Get it on Google Play
Download on the App Store

२८. प्लॅनिंगचा मुखवटा

 

हा व्हिडीओ "वाईट" ने  फक्त सरकारी संस्थांना न पाठवता सरसकट सर्वच न्यूज चॅनेल्सला पाठवल्यामुळे सर्व सत्य अचानक अक्षरशः जगजाहीर झालं. काही भाग लोकांना कळला नसता तर बरं झालं असतं असं विविध गव्हर्मेंट संस्थांना वाटत असलं तरी आता काही उपयोग नव्हता. एखाद्या चॅनलने आचारसंहिता पाळून व्हिडिओ मधला काही भाग वगळायचा ठरवला तरीही इतर अनेक चॅनल्सनी संपूर्ण व्हिडिओ दाखवायला सुरुवात करून दिली होती. वाईट संस्थेलासुध्दा कदाचित हेच हवे होते. मात्र एक बरे झाले की त्यांना असे वाटत होते की अलाईड सीक्रेट फोर्सेस आता संपली.

 

सुपर नेचर बेटावर सर्वजण हा व्हिडिओ बघत होते. आता तातडीने ॲक्शन प्लॅन बनवायची आवश्यकता होती. हा व्हिडिओ बघून काही वेळ विचार करून डिटेक्टिव्ह निगेटिव्ह तिथे उपस्थित असलेल्या सर्व महत्त्वाच्या व्यक्तींना म्हणाला -

 

"म्हणजे त्यांना असे वाटते आहे की अलाईड सिक्रेट फॉर्सेस संस्था आता संपल्यात जमा आहे. रणजित आणि माझ्यावर हल्ला यासाठी केला असावा की मी आणि रणजित, आम्ही सोबत काम करून त्यांच्यासाठी काम करणारे अनेक अपराधी पकडले होते. मला वाटत नाही की त्यांना माझ्या सुपरपॉवरबद्दल माहिती आहे. आम्हा दोघांना त्यांना पेशी समूहात रुपांतरीत करायचे नव्हते!  मारायचेच होते! नर्सने सायलीला पेशी समूहात रूपांतरित करण्याचा प्रयत्न जरूर केला कारण आपल्या प्रतिसृष्टीमध्ये एक हुशार शार्प बुद्धिमान डॉक्टर कुणाला नको असेल? तो  प्रयत्न फसला. मग त्यांनी चिडून तिला मारायचे ठरवले असावे कारण ती माझ्यावर उपचार करत होती आणि अर्थात माझ्यावरही पुन्हा हल्ला केला कारण मी नरीमन पॉईंटला रणजितवर झालेल्या हल्ल्यातून वाचलो होतो. त्यांना नेत्रा यांचाही पेशीसमूह हवा होता ज्याद्वारे आपल्या संस्थेची सगळी महिती त्यांना मिळू शकली असती."

 

नेत्रा आणि रणजित यांचा संदर्भ आल्यावर थोड्या वेळाकरता सगळेच जण भावूक झाले. या संस्थेला इथवर आणण्यात नेत्राने जेवढी मेहनत घेतली तेवढी खचितच कुणी घेतली असेल. आज नेत्राच्या नियोजनामुळेच ते चौघे जिवंत होते आणि रणजित यांचेही अप्रत्यक्षपणे खूप योगदान होतेच!

 

पुढे सायली म्हणाली, "पण हाडवैरी आणि निद्राजीता यांच्याबद्दल "वाईट" ला माहीत असण्याची शक्यता नक्की नाही. कारण नेत्रा यांनी सांगितल्याप्रमाणे दोघांना गुप्तपणे शोधून आपल्या ग्रुपमध्ये सामील करण्याचा प्लान केला गेला होता!"

