Get it on Google Play
Download on the App Store

वि. स. खांडेकर

वि. स. खांडेकर 

जन्म : ११ जानेवारी, १८९८.

ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेले पहिले मराठी साहित्यिक !

विष्णू सखाराम खांडेकर हे मराठी साहित्यातील एक अग्रगण्य कादंबरीकार, एक लोकप्रिय साहित्यिक म्हणून ओळखले जातात. त्यांनी कादंबरीसह कथा, कविता, लघुनिबंध, समीक्षा, चित्रपट-कथा, नाटक, व्यक्तिचित्रे, अनुवाद अशा विविध साहित्यप्रकारांत अगदी विपुल असे लेखन केले. वृत्तपत्रीय लेखन व ग्रंथ-संपादन या क्षेत्रांतही त्यांनी ठसा उमटवला.

कुमारवयापासूनच त्यांच्यावर उत्तम साहित्याचे संस्कार होत होते, ते त्यांच्या मराठीच्या शिक्षकांमुळे आणि बालकवी, राम गणेश गडकरी, अच्युतराव कोल्हटकर यांसारख्या साहित्यिकांशी झालेल्या परिचयामुळे. गडकरींमुळे पाश्र्चात्त्य साहित्य वाचण्याचा छंदही त्यांना तेव्हा लागला होता. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी खांडेकरांना विनोद चांगला साधतो व काव्यात्म प्रकृतीचे लेखनही ते करू शकतात, तेव्हा या दोहोंचे मिश्रण असलेल्या गोष्टी त्यांनी लिहाव्यात असे सुचवले; तेव्हा खांडेकर यांना स्वत:त लपून बसलेला कथाकार सापडला. ते उत्कृष्ट वक्ते म्हणूनही महाराष्ट्रात प्रसिद्ध होते.

एक कादंबरीकार म्हणून स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच त्यांना महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेरही अफाट लोकप्रियता मिळाली. १९३० मध्ये ‘हृदयाची हाक’ ही पहिली कादंबरी त्यांनी लिहिली. त्यानंतर एकापाठोपाठ एक कांचनमृग (१९३१), दोन ध्रुव (१९३४), हिरवा चाफा, दोन मने (१९३८), रिकामा देव्हारा (१९३९), पहिले प्रेम(१९४०) अशा त्यांच्या अनेक कादंबर्‍या प्रकाशित झाल्या. सुमारे ३५ कथासंग्रह, १० लघुनिबंध संग्रह, गोफ आणि गोफण यांसारखे समीक्षालेख संग्रह असे झंझावाती लेखन त्यांनी केले. छाया, ज्वाला, अमृत, देवता, माझं बाळ यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांच्या कथाही त्यांनी लिहिल्या.

शब्दप्रभुत्व, कोटीबाजपणा, कल्पनावैभव यांचा वारसा त्यांनी कोल्हटकर-गडकरी यांच्याकडून घेतला. मध्यमवर्गीय माणसांच्या आशा-आकांक्षा, सर्वसामान्यांची सुख दु:खे, त्यांचा आदर्शवाद त्यांनी मुख्यत्वे आपल्या कथा-कादंबर्‍यांतून मांडला. त्यांचा नायक हा सामाजिकतेचे भान असलेला, आदर्शाची ओढ असलेला असे. हळूहळू बदलत चाललेल्या सामाजिक परिस्थितीत या प्रकारचा आदर्शवाद ही मध्यमवर्गीय तरुण पिढीची मानसिक गरज होती. त्यामुळे खांडेकर त्या काळातले सर्वांत लोकप्रिय लेखक ठरले. त्यांची क्रौंचवध (१९४२) ही कादंबरीही लोकप्रिय ठरली. ययाती(१९५९), अमृतवेल (१९६७) या स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वांत जास्त गाजलेल्या त्यांच्या कादंबर्‍या होत. ‘ययाती’ला १९६० चा साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला.

