Get it on Google Play
Download on the App Store

४२. महायुद्ध

राऊटरन आणि वायफायर सुनिलकडे परत आले. इतर सगळे हेलिकॉप्टर्स तिथून परत पुणे शहराकडे  घेण्याचे आदेश सुनिलने दिले. हाडवैरी पण पुन्हा शहरात आला. कारण वेगवेगळे प्राणी ठिकठिकाणी हल्ला करतच होते.

 

ज्या फॉर्म्युल्यासाठी व्हायरसिक हा हितेन आणि रजक यांच्यावर अवलंबून होता तो फॉर्म्युला आता ते दोघे बाहुल्यांमुळे विसरले होते. हे कळेल तेव्हा व्हायरसिकचे धाबे दणाणेल आणि प्रतिसृष्टी आकाशात राहील आणि वाईट टीम पृथ्वीवर राहील, असे होईल. वाईट टीम आणि इतर लोक प्रतिसृष्टीत जाऊच शकणार नाहीत आणि मग इसरो आणि नासाच्या मदतीने वाईट टीमने तयार केलेली प्रतिसृष्टी नष्ट करण्याचा प्लॅन करता येईल.

 

त्यामुळे गुहेत जाऊन वाईट टीमला पकडण्याचा प्लॅन करण्याआधी निष्पाप नागरिकांना प्राण्यांच्या हल्ल्यापासून वाचवणे हे आता मोठे आव्हान होते. कारण गुहेच्या आसपास अदृश्य स्तंभात अजून काही तशी हालचाल दिसत नव्हती. डायरेक्ट गुहेत हल्ला केला तर ती टीम आणखी वेगळ्या टेक्नॉलॉजीने हल्ला करण्याची शक्यता होती.

 

त्या हल्लेखोर प्राण्यांचा पाडाव करण्यात यश आलं की मग लवकरच खंडाळ्याला दूरदृष्टीने जाऊन त्या टीमला पकडता येणार होतं. सुनिल लढण्यात बिझी असल्याने इच्छा असूनही तो सध्या खंडाळ्याला गुहेत काय घडते आहे हे पाहू शकला नाही कारण आज सामान्य नागरिकांना त्याची गरज होती. तिकडे मुंबईत निद्राजीता आणि सारंग परिस्थिती सांभाळत होते.

 

इकडे आधी हितेन आणि त्यांच्यानंतर हॉट एयर बलून मधून आलेला डॉक्टर रजक हे दोघे आणि त्यांना घेऊन आलेल्या चौघांपैकी तिघे असे सर्वजण खंडाळ्याच्या गुहेत अदृश्य स्तंभातून आतमध्ये शिरले.

व्हायरसिकने त्यांना गुहेतील भव्य तळघरातील प्रयोगशाळेत नेले. तिथे अनेक स्क्रिन्स भिंतीवर लावलेल्या होत्या. समोर वेगवेगळे बटणं आणि पॅनेल्स होते. खूप मोठी सुसज्ज अशी प्रयोगशाळा होती. अवकाशात जाण्यास तयार असलेले चार भव्य यान तिथे तयार होते. तळघरातील एका भव्य पण अंधाऱ्या खोलीत प्रतिसृष्टीत जाण्यासाठी तयार असलेले लोक व्हायरसिकने ठेवलेले किंवा डांबून ठेवले होते असे म्हणण्यास हरकत नव्हती. तो भाग तुरुंगासारखाच वाटत होता. सगळ्या देशांतील लोक तिथे होते. काही लोक चिंतेत उभे होते, काही बसून होते. काही येरझारा घालत होते. काही स्त्रिया आणि लहान मुलेही त्यात सामील होती. त्यांना एका स्वर्गीय अद्भुत जगात जाण्याचे आमिष व्हायरसिकने दाखवले होते पण प्रत्यक्षात त्या सगळ्यांना तो गुलाम म्हणून तिथे घेऊन जाणार होता.