 

सुनिल पुढे म्हणाला, "बरोबर आहे! अलाईड सीक्रेट फॉर्सेसची प्रमुख मारली गेली आणि संस्था संपली असे त्यांना वाटते आहे, परंतु ह्या संस्थेचे रुपांतर होऊन ती स्वागत या नव्या नावाने बनली आहे, हे त्यांना माहिती असल्याचे दिसत नाही! आता आपण चौघांनी मुखवटे घालून आपली ओळख लपवायला हवी. भारतातील आपल्या वेगळ्या शहरातील कार्यालयात तसेच मुख्यालयात संपर्क साधा. त्यानंतर ते वेगवेगळ्या देशांची संपर्क साधतीलच. जगाचे नेतृत्व आज आपल्याला करायचे आहे आणि जगाची मोठ्या संकटातून सुटका करायची आहे!! कारण भारतानंतर ते कोणत्या देशांना आणि कधी टार्गेट करतील सांगता येत नाही! आणि कदाचित त्यांनी सांगितलेल्या तारखेच्या आधीच ते घातपात करू शकतात. त्यामुळे आपण एक दिवस आधीच जायला हवे. त्या आधीसुद्धा जर का त्यांनी काही घातपात केला तर आपल्या पुणे आणि मुंबई शहरातील टीम्स आहेतच. "

 

सायली म्हणाली, "होय! आणि आपल्या टीम मध्ये आता जास्तीत जास्त सुपरपॉवर असलेले लोक आपण शोधून ऍड करायला हवे. अर्थात सुपर पॉवरच्या जोडीला गॅजेट्स आणि वेगवेगळे वैज्ञानिक शोध आवश्यकच आहेत कारण आपल्याला त्यांची मदतच होते.  म्हणजे दुग्धशर्करा योग! SWAGAT = Supernatural Warriors And Gadgets Assisted Team"

 

सुनिल पुढे म्हणाला, "हा जो कोणी बॉस आहे जो स्वतःला व्हायरसिक म्हणतो त्याची कळकळ योग्य आहे परंतु ते सिद्ध करण्यासाठी त्यांनी जे काही आरंभले आहे ते चुकीचे आहे. हे मात्र नक्की की विज्ञानाच्या मदतीने मानवाने जितक्या चांगल्या गोष्टी शोधल्या त्यापेक्षा जास्त वाईट गोष्टी शोधल्या. नुकसानकारक गोष्टी शोधल्या. निसर्गाचे नुकसान केले. निसर्गावर अतिक्रमण केले. पशुपक्ष्यांवर, प्राण्यांवर अतिक्रमण केले. त्यांचे अधिकार हिरावून घेतले. ऑटोमेशन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स तसेच इतर कारणांमुळे खरोखरच लोकांच्या नोकऱ्या जात आहेत हे मान्य! मात्र त्यावर उपाय म्हणून अशा विघातक कारवाया करणे आणि प्रतिसृष्टी वगैरे उभारणे हे खचितच योग्य नाही. हे अति झालं. तो जर स्वतः इतका हुशार आहे तर नोकरी गमावलेल्या युवकांना हाताशी धरून एखादी कंपनी काढून तो रोजगार देऊ शकला असता. असो! हा सगळा विचार करत बसण्याची आता वेळ नाही कारण आजची तारीख आहे 4!! आपल्याकडे फक्त तीन दिवस आहेत. काहीतरी प्लॅन करून लवकरच आपल्याला इथून निघायला हवे आणि त्या दोघांना वाचवायला हवे. त्यांचा ठावठिकाणा आपल्याला शोधायचा आहे!! त्यासाठी माझी दूरदृष्टी आहे पण नेमकेच ते कुठे कोणत्या दिशेला असू शकतात याच्यावर बराच विचार करावा लागेल. त्याबद्दल सध्या आपल्याकडे काहीच क्लू नाही पण ते महाराष्ट्रातच कुठेतरी असावेत. कदाचित पुणे किंवा मुंबईतच!!"

 

हाडवैरी म्हणाला, "मला वाटते सायली तू लवकरच इथल्या टीमच्या मदतीने आपल्यासाठी पोशाख डिझाईन कर. आमच्या सगळ्यांच्या बारीक-सारीक सुपरपॉवर आम्ही तुला थोड्याच वेळात पुन्हा एकदा नीट सांगतो!"

 

सायली हसून म्हणाली, "हरकत नाही मी करीन, पण इथल्या टीमची मदत घेण्यापेक्षा आपल्याकडे परफेक्ट चित्रकार आहे- सुनिल! म्हणजेच आपले डिटेक्टीव निगेटिव्ह हे स्वतः सुद्धा एक चित्रकार आहेत!"

 

सर्वजण आश्चर्याने एकमेकांकडे बघायला लागले.

