Get it on Google Play
Download on the App Store

३३. चकवा

थोड्यावेळापूर्वी लोहगांव विमानतळावर-

सुनिलने दृष्टीने त्या पुणे मनपा भवन जवळच्या पुलाच्या पायऱ्यांवर बसलेल्या त्या दोघांचा नंतर पाठलाग सुरू केला होता. त्यापैकी आधी जो पुलावर बसला होता त्याच्याजवळ एक मोठे पोते होते. ते दोघे बाईक वर मधमाशी पालन केन्द्रात गेले. तिथे त्यांनी एका माणसाशी काहीतरी संभाषण केले. ते पोते त्याला दिले. त्यानंतर ते दोघे जण हितेन राज या अणु शास्त्रज्ञांच्या घराकडे जाऊ लागले. रानमांजर कुणी पुलावर सोडलं हे सुनिल व्यतिरिक्त प्रत्यक्ष डोळ्यांनी कोणी बघितले नव्हते. त्यामुळे त्या दोघांवर संशय घेण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे कुणीही त्यांच्या मागावर नव्हते. आणि सुनिलला हेच हवे होते कारण तरच तो त्यांचा पाठलाग दृष्टीने करू शकणार होता.

 

विशेष म्हणजे हितेन राज यांच्या घरी सिक्युरिटीने त्या दोघांना बाहेर अडवले. पण हितेन स्वतः बाहेर येऊन त्या दोघांना आत येऊ द्या अशी विनंती करू लागले. थोडेफार प्रश्न विचारून त्या दोघांना सिक्युरिटी आणि पोलीस यांनी आत मध्ये जाऊ दिले.

 

त्यानंतर ते दोघे हितेन यांना भेटले. त्या दोघात एका बंद रूम मध्ये संभाषण झाले. त्यांच्यात जे संभाषण झाले त्याबद्दल हितेन यांच्या फॅमिलीला सुद्धा काहीच माहिती नव्हते. त्यानंतर ते दोघे जण बाहेर आले आणि बाईकवर बसून शहराच्या दिशेने निघून गेले. त्यानंतर हितेन यांनी हॉटलाइन वरून कुणालातरी फोन लावला. त्यानंतर ते बराच वेळ कुणाशीतरी बोलत होते. त्या संभाषणाच्या आधारे मग सुनिलने त्याची दृष्टी वेगाने अनेक किलोमीटर दूर असलेल्या एका ठिकाणी नेली आणि तिथे त्याला काहीतरी दिसले आणि त्याला स्वतःच्या दृष्टीवर विश्वास बसला नाही. त्याने थोड्या वेळापूर्वी जे ऐकले होते त्याची पुष्टी करणारे दृश्य तो आता समोर बघत होता. मग त्या ठिकाणी आतमध्ये दृष्टी नेऊन सुनिलने काहीतरी पाहिले, तिथले संभाषण आणि हालचाल पाहिली...

हा पाठलागाचा आणि त्यानंतरचा सगळा प्रसंग विमानतळावर बसून डोळ्यांनी बघता बघता सुनिलच्या चेहऱ्यावरचे भाव खूपच बदलू लागले, आश्चर्याने आ वासू लागला, चेहऱ्यावर घाम दिसू लागला. असे काहीतरी ऐकायला बघायला मिळेल असा त्याने विचार केला नव्हता. थोडा संशय त्याला होताच परंतु आता तो संशय पक्का होत चालला होता. पूर्वी प्लॅन करताना हा मुद्दा सुद्धा त्याने विचारात घेतला होता. परंतु असे खरेच घडेल असे त्याला वाटले नव्हते.  सुनिलने दृष्टी हळूहळू परत स्वतःजवळ आणली. त्याला थकवा जाणवत होता. थोड्या वेळ त्याने डोळे बंद ठेवले आणि उघडले. त्यानंतर चेहऱ्यावरचा घाम पुसला आणि पाणी प्याला. मग हाडवैरीला तो बाजूला एका कॉरिडॉरमध्ये घेऊन गेला आणि चालत चालत त्याच्याशी बोलू लागला.

 

"काय झालं सुनिल?", हाडवैरी म्हणजे विशाल म्हणाला.

"अरे, विशाल काय सांगू? या सगळ्या खेळात हितेन आणि मुंबईतील डॉक्टर रजक पण सामील आहेत!"

