Get it on Google Play
Download on the App Store

वसंतदादा पाटील

वसंतदादा पाटील

प्रखर देशभक्त; कुशल पक्ष संघटक व राज्याचे मुख्यमंत्री या भूमिका प्रभावीपणे निभावणारे व्यक्तिमत्त्व! सच्चे सहकार महर्षी आणि मनमोकळे राजकारणी नेतृत्व!

महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला एक वेगळे, निर्णायक वळण देऊन विकास साधणारे नेते म्हणजे वसंतदादा पाटील होत. क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक ते विधायक कार्य करणारे, पक्ष संघटना वाढवणारे राजकीय नेते, प्रभावी मुख्यमंत्री व सहकार महर्षी - असा त्यांचा जीवन प्रवास आपल्याला थक्क करतो.

सांगली जिल्ह्यातील, तासगाव तालुक्यातील पद्माळे या छोट्या गावी जन्मलेले वसंतदादा १९७७ ते १९८५ या काळात चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. एकूण सुमारे ४ वर्षे त्यांनी राज्याचे मुख्यमंत्रीपद सांभाळले. ते काही काळ राजस्थानचे राज्यपालही होते. त्या आधी १९७२ मध्ये ते प्रथम मंत्री झाले होते. तसेच १९५२ च्या १ ल्या निवडणुकीतच ते सांगलीतून आमदार म्हणून निवडून आले होते. पुढील काळात सुमारे २५ वर्षे त्यांनी सांगलीचेच प्रतिनिधित्व (विधानसभेत व लोकसभेत) केले. राजकीय जीवनात त्यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, राष्ट्रीय मिल मजदूर संघ, व महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस आदी संस्था-संघटनांची अध्यक्षपदे सांभाळली. पक्ष कार्याला त्यांनी विशेष महत्त्व दिले. वसंतदादांनंतर कॉंग्रेस पक्ष संघटनेला एवढे बळ देणारा नेता पुढे कॉंग्रेसला महाराष्ट्रात मिळालाच नाही. (तसेच प्रामुख्याने ग्रामीण महाराष्ट्रात कॉंग्रेसचा प्रभाव कायम राहण्यात व वाढण्यात दादांचाच वाटा मोठा आहे,) असे राजकीय निरीक्षक म्हणतात. सत्तेची हाव नसलेला सत्ताधारी, असे दादांबद्दल म्हटले जाते.

महाराष्ट्राचे नेतृत्व करताना दादांनी अनेक समाजहितकारक, दूरगामी परिणाम साधणारे निर्णय घेतले. १९८३ मध्ये त्यांनी वैद्यकीय, अभियांत्रिकी महाविद्यालये व तंत्रनिकेतन विद्यालये विना अनुदान तत्त्वावर स्थापन करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध होण्याबरोबरच, या निर्णयामुळे शैक्षणिक व (पर्यायाने) औद्योगिक विकासालाही चालना मिळाली. वसंतदादांनी राज्याचा विकासविषयक आढावा घेण्यासाठी अर्थतज्ज्ञ वि. म. दांडेकर यांची सत्यशोधन समिती नेमली. यातूनच समतोल विकास, विदर्भ-मराठवाड्याचा अनुशेष (बॅकलॉग) अशा संज्ञा पुढे आल्या. शालेय विद्यार्थ्यांना मोफत एस. टी. प्रवास, परगावी शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डब्यांची मोफत वाहतूक, शेतकर्‍यांना कमी व्याज दराने कर्ज पुरवठा इत्यादी महत्त्वाचे निर्णय दादांनी त्यांच्या काळात घेतले. पाणी अडवा, पाणी जिरवा हे सूत्र प्रथम दादांनी महाराष्ट्रासमोर आणले. दादांच्या या लोकहितकारक निर्णयांची बीजे त्यांच्या देशभक्तीत व त्यांनी केलेल्या क्रांतिकार्यात आढळतात.