भारत सरकारने १९६८ मध्ये पद्मभूषण सन्मान देऊन त्यांना गौरवले. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने त्यांना डी. लिट. (डॉक्टर ऑफ लिटरेचर) बहला केली. तर भारतीय ज्ञानपीठातर्फे १९७४ मध्ये त्यांना ‘ज्ञानपीठ’ या अत्युच्च मानाच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यांच्या कथा-कादंबर्‍यांवर अनेक भाषांमध्ये चित्रपट, दुरदर्शन मालिकाही निर्माण झाल्या. त्यांच्या साहित्याचे अन्य भारतीय भाषांत व विदेशी भाषांतही अनुवाद झाले.

‘रूपककथा’ ही खांडेकरांनी मराठी कथेला दिलेली देणगी होय. आपले जीवनविषयक तत्त्वज्ञान आणि आदर्श मूल्ये यांची मांडणी त्यांनी या कथांतून केली. वेचलेली फुले (१९४८) या संग्रहात या रूपककथा आहेत. अक्षरश: चकित व्हायला व्हावे एवढे विविध प्रकारचे, विपुल आणि तरीही दर्जेदार असे लेखन करून खांडेकरांनी मातृभाषेची सेवा केली आहे, आणि त्यायोगे मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून त्यांनी मराठी रसिकांत व साहित्यिकांमध्ये चैतन्य आणि आत्मविश्र्वास निर्माण केला.

महाराष्ट्राचे शिल्पकार

अभिषेक ठमके
Chapters
प्रस्तावना छत्रपती शिवाजी महाराज महात्मा - फुले लोकमान्य टिळक राजर्षी शाहू महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर संत श्री ज्ञानेश्वर संत तुकाराम समर्थ रामदास संत नामदेव संत एकनाथ शहाजीराजे भोसले राजमाता जिजाबाई बाजीप्रभू देशपांडे तानाजी मालुसरे श्रीमंत बाजीराव पेशवे तात्या टोपे झाशीची राणी लक्ष्मीबाई वासुदेव बळवंत फडके सावित्रीबाई फुले संत गाडगेबाबा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर प्रबोधनकार ठाकरे कर्मवीर भाऊराव पाटील आचार्य विनोबा भावे साने गुरुजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बाबा आमटे कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे एस. एम. जोशी यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील बाळासाहेब ठाकरे शरद पवार डॉ. इरावती कर्वे डॉ. य. दि. फडके शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे डॉ. वसंत गोवारीकर जयंत विष्णू नारळीकर डॉ. रघुनाथ माशेलकर डॉ. विजय भाटकर श्री.वालचंद हिराचंद दोशी डॉ.विठ्ठलराव विखे पाटील प्रा.धनंजयराव गाडगीळ शंतनुराव किर्लोस्कर जहांगीर रतन दादाभॉय (जे. आर. डी.) टाटा राहूल बजाज बी. जी. शिर्के केशवसुत-कृष्णाजी केशव दामले दादासाहेब फाळके पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर बहिणाबाई नथूजी चौधरी राम गणेश गडकरी बालगंधर्व केशवराव भोसले वि. स. खांडेकर प्रल्हाद केशव अत्रे व्ही. शांताराम बा.सी.मर्ढेकर कुसुमाग्रम -वि.वा.शिरवाडकर शाहीर अमर शेख गोविंद विनायक (विंदा) करंदीकर सुधीर फडके गजानन दिगंबर माडगूळकर (गदिमा) पु.ल.देशपांडे डॉ.सरोजिनी बाबर शाहीर अण्णा भाऊ साठे पंडित भीमसेन जोशी लता मंगेशकर किशोरी आमोणकर आशा भोसले शांता शेळके नारायण गंगाराम सुर्वे विजय तेंडुलकर शाहीर साबळे बाबुराव रामचंद्र बागूल सुरेश भट विठाबाई भाऊ (मांग) नारायणगावकर दया पवार सचिन तेंडुलकर खाशाबा जाधव सुनील गावस्कर अभिजित कुंटे निळू फुले संदर्भ सूची - व्यक्तिमत्त्वे