"काय? आणि ते दोघे स्वतःलाच किंवा आपल्याच क्षेत्रातील लोकांना म्हणजे रणवर्धन आणि हरित यांना मारण्याचा प्लॅन का बनवतील?"

"तो प्लॅन नाही विशाल. या चौघांपौकी दोघांना उद्या परवा पेशी समूहात रुपांतर करण्याचा जो प्लॅन आहे तो आपल्याला मूर्ख बनवण्यासाठी त्यांनी केला आहे. मुळात तसा प्लॅनच नाही आहे! वाईट टीम त्या कुणाला मारणार नाहीच आहेत! त्यांचा खरा प्लॅन तर वेगळाच आहे!"

"खरा प्लॅन? कोणता?"

"आपल्याला वाटतं की खोटे सुपरहिरो त्यांच्या समोर आणून आपण त्यांना चकवलं! पण खरं तर त्यांनी आपल्याला खूप मोठा चकवा दिला आहे! त्यांना वाटलं होतं सिक्रेट अलाईड फोर्सेस संपली पण स्वागत नावाची नवी संस्था अचानक समोर आल्याने त्यांनी आपल्यावर हल्ले सुरू केले आणि त्यांच्या प्लॅनची तारीख बदलली आहे!"

"कोणता चकवा? कसा प्लॅन?"

"आज दुपारी एक अद्भुत घटना घडणार आहे जिला आपल्याला कोणत्याही परस्थितीत घडू द्यायचं नाही आहे नाहीतर..."

"काय घडणार आहे दुपारी?"

"अल्ट्रा ग्रेव्हीटी बर्स्ट एनर्जी फोर्स साहायाने त्यांनी त्यांच्या जवळ जमलेला सगळा पेशी समूह, ऊर्जा रुपी वस्तुमान हे आधीच वर अवकाशात पाठवले आहे. आणि आज दुपारी दोन वाजेच्या आत वाईट टीम त्यांच्या "ताकामिशी" मांजरासहित हितेन आणि रजक यांच्यासहित पण त्यांच्या फॅमिली वगळता आणि जगभरातील वाईट टीम मेंबरसहित आकाशात प्रतीसृष्टीवर राहण्यासाठी जाणार आहेत, कायमचे!"

"काय? कुठून जाणार आहेत ते अवकाशात? आणि प्रतिसृष्टी त्यांनी केव्हा निर्माण केली? कुणालाच ती दिसली कशी नाही?"

"तुला विश्वास बसणार नाही, वाईट टीमची मोठी प्रयोगशाळा खंडाळ्याच्या घाटात एका गुहेत आणि त्या खाली असलेल्या भव्य तळघरात आहे! प्रतिसृष्टी निर्माण करायला त्यांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे ब्रह्मांडातील असंतुलन वाढेल!"

"काय? खंडाळ्यात? आणि अजूनपर्यंत कुणाच्याही ते लक्षात कसे आले नाही?"

"ते लोक कधीपासून याची प्लॅनिंग करत आहेत, अतिशय गुप्तपणे हे कार्य करत आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून भारतातून आणि जगभरातील अनेक लोक पुणे मुंबई परिसरात येत आहेत. ते तेच लोक आहेत ज्यांना प्रतिसृष्टीत घेऊन जायचे आमिष व्हायरसिकने दिले आहे. तिथे एक अदृश्य स्तंभ त्यांनी बनवला आहे. त्या गुहेचे प्रवेशद्वार पण त्या अदृश्य स्तंभातून जाते, त्यामुळे कुणी गुहेत प्रवेश केला तर ते दिसून येत नाही. हे सगळे घाटातील एका निर्मनुष्य खोल दरीत असल्याने दिसत नाही. या सगळ्या गोष्टी तयार करण्यामागे मोठा हात ताकामिशी याचा आहे, जो आता मांजर रुपात आहे. स्तंभातून त्यांनी आधीच रॉकेट लाँच करून अवकाशात एका नुकत्याच नष्ट झालेल्या ताऱ्याच्या रिकाम्या झालेल्या जागेत प्रतिसृष्टी उभारायला सुरुवात  केली आहे, असे त्यांच्या बोलण्यातून मला समजले!!"

