१०. ताकामिशी क्योदाई
दरम्यान जपान देशात -
ताकामिशी आडनावाच्या दोन्ही जापानी जुळ्या भावंडांनी (भाऊ आणि बहिण) जे आजपर्यंत विज्ञानाचे अभूतपूर्व शोध लावले होते व यापुढेही लावणार होते त्यासाठी टोकियोमधील एका सभागृहात स्टेजवर जापानी सरकारतर्फे आणि प्रेक्षकांतर्फे त्यांचा जयजयकार होत होता. त्याना खूप बक्षिसे मिळत होती.
"योक्कू यात्ता ताकामिशी क्योदाई!"
"योक्कू यात्ता ताकामिशी क्योदाई!!"
असा स्टेजवर जयघोष चालला होता. वेल डन म्हणजे जापानी भाषेत योक्कू यात्ता आणि क्योदाई म्हणजे भावंडं!
जपान हा पूर्व आशियामधील एक द्वीप-देश आहे. जपानच्या पश्चिमेला जपानचा समुद्र, चीन, उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया व रशिया, उत्तरेला ओखोत्स्कचा समुद्र व दक्षिणेला पूर्व चीन समुद्र व तैवान आहेत. जपानी भाषेत "जपान" या नावासाठी वापरल्या जाणाऱ्या कांजीचा (कांजी = चिनी / जपानी भाषेचे वर्ण) अर्थ "सूर्य उगम" असा होतो. जपानी भाषेत जपानला "निहोन" किंवा "निप्पोन" असं म्हणतात. त्यामुळे आणि जपानच्या अतिपूर्वेकडील स्थानामुळे जपानला उगवत्या सूर्याचा देश असे संबोधण्यात येते.
जपान देश पूर्णपणे बेटांवर वसला असून त्याची कोणत्याही इतर देशासोबत जमिनीवरील सीमा नाही. जापानमध्ये थोड्या काळासाठी पण खूप जोरदार पाऊस पडतो, विशेषत: जूनच्या शेवटी / जुलैच्या सुरुवातीच्या काळात आणि सप्टेंबरमध्ये वादळांच्या हंगामात सुद्धा. वास्तविक पावसाळ्याचे दिवस लहान असतात. जपानी द्वीपसमूह अशा ठिकाणी स्थित आहे जेथे अनेक खंड आणि समुद्री प्लेट्स एकत्र येतात. हेच कारण आहे की तेथे वारंवार भूकंप होतात आणि अनेक ज्वालामुखी आणि गरम झरे अस्तित्त्वात आहेत. जर भूकंप समुद्राच्या खाली आलेत तर समुद्राच्या भरतीच्या लाटा (त्सुनामी) ला कारणीभूत ठरू शकतात. हरिकेन किंवा टायफून यासारखी प्रचंड चक्रीवादळेसुद्धा तिथे भूकंप होण्यास कारणीभूत ठरतात.
जपानी लोक विविध कलांमध्ये पारंगत आहेत. हे लोक कागदाच्या घड्या घालून विविध वस्तू बनवतात. याला ओरिगामी कला असे म्हणतात. कलाकुसरीच्या वस्तू बनवणे, सुंदर निसर्ग चित्रे काढणे, आकर्षक खेळणी बनवणे यांत हे लोक कुशल आहेत. जापानी कार्टून ज्यांना ऍनिमे म्हणतात त्यांना जगभर एक वेगळी ओळख आणि खूप चाहते आहेत. एकूणच जपानी लोक खूप मेहनती म्हणून ओळखले जातात. आणि नवनवीन टेक्नॉलॉजी शोधण्यात तर जापान देश बराच आघाडीवर आहे. जसे डीव्हीडी, डिजिटल कॅमेरा, वॉकमन, सीडी, एलईडी लाईटस्, टीव्ही स्क्रीनचे प्रकार वगैरे असे अनेक शोध सांगता येतील.
