गोविंद विनायक (विंदा) करंदीकर
गेली अनेक वर्षे आपल्या प्रतिभेसह बालकवितांपासून अनेक काव्यप्रकार
लीलया हाताळणारे शब्दप्रभू अन् मराठीला ‘ज्ञानपीठ’चा बहुमान मिळवून देणारे ज्येष्ठ साहित्यिक!
विंदा करंदीकर या नावाने साहित्य क्षेत्रात गोविंद विनायक करंदीकर सुपरिचित आहेत. विचारवंत, कवी, लघुनिबंधकार, समीक्