Get it on Google Play
Download on the App Store

१६. तो आणि ती

नंतर उशिरा रात्री बराच वेळ सायली आणि सुनिल एका रूम मध्ये बोलत बसले होते. कारण या नर्सच्या घटनेनंतर चर्चा करणे आता अपरिहार्य होते. सुनिलने तीला स्वत:बद्दल सगळे सांगितले, त्याने तिला का धक्का देऊन पाडले याचे कारण सांगितले. सायलीला इंजेक्शन देण्याचा प्रयत्न करण्यामागे त्या नर्सचा नेमका काय हेतू होता, त्या इंजेक्शनमध्ये नेमके काय होते हेही कळू शकले नव्हते कारण ती नर्सच इंजेक्शनसहित रहस्यमयरित्या गायब झाली होती.

 

आता सायलीसारख्या काही दिवसांचाच परिचय असलेल्या नवख्या व्यक्तीला आणि डॉक्टरला आपल्या आयुष्याबद्दल सगळं सांगावं की नाही याबद्दल तो सुरुवातीला साशंक होता पण त्याची हॉस्पिटलमध्ये तिने मनापासून आपलेपणाने केलेली सेवा, त्याला तिच्याबद्दल वाटणारे प्रचंड आकर्षण आणि प्रेमभावना तसेच तिच्याही डोळ्यात त्याने बघितलेले त्याच्याबद्दलचे तेच भाव यामुळे त्याने  सायलीला आतापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घटनांबद्दल, त्याला मिळालेल्या शक्तींबद्दल सर्वकाही थोडक्यात सांगितले. त्याने तिलाही तिच्याबद्दल विचारले की कुठेही न बघता ती कसे काय सगळे आठवून टाईप करत होती तेव्हा तिने त्याला सर्व सांगितले. तिला जन्मापासून मिळालेल्या विशिष्ट शक्तीबद्दल सांगितले.

 

त्याची कथा ऐकताना तिलाही अंदाज आला होताच की तिच्याप्रमाणेच तो सुद्धा मितींचे मिश्रण असलेला जीव आहे. इतरांपेक्षा वेगळा आहे. मग तिनेही तिच्या आयुष्यातील महत्वाच्या घटना त्याला सांगितल्या. तिच्या बाहुलीबद्दल सांगितले. त्यात ती अनावश्यक घटनांचा बॅकअप बाहुलीत कशा प्रकारे घेते हेही सांगितले. जसे त्याच्याजवळ त्याच्या शक्ती संदर्भात स्फटिक आहे तसंच तिच्या जवळही बाहुली आहे. फक्त सूर्यप्रताप संदर्भात ती त्याला सांगू शकली नाही कारण तो तिच्या मेमरीतून डिलीट झालेला होता. पण आपण वेळोवेळी कोणत्या तारखेला किती वाजता बॅकअप घेतला हे मात्र तिला तपशीलवार आठवत होते.

 

 

पुढे त्यांचे बोलणे सुरूच होते!

"एक महत्वाचा विचार आला आहे सायली!"

"कोणता?"

"आपल्याकडे वेळ कमी आहे. आपल्या दोघांचे जीव धोक्यात आहेतच पण एकंदरीतच रणजित यांच्या सांगण्यावरून आणखी काहीतरी मोठे कारस्थान कुठेतरी शिजते आहे!"

"होय, रात्र वैऱ्याची आहे!"

"पुढे काय करायचे याचा कोणताही प्लॅन करण्याआधी मला एक महत्वाच्या विषयी बोलायचे आहे! माझा स्फटिक घड्याळात असतो. घड्याळ हरवले किंवा कुठे राहून गेले, चोरीला गेले तर मी संकटात सापडेन. स्फटिक अंगठीत घातला तरीही त्याने फारशी परिस्थिती वेगळी होणार नाही. तसेच तुझ्या बाहुलीबद्दल आहे. ती कुठे हरवली तर? कुणी तोडली तर? आपण त्यापेक्षा तुझ्या मेडिकल ज्ञानाचा उपयोग करून सांग की माझे स्फटिक मी एखाद्या आवरणात ठेऊन मग ते आवरण सरळ माझ्या शरीरात कुठेही किंवा चेहऱ्याला कायमचा चिकटवून ठेवू शकतो का? आणि तसेच तुझ्या बाहुलीबद्दल काय करता येईल?"

 

तेवढ्यात तिथे दोन्ही मितीजीव आल्या, स्मृतीका आणि रंगिनी!