 

हाडवैरी आणि निद्राजीता म्हणाली, "अरे वा! ही गोष्ट आम्हाला माहिती नव्हती, हे तर छानच झाले!"

सुनिल म्हणाला, "हे डिझाइन करण्याची माझी पण आधीपासून इच्छा होतीच, पण मी आता थोडक्यात रफ स्केच तुम्हाला बनवून देईन. मग आपले कॉम्प्युटर एक्सपर्ट तो फायनल करतील आणि मग थ्रीडी प्रिंटरच्या मदतीने आपण पोशाख प्रिंट करू आणि आपल्या चौघांना आपापल्या शहरात लोक ओळखत असल्याने आपल्याला चेहरा संपूर्ण झाकला जाईल असे मास्क बनवावे लागतील. आपले चेहरे संपूर्ण बदलले पाहिजेत. आपण चौघे संपूर्ण वेगळे व्यक्ती वाटले पाहिजेत. असे की जणू काही आपण प्लास्टिक सर्जरी केली आहे. आणि आपल्याला जास्त काळ ते घातले तरी त्रास होणार नाही. मला वाटते इथल्या सर्व टीमसाठी हे करणे फारसे कठीण नाही. थोड्याच वेळात आपण आपले चेहरे साईज् साठी 3D स्कॅन करून घेऊ. तसेच कोणती उपलब्ध साधने गॅजेट्स इन्स्ट्रुमेंट्स आणि वाहने आपल्याकडे आहेत लवकर विचार करून ठेवा. वाहनांसाठी इंधन आपल्याकडे जहाजांवरून येत असते हे मला काल येथील टीमकडूम कळले. सर्व प्रकारचे इंधन आपल्याकडे सध्या पुरेसे उपलब्ध आहे. पोशाखासाठी स्केच बनवल्यानंतर आपल्याला इतर भरपूर कामं असणार आहेत. तयारी करावी लागणार आहे!"

 

सायली म्हणाली, "सुनिल! आपण आपले चेहरे बनवताना आपल्या आवडीच्या कलाकारांचे चेहरे मिक्स करावयाचे का? नाहीतरी आपण कॉम्पुटर वापरून 3D मिक्सिंग आणि प्रिंटिंग करणार आहोत. जसे मला माधुरी दीपिका आणि निकोल या अभिनेत्री आवडतात. त्यामुळे जरा आपला कॉन्फिडन्स पण वाढेल नाही का? काय बोलतो?"

सुनिल," वा यार सायली! ग्रेट कल्पना आहे. मला तर बुवा सुबोध अक्षय आणि टॉम आवडतात! आणि हो मला हॅट आणि कोट असला पाहिजे बरं का! मी सुपर पावर असलेला डिटेक्टिव्ह असलो तरी आहे डिटेक्टिव्हच ना!"

सायली लाजली. तिने मनात कल्पना केली की माझा सुनिल हॅट कोटमध्ये किती स्मार्ट दिसेल आणि त्याच्या बाजूला मी बंदूक घेतलेली त्याची असिस्टंट!!

हाडवैरी, "मला लक्ष्मीकांत, गोविंदा आणि अरनॉल्ड फ्लेवर प्लिज!"

निद्राजीता हसायला लागली, "वा वा वा. क्या बात! काय भारी कॉम्बिनेशन आहे. कसा दिसेल हा नवा चेहरा? कल्पनाच करवत नाही! बरं, माझेकडून सोनाली, आलिया आणि ज्युलिया घ्या!"

सर्वजण हसायला लागले आणि सर्वांना कल्पना पसंत पडली. तणावपूर्ण वातावरणात थोडे हलके क्षण आले.