 

या सगळ्या लोकांना गुहेत आल्यानंतर काही दिवसांनी हे सगळे समजले पण तोपर्यंत उशीर झाला होता. त्याने या सगळ्यांवर वेगवेगळे प्रयोग करायला सुरुवात केली होती. काहींना त्याने पेशीसमूहात रुपांतरीत केले होते. जे जिवंत होते ते जणू भाव भावना नसलेले चालते बोलते रोबोट किंवा प्रेतासारखे बनलेले होते. त्या सगळ्यांच्या हालचाली नैसर्गिक वाटत नव्हत्या.

 

आणखी एका रूम मध्ये वेगवेगळे रोबोट्स येरझारा घालत होते आणि एका रूममध्ये विविध हिंस्र प्राणी वेगवेगळे आवाज काढत इकडे तिकडे फिरत होते. या सगळ्या रूम्सवर ताकामीशी लक्ष ठेऊन होता. व्हायरसिक त्याला हवे तसे राबवून घ्यायचा. तसेच इतर ठिकाणी त्याचे साथीदार सगळी कामं बघत होते.

 

प्रयोगशाळेत -

"हितेन, रजक! चला आता आकाशातील आपल्या नव्या जगात जायची वेळ झाली आहे. जास्त वेळ दवडून चालणार नाही. टाका तुमचा तो फिजिक्सचा फॉर्म्युला!"

हितेन त्या विविध बटनांच्या पॅनेलजवळ आला, एक खुर्ची त्याने ओढली आणि बसला. तो आठवण्याचा प्रयत्न करू लागला पण त्याला तो फॉर्म्युला आठवतच नव्हता!

 

त्याचा चेहरा बघण्यासारखा झाला. चेहऱ्यावरचा रंग उडाला. चेहरा घामाने डबडबला. मनातून त्याला थोडी शंका होतीच की बाईकवर असतांना हिरव्या डोळ्यांनी संमोहित करून त्या बाहुल्यांनी आपल्या डोक्यात काहीतरी गडबड केली ज्यामुळे आपल्याला तो फॉर्म्युला आठवत नाही आहे, पण हे तो व्हायरसिकला सांगू शकत नव्हता. त्याने हितेनला वेड्यात काढले असते.

"काय झालं हितेन? चेहऱ्यावर बारा का वाजले? आठवत नाही का फॉर्म्युला?"

हितेन त त फ फ होऊन म्हणाला, "न न न नाही म्ह म्ह म्हणजे हो हो, घरातून निघेपर्यंत आठवत होता, पण आता  आ आ आ आठवत ना ना नाही हो..!"

"येडा बनवतो का मला? फॉर्म्युला न आठवल्याचं नाटक करून तुझा काहीतरी प्लॅन दिसतोय. पोलिसांना, सरकारला आणि स्वागत टीमला तर सामील नाही ना झालास?"

रजक डॉक्टरला पण बाहुलीबद्दल तसा संशय आला होता आणि त्याने पण त्याच्या लिक्विडबद्दल माहिती मनातल्या मनात आठवून बघण्याचा प्रयत्न केला पण त्यालाही काही आठवत नव्हते.

रजक घाबरत म्हणाला, "म मला वाटते बॉस त्या बाहुलीत काहीतरी गडबड होती, संमोहन शक्ती होती! मलाही माझा फॉर्म्युला आठवत नाहीये!"

व्हायरसिकने चार पाच वेळा समोरच्या पॅनेलवर हात आपटला आणि तो जोरजोरात हसायला लागला.

"मेरी बिल्ली और मुझसेही म्यांव? पानी मे रहकर मछली से बैर? कोणत्यातरी फडतूस स्वागत टीमने पाठवलेल्या बाहुल्यांना दोष देता आणि स्वतःचा कृतघ्नपणा झाकता? नालायक हरामखोर साले, दोघेच्या दोघे! पण माझी खरी बिल्ली ताकामीशी मला कधीच म्यांव करत नाही, माझे मानवी मेंदू असलेले मासे पण माझ्याशी वैर धरत नाहीत, पण तुम्ही दोघे पडले शेवटी माणसंच! तेही पृथ्वीवरचे! तेही आजच्या युगातले! म्हणून धोकेबाज असणारच!"