तर अशा या टेक्नो जपान देशात ताकामिशी क्योदाई म्हणजे ताकामिशी भावंडे दोघेही खूप मोठे सायंटिस्ट होते आणि त्यांचा नेहमी सत्कार व्हायचा. आजही होत होता. "सोराकैतो ताकामिशी" आणि त्याची बहीण "इचीकाई ताकामिशी" हे दोघेही लहानपणापासून खूप हुशार.
स्टेजवर दोघांनी लावलेल्या वेगवेगळ्या शोधांची माहिती सांगण्यात येत होती. इचीकाईने लॅपटॉप मोबाईल टीव्ही वगैरे यांच्या स्क्रीन डिस्प्ले क्षेत्रात अभूतपूर्व क्रांती निर्माण होईल असा शोध लावला होता. तो म्हणजे विशिष्ट प्रकारचे असे क्रिस्टल ज्यांचा डिस्प्ले बनवल्यानंतर ते जेव्हा प्रकाशमान (इल्युमिनेट) होतील तेव्हा साध्या डोळ्यांनी त्यावरचे चित्र किंवा व्हीडिओ कुणाला दिसणार नाही, त्याऐवजी एक चष्मा घालावा लागेल जो त्या प्रकाशमान झालेल्या अनेक क्रिस्टलमधून निर्माण होणारे किरण ओळखू शकेल आणि मग फक्त त्या चष्म्यातूनच त्या स्क्रीनवर काय दिसतंय हे दिसेल.
पण सध्या याची उत्पादन किंमत खूप होती आणि सामान्य माणूस वापरू शकेल इतकी कमी किंमत करता येत नव्हती. हे डिस्प्ले सध्या जिथे गोपनीयता आवश्यक आहे अशा ठिकाणी उदाहरणार्थ मिलिटरी वापरायला सुरुवात झाली होती. म्हणजे तुम्ही लॅपटॉपवर किंवा मोबाईलवर काही बघत आहेत तर आसपासच्या लोकांना दिसणार नाही फक्त वापरणाऱ्या व्यक्तीला त्या विशिष्ट चष्म्यातूनच दिसेल. याचा डेमो दाखवला गेला तेव्हा टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. आता पाळी होती इचीकाई यांच्या भावाची!!
मॉनिटर/ सुपरवायझर, बिल्डर/असेंम्बलर आणि शेफ रोबोट असे तीन स्पेशलाईज म्हणजे विशेष रोबोट सोराकैतो यांनी बनवले होते. जिथे जिथे मॉनिटरिंगची गरज पडते, सुपरवायझरची गरज पडते तिथे तिथे माणसांना वगळून हे रोबोट ते काम करू शकणार होते. फक्त ज्या ज्या क्षेत्रातील जी जी मॉनिटरिंग आणि सुपरवायझिंगची गरज आहे त्या कस्टमरच्या गरजेनुसार प्रोग्रामिंग करून रोबोट बनवून देता येणार होते. रोबोट म्हटले म्हणजे आपल्या डोळ्यासमोर माणसासारखा दिसणारा अशीच प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर येते पण तसे नसते. रोबोट म्हणजे आपोआप हालचाल करणारं नेमून दिलेलं काम न थकता करत राहणारं मशीन!
बिल्डर रोबोट नावाप्रमाणेच घरे बांधणारा रोबोट असणार होता. गवंडी माणसांना वगळून या प्रकारच्या अनेक रोबोंच्या मदतीने एखादे घर, बिल्डिंग खूप जलद बांधता येणार होती. अर्थात आधी संपूर्ण घराचा नकाशा, ब्लू प्रिंट, आराखडा या गोष्टी तसेच बांधकामाची संपूर्ण माहिती, प्रोसेस यासारखी सगळी माहिती आधी त्यांच्यात प्रोग्रामिंग करून आयसी मध्ये फीड करावी लागत असे. मग बिल्डर रोबोट दिवसरात्र न थकता, उन्हातान्हाची पर्वा न करता अविरत बांधकाम करू शकणार होते. असेंम्बलर रोबोटपण वेगवेगळे पार्ट असेंबल करून वस्तू तयार करू शकणार होता. सध्या स्टेजवर त्यांनी बनवलेले प्रत्येकी एकेक प्रोटोटाईप मॉडेल आणले होते.