 

"आम्ही आहोत ना! आम्हाला आनंद होतोय की तुम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलात. असेच प्रेम कायम ठेवा. आणि तुम्हाला पडलेला प्रश्न आम्ही सोडवलाय!"

 

दोघांना आपापल्या मितीजीव एकत्र आणि अचानक आलेल्या बघून खूप आनंद झाला. ते हॉस्पिटलमधल्या अशा खोलीत होते जिथे सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते. त्यामुळी या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड होण्याचा प्रश्न नव्हता. आता दोघांच्या आजूबाजूचे जग रंगमय होते तसेच त्यात भर म्हणून काळसर पार्श्वभूमीवर हिरवे 0 आणि 1 हे असंख्य आकडे  खालून वर, वरून खाली, आणि इकडून तिकडे असे पाण्यासारखे वाहत होते. थोडक्यात दोन्ही मितींचा प्रभाव त्यात होता.

सायली आणि सुनिल उत्सुकतेने ऐकू लागले.

रंगिनीच्या संमतीने स्मृतिका म्हणाली, "सायलीबाबत सांगायचे तर सुनिल, तू तिचा बाहुला होशील का?"

सायली आणि सुनिल हसू लागले. सायली तर सुनिलकडे बघून प्रचंड लाजून आरक्त झाली.

सुनिल सायलीकडे बघत म्हणाला, "चालेल! बाहुल्याची भूमिका सायलीसाठी मी पार पडेन! नाहीतरी सगळ्यांची नकारात्मकता शोधण्याचंच तर माझं आयुष्याचं ध्येय आहे! आणि सायलीची निगेटिव्ह मेमरीज मी आनंदाने माझ्यात साठवून घ्यायला तयार आहे. पण स्मृतिका मला एक सांग, त्या सायलीच्या साठवलेल्या मेमरीज मला माझ्या स्वत:च्या मेमरीसारखी आठवेल  का?"

"होय, सायलीच्या तुझ्या मेंदूत असलेल्या मेमरीज तुझ्या स्वत:च्या आयुष्यातील घटनांपेक्षा वेगळ्या करून बघण्याची जाणीवपूर्वक सवय तुला करून घ्यावी लागेल! आणि पद्धत तीच राहील! केसांना केस जोडायचे आणि डेटा ट्रान्स्फर करायचा. पण हे वन वे ट्रान्स्फर राहील! म्हणजे फक्त सायलीच तिच्या अनावश्यक मेमरी तुझ्या मेंदूत टाकू शकेल, तू तुझ्या कोणत्याच मेमरीज तिच्या मेंदूत टाकू शकणार नाहीस!"

"चालेल! चालेल! पण एक प्रश्न आहे! जर हिच्या मेमरी घेऊन घेऊन माझीच मेमरी फुल झाली तर? मीच हँग होईल ना!", सुनिल म्हणाला.

स्मृतिका म्हणाली, "ते तुम्ही ठरवा! सायलीने तिच्या मेमरीची कमीत कमी विल्हेवाट लावावी, हवी तेव्हा नको ती मेमरी सुनिलला देत बसू नये! नाहीतर बाहुली आहेच! त्यात टाकू शकतेस! पण निगेटिव्हीटी सोबत जगायला शिक! ते जास्त योग्य होईल! निगेटिव्हीटी वगळता इतर अनावश्यक मेमरी बाहुल्यांमध्ये टाकत जा! हे घ्या चार बाहुल्या अजून! त्या नीट सांभाळून ठेवण्याची जबाबदारी तुमची राहील!"

पुढे रंगिनी म्हणाली, "आणि राहता राहिला तुझा स्फटिकाचा प्रश्न! तू त्याचे योग्य उत्तर आधीच शोधले आहेस. सायलीकडून शस्त्रक्रिया करून तो स्फटिक उजव्या बाजूला चेहऱ्यावर कानाच्या वर केसांनी झाकला जाईल असा बसवून घे!"

