व्ही. शांताराम
भारतीय चित्रपट सृष्टीत अभूतपूर्व योगदान देणार्या ‘प्रभात’ संस्थेचे अध्वर्यू! ‘सिनेमा’च्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट निर्माते-दिग्दर्शक-अभिनेत्यांमधील एक आघाडीचे कलावंत!
भारतीय चित्रपटाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरून ठेवलेलं हे नाव. चित्रपट महर्षी, मराठी चित्रपट सृष्टीचा सम्राट या विशेषणांनी सुपरिचित असलेल्या व्ही. शांताराम यांना आचार्य अत्रे यांनी ‘चित्रपती’ ही यथोचित पदवी बहाल केली. शून्यापासून सुरुवात करून मराठी चित्रपट उद्योगात ६० वर्षांपेक्षा जास्त काळ सर्वतोपरी कलात्मक योगदान देणारा हा थोर कलावंत. शेजारी, माणूस, कुंकू, दो आँखे बारा हाथ, डॉ. कोटणीस की अमर कहानी, पिंजरा यांसारख्या आशयघन, लोकप्रिय कलाकृतींचे जन्मदाता कलाकार म्हणजे व्ही. शांताराम होत.
व्ही. शांताराम म्हणजेच शांताराम वणकुद्रे. यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. शालेय शिक्षण सुरू असतानाच त्यांचे मन सिनेमा, नाटके, सर्कशी यातच रमायचे. वयाच्या १४ व्या वर्षी, १९१५ साली त्यांचा गंधर्व नाटक मंडळीत हरकाम्या म्हणून प्रवेश झाला. पुढे अनेक ठिकाणी छोटी छोटी कामे करत १९२० साली कोल्हापूरच्या बाबुराव पेंटर यांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनीत ते दाखल झाले. तिथेच त्यांना लहान-मोठ्या भूमिका करण्याची संधी मिळाली. चित्रपट क्षेत्रातील महत्त्वाच्या कौशल्यांचे म्हणजेच अभिनय, पटकथा लेखन, दिग्दर्शन, संकलन,छायाचित्रण आदींचे ज्ञान त्यांना मिळाले. जबरदस्त निरीक्षण शक्तीच्या जोरावर या सर्व कामांत अत्यंत कमी वेळात त्यांनी प्रावीण्य मिळविले. १९२७ साली ‘नेताजी पालकर’ हा चित्रपट केशवराव धायबर यांच्या जोडीने त्यांनी दिग्दर्शित केला. ९-१० वर्षांच्या कारकीर्दीमुळे त्यांच्यात एक आत्मविश्वास निर्माण झाला व आपली स्वतःची चित्रपट संस्था असावी हा विचार त्यांच्या मनात घर करून राहिला.
तारीख १ जून, १९२९. प्रभात फिल्म कंपनीचा कोल्हापूर येथे जन्म झाला. महाराष्ट्र फिल्म कंपनीतीलच त्यांचे सहकारी केशवराव धायबर, विष्णुपंत दामले, शेख फत्तेलाल व स्वतः व्ही. शांताराम असे हे तंत्रज्ञ,कलावंत व भांडवलासाठी कोल्हापूरचे सीताराम कुलकर्णी अशा पाच जणांनी एकत्र येऊन ही संस्था सुरू केली. पुढे या संस्थेने भारतीय चित्रपटाचे सुवर्णयुग निर्माण केले.
मूकपटांच्या जमान्यात प्रभात कंपनीचा पहिला मूक चित्रपट ‘गोपालकृष्ण’ च्या यशाने सर्वांचा आत्मविश्वास वाढला. प्रभातने १९२९ ते १९३२ या ३ वर्षांत ६ मूक चित्रपट निर्माण केले. ‘आलमआरा’ या बोलपटापासून प्रेरणा घेऊन १९३२ साली प्रभात कंपनीचा पहिला बोलपट ‘अयोध्येचा राजा’ तयार झाला. या चित्रपटाला दिग्दर्शन शांतारामांचे होते. चित्रपट कमालीचा यशस्वी झाला.
१९३३ च्या रंगीत चित्रपटांच्या लाटेत त्यांनी ‘सैरंधी़’ हा चित्रपट तयार केला. रंगीत चित्रपट निर्माण करण्यासाठी, तंत्रज्ञानाची, सिनेयंत्राची माहिती घेण्यासाठी ते जर्मनीला जाऊन आले. कंपनीचा वाढता व्याप, अपुरा वीज पुरवठा, अपुरा स्टुडिओ या कारणांमुळे कोल्हापूरचे बस्तान हालवण्याचे ठरवण्यात आले. पुण्यात अद्ययावत नवा स्टुडिओच नव्हे तर प्रभातनगरच उभे करायचे अशी योजना अमलात आणली गेली. या योजनेत अर्थातच शांताराम यांनीच पुढाकार घेतला होता.
