Get it on Google Play
Download on the App Store

जहांगीर रतन दादाभॉय (जे. आर. डी.) टाटा

जहांगीर रतन दादाभॉय (जे. आर. डी.) टाटा

उद्योगांना उच्च दर्जाचे, विकासाचे, विस्ताराचे पंख लावणारा उद्योगपती.

जहांगीर रतन दादाभॉय (जे. आर. डी.) टाटा हे भारतातील आदर्श उद्योगपतींपैकी एक मानले जातात. स्वातंत्र्यपूर्व काळात हाती आलेला टाटा उद्योग समूह त्यांनी आपल्या नेतृत्वगुणांच्या बळावर अनेकपटींनी वाढवला.  जवळजवळ अर्ध शतकाच्या आपल्या कारकीर्दीमध्ये त्यांनी भारतातील सर्वांत मोठा उद्योगसमूह असण्याचा मान आपल्या कर्तृत्वाने टाटा उद्योग समूहाकडे बहुतांश वर्षे टिकवून ठेवला. उद्योगधंद्यांच्या व्याप्तीबरोबर समाजसेवा, समाजकारण, सांस्कृतिक सहभाग, कला अशा समाजाच्या अनेक क्षेत्रांच्या संदर्भात सुद्धा जे. आर. डी. यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटवला आहे. म्हणूनच आजही उद्योगपतींच्या नामावलीमध्ये जे. आर. डी. यांचं स्थान अग्रभागी घेतलं जातं.

जे. आर. डी. यांचा जन्म श्री. रतन दादाभॉय (आर. डी.) व श्रीमती सूनी टाटा यांच्या पोटी पॅरिस येथे झाला. जे. आर. डी. याच नावानी त्यांना सर्व जग ओळखते. निकटवर्तीय त्यांना ‘जेह’ या नावानेच हाक मारीत. स्वत: जे. आर. डी. सुद्धा स्वत:ची ओळख करून देताना, मला ‘जेह’ म्हणा असंच सांगत. जे. आर. डी. यांनी भारतातील सर्वात मोठ्या उद्योग समूहाचं प्रमुख म्हणून बावन्न वर्षे पद भूषवले. अनेक अडचणींना, व्यावसायिक अडथळ्यांना तोंड देत असताना सुद्धा आपल्या उच्च व्यावसायिक मूल्यांना त्यांनी कधीही मुरड घातली नाही. अत्यंत सचोटीचा व्यवहार, प्रामाणिकपणा आणि आपल्या कामांसाठी कुणाला लाच द्यायची नाही या त्यांच्या तत्त्वांसाठी ते सर्वज्ञात होते. व्यावसायिक उच्च मूल्यांची अवहेलना न करताही उत्तम, फायदेशीर व मोठ्या प्रमाणावर व्यवसाय-उद्योगधंदा करता येतो हे जे. आर. डी. यांनी स्वत:च्या कृतीने भारताला तसेच सर्व जगाला दाखवून दिले.

१९२५ च्या डिसेंबर महिन्यात जे. आर. डी. हे टाटा समूहात रुजू झाले. प्रथम काही महिने त्यांनी टिस्कोमध्ये जमशेदपूर येथे काम केले. पण वडिलांच्या अकाली निधनामुळे ते मुंबई येथे समूहाच्या मुख्यालयात दाखल झाले. हळूहळू जे.आर.डी. यांच्या कार्यकुशलतेमुळे त्यांचा प्रभाव टाटा समूहावर वाढायला लागला. उद्योग समूहाच्या अनेक जटील समस्यांना ते अत्यंत कुशलतेने व सहजपणे हाताळीत. त्या प्रश्र्नांवर उद्योगाच्या हिताच्या दृष्टीने र्सेंल तोडगेही काढीत. त्यांच्या उद्योगधंद्यातील या कौशल्यामुळे व हातोटीमुळे त्यांचं नेतृत्व टाटा उद्योगसमूहात स्वीकारलं गेलं, आणि २६ जुलै, १९३८ रोजी एका औपचारिक बैठकीनंतर ते टाटा समूहाचे अध्यक्ष झाले.

टाटा उद्योगसमूह हा जे. आर. डी. यांच्या काळात खूप विस्तारला. विद्युतनिर्मिती व वितरण, पोलाद, ट्रक, मोटारी, रसायनं, तंत्रज्ञान, संगणक, हॉटेल्स, वातानुकूलीत यंत्र, इलेक्ट्रोनिक्स्‌, सिमेंट, चहा, औषधं, सौंदर्यप्रसाधनं, व्हेंचर कॅपिटल- अशा एक ना अनेक उद्येगधंद्यांमध्ये जे. आर. डी. यांच्या कारकीर्दीत टाटा उद्योगसमूहाने पाय रोवले. असं म्हटलं जातं की, भारतीय माणूस सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत टाटा उद्योगसमूहामध्ये बनलेली अनेक उत्पादने  वापरत असतो. इतक्या विविध क्षेत्रांमध्ये विस्तार असून सुद्धा जे. आर. डी. हे प्रामुख्याने ओळखले जातात, ते त्यांनी सुरू केलेल्या भारतातील पहिल्या विमान कंपन्यांसाठी! देशांतर्गत प्रवासासाठी ‘इंडियन एअरलाईन्स’ आणि परदेशी प्रवासासाठी ‘एअर इंडिया’ या दोन विमान कंपन्या जे. आर. डी. यांनी सुरू केल्या. (पूर्वी या विमान सेवा ‘टाटा एअरलाईन्स’ या नावानी सुरू झाल्या होत्या.) या विमान कंपन्यांमुळे जे. आर. डी. यांचं नाव भारतीय प्रवासी विमान सेवा उद्योगाशी कायमचे जोडले गेले.