बिल्डर रोबोटने वेगाने एका मोठ्या बिल्डिंगचे मॉडेल स्टेजवर बनवून दाखवले. त्याने एकूण किमान आठ वेगवेगळ्या प्रकारच्या घरांना स्टेजवर डमी मटेरियल वापरून झटपट बनवले. अर्थात खऱ्या बिल्डिंग बनवायला अनेक रोबोट एकाच वेळेस काम करणार होते.
नंतर त्याच रोबोटने असेंम्बलर मोडमध्ये जाऊन स्टेजवर डेस्कटॉप कॉम्प्युटरचे संपूर्ण वेगवेगळे पार्टस जोडून कॉम्प्युटर चालू करून दाखवला. त्यानंतर त्याने मदरबोर्ड पण असेंबल करून दाखवले. वेगवेगळ्या कंपनीचे रेडिओ, फ्रीज, टीव्ही, घड्याळं अशा अनेक गोष्टी असेंबल केल्या. ट्रेन, बस, रिक्षा, कार यांचे डमी छोटे वेगवेगळे पार्ट एकत्र करून ते तयार करून दाखवले.
मॉनिटरिंग/सुपरवायझिंग रोबोटने तिथे असलेल्या प्रेक्षकांपैकी कोण कोण कितीवेळा मोबाईलवर बोलले, कोणी किती वेळा डोळे मिचकावले अशा प्रकारची माहिती सांगितली. आतापर्यंत प्रेक्षकांनी किती वेळा टाळ्या वाजवल्या हे सांगितले हे सांगताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.
मग आला शेफ रोबोट! त्याने जपानचे लोकप्रिय खाद्यपदार्थ बनवले नंतर इतर काही देशातील सुद्धा लोकप्रिय पदार्थ बनवले. बिल्डर/असेंम्बलर आणि शेफ रोबोट या दोघांना प्रत्येकी सहा हात आणि दोन पाय होते. मॉनिटर/ सुपरवायझर रोबोट हा कुत्र्याच्या आकाराचा होता आणि त्याच्या डोक्यावर मोठे मॉनिटर/स्कॅनर होते. कानांच्या ठिकाणी दोन मोठे स्पीकर होते.
नंतर आणखी एक सरप्राईज रोबोट स्टेजवर आला: डान्स अँड योगा रोबोट! हा रोबोट जगातल्या सगळ्या प्रकारचे योगासनं, व्यायाम प्रकार आणि नृत्य न थकता शिकवू शकणार होता. त्यानेही दोन चार डेमो दाखवले. एकूणच स्टेजवरचा हा समारंभ खूपच लोकप्रिय ठरला. या सगळ्या शोधांचे पेटंट दोन्ही भावंडांकडे होते.
ताकामिशी भावंडे एका साध्या घरात रहात होते. ते शिकत असताना त्यांचे आई वडील एका कार अपघातात वारले होते पण नंतर त्यांना मिळालेल्या वेगवेगळ्या शिष्यवृत्ती आणि त्यांची हुशारी, चिकाटी बघून गव्हर्नमेंटने त्यांना केलेली मदत याच्या जोरावर त्या दोघांनी इथपर्यंत प्रगती केली होती.