"ओह, म्हणजे ते लोक आपल्याला या चार जणांच्या संरक्षणार्थ बिझी करतील, आपल्यावर वेगवेगळ्या प्राण्याद्वारे हल्ला करतील आणि तोपर्यंत ते अवकाशात पोहोचले असतील. तिथे त्या व्हिडिओमध्ये सांगितल्यानुसार प्रतिसृष्टीचे काम पूर्ण करतील!"

"येस, पण त्यासाठी त्यांना हितेन आणि रजक यांना पेशी समूहात नाही तर त्यांच्या मूळ रूपातच न्यायचे आहे! हितेनने स्वतःकडे एक फॉर्म्युला ठेवलाय ज्याच्या शिवाय सर्वजण प्रतिसृष्टीत जाऊ शकणार नाहीत. फक्त हितेनच नाही तर रजक डॉक्टरने असा एक लिक्वीड पदार्थाचा फॉर्मुला शोधला आहे की जो घेतला की आपण आपल्या मनातील सगळ्या भावना आपल्या मनाप्रमाणे नियंत्रित करू शकतो. म्हणजे राग, लोभ, प्रेम, इर्षा, हास्य, रडणं.. सगळं सगळं! प्रतिसृष्टीमध्ये सगळे जण हे लिक्विड पितील!"

"अच्छा, म्हणजे ते दोघे रजक आणि हितेन आज कधीतरी पुण्यातून आणि मुंबईतून खंडाळ्याला जायला निघतील? आणि त्यानंतरच वाईट टीमचे लोक प्रतिसृष्टीवर जायला निघतील?"

"होय. कधीतरी नाही ते सकाळी 9 वाजता निघणार आहेत. आता आपल्याला त्यांना घराबाहेर जाण्यापासून रोखावे लागेल आणि त्याआधीच ...", बोलतांना सुनिलच्या चेहऱ्यावर प्रचंड ताण जाणवत होता.

"आणि त्याआधी काय होईल सुनिल??"

"मुंबईतील आणि पुण्यातील विविध ठिकाणी विविध प्रकारचे मानवी मेंदू असलेले प्राणी, तसेच रिमोटने चालणारे यांत्रिक प्राणी हल्ला करणार आहेत. असे दोन जण आधीच बाहेर आलेत, ज्यांनी मुंबई रस्त्यावर आपल्या नकली निद्राजीता आणि मेमरी डॉल आणि इतर दोघांवर हल्ला केलाय!"

"बापरे, भयंकर आहे हे सगळे! पण सध्या पोलीस तिकडे मुंबई रस्त्यावर आहेत आणि एव्हाना चौघांनी त्या बाईकवरील दोघांना पकडले असेलच!"

"तशी आशा करूया. आणि मधमाशी पालन केंद्रातून खऱ्या मधमाशा आणि त्याच्यात खोट्या मधमाशा मिक्स करून यांत्रिक मधमाशा खऱ्या मधमाश्यांच्या उडणाऱ्या आकृत्याचा पाठलाग करतील, तसे त्यांच्यात प्रोग्रॅम केले आहे. त्या माणसाच्या पोत्यात यांत्रिक मधमाशा होत्या. तसंच मुंबईतून रजकसुद्धा असंच काहीतरी करून निघून जाईल. हितेन आणि रजक यांनी मुद्दाम शेवटचा पत्ता स्वतः कडे ठेवलाय म्हणजे नव्या सृष्टीमध्ये दोघांना घेतल्या शिवाय वाईट टीम निघणार नाही! आणि ते गायब झाल्याचा ठपका आपल्यावर येईल आणि लोकांमध्ये त्या दोघांची प्रतिमा चांगली राहील!"

"पण हे सगळे त्यांना गुप्तपणे करता आले असते, व्हिडीओ प्रसारित करून सगळ्यांना सावध करायची काय गरज होती?"

"कारण, चौघांच्या रक्षणासाठी आपल्यासारखे लोक, पोलीस वगैरे मुंबई पुण्यात येतील आणि प्रतिसृष्टीकडे प्रस्थान केल्यावर वाईट टीम रिमोटने गुहेतील एक यंत्र सुरु करतील. त्या यंत्रातून हळू हळू "बिग कोलॅप्स निगेटिव्ह कण" एका स्फोटाद्वारे पसरतील आणि त्याचा आपल्या शहरावर नेमका काय, कसा आणि किती परिणाम होईल हे सांगता येणार नाही! पण परिणाम भयंकर असतील, हे नक्की!"