पुण्यात प्रभातचे स्थलांतर झाल्यावर चित्रपट निर्मितीच्या सर्व नाड्या व्ही.शांताराम ह्यांच्या हाती आल्या. अनेक पौराणिक चित्रपट करून झाल्यावर सामाजिक समस्या, समाज सुधारणा, वास्तव चित्रण, प्रगत विचार घेऊन ‘कुंकू’ हा सामाजिक आशयाचा चित्रपट त्यांनी तयार केला. गतिमान संकलन, उत्कंठावर्धक चित्रण, बहुभाषिक गाणे, वेश्या जगताचे डोळस दर्शन या वैशिष्ट्यांमुळे त्यांचा ‘माणूस’ हा चित्रपटही फारच प्रेक्षणीय झाला.
१९४१ मध्ये शांताराम यांनी त्या काळातील सामाजिक व राजकीय घडामोडींशी संबंधित विषयांवर चित्रपट काढले. धार्मिक सद्भाव, प्रेम निर्माण व्हावे या हेतूने ‘शेजारी’ (हिंदीत ‘पडोसी’) हा संवेदनशील चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला.
मतभेदांमुळे, एप्रिल १९४२ मध्ये शांताराम बापूंनी प्रभात कंपनी सोडली व मुंबई येथे राजकमल कलामंदिर या चित्रपट निर्मिती संस्थेची स्थापना केली. राजकमलच्या काही चित्रपटांना राष्ट्रीय पातळीवरील पारितोषिके मिळाली. ‘दो आँखे बारह हाथ’ या चित्रपटाला राष्ट्रपती पदक व सॅम्युअल गोल्डवीन अॅवॉर्ड मिळाले, तसेच या चित्रपटाला बर्लिन चित्रपट महोत्सवातही पुरस्कार मिळाला. त्यांच्या ‘झुंज’ या चित्रपटाला उत्कृष्ट संकलनाचे पारितोषिक मिळाले.
राजकमलच्या सुमारे ५० वर्षांच्या काळात सुमारे ३५ चित्रपटांची निर्मिती झाली. राजकमलच्या माध्यमातून व्ही. शांताराम यांनी चानी, पिंजरा, शकुंतला, नवरंग, झनक झनक पायल बाजे, गीत गाया पत्थरोने असे दर्जेदार चित्रपट निर्माण केले. राजकमल स्टुडिओ हा अत्याधुनिक कॅमेरे, रेकॉर्डिंग व एडिटिंगची (ध्वनिमुद्रण व संपादन) यंत्रसामग्री, फिल्म विकसित करण्याची अत्याधुनिक साधने- अशा साधनांनी युक्त असल्यामुळे अन्य निर्मात्यांना भाड्याने देण्यास सुरुवात झाली.
शांताराम बापूंना आयुष्याच्या अखेरच्या पर्वात अनेक मानसन्मान मिळाले. चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च मानाचा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ त्यांना १९८५ साली देण्यात आला. नागपूर विद्यापीठाची डॉक्टरेट, पुणे व मुंबई महानगरपालिकेतर्फे सन्मान त्यांना प्रदान करण्यात आले. राष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या पारितोषिक समितीचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले.
‘शांताराम’ नावाचे त्यांचे आत्मचरित्र १९८६ साली प्रसिद्ध झाले. आपल्या चित्रपटातून सामाजिक प्रश्नांना स्थान देणे, पुरोगामी विचारसरणी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे, ध्येयवादी आदर्श व्यक्तिमत्त्वांवर चित्रपट तयार करून प्रेक्षकांना संदेश देणे - अशा प्रकारे करमणुकीबरोबरच सामाजिकतेचे भान ठेवून त्यांनी चित्रपट निर्मिती केली. त्यांच्या दिग्दर्शनाखाली मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक अभिनेत्री - अभिनेते घडले.
सुरुवातीच्या काळात भारतीय चित्रपट सृष्टीत धार्मिक, आध्यात्मिक, ऐतिहासिक अशा स्वरूपाचेच चित्रपट निर्माण होत होते. पण चित्रपती व्ही. शांताराम यांनी चित्रपटांना समाजाभिमुख, वास्तववादी बनवले, चित्रपटांना सामाजिक आशय - विषय दिले. जिद्दी, कडक शिस्तीचे, अपार कष्ट करण्याची तयारी असणारे , मोजके व मुद्देसूद बोलणारे, आत्मविश्वासाने चित्रपटातील प्रत्येक प्रसंगातून प्रेक्षकांना काही संदेश देण्याचा ध्यास घेतलेले हे महान दिग्दर्शक-संकलक १९९० मध्ये अनंतात विलीन झाले.