दोघेजण घाबरले. थरथर कापू लागले.

पुढे व्हायरसिक म्हणाला, "हे बघा!! आता जास्त झालं. पण तुम्हाला काय वाटलं की तुम्ही मुद्दाम टाईमपास कराल, मला गुंतवून ठेवाल आणि तोपर्यंत बाहेरून येऊन ते लोक गुहेला वेढा घालून मला पकडतील? नो नो नो!"

दोघेजण पाया पडू लागले.

"अहो, नाही. आम्ही तुमच्याशी प्रामाणिक आहोत. आम्हाला खरंच काही आठवत नाही!"

"बास झाली तुमची नाटकं! आणि तुम्हाला काय वाटलं की माझ्याकडे प्लॅन B नाही? आहे! गेले आठ दिवस तुमच्या दोघांच्या घरात आमचे यांत्रिक भुंगे हेरगिरी करून सगळी तुमच्या फॉर्म्युल्याची माहिती गोळा करत होते. आतापर्यंत तुम्ही गुप्तपणे आम्हाला खूप मदत केली आहे म्हणून तुमचा मान राखला आणि आमच्या प्रतिसृष्टीत तुम्हाला स्थान द्यायचे मी ठरवले पण तुम्ही मलाच धोका दिला? त्या भुंग्याद्वारे मिळालेल्या माहितीचे माझे प्रयोगशाळेतील इतर तज्ञ विश्लेषण करत आहेत. ते पूर्ण झाले की आम्ही इथून छू मंतर!! पण त्या आधी मला एक काम करायचे आहे!"

असे म्हणून त्याने एका मजबूत रोबोटला बोलावले आणि कंट्रोल पॅनेलवर एक कमांड दिली. तो रोबोट दाण दाण पाय आपटत हितेन आणि रजक यांचेकडे येऊ लागला.

"नका हो आम्हाला नका मारू!", ते दोघे रडू लागले.

व्हायरसिक मोठमोठ्याने हसत होता.

"आता एकदा का फॉर्म्युला मिळाला की वेळ न दवडता मला सगळे यान कार्यरत करून प्रतिसृष्टीकडे प्रस्थान करायचे आणि "बिग कोलॅप्स निगेटिव्ह कण" स्फोटाद्वारे सोडायचे म्हणजे ही गुहा ब्लॅक होल होईल आणि सगळं यात ओढलं जाऊन नष्ट होईल!"

रोबोट त्या दोघांना दोन्ही हातांनी उचलून चालू लागला. तो रोबोट त्यांना एका गरम गॅसच्या चेंबर मध्ये फेकणार एवढ्यात-

"थांबा थांबा! त्या भुंग्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आम्ही पुन्हा फॉर्म्युला बनवण्यासाठी प्रयत्न करतो! आम्हाला मारू नका, एक संधी द्या!

"दिली! रोबोट, सोडून ये रे दोघांना त्या प्रयोगशाळेत!", जवळच्या टेबलावर चार पाच वेळा हात आपटत व्हायरसिक म्हणाला आणि वेड्यासारखे हातवारे करत हसायला लागला. धक्क्याने टेबलावरचे दोन चार उपकरण खाली पडले.

मग हितेन आणि रजक पुन्हा स्वतःचेच फॉर्म्युले पुन्हा शोधण्यासाठी इतरांसोबत कामाला लागले.

तोपर्यंत व्हायरसिक आणि नेटवर्किता टीव्हीवरचे मुंबई पुण्यातील लाईव्ह प्रक्षेपण बघू लागले.

