डॉ.विठ्ठलराव विखे पाटील
‘सहकार’ या मंत्राचे सामर्थ्य ओळखून तो मंत्र सहकारी संस्थांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकर्यांपर्यंत पोहोचवणारे सहकारमहर्षी!
महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रातील एक आघाडीचे नाव म्हणजे विठ्ठलराव एकनाथराव विखे-पाटील. ‘सहकार’ या तत्त्वाच्या क्षमता लक्षात घेऊन, विठ्ठलरावांनी हे तत्त्व आचरणात आणले. शेतकर्यांपर्यंत हे तत्त्व नेऊन; अनेक संस्था स्थापन करून सहकाराचा परिचय त्यांनी ग्रामीण महाराष्ट्राला सुरुवातीच्या काळात करून दिला. त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील लोणी-बुद्रुक या गावी एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. याच गावी त्यांनी १९२३ मध्ये ‘लोणी-बुद्रुक सहकारी पतपेढी’ स्थापन केली. सहकारी तत्त्वावर स्थापन झालेली ही आशियातील पहिलीच पतपेढी मानली जाते. यानंतर त्यांनी गावोगावी सहकारी पतपेढ्या स्थापन केल्या व त्यांच्या माध्यमातून शेतकर्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून दिली.
१९२९ मध्ये त्यांनी राजुरी या गावी आदिवासी समाजासाठी सहकारी सोसायटीची स्थापना केली. गोदावरी-प्रवरा कॅनॉल खरेदी-विक्रि संघाच्या स्थापनेतही त्यांनी पुढाकार घेतला होता. १९४४ मध्ये त्यांनी सहकारी तत्त्वावरील शेतीसंस्थाही स्थापन केली.दिनांक १७ जून, १९५० रोजी अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरानगर (लोणी) येथे आशियातील सहकारी तत्त्वावरील पहिला साखर कारखाना विखे-पाटील यांच्याच नेतृत्वाखाली उभा राहिला. या कारखान्यासाठी शेतकर्यांपर्यंत पोहोचून त्यांना सहकारी तत्त्वावरील कारखान्याचे महत्त्व पटवून देणे, शेतकर्यांकडूनच कारखान्याच्या भागभांडवलाची उभारणी करण्याचा प्रयत्न करणे, कारखान्याच्या मंजुरीसाठी शासकीय पातळीवर पाठपुरावा करणे, इतर कार्यकर्त्यांवर सोपवलेल्या कामांचा पाठपुरावा करणे आदी कामांमध्ये विठ्ठलरावांनी स्वतःला पूर्णपणे झोकून दिले. थोडक्यात या कारखान्याच्या -आर्थिक, सामाजिक, राजकीय व शासकीय अशा-सर्व आघाड्या विखे-पाटील यांनी समर्थपणे सांभाळल्या. या सहकार-क्रांती घडवणार्या कारखान्याच्या स्थापनेत त्यांना अर्थतज्ज्ञ धनंजयराव गाडगीळ यांचे सहकार्य लाभले. या कारखान्याचे पहिले अध्यक्ष गाडगीळ हेच होते.
समाजातील शेवटच्या स्तरावरील मुलांपर्यंत शिक्षण पोहोचावे यासाठीही त्यांनी कार्य केले. अहमदनगर जिल्ह्यात रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक शाळा व महाविद्यालये यांची स्थापना त्यांनी पुढाकार घेऊन केली. तसेच त्यांनी या शाळांना आर्थिक सहकार्यही केले. शैक्षणिक कार्यात त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटलांना यथाशक्ति साथ दिली. काही काळ ते रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्षही होते. त्यांच्या शैक्षणिक कार्याचा परिणाम म्हणजे आज प्रवरानगर हे देशातील उत्तम शैक्षणिक केंद्र मानले जाते.
पुढील काळात विठ्ठलरावांच्या प्रेरणेने सहकारी कारखाने स्थापन होऊ लागले. या कारखान्यांमुळे केवळ शेतकर्यांचाच विकास झाला असे नाही, तर कारखान्याच्या परिसराचाही औद्योगिक व शैक्षणिकदृष्ट्या विकास घडून आला. सहकारी कारखाने व त्याला जोडून उभी राहिलेली ‘विकास केंद्रे’ यांमध्ये प्रमुख योगदान हे विठ्ठलरावांच्या मूलभूत कार्याचे आहे. ‘सहकारमहर्षी’ या किताबाचे खरेखुरे मानकरी विठ्ठलरावच होत. पुणे विद्यापीठाने त्यांना डी. लिट. ही पदवी, तर राहुरीच्या कृषी विद्यापीठाने डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी बहाल केली. भारत सरकारने २६ जानेवारी, १९६० रोजी त्यांना पद्मश्री या सन्मानाने गौरविले.