वसंतदादा अगदी लहान वयातही (१९३०) स्वातंत्र्य चळवळीत सामील झाले होते. १९४० पासून त्यांनी लढ्यात जोमाने सहभाग घेतला. फोनच्या तारा तोडणे, पोस्ट जाळणे, रेल्वेचे नुकसान करणे, पिस्तुल-बॉंबचा वापर करून ब्रिटिशांमध्ये दहशत निर्माण करणे इत्यादी कामांच्या माध्यमातून त्यांनी सांगली जिल्ह्यात, १९४२ मध्ये ब्रिटिश विरोध प्रखर केला. कायदेभंग चळवळीच्या काळात सोलापूरला चार युवक हुतात्मे झाले. या हौतात्म्याची आठवण म्हणून दादांनी चहा सोडला होता. दादा काही काळ भूमिगत होते. त्यांना सुमारे ३ वर्षे तुरुंगवासही भोगावा लागला. १९४३ मध्ये दादांनी तुरुंगातून निसटण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना खांद्याला गोळी लागली होती, व त्यांना पुन्हा तुरुंगवास भोगावा लागला होता. दादांच्या सुटकेसाठी सांगलीकरांनी सभा-मोर्चा या माध्यमातून प्रयत्न केले होते. या प्रयत्नांत रामानंद भारती, बॅ. नाथ पैदेखील सहभागी होते. सातारा-सांगली या भागांत दादा स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिसिंह नाना पाटील, यशवंतराव चव्हाण यांच्याबरोबर आघाडीवर होते. स्वातंत्र्य मिळाल्यावर स्थानिक स्वातंत्र्य-सैनिकांकडून शस्त्रास्त्रे परत घेऊन, त्यांच्यामध्ये विधायक कार्य करण्याची प्रेरणा निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण काम दादांनी केले होते.

वसंतदादांचे महाराष्ट्राच्या उभारणीतील सर्वांत महत्त्वाचे कार्य म्हणजे त्यांनी सहकार क्षेत्राचा केलेला विकास व विस्तार होय. त्यांनी सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण विकास, कृषी विकास व कृषी-उद्योग विकास साधण्याचा यशस्वी प्रयत्न केला. कुक्कुटपालन, दुग्धविकास या क्षेत्रांत सहकाराचा प्रसार प्रामुख्याने दादांनी केला. खत कारखाने, सूत गिरण्या, तेल गिरण्या, कागद कारखाने, सिमेंट पाईपचे कारखाने, कृषी अवजारांचे उत्पादन व कृषी प्रक्रिया उद्योग इत्यादी उद्योग राज्यात वसंतदादांनी सहकारी तत्त्वावर सुरू केले. १९५६-५७ मध्येच त्यांनी शेतकरी सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली होती. त्या वेळी त्यांनी स्वत: शेतांमध्ये जाऊन ऊस कसा लावायचा, याचे शेतकर्‍यांना प्रात्यक्षिक दिले होते. सहकारी साखर कारखान्यांनी साखरेसह उप-उत्पादनांचीही निर्मिती करावी असा आग्रह दादांनी धरला. तसेच कारखान्याच्या परिसरात शिक्षण, आरोग्य, इतर उद्योग व मूलभूत सोयीसुविधा या क्षेत्रांत विकास साधण्यासाठी विकास निधी वेगळा काढण्याची कल्पना त्यांनी रुजवली. त्यामुळे आज महाराष्ट्रात कारखान्यांना जोडून निर्माण झालेली विकास केंद्रे आपल्याला दिसतात. दादांनी डेक्कन शुगर इन्स्टिट्यूटची स्थापना करून संशोधनाला चालना दिली. याच संस्थेचे नाव आज वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिटयूट आहे. आज राज्यात छोट्या-मोठ्या सहकारी पतसंस्थांचे जाळे उभे राहिलेले दिसते. यामध्येही वसंतदादांचा मोठा वाटा आहे.

सहकार क्षेत्रातील या अद्वितीय कामगिरीमुळेच १९६७ मध्ये त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने गौरवण्यात आले. वसंतदादा १९५२ पासून लोकप्रतिनिधी होते, १९७२ मध्ये ते प्रथम मंत्री झाले, व नंतर मंत्री -मुख्यमंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास झाला. विशेष म्हणजे १९५२ ते १९७२ दरम्यान त्यांनी सहकार क्षेत्रातील बहुतांश कार्य केले. या पार्श्र्वभूमीवर दादांनी ज्या काळात सहकार क्षेत्राची पायाभरणी व विस्तार केला तो काळ १९५२ ते १९७२ असल्याचे लक्षात येते. विशेष सत्तास्थानांवर नसताना त्यांनी सहकाराचा प्रचार-प्रसार-विकास केला हे लक्षणीय ठरते.

