक संशोधन आणि परिश्रमानंतर त्या प्रयोगाला यश आले. तो व्हायरस 'सिक्रियम ट्राय- नायट्रोफोस्फाईड' या केमिकल मध्ये अनेक दिवस जिवंत राहतो. त्या व्हायरस असलेल्या लिक्विडला तोंडावाटे किंवा नाकावाटे मानवाच्या किंवा प्राण्याच्या शरीरात सोडल्यास पेशी आक्रसत जाऊन एक छोटा पेशीसमूह उरतो ज्यात संपूर्ण शरीराची मेमरी, DNA, RNA आणि इतर आराखडा असतो, जो पुन्हा उलट प्रयोगाद्वारे मानवात रुपांतरीत करता येतो, हेच प्रांण्याच्या बाबतीत सुद्धा लागू होते!"

 

तिला थांबवून नेटवर्किता सांगू लागली, "थोडक्यात -सुपर बिग बॅंग म्हणजे काय? तर उर्जेतील सुप्त अणु संरचना (त्यांच्यात असलेल्या मूळ कणांच्या प्रसरणामुळे) प्रसरण पावणे आणि एका वस्तुमानात स्थिर होणे! कोणामुळे? तर धनभारीत उद्दीपित करणाऱ्या त्या मूलकणामुळे!. सुपर बिग कोलॅप्स म्हणजे अणु संरचना कोलमडणे किंवा अस्थिर होणे आणि उर्जेत रुपांतरीत होणे! हे निर्जीव आणि सजीव या दोघांसाठी आम्ही करू शकतो. आमच्या प्रतिसृष्टीत आम्ही तुमचे पेशी समूहात रुपांतर केलेले सजीव आणि तसेच उर्जेत रुपांतरीत झालेले निर्जीव पुन्हा पूर्ववत करू! यातील सजीवांवर आमचे कंट्रोल राहील. तसेच दोन सजीव पेशी समूह आम्ही एकत्र करून त्यांचे पुन्हा एकत्रित एकाच सजीवात रुपांतर करू शकतो. दोन मानवांचे किंवा एक प्राणी एक मानव किंवा पक्षी प्राणी असे काहीही! त्यात एकाचा मेंदू असतो तर दुसऱ्याचे शरीर! आम्ही उडत्या यांत्रिक कीटकांच्या मदतीने कणांचा फवारा मारून आधी निर्जीव वस्तू नष्ट करतो! पण ते कीटक कोण रिमोटने ऑपरेट करतात, माहित आहे? मानवी मेंदू असलेले प्राणी पक्षी किंवा कीटक! आणि यांत्रिक उडते भुंगे हे काही फक्त कण स्प्रे करायला नाही तर काही भुंगे हे विविध लोकांवर पाळत ठेवायला पण आम्ही वापरत असतो, त्यात कॅमेरे असतात. त्याद्वारे आम्ही विविध व्यक्ती आणि ठिकाणे यांचे सर्व्हे करतो, माहिती मिळवत असतो."

 

मग व्हायरसिक उभा राहिला आणि कपाळावर मूठ आपटत आपटत मोठ्याने हसत म्हणाला, "या एकत्रीकरणाचा शोध योगायोगाने लागला. जेव्हा हाराकू नाकामुरा याने चोरून आणलेला सोराकैतो ताकामिशी यांचा पेशीसमूह आम्ही अभ्यासत होतो तेव्हा बाजूला एका मांजराचा आमच्याकडून आक्रसलेला पेशीसमूह अनवधानाने त्याला स्पर्श करून ठेवलेला होता. सजीवांचा सुपर बिग बॅंग व्हायरस ज्या पेशीसमूहात आम्ही इंजेक्शनने सोडला होता (ताकामिशी) त्याचा मेंदू आणि दुसऱ्याचे (मांजराचे) शरीर असा प्राणी तयार झाला. मग असे प्राणी तयार करून आम्ही त्यांच्या मदतीने रिमोटद्वारे इतर यांत्रिक प्राणी कीटक ऑपरेट करतो! त्यामुळे कोणाच्या हाती काही लागण्याचा प्रश्नच उरत नाही! त्यामुळे आमचे बरेचसे काम सोपे झाले! फक्त एकच प्रॉब्लेम आहे की एकदा आक्रसलेल्या पेशीसमूहाचे रूपांतर पुन्हा सजीवात केले की पुन्हा त्याला पेशी समूहात रूपांतर करण्याचा प्रयत्न केला तर तो मरतो. त्यामुळे आता हा ताकामीशी, ताकात मिशी बुडवून आयुष्यभर ताक आणि दूध पीत राहील! आणि आम्हीही यानंतर दुधाने जीभ पोळल्यावर ताक फुंकून पितो, या ताकामिशी सारखे, मिशी बुडवून बुडवून!"