 

त्या दोन्ही जशा अचानक आल्या तशा लगेच निघूनही गेल्या. त्या गेल्यानंतर सायली आणि सुनिल बराच वेळ एकमेकांकडे बघत राहिले. नजर एकमेकांवरून हटेना. एकसारखे एकमेकांकडे बघण्याचा परिणाम असा झाला की त्यांच्यात प्रचंड आकर्षण निर्माण होऊन एकमेकांचा चेहरा हातात घेऊन कीस घेण्याची त्यांना अनिवार इच्छा निर्माण झाली आणि तिच्याही डोळ्यातले तेच भाव ओळखून सुनिलने दरवाजा बंद केला, सायलीला उचलून टेबलावर बसवले, भिंतीला टेकवले आणि तिचे केस चेहऱ्यावरून मागे हटवून अधाशासारखा तिच्या कपाळापासून तिच्या हनुवटीपर्यंत आणि तिच्या मानेच्या प्रत्येक भागाचे तो चुंबन घेऊ लागला. ती आनंदाने डोळे बंद करून हा अनुभव घेत राहिली. नंतर मग त्याने स्पर्शासाठी अधीर झालेल्या तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले आणि बराच वेळ तिच्या ओठांचा कीस वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या कोनांतून तो घेतच राहिला. अधूनमधून डोळे उघडून त्याच्या रंगीत चमकणाऱ्या डोळ्यांकडे बघत बघत मंत्रमुग्ध होत तिनेही त्याच्या या किसला अगदी मनापासून साथ दिली. मग तो कीस घ्यायचा थांबला. थोडा वेळ एकमेकांकडे ते बघत राहिले. नंतर लगेच तिने त्याचे बराच वेळ चुंबन घेतले. नंतर थोडा वेळ थांबल्यावर आपण हॉस्पिटलमध्ये असल्याची जाणीव होऊन त्या दोघांनी सावरून आधी बाहुलीचा डेटा सुनिलमध्ये त्याच्या केसांना बाहुलीचे केस जोडून ट्रान्स्फर केला. ती बाहुली आणि इतर नव्या बाहुल्या पर्समध्ये ठेवल्या आणि दरवाजा उघडून ते बाहेर आले.

 

बाहेर सुनिलच्या आदेशानुसार पोलिसांचा विविध प्रकारे नर्सचा शोध सुरूच होता. आताच रात्री शस्त्रक्रिया करून सुनिलच्या चेहऱ्यावर ते स्फटिक एका आवरणात कायमचे बसवून टाकायचे होते. त्याप्रमाणे सायलीने शस्त्रक्रिया केली. शरीराला कायम स्पर्श होऊ नये यासाठी ते स्फटिक एका अशा धातूमध्ये फिट्ट बसवले ज्याच्यामुळे शरीराला इन्फेक्शन किंवा अपाय होणार नाही आणि मग शस्त्रक्रिया करून ते चेहऱ्यावर कायमचे बसवले. आता चेहऱ्यावर केसांनी झाकलेले ते स्फटिक कुणाला दिसणारही नव्हते आणि आणि त्याच्यापासून कधीही दूर जाणार नव्हते. पण ते घड्याळ मात्र आठवण म्हणून त्याने कायम वापरायचे ठरवले.

^^^

डिटेक्टिव्ह निगेटिव्ह

Nimish Navneet Sonar
Chapters
१: जन्मापासून सुरुवात २. जाणीव ३. सुगावा ४. ती दिसली ५. सायन्स फेस्टिव्हल ६. पुलावरचा घात ७. एक नवी सुरुवात ८. स्मृतिबंधन ९. पहिले प्रेम १०. ताकामिशी क्योदाई ११. दूरदर्शन १२. भटकंती १३. नरिमन टर्निंग पॉईंट १४. सुटका १५. संकट १६. तो आणि ती १७. प्रवास सुरू १८. जहाजावर १९. चाहूल २०. उलगडा २१. पाठलाग २२. परिवर्तन २३. सुपर नेचर कडे २४. सुपर नेचर २५. तयारी २६. वाईट हेतू २७. आव्हान २८. प्लॅनिंगचा मुखवटा २९. प्रस्थानम् ३०. पुन्हा पुलावरचा घात? ३१. दिसतं तसं नसतं ३२. शक्ती प्रदर्शन ३३. चकवा ३४. त्यांना आमंत्रण ३५. हाडाचा लढवैय्या ३६. नरिमन ऍक्शन पॉईंट ३७. तो येतोय ३८. युद्ध आमुचे सुरू ३९. प्लॅन्डी ४०. अपहरण ४१. गीता आणि नीता ४२. महायुद्ध ४३. वादळ शांत! लेखकाचे मनोगत लेखक परिचय प्रकाशनपूर्व आलेल्या इतर काही प्रतिक्रीया लेखिका मेधा इनामदार (पुणे) यांचा अभिप्राय राहुल दवे (कॅलिफोर्निया) यांची प्रस्तावना अक्षर प्रभू देसाई (कॅलिफोर्निया) यांची प्रस्तावना आदित्य भागवत, ठाणे यांचा अभिप्राय सिद्धेश प्रभुगांवकर, पुणे यांचा अभिप्राय