 

तो नेटवर्किताला म्हणाला, "दोन्ही शहरातल्या आपल्या टीमला सूचना दे. आणखी प्राणी सोडा स्वागत टीमवर. आपला स्पेशल रोबोट ऍक्टिव्हेट करा आणि सोडा त्यांच्यावर! नष्ट करून टाका त्यांना. नष्ट करा दोन्ही शहरातील नागरिकांना!!"

नेटवर्किता म्हणाली, "जशी आपली आज्ञा बॉस!"

तिचे नाव उगाचच नेटवर्किता नव्हतं. तिने वाईट टीमचं अनेक शहरांत चांगलं जाळं (नेटवर्क) निर्माण केलं होतं.

 

दरम्यान नासा आणि इसरो यांनी आपल्या वेगवेगळ्या सॅटेलाईट्स, दुर्बिणी आणि स्काय लॅब्सच्या आधारे अवकाशात एके ठिकणी एक ज्यादा ग्रह शोधून काढला जो अगदी पृथ्वीसारखाच दिसत होता, त्याच्या भोवती एक चंद्रासारखाच दिसणारा ग्रह फिरत होता पण त्यांची फिरण्याची गती कधी कमी कधी जास्त होत होती. आणखी शनी सारखा दिसणारा एक ग्रह हळूहळू तयार होत होता. म्हणजे गोल ग्रह तयार होता पण त्या भोवती एक निळे कडे हळूहळू निर्माण होत होते. हे सगळे स्वागत टीम आणि भारतातील आणि भारताच्या मित्र देशांतील महत्वाच्या व्यक्तींना आणि संस्थांनाच फक्त कळवण्यात आले होते. त्या ठिकाणी एक वेगळेच चुंबकीय क्षेत्र तयार होत होते. हे नवे निर्माण होत असलेले ग्रह नष्ट करणे भाग होते.

 

सुनिल भारताच्या पंतप्रधान आणि राष्ट्रपती तसेच तिन्ही लष्कराच्या प्रमुखांशी संपर्क साधून होता. त्यांच्याकडून स्वागत टीमला संपूर्ण मदतीचे आश्वासन मिळाले होते. तसेच इसरोने आणि नासाने मिळून भारतातील सर्व महत्वाच्या राजकिय आणि विज्ञान क्षेत्रातील व्यक्ती यांना विश्वासात घेऊन एक प्लॅन आखला त्यानुसार एक रॉकेट इसरोच्या प्रक्षेपण केंद्रातून लाँच करून व्हायरसिक बनवत असलेली प्रतिसृष्टी नष्ट करता येणार होती. त्यासाठी युद्धपातळीवर तिथले शास्त्रज्ञ काम करायला लागले. वेळ कमी होता, त्यामुळे आधीच इतर कामासाठी तयार असलेले रॉकेट्स या कामासाठी थोडा बदल करून वापरायचे ठरले.

 

जिथे शक्य होते तिथे आर्मीचे हेलिकॉप्टर्स आणि राष्ट्रीय सुरक्षा दलाचे जवान मुंबई पुण्यात येऊन सामान्य नागरिकांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते पण जिथे सामान्य माणसाची ताकद कमी पडत होती तिथे सुपर पॉवर असलेल्या स्वागतच्या सुपरहिरों शिवाय पर्याय नव्हता.

 