"ओह, असा प्लॅन आहे तर! हा व्हायरसिक बहुतेक पुण्या मुंबईतीलच असावा, आणि त्याचे दुश्मनपण पुण्या मुंबईतील बरेच जण असावेत!

"हो! आणि म्हणूनच त्याचा एवढा रोष या दोन शहरांवर आहे! पण त्याचा तो प्लॅन आपण फेल करूच!!"

"सुनिल, तू त्यांचे चेहरे पाहिले?"

"त्या चौघांचे चेहरे मी गुहेत दूरदृष्टीने पाहिले पण मी त्यांना ओळखत नाही!"

"ओह, पण त्यांना ओळखण्यापेक्षाही आता महत्वाचं आहे त्यांना थांबवणं!!"

"होय विशाल!! हे सगळं आपल्याला मुंबईकडे निघालेल्या निद्राजीता आणि मेमरी डॉल यांना कळवायला हवं! म्हणजे दोघीजणी सावध होतील आणि आपल्या मुंबईच्या ऑफिसेसमध्ये पण तशा सावधगिरीच्या सूचना देतील. त्या दोघींना मी जे काम दिले आहे ते लवकर झालेच पाहिजे आणि मी लवकरच इसरो आणि नासा तसेच जगभरातील अवकाश संशोधन केंद्रांना सावध करून सूचना द्यायला सांगणार आहे की अवकाशात चोवीस तास देखरेख ठेवा. काही असाधारण गोष्टी दिसल्या तर कळवा. तसेच कदाचित असे हल्ले इतर देशांत पण होतील तेव्हा सगळीकडे सावधगिरीच्या सूचना देण्यात आल्या आहेत! तसेच ते यांत्रिक कुत्र्यांना ऑपरेट करणारे दोन जण पण आपल्या चार स्वागत फायटर्सला व्यस्त ठेऊन मुद्दाम अडकवून ठेवत आहेत त्यांना पण थांबवले पाहिजे!"

"पोलीस आणि चौघेजण त्यांना नमवण्यात सक्षम आहेत!"

तेवढ्यात एक स्वागत फायटर तिथे धावत आला.

^^^

डिटेक्टिव्ह निगेटिव्ह

Nimish Navneet Sonar
Chapters
१: जन्मापासून सुरुवात २. जाणीव ३. सुगावा ४. ती दिसली ५. सायन्स फेस्टिव्हल ६. पुलावरचा घात ७. एक नवी सुरुवात ८. स्मृतिबंधन ९. पहिले प्रेम १०. ताकामिशी क्योदाई ११. दूरदर्शन १२. भटकंती १३. नरिमन टर्निंग पॉईंट १४. सुटका १५. संकट १६. तो आणि ती १७. प्रवास सुरू १८. जहाजावर १९. चाहूल २०. उलगडा २१. पाठलाग २२. परिवर्तन २३. सुपर नेचर कडे २४. सुपर नेचर २५. तयारी २६. वाईट हेतू २७. आव्हान २८. प्लॅनिंगचा मुखवटा २९. प्रस्थानम् ३०. पुन्हा पुलावरचा घात? ३१. दिसतं तसं नसतं ३२. शक्ती प्रदर्शन ३३. चकवा ३४. त्यांना आमंत्रण ३५. हाडाचा लढवैय्या ३६. नरिमन ऍक्शन पॉईंट ३७. तो येतोय ३८. युद्ध आमुचे सुरू ३९. प्लॅन्डी ४०. अपहरण ४१. गीता आणि नीता ४२. महायुद्ध ४३. वादळ शांत! लेखकाचे मनोगत लेखक परिचय प्रकाशनपूर्व आलेल्या इतर काही प्रतिक्रीया लेखिका मेधा इनामदार (पुणे) यांचा अभिप्राय राहुल दवे (कॅलिफोर्निया) यांची प्रस्तावना अक्षर प्रभू देसाई (कॅलिफोर्निया) यांची प्रस्तावना आदित्य भागवत, ठाणे यांचा अभिप्राय सिद्धेश प्रभुगांवकर, पुणे यांचा अभिप्राय