बाजीप्रभू देशपांडे
स्वराज्यासाठी अतुलनीय पराक्रम करून प्राणार्पण करणारे आणि हिंदवी स्वराज्याचा पाया रचणारे ‘शूर सरदार’!
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील हिरडस येथील - मावळातील- सरदार म्हणजे बाजीप्रभू देशपांडे! हे मावळातील पिढीजात देशकुलकर्णी. शिवरायांविरुद्ध लढणार्या बांदलांचे बाजी दिवाण होते. बाजीप्रभू देशपांडे हे पराक्रमी लढवय्ये तर होतेच, तसेच ते त्यागी, स्वामिनिष्ठ, करारी, कोणत्याही अमिषाला बळी न पडणारे असे होते. वयाच्या पन्नाशीतही दिवसातले २०-२२ तास काम करूनही न थकणार्या बाजींचा पूर्ण मावळ पट्ट्यात मोठा दबदबा होता. त्यांचे प्रशासकीय कौशल्य आणि शौर्य पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपलेसे करून घेतले. बाजींनीही स्वराज्यासाठी आपली निष्ठा शिवरायांच्या चरणी वाहिली.
महाराजांपेक्षा वयाने मोठ्या असणार्या बाजीप्रभूंच्या मनात महाराजांविषयी आत्यंतिक प्रेमाबरोबरच भक्तिभाव होता आणि वडीलकीच्या नात्याने काळजीचीही भावना होती. पन्हाळगडाला शत्रूने वेढा घातलेला असताना छत्रपतींची त्यातून सुटका करणे; महाराजांना विशाळगडापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करणे - या भूमिका निभावताना बाजीप्रभूंनी आपले केवळ शौर्यच नव्हे तर प्राण पणाला लावले. ही घटना स्फुरण चढवणारी, स्वराज्याविषयीचा अभिमान (आजही) आपल्या रोमरोमात भिनवणारी आहे. बाजीप्रभूंनी ‘लाखांचा पोशिंदा’ सुरक्षित राहण्यासाठी आपला देह अर्पण केला. त्यांचा अतुलनीय असा पराक्रम महाराष्ट्रातील पुढच्या असंख्य पिढ्या नक्कीच स्मरणात ठेवतील.
सिद्धी जौहरने पन्हाळ्याला घातलेल्या वेढ्यातून सुटण्यासाठी महाराजांना घेऊन बाजी विशाळगडाकडे निघाले होते. त्या वेळी आपली फसवणूक झाली हे लक्षात येऊन विजापूरी सैन्य त्यांचा पाठलाग करीत होते. पुढचा धोका लक्षात घेऊनच वडीलकीच्या अधिकाराने बाजींनी महाराजांना विशाळगडाकडे पुढे जाण्यास सांगितले. बाजी व फुलाजी हे दोघे बंधू गजापूरच्या खिंडीत (घोडखिंडीत) सिद्धीच्या सैन्यासाठी महाकाळ म्हणून उभे राहिले. हजारोंच्या सैन्याला ३०० मराठी मावळ्यांनी रोखले होते. सतत २१ तास चालून शरीर थकलेल्या स्थितीत असतानाही बाजी आणि त्यांच्या मावळ्यांनी मोठ्या हिंमतीने ६ ते ७ तास खिंड लढविली. पराक्रमाची शर्थ म्हणजे काय ते घोडखिंडीतील (पावनखिंडीतील) लढाईकडे पाहून समजते. (ही खिंड कोल्हापूर जिल्ह्यात आहे.)
सिद्धी मसूदचे सैन्य अडविताना कामी आलेले मराठी मावळे, धारातीर्थी पडलेले बंधू फुलाजी, जखमी झालेले स्वत:चे शरीर या कशाचेही भान बाजींना नव्हते. महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले याचा इशारा देणार्या तोफांच्या आवाजाकडे त्यांचे कान होते. तोफांचा आवाज ऐकेपर्यंत ते दोन्ही हातात तलवार घेऊन प्राणांची बाजी लावून लढत होते. खिंडीमध्ये महादेवाचा महारुद्र अवतार प्रकटलेला होता. तोफांचे आवाज ऐकल्यावर कर्तव्यपूर्तीच्या समाधानाने त्यांनी प्राण सोडले. (ही घटना दिनांक १३ जुलै, १६६० रोजी घडल्याची इतिहासात नोंद आहे.)
मराठी सैनिकांच्या अभूतपूर्व अशा पराक्रमाने आणि बाजींसारख्या स्वराज्यनिष्ठांच्या पवित्र रक्ताने घोडखिंड पावन झाली म्हणूनच तिचे नाव पावनखिंड झाले. बाजी - फुलाजी बंधूंवर विशाळगडावर, महाराजांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. बाजीप्रभू व फुलाजी यांची समाधी विशाळगडावर आहे. तसेच पन्हाळगडावर बाजीप्रभूंचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे.
स्वराज्यनिर्मितीसाठी छत्रपती शिवाजी महाराज सुखरूप, सुरक्षित राहायला हवेत यासाठी स्वत: मृत्यूला सामोरे जायची तयारी असलेल्या बाजी आणि फुलाजी देशपांडेंसारख्या सरदारांमुळे स्वराज्याचा पाया रचला जात होता. परंतु ही हिर्यांसारखी अमूल्य माणसे सोडून गेलेली पाहताना महाराजांना काय वाटत असेल हे सांगणे कठीणच.
‘रणचंडीचे जणू पुजारी, पावनखिंडीचे गाजी।
विशालशैली दिसती दोघे, बाजी आणि फुलाजी।।’
(प्रख्यात दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांनी ‘बाजीप्रभू देशपांडे’ ह्या चित्रपटाच्या (१९२९) माध्यमातून बाजी प्रभूंच्या पराक्रमाच्या स्मृती जतन करून ठेवल्या आहेत.)