काही दिवसांत गव्हर्नमेंटच्या विशेष शिष्टमंडळाने दोघांसोबत एक चर्चा सुरू केली. त्यात सरकारमधील अनेक महत्वाचे मंत्रीही होते. त्यांनी दोघांनी लावलेल्या शोधाचा उपयोग देशासाठी आणि सामान्य माणसांसाठी कमीत कमी खर्चात कसा करून घेता येईल यासाठी ती चर्चा होती. तसेच त्याचा दुरूपयोग कशा पद्धतीने होऊ शकतो आणि तो टाळण्यासाठी काय प्रतिबंधात्मक उपाययोजना करता येतील याबद्दल साधकबाधक चर्चा होत होती. या चर्चेला इतर अनेक देशातील सायंटिस्टना सुद्धा बोलावण्यात आलेले होते आणि ते हजर होते.
लंच ब्रेक झाला. लंच नंतर चालता चालता एकाशी बोलत बोलत सोराकैतो ताकामिशी वॉशरूमला गेले, सोबत एक जण होता तो बाहेर थांबला. तो एक मोठा अमेरिकन सायंटिस्ट होता- जेकब विल्यम्स! बराच वेळ झाला पण वॉशरूम मधून सोराकैतो बाहेर आले नाहीत म्हणून शेवटी जेकब मध्ये गेला पण आतमध्ये सोराकैतो नव्हते. जेकब बाहेर आला. कदाचित आपले लक्ष नसतांना घाईत सोराकैतो आपल्याला विसरून निघून गेले असावे असे वाटून जेकब पुन्हा मिटिंग रूम मध्ये गेला तर तिथे सर्वजण सोराकैतो यांचीच वाट बघत होते तसेच तिथे आणखी एकजण नव्हता त्याचे नाव- हाराकू नाकामुरा.
याच हाराकू नाकामुरा याला सुद्धा सोराकैतो गेल्यानंतर बाथरूममध्ये जातांना जेकबने पाहिले होते. पण थोडयावेळाने हाराकू बाहेर आला होता आणि लाऊंजमध्ये रेंगाळत नंतर लिफ्टकडे गेल्याचे जेकबला आठवले. खाली मोकळ्या हवेत हाराकू फिरायला गेला असेल असे जेकबला वाटून त्याने त्याकडे दुर्लक्ष केले होते.
सगळ्या प्रकारच्या शक्यता पडताळून झाल्या. पोलीस आले, विशेष तपास संस्था आल्या, सगळीकडचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासून पाहिले गेले. त्यातून एकच निष्कर्ष निघाला, तो म्हणजे सोराकैतो बाथरूममध्ये नक्की गेले होते पण तिथून बाहेर आले नाहीत. नक्की आले नाहीत! बाथरूमचे सर्व कोपरे चेक केले गेले. सोराकैतो नव्हते. त्यांचे सगळे कपडे बाथरूममध्ये सापडले पण ते कुठेही नव्हते! वॉशरूमच्या कोणत्याही खिडकीतून ते अशा विना कपड्यांनी नग्नावस्थेत निघून गेल्याचीही अशक्य असलेली शक्यता पण पडताळून पहिली गेली. वॉशरूममध्ये जरी कॅमेरे नव्हते तरीही बिल्डिंगच्या बाहेरच्या बाजूने असलेल्या कॅमेऱ्यातून चेक झाले. ते कोणत्याही खिडकीतून बाहेर गेले नव्हते. हाराकूचा फोन पण नॉट रिचेबल होता. मिटिंगतर अपूर्ण राहिलीच पण संपूर्ण जापान सरकार हादरले होते. इचीकाई या तर हे ऐकून बेशुद्धच झाली होती आणि नंतर अनेक दिवस संभ्रमावस्थेतच होत्या. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले तेव्हा घराचा ताबा स्थानिक पोलिसांकडे होता. इचिकाई बऱ्या होऊन घरी आल्या तेव्हा त्यांच्या लक्षात आले की त्या दोघांनी लावलेल्या शोधांच्या पेटंट असलेल्या छापील फाईल्स, कागदपत्रे आणि त्या संदर्भातील डिजिटल दस्तऐवज हा गायब झाला होता. घराला पोलीस संरक्षण असूनही असे कसे झाले याबद्दल सगळेजण आश्चर्य व्यक्त करत होते.
^^^