मुंबई पुण्यात अनेक महत्त्वाच्या ठिकाणी आता वेगवेगळ्या यांत्रिक आणि मानवी प्राण्यांचा आणखी हल्ला झाला. सुनिलने यांत्रिक प्राणी ओळखले की त्यांच्यावर लष्करी आणि स्वागतच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने गोळीबार करता येत होता. त्यासाठी सुनिल आपल्या अँटिक्लिपवर बसून उडत उडत खूप उंचावर गेला आणि तिथून वेगवेगळ्या ठिकाणी जिथे प्राण्यांचा हल्ला झाला तिथे दृष्टीने जवळ जाऊन लाल वर्तुळातील मानवी प्राणी ओळखून हॅट मधून आपले सूक्ष्म शस्त्र काढून मोठे करून ते शस्त्र त्यांच्यावर फेकून त्यांना मारत होता. ते मेले की त्यांना फॉलो करणारे इतर यांत्रिक प्राणी पण निष्प्रभ होत होते, मग लष्कर हेलिकॉप्टरमधून त्यांच्यावर स्फोटकं टाकून त्यांना नष्ट करत होते. सुनिलजवळच्या शस्त्राने जे मानवी प्राणी मरत नव्हते त्यांना मारण्यासाठी सुनिल फोनद्वारे इतर स्वागत मेम्बर्सला सूचना द्यायचा आणि मग ते झाड मानव आणि जलजीवा यांच्या मदतीने त्यांचा खात्मा करत होते.

 

बहुतेक यांत्रिक प्राणी शॉक देऊन देऊन त्यांच्यातले सर्किट जाळून हाडवैरीने नष्ट केले. निद्राजीताला नरिमन पॉईंटवरील सत्तर टक्के मांजर आणि बोक्यांना मारण्यात यश आले होते. मदतीला आणखी बरेच जलजीवा अरबी समुद्रातून लाटांच्या स्वरूपात शहरात येत होते. पुण्यात मुळा मुठा नदीत पण बरेच जलजीवा शिरले होते. काही जलजीवा ढगांच्या रुपात येऊन आपले काम साध्य करत होते. आधी सुनिलच्या डोक्यात विचार आला की खरे कुत्रे या मानवी मांजरांवर सोडले तर? पण प्राणीमित्र संघटनानी त्याला परवानगी दिली नाही. निरपराध प्राण्यांना या युद्धात मुद्दाम सामील करून त्यांचा बळी देऊन मानवांनी जगणे स्वार्थीपणा झाला असता. प्राणी मित्र संघटना त्यांच्या दृष्टीने बरोबरच होत्या. मुंबईतील लोकल ट्रेन्स आणि बेस्ट बस वर वटवाघळे हल्ला करू लागली. त्यांच्याशीही सारंग आणि निद्राजीता जमेल तसे लढू लागले.

इकडे पुण्यात मनपा भवन जवळचा जग्गू भुसनळ्या हत्ती खूप चिवट होता. तो मरत नव्हता. सुनिलने त्याच्याजवळ उडत उडत अँटिक्लिपला नेले. अँटिक्लिपमध्ये दोन मानवी मेंदू पैकी एक असलेला पप्पू भुसनळ्या त्याला म्हणाला," भावा! सोडून दे ही वाईट कामं! स्वागत टीमला सामील हो!"

"नाही, लहानपणापासून या जगाने मला काय दिलं? तुला काय दिलं? मला एकही ठिकाणी धड नोकरी मिळाली नाही. आपण गरीब होतो. गरीब लोकांना कुणीही वाली नाही. आठवत नाही दादा तुला आपण कसे दिवस काढले? शेवटी या गुन्हेगार लोकांनीच आपल्याला काम दिलं, रोजी रोटी दिली. तू कारखान्यात काम करत होतास पण ते पैसे पुरत होते का आपल्या आजारी आई वडीलांच्या ऑपरेशनच्या खर्चासाठी?", हत्तीमधला जग्गू म्हणाला.

"हो रे, आठवतं! पण याचा अर्थ सगळं जग वाईट आहे असा नाही. आपल्यासोबत वाईट घडलं म्हणून आपल्याला आवडलं नाही आणि मग पुन्हा आपणही त्यामुळे वाईट बनून इतर निष्पाप आणि निरपराध लोकांना त्रास देऊन त्यांच्या सोबत पण वाईट करायचं? याला काय अर्थ आहे? मी बदललो, तसा तूही बदल कर स्वतःच्या दृष्टीकोनात!!", अँटिक्लिपमधला पप्पू म्हणाला.