 

डॉक्टर शिशिर म्हणाले, "तुम्ही चार जण आलात म्हणून खूप छान झाले, अन्यथा आम्ही कल्पना करू शकत नाही हा संघर्ष कसा झाला असता? पण तुम्हाला चौघांना मला काहीतरी सांगायचे आहे. आपण शत्रूवर यशस्वीपणे मात करूही परंतु त्यानंतर आम्हाला आणि डॉक्टरांना यावर भरपूर विचार करावा लागणार आहे कारण विज्ञानाचा दुरुपयोग होत आहे आणि निसर्गाचे नुकसान आपण करत आहोत आणि त्याचाच गैरवापर करुन ते आपल्याला शह देऊ बघत आहेत, मात करू बघत आहेत. यावरून जगभर संदेश गेलाच आहे. पण आपण सर्व स्वागत टीमने संपूर्ण जगभर शक्य होईल तिथे शक्य होईल तसे आणि शक्य होईल तेव्हा याबद्दल जनजागृती करायला हवी. निसर्ग पशुपक्षी प्राणी यांच्यावर अतिक्रमण करून आपल्याला जगायचे नाही, तो आपला उद्देश नाही. सृष्टी निर्मात्याचा पण हा उद्देश नाही. अन्यथा पुढे सगळी मानवजात आपोआप नष्ट होईल, निसर्ग ती नष्ट करेल, कोणत्या ना कोणत्या रूपाने. तसे होण्याआधी या वायरस आणि त्यांच्या वाईट टीमने आपल्याला सावध केले. मग ते चुकीच्या पद्धतीने का होईना! पण आता तरी सर्व मानव जातीचे डोळे उघडले आहेत!"

 

सुनिल म्हणाला, "अगदी बरोबर आहे डॉक्टर तुमचे. तसेच ते पाच मास्क घातलेले लोक, त्यांची खरी नावं आणि त्यांच्या  टीममध्ये कोण कोण आहेत, ते कुठून आलेत हे समजा एखाद्या दिवशी शोधलेही तरी त्याने काय साध्य होणार? त्यापेक्षा त्यांच्यावर ही पाळी कळाली हे शोधण्याची आज गरज आहे!"

 

डॉक्टर राधाकृष्णन म्हणाले, "अगदी बरोबर सुनिल! आता जास्त चर्चेत वेळ न घालवता आपण सर्वांनी कामाला लागावे हे उत्तम!! आज जमेल तेवढं जे काही प्लॅनिंग करता येईल ते सर्वजण करा आणि रात्री मात्र पुरेशी झोप सुद्धा घ्या. आपली या बेटावरची को-ऑर्डिनेशन टीम सतत शहरातील कार्यालयांशी संपर्कात आहे आणि ती आपल्याला अपडेट देत राहील!"

सुनिल म्हणाला, "त्यांनी आता शहरांमध्ये शरीर पशु पक्षी प्राणी यांचे पण मेंदू मानवाचा अशा किती प्रजाती सोडल्या याचा आपल्याला काहीच अंदाज नाही आणि ते ओळखण्याची काही खूण सुद्धा आपल्याकडे नाही. त्यामुळे ते खुश आहेत. त्यांना वाटते की गुप्तरितीने हे प्राणी त्यांच्या टीममधील माणसांच्या मदतीने त्या दोन महत्त्वाच्या व्यक्तींना पेशीसमूहात रूपांतर करण्यात यशस्वी होतील. परंतु तुम्हा सर्वांना मला एक गोष्ट सांगायची आहे. मला फक्त मानवामधलीच नकरात्मक उर्जा लाल स्वरूपात दिसते असे नाही तर प्राणी पशु पक्षी नकारात्मक विचार करत असला तरी त्यातील निगेटिव्ह एनर्जी लाल वर्तुळाच्या स्वरूपात दिसते. त्यामुळे त्यांनी पाठवलेले मानवी मेंदू असलेले हे प्राणी तर मला सहज ओळखता येतील. फक्त प्रश्न असा आहे की ते कुठे आहेत, तितक्या सगळ्या ठिकाणी प्रत्यक्ष किंवा दूरदृष्टीने सुद्धा मला पटापट जाणे शक्य होणार नाही. आणि त्या व्हिडिओमुळे आता लोक सगळीचकडे वेगवेगळ्या पशु पक्षी कीटक यांचे कडे संशयाने बघू लागतील. निरुपद्रवी प्राण्यांना पण घाबरू लागतील. कदाचित त्यांच्याविरुद्ध हिंसा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे झाले की वाईट टीमला अजून आनंद होईल. असे होऊ नये यासाठी आपल्याला काहीतरी उपाय करावा लागेल, लोकांना टीव्ही किंवा इतर माध्यमांतून दिलासा द्यावा लागेल. तरी आपण त्या महत्त्वाच्या व्यक्तीकडे फोकस करू. RH आणि HR अक्षराने सुरु होणारे अणुशास्त्रज्ञ आणि हृदयरोग तज्ञ पुणे मुंबईत किती आहेत ते शोधायला लागा!"