 

मग तो स्वतःच्या जोकला पोट धरून हसायला लागला. मग व्हिडीओमध्ये एक मांजर समोर आणले गेले ज्याच्या चेहऱ्यात सोराकैतो ताकामिशी यांच्या चेहऱ्याची झलक होती पण ते होते एक मांजरच!!

 

त्या मांजराने व्हायरसिक सोबत हस्तांदोलन केले आणि ते माणसासारखे हसू लागले.

 

व्हायरसिक पुढे म्हणाला, "आता मानवजातीला आम्ही एक आव्हान देतोय! पुढचा हल्ला आम्ही दोन जणांवर करणार! येत्या 8 तारखेला सोमवारी!! मुंबईत राहणाऱ्या भारतातील एका प्रसिद्ध डॉक्टरवर ज्यांचे नाव R आणि आडनाव H अक्षराने सुरू होते आणि पुण्यातील एका मोठ्या अणू शास्त्रज्ञावर ज्यांचे नाव H अक्षराने आणि आडनाव R अक्षराने सुरू होते. त्यांना पेशी समूहात रूपांतरित करून ते समूह सर्वांच्या डोळ्यासमोर आम्ही चोरून नेऊ आणि तुम्ही बघतच राहाल! बघतोच एकेकाला आता! महाविनाशाला सुरुवात मुंबई पुण्यापासून करू या! नंतर बरेच काही होईल पण आधी तुम्ही या दोघांना वाचवून दाखवा! Allied Secret Forces तर आता राहिली नाही! इतर संस्था तर काय असून नसल्यासारख्या आहेत! लेच्या पेच्या! मग बघू तुम्हाला कोण वाचवते ते!"

 

सगळ्यांनी आजची तारीख बघितली. आज तारीख होती चार!

 

थोडे थांबून तो व्हीडिओमधील व्हायरसिक पुढे म्हणाला, "हॉस्पिटलमध्ये हल्ल्यातून तुम्ही वाचलात, तुमच्या माणसांचे नकली पुतळे करून आमच्या माणसांना चकवून गाडीत स्फोट करून मारले पण आम्ही तुम्हाला जहाजावर शेवटी गाठलेच आणि नष्ट केलेच!! फक्त आमची एकच खंत राहील. आमची स्पायवियरा नावाची लढवय्यी टीम मेंबर मारली गेली असावी तुमच्या Allied Secret Forces च्या एका जहाजावरून परत येतांना! कारण ती आमच्याकडे परत आली नाही. पण तिने जहाज नक्की नष्ट केले असा आमचा विश्वास आहे. बरे झाले! आता आम्हाला विरोध करणारी टीमच उरली नाही!"

 

मग मांजरासाहित पाचही जणांनी बाय बाय केले, कॅमेरा दूर दूर होत गेला.

 

अंधार झाला आणि व्हिडीओ बंद झाला!

 

^^^

डिटेक्टिव्ह निगेटिव्ह

Nimish Navneet Sonar
Chapters
१: जन्मापासून सुरुवात २. जाणीव ३. सुगावा ४. ती दिसली ५. सायन्स फेस्टिव्हल ६. पुलावरचा घात ७. एक नवी सुरुवात ८. स्मृतिबंधन ९. पहिले प्रेम १०. ताकामिशी क्योदाई ११. दूरदर्शन १२. भटकंती १३. नरिमन टर्निंग पॉईंट १४. सुटका १५. संकट १६. तो आणि ती १७. प्रवास सुरू १८. जहाजावर १९. चाहूल २०. उलगडा २१. पाठलाग २२. परिवर्तन २३. सुपर नेचर कडे २४. सुपर नेचर २५. तयारी २६. वाईट हेतू २७. आव्हान २८. प्लॅनिंगचा मुखवटा २९. प्रस्थानम् ३०. पुन्हा पुलावरचा घात? ३१. दिसतं तसं नसतं ३२. शक्ती प्रदर्शन ३३. चकवा ३४. त्यांना आमंत्रण ३५. हाडाचा लढवैय्या ३६. नरिमन ऍक्शन पॉईंट ३७. तो येतोय ३८. युद्ध आमुचे सुरू ३९. प्लॅन्डी ४०. अपहरण ४१. गीता आणि नीता ४२. महायुद्ध ४३. वादळ शांत! लेखकाचे मनोगत लेखक परिचय प्रकाशनपूर्व आलेल्या इतर काही प्रतिक्रीया लेखिका मेधा इनामदार (पुणे) यांचा अभिप्राय राहुल दवे (कॅलिफोर्निया) यांची प्रस्तावना अक्षर प्रभू देसाई (कॅलिफोर्निया) यांची प्रस्तावना आदित्य भागवत, ठाणे यांचा अभिप्राय सिद्धेश प्रभुगांवकर, पुणे यांचा अभिप्राय