"तुमच्या आई वडिलांची जबाबदारी यापुढे स्वागत टीम घेईल. सोड हे सगळं आणि सामील हो आम्हाला!"

बराच वेळ चर्चा होऊन आढेवेढे घेत शेवटी जग्गू तयार झाला. आता हाच हत्ती आपल्या इतर साथीदारांवर तुटून पडला आणि त्यांना मारू लागला. वाईट टीमचे सगळे मानवी आणि यांत्रिक हत्ती जग्गू हत्तीने सोंडेत धरून आपटले आणि नदीत फेकले. नदीत अनेक जलजीवांनी त्यांना बर्फात गोठवले.

सुनिलने वेळ मिळताच दृष्टी गुहेत नेली, सगळीकडे काय काय चालले आहे ते पहिले आणि चिडलेला व्हायरसिक बघितला. तो हितेन आणि रजक यांना म्हणत होता, "विसरलेला फॉर्म्युला लवकर शोधा नाहीतर तुमचा थेट वर जाण्याचा फॉर्म्युला मी बनवून ठेवला आहे!"

 

गुहेचे लोकेशन सुनिलला कळल्यामुळे हेलिकॉप्टरमधून सरळ त्या गुहेवर बॉम्ब टाकता आला असता पण तिथे असलेल्या व्हायरसिकने फसवून डांबून ठेवलेल्या अनेक लोकांची सुटका करणे आवश्यक होते. त्यासाठी काय करता येईल, गुहेत कसे जाता येईल याचा सुनिल विचार करु लागला तेवढ्यात त्याच्यावर हल्ला झाला म्हणून त्याने परत लढायला सुरुवात केली. नंतर सायलीला फोन करून त्याला एक शक्यता पडताळून बघायची होती की आणखी जर का काही नवीन बाहुल्या तयार करता आल्या तर त्यांच्या मदतीने मानवी प्राण्यांची सगळी मेमरी डिलीट केली तर ते आपोआपच लढायचे विसरून जातील. त्याने सायलीला बराच वेळ फोन केला पण तिचा रिस्पॉन्स आला नाही...

 

कारण तीची मेमरी फुल झाल्याने मेंदू हँग होऊन ती मुंबईतील प्रयोशाळेतच बेशुद्ध पडली होती. डॉक्टर राजमे यांनाही कळत नव्हते की ही अचानक बेशुद्ध का झाली?

 

अँटिक्लिपवर बसल्या बसल्या सुनिलने दृष्टी मुंबईतील प्रयोग शाळेत नेण्यास सुरुवात केली व अर्ध्या वाटेवर असतांनाच त्याच्यावर समोरून कुणीतरी प्रखर लेसर सदृश्य वेगळीच किरणे सोडली आणि डोळ्यासमोर अंधारून आले. डोळ्यांनी ते किरण सोडणारा तो एक भव्य रोबोट होता. बाजूच्या एका वाईट टीमच्या घरातून त्याचे पार्ट जोडून त्याला तयार केले गेले होते. नेटवर्किताच्या सांगण्यावरून हा रोबोट तयार करण्यात आला होता. त्याने वेगाने सुनिलला धक्का मारून अँटिक्लिप वरून खाली फेकले. खाली पडतांना सुनिलला तो रोबोट अंधुकपणे दिसला होता.

 

सुनिल खाली पडल्याचे लक्षात येताच हाडवैरी तिकडे पळाला आणि सुनिलने त्याला लेसर किरणांच्या माऱ्यामुळे दिसत नसल्याचे सांगितले. तेवढ्यात अँटिक्लिप म्हणाला, "काळजी करू नका सुनिल. मी आहे ना! मी तुमची दृष्टी बनतो! तुम्ही माझ्यावर बसा!"

 

सुनिल अँटिक्लिपवर बसला आणि हाडवैरीला म्हणाला, "तू त्या रोबोटला निकामी कर! मी ठीक आहे!"