स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच्या विविध प्रकारच्या अनुभवांचे संचित, स्मरणशक्ती, नेतृत्वगुण, संघटनकौशल्य, समाजमन-आकलन शक्ती, निर्णयक्षमता, शेतकरी व ग्रामीण समाजजीवनाची अचूक, परिपूर्ण जाणीव - इत्यादी गुणांच्या आधारे वसंतदादांनी महाराष्ट्राचा विकास साधला. १९१८ मध्ये प्लेगच्या साथीत दादांच्या आई-वडिलांचा एकाच दिवशी मृत्यू झाला होता. त्या वेळी केवळ एक वर्षाचे असणार्‍या दादांचा सांभाळ, पुढील आयुष्यात त्यांच्या आजीने केला होता. या परिस्थितीत दादा जास्त शिकू शकले नाहीत. पण पुढील आयुष्यात त्यांनी केलेल्या विकास-कार्याची फळे आज महाराष्ट्र चाखतो आहे. म्हणूनचदुर्दैवाने फार शिकू न शकलेला, पण तरीही सर्वांत शहाणा नेता या समर्पक शब्दांत त्यांचे वर्णन केले जाते.

महाराष्ट्राचे शिल्पकार

अभिषेक ठमके
Chapters
प्रस्तावना छत्रपती शिवाजी महाराज महात्मा - फुले लोकमान्य टिळक राजर्षी शाहू महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर संत श्री ज्ञानेश्वर संत तुकाराम समर्थ रामदास संत नामदेव संत एकनाथ शहाजीराजे भोसले राजमाता जिजाबाई बाजीप्रभू देशपांडे तानाजी मालुसरे श्रीमंत बाजीराव पेशवे तात्या टोपे झाशीची राणी लक्ष्मीबाई वासुदेव बळवंत फडके सावित्रीबाई फुले संत गाडगेबाबा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर प्रबोधनकार ठाकरे कर्मवीर भाऊराव पाटील आचार्य विनोबा भावे साने गुरुजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बाबा आमटे कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे एस. एम. जोशी यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील बाळासाहेब ठाकरे शरद पवार डॉ. इरावती कर्वे डॉ. य. दि. फडके शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे डॉ. वसंत गोवारीकर जयंत विष्णू नारळीकर डॉ. रघुनाथ माशेलकर डॉ. विजय भाटकर श्री.वालचंद हिराचंद दोशी डॉ.विठ्ठलराव विखे पाटील प्रा.धनंजयराव गाडगीळ शंतनुराव किर्लोस्कर जहांगीर रतन दादाभॉय (जे. आर. डी.) टाटा राहूल बजाज बी. जी. शिर्के केशवसुत-कृष्णाजी केशव दामले दादासाहेब फाळके पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर बहिणाबाई नथूजी चौधरी राम गणेश गडकरी बालगंधर्व केशवराव भोसले वि. स. खांडेकर प्रल्हाद केशव अत्रे व्ही. शांताराम बा.सी.मर्ढेकर कुसुमाग्रम -वि.वा.शिरवाडकर शाहीर अमर शेख गोविंद विनायक (विंदा) करंदीकर सुधीर फडके गजानन दिगंबर माडगूळकर (गदिमा) पु.ल.देशपांडे डॉ.सरोजिनी बाबर शाहीर अण्णा भाऊ साठे पंडित भीमसेन जोशी लता मंगेशकर किशोरी आमोणकर आशा भोसले शांता शेळके नारायण गंगाराम सुर्वे विजय तेंडुलकर शाहीर साबळे बाबुराव रामचंद्र बागूल सुरेश भट विठाबाई भाऊ (मांग) नारायणगावकर दया पवार सचिन तेंडुलकर खाशाबा जाधव सुनील गावस्कर अभिजित कुंटे निळू फुले संदर्भ सूची - व्यक्तिमत्त्वे