सायली म्हणाली, "कशाला शोधाशोध करता. मी सांगते की!"

सुनिल म्हणाला, "अरेच्चा! विसरलोच की रे आपण! हा चालता बोलता सायली-पिडीया आहे ना आपल्याकडे!"

सायली लाजली आणि दहा सेकंद विचार करून म्हणाली, "RH आणि HR असे नाव असलेले चारच जण आहेत जे डॉक्टर आणि अणुशास्त्रज्ञ आहेत:

रणवर्धन हस्तक, मुंबई (अणुशास्त्रज्ञ)

रजक हडपकर, मुंबई (डॉक्टर)

हरित रागवे, पुणे (डॉक्टर)

हितेन राज, पुणे (अणुशास्त्रज्ञ)!"

सुनिल म्हणाला, "हे तर फारच छान झाले सायली. व्हिडीओनुसार तर आपल्याला रजक हडपकर, मुंबई (डॉक्टर) आणि हितेन राज, पुणे (अणुशास्त्रज्ञ) या दोन जणांकडे फोकस करून त्यांना संरक्षण द्यायला हवे! पण काय सांगावे, ती टीम उलटही करू शकते! म्हणून त्यापेक्षा आपण चौघांनाही संरक्षण देऊ!"

 

सगळेजण या गोष्टीशी सहमत झाले.

 

सुनिल पुढे म्हणाला, "आणि आपल्याकडे जी दंडगोलाकार वस्तू आहे ती आता आपल्या कामास येऊ शकते. फक्त त्यात मला दोन दिशेला दोन निगेटिव्ह लाल वर्तुळ जाणवले होते म्हणजे त्यात नक्की एका बाजूला "बिग कोलॅप्स निगेटिव्ह कण" आणि दुसऱ्या बाजूला "बिग कोलॅप्स निगेटिव्ह व्हायरस" लिक्वीड असावे आणि पॉझिटिव्हबद्दल पण तसेच! आता वेळ आली की याचा योग्य उपयोग आपण करू!"

 

आणि ते सर्वजण आपापल्या तयारीला लागले.

^^^

डिटेक्टिव्ह निगेटिव्ह

Nimish Navneet Sonar
Chapters
१: जन्मापासून सुरुवात २. जाणीव ३. सुगावा ४. ती दिसली ५. सायन्स फेस्टिव्हल ६. पुलावरचा घात ७. एक नवी सुरुवात ८. स्मृतिबंधन ९. पहिले प्रेम १०. ताकामिशी क्योदाई ११. दूरदर्शन १२. भटकंती १३. नरिमन टर्निंग पॉईंट १४. सुटका १५. संकट १६. तो आणि ती १७. प्रवास सुरू १८. जहाजावर १९. चाहूल २०. उलगडा २१. पाठलाग २२. परिवर्तन २३. सुपर नेचर कडे २४. सुपर नेचर २५. तयारी २६. वाईट हेतू २७. आव्हान २८. प्लॅनिंगचा मुखवटा २९. प्रस्थानम् ३०. पुन्हा पुलावरचा घात? ३१. दिसतं तसं नसतं ३२. शक्ती प्रदर्शन ३३. चकवा ३४. त्यांना आमंत्रण ३५. हाडाचा लढवैय्या ३६. नरिमन ऍक्शन पॉईंट ३७. तो येतोय ३८. युद्ध आमुचे सुरू ३९. प्लॅन्डी ४०. अपहरण ४१. गीता आणि नीता ४२. महायुद्ध ४३. वादळ शांत! लेखकाचे मनोगत लेखक परिचय प्रकाशनपूर्व आलेल्या इतर काही प्रतिक्रीया लेखिका मेधा इनामदार (पुणे) यांचा अभिप्राय राहुल दवे (कॅलिफोर्निया) यांची प्रस्तावना अक्षर प्रभू देसाई (कॅलिफोर्निया) यांची प्रस्तावना आदित्य भागवत, ठाणे यांचा अभिप्राय सिद्धेश प्रभुगांवकर, पुणे यांचा अभिप्राय