 

सुनिलने स्फटिकला स्पर्श करून रंगिनीशी मनातल्या मनात संवाद साधला. तिने सांगितले की जवळपास अर्धा एक तास या किरणांचा प्रभाव राहील आणि तुझी दृष्टी पूर्ववत होईल, तोपर्यंत आवाज आणि वास यांच्या आधारे तू निगेटिव्ह गोष्टी ओळखण्याचे काम कर!"

मग सायलीच्या मेंदूची मेमरी फुल झाल्याने ती बेशुद्ध आहे हे सुनिलला तेव्हा समजले, जेव्हा त्याच्या कम्युनिकेशन डिव्हाईसच्या साध्या मोबाईल मोडवरून त्याने डॉक्टर राजमे यांना फोन केला. मग त्याने रंगिनीशी पुन्हा संवाद साधून सायलीबद्दल स्मृतिकाला सांगायला सांगितले.

खूप गर्दीपासून दूर एके ठिकाणी खूप उंचावर अँटिक्लिप सुनिलला घेऊन गेला आणि तिथे आकाशात स्थिर राहिला. दोन जलजीवा त्याच्या संरक्षणार्थ आजूबाजूला ढगांच्या रुपात फिरत राहिले. पण वातावरणात इतक्या ठिकाणी निगेटिव्हीटी होती की सगळे आवाज आणि वास मिक्स होत होते. त्यामुळे आता दृष्टी परत येईपर्यंत काही न करता एके ठिकाणी शांतपणे वाट बघायचे ठरले. अँटिक्लिप पंख फडकवत हवेत उंचावर स्थिर राहिला आणि सुनिलला खाली चाललेले युद्धाचे वर्णन करून सांगू लागला. उडण्याचा वेग खूप असल्याने कधी पुण्यातील एका ठिकाणी तर कधी दुसऱ्या तर काही वेळानंतर मुंबईत असा अँटिक्लिप उडत राहिला आणि सुनिलला वर्णन सांगत राहिला.

 

"सगळीकडे धुरळा उडतोय. दृष्यमानता कमी झाली आहे. हे सगळे टीव्हीवर लाईव्ह बघून सहसा सामान्य नागरिक घरातच बसून आहेत पण अत्यावश्यक कामासाठी जे सकाळपासून आधीच बाहेर पडले होते ते या सर्व प्राण्यांच्या हल्ल्यांची शिकार झाले आहेत"

"आपले स्वागत फायटर्स ठिकठिकाणी ह्या प्राण्यांचा हल्ला परतवून लावत आहेत. जग्गू हत्ती सुद्धा इतर प्राणी आणि हत्तींना मारण्यात मदत करत आहे. इतर हत्ती ताकदीने स्वतः भोवतीचे बर्फाचे आवरण फोडून टाकत आहेत पण जग्गू त्यांना सोंडेने उचलून वेगाने जलजीवांकडे फेकत आहे आणि जलजीवा पुन्हा त्यांना बर्फात बंद करत आहेत."

"लोकल ट्रेन्स आणि बेस्ट बसेसवर वटवाघूळ हल्ला करत आहेत आणि ट्रीमेन, जलजीवा, सारंग, इतर स्वागत फायटर्स तो हल्ला परतवून लावण्याचे प्रयत्न करत आहेत. सध्या बऱ्याच लोकल ट्रेन्सच्या डब्यांवर बर्फमानव रूपातले जलजीवा उभे आहेत. लोकल पुलाखालून गेली की ते वाफ बनून पुन्हा अडथळे दूर झाले की पुन्हा बर्फ बनून वटवाघूळांना बर्फात बंदिस्त करून ठेवत आहेत. निद्राजीता पण लोकल डब्यांमध्ये घुसून तिथे गर्दीत घुसलेल्या वटवाघूळांना लोकलच्या दरवाज्यातून बाहेर रुळांवर फेकते आहे."

"इकडे पुण्यात हाडवैरी रोबोटशी लढतोय. त्या रोबोटच्या डोळ्यातील किरण टाळण्यासाठी त्याच्या डोळ्यात सरळ न बघता तो त्या रोबोटशी लढतो आहे. एरवी या रोबोटशी कुणीच लढू शकले नसते कारण रोबोटला ज्याचाही स्पर्श होतोय तो शॉक लागून मरतोय पण आपला हाडवैरी शॉक प्रूफ असल्याने फक्त तोच रोबोटशी लढू शकतोय!"

"हाडवैरीने आता रोबोटचा पाय धरून त्याला दोन्ही हातांनी उचलले आणि घोळक्याने हल्ला करणाऱ्या अनेक वाईट प्राण्यांच्या अंगावर भिरकावले त्यामुळे त्यातील मानवी प्राणी शॉक लागून मेले आणि यांत्रिक प्राणी तुकडे होऊन नष्ट झाले. हाडवैरी आता रोबोटला उचलून कुठेतरी घेऊन चालला आहे. जाता जाता सगळ्या प्राण्यांना तो रोबोटचा स्पर्श करत करत चालला आहे. ओह! मला वाटते तो त्याला विजेच्या ट्रान्सफॉर्मर जवळ घेऊन जातोय. अरे! वा, हाडवैरीने त्या बावळट रोबोटला ट्रान्सफॉर्मरला चिकटवले आणि आता शॉक लागून रोबोटचे पार्ट पार्ट वेगळे होत आहेत. तो रोबोट फुटला आहे आता!"

 

"मेलेल्या या सगळ्या प्राण्यांचा कचरा आपल्या फांद्यांमध्ये उचलून त्या फांद्या लांब करून करून आपले अनेक झाड मानव तो कचरा महापालिकेने ठिकठिकाणी ठेवलेल्या कचरा गाड्यांमध्ये टाकत आहेत!"

 

सुनिलला आपल्या डोळ्यांचे कधी नव्हे एवढे महत्व आता जाणवत होते.

 

^^^

डिटेक्टिव्ह निगेटिव्ह

Nimish Navneet Sonar
Chapters
१: जन्मापासून सुरुवात २. जाणीव ३. सुगावा ४. ती दिसली ५. सायन्स फेस्टिव्हल ६. पुलावरचा घात ७. एक नवी सुरुवात ८. स्मृतिबंधन ९. पहिले प्रेम १०. ताकामिशी क्योदाई ११. दूरदर्शन १२. भटकंती १३. नरिमन टर्निंग पॉईंट १४. सुटका १५. संकट १६. तो आणि ती १७. प्रवास सुरू १८. जहाजावर १९. चाहूल २०. उलगडा २१. पाठलाग २२. परिवर्तन २३. सुपर नेचर कडे २४. सुपर नेचर २५. तयारी २६. वाईट हेतू २७. आव्हान २८. प्लॅनिंगचा मुखवटा २९. प्रस्थानम् ३०. पुन्हा पुलावरचा घात? ३१. दिसतं तसं नसतं ३२. शक्ती प्रदर्शन ३३. चकवा ३४. त्यांना आमंत्रण ३५. हाडाचा लढवैय्या ३६. नरिमन ऍक्शन पॉईंट ३७. तो येतोय ३८. युद्ध आमुचे सुरू ३९. प्लॅन्डी ४०. अपहरण ४१. गीता आणि नीता ४२. महायुद्ध ४३. वादळ शांत! लेखकाचे मनोगत लेखक परिचय प्रकाशनपूर्व आलेल्या इतर काही प्रतिक्रीया लेखिका मेधा इनामदार (पुणे) यांचा अभिप्राय राहुल दवे (कॅलिफोर्निया) यांची प्रस्तावना अक्षर प्रभू देसाई (कॅलिफोर्निया) यांची प्रस्तावना आदित्य भागवत, ठाणे यांचा अभिप्राय सिद्धेश प्रभुगांवकर, पुणे यांचा अभिप्राय