जे. आर. डी. यांच्या बावन्न वर्षांच्या यशस्वी कारकीर्दीला त्यांच्यातील असामान्य नेतृत्वगुण  कारणीभूत होते. त्यांना कामाचं जणू व्यसनच होतं. अगदी लहानातल्या लहान गोष्टींतही त्यांचा परिपूर्णतेचा ध्यास  असे. ‘परिपूर्णतेसाठी प्रयत्न करीत राहिलात, तर तुम्ही सर्वोत्तम कामगिरी करू शकाल’, असे जे. आर. डी. नेहमी म्हणत. ते अत्यंत उत्साही होते. त्यांचे सहकारी दरबारी सेठ एकदा म्हणाले होते की, ‘जे. आर. डी. यांना भेटून आल्यावर उत्साहाची उर्जा घेऊन न येणारा मला अजून कोणी भेटलेला नाही.’ जे. आर. डी अतिशय प्रेमळ होते. आपल्या माणसांना मदत करण्यासाठी ते सदैव तत्पर असत. त्यांचे ज्ञान प्रगाढ आणि अतिशय व्यापक होते. त्यांनी स्वत:च स्वत:चा प्रशिक्षक होऊन बहुतांश ज्ञान संपादन केले होते. एकदा अमेरिकेतील अंतराळ संशेधन संस्था ‘नासा’ च्या डिझाईन विभागाला त्यांनी भेट दिली होती. तेथे विविध विषयांवर त्यांनी तेथील तज्ज्ञांशी चर्चा केली. त्या वेळी त्यांच्याबरोबर उपस्थित असलेले सध्याचे टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री. रतन टाटा म्हणाले की, ‘नासामधील नावीन्यपूर्ण गोष्टी पाहून जे. आर. डी. प्रभावित होऊन बाहेर पडतील असे वाटले होते. पण जे.आर.डी. यांच्या ज्ञानाने नासातील तज्ज्ञच प्रभावित झाले होते.’

जे. आर. डी. यांना सामाजिक जाणीव व आस्थाही खूप होती. समाजसेवेचं व समाजकारणाचं त्यांचं दायित्व त्यांनी ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’ ‘टाटा मेमोरिअल कॅन्सर हॉस्पिटल’ या अशा समाजाभिमूख व समाजहिताच्या दृष्टीने निर्माण केलेल्या संस्थांमधून यशस्वीरीत्या निभावले. आजही या संस्था समाजकारणाच्या अनेक पैलूंवर कार्यरत आहेत. जे. आर. डी. यांनी  ‘सहमतीचं व्यवस्थापन’ ही भारतीय उद्योगधंद्यातील व्यवस्थापन कौशल्यात घातलेली मोलाची भर आहे. जे. आर. डी. हे निर्णयप्रकियेच्या बाबतीत काही प्रमाणात आग्रही होते, तसेच लोकशाहीवादीही होते. टाटा उद्योग समूहातील कंपन्यांच्या संचालकपदांवर अतिशय मुत्सद्दी, प्रभावी, आणि समाजमान्य ज्ञानवंतांची त्यांनी निवड व नियुक्ती केली होती. श्री. दरबारी सेठ, श्री. रुसी मोदी, श्री. सुमंत मुळगावकर, श्री. नानी पालखीवाला, श्री. रतन टाटा अशी अनेक व्यक्तिमत्त्वे टाटा उद्योग समूहातील कंपन्यांच्या जबाबदार्‍या सांभाळत होती. या सर्वांना टाटा ‘उद्योगसमूहातील नवरत्ने’ म्हणत असत. जे. आर. डी. हे त्यांच्या या सहकार्‍यांबरोबर सल्लामसलत करून अनेक महत्त्वाचे निर्णय घेत असत. जे. आर. डी. यांची स्वत:ची अशी काही व्यावसायिक तत्त्वे होती की, जी ते स्वत: पाळत व त्यांच्या सहकार्‍यांकडून ती पाळली जावीत अशी त्यांची अपेक्षा असे. त्यांची कामगारविषयक तत्त्वे अतिशय उदार, सौदार्हपूर्ण व त्या काळाचा विचार करता अतिशय पुरोगामी होती.

जे. आर. डी. यांच्या औद्योगिक क्षेत्रातील सर्वसमन्वेशक, आदर्श आणि अत्युत्तम कामगिरीसाठी भारत सरकारने त्यांना १९९१ साली ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करून त्यांना गौरविले. ते या सन्मानाचे भारतीय उद्योगक्षेत्रातील दुसरे मानकरी ठरले.

हवाई क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित असलेला अमेरिकेतील ‘टोनी जानूस’ हा पुरस्कार  मिळवणारे जे. आर. डी. हे पहिले भारतीय आहेत. भारतातील विमानोड्डाणाचा पहिला परवाना जे.आर. डी. यांना मिळालेला आहे. पूर्ण जगतात टाटा उद्योगसमूह व जे. आर. डी. यांचं नाव दुमसुमलं आहे. टाटा म्हणजे दर्जा, टाटा म्हणजे उत्कृष्टता अशी समीकरणं जगात रूढ करण्यामागे जे. आर. डी. यांचा सिंहाचा वाटा आहे.

महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथून जे.आर.डी. यांच्या कारकीर्दीला सुरुवात झाली. उद्योगधंद्यांचा व त्यांच्या कारकीर्दीचाही सतत चढणारा आलेख बघण्याचं भाग्य मुंबई येथील ‘बॉम्बे हाउस’ या कार्यालयालाच मिळाले आहे. श्री. सुमंत मुळगावकरांसार‘या त्यांच्या मराठी सहकार्‍यांनी टेल्कोच्या पुण्याच्या कंपनीद्वारे पुण्याचं, टाटांचं आणि पूर्ण महाराष्ट्राचंही नाव सर्वदूर प्रतिष्ठित केले आहे.

जे. आर. डी. यांच नाव, त्यांच्या प्रतिष्ठेचं वलय, आणि टाटा समूहाचं उद्योगक्षेत्रातील स्थान हे एकमेवाद्वितीयच आहे. या अशा व्यक्तिमत्त्वांमुळे भारताचे औद्योगिक क्षेत्रातील स्थान बळकट झालं आहे. म्हणूनच प्रत्येक भारतीयाचा उर जे. आर. डी. यांच्या कर्तृत्वाच्या आठवांनी, अभिमानानी भरून येतो.

भारतीय उद्योगधंद्यांना आणि भारतीयांना पंख देणार्‍या जे.आर.डी. टाटा या असामान्य उद्योगसम्राटाला म्हणूनच त्रिवार प्रणाम!!!

महाराष्ट्राचे शिल्पकार

अभिषेक ठमके
Chapters
प्रस्तावना छत्रपती शिवाजी महाराज महात्मा - फुले लोकमान्य टिळक राजर्षी शाहू महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर संत श्री ज्ञानेश्वर संत तुकाराम समर्थ रामदास संत नामदेव संत एकनाथ शहाजीराजे भोसले राजमाता जिजाबाई बाजीप्रभू देशपांडे तानाजी मालुसरे श्रीमंत बाजीराव पेशवे तात्या टोपे झाशीची राणी लक्ष्मीबाई वासुदेव बळवंत फडके सावित्रीबाई फुले संत गाडगेबाबा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर प्रबोधनकार ठाकरे कर्मवीर भाऊराव पाटील आचार्य विनोबा भावे साने गुरुजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बाबा आमटे कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे एस. एम. जोशी यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील बाळासाहेब ठाकरे शरद पवार डॉ. इरावती कर्वे डॉ. य. दि. फडके शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे डॉ. वसंत गोवारीकर जयंत विष्णू नारळीकर डॉ. रघुनाथ माशेलकर डॉ. विजय भाटकर श्री.वालचंद हिराचंद दोशी डॉ.विठ्ठलराव विखे पाटील प्रा.धनंजयराव गाडगीळ शंतनुराव किर्लोस्कर जहांगीर रतन दादाभॉय (जे. आर. डी.) टाटा राहूल बजाज बी. जी. शिर्के केशवसुत-कृष्णाजी केशव दामले दादासाहेब फाळके पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर बहिणाबाई नथूजी चौधरी राम गणेश गडकरी बालगंधर्व केशवराव भोसले वि. स. खांडेकर प्रल्हाद केशव अत्रे व्ही. शांताराम बा.सी.मर्ढेकर कुसुमाग्रम -वि.वा.शिरवाडकर शाहीर अमर शेख गोविंद विनायक (विंदा) करंदीकर सुधीर फडके गजानन दिगंबर माडगूळकर (गदिमा) पु.ल.देशपांडे डॉ.सरोजिनी बाबर शाहीर अण्णा भाऊ साठे पंडित भीमसेन जोशी लता मंगेशकर किशोरी आमोणकर आशा भोसले शांता शेळके नारायण गंगाराम सुर्वे विजय तेंडुलकर शाहीर साबळे बाबुराव रामचंद्र बागूल सुरेश भट विठाबाई भाऊ (मांग) नारायणगावकर दया पवार सचिन तेंडुलकर खाशाबा जाधव सुनील गावस्कर अभिजित कुंटे निळू फुले संदर्भ सूची - व्यक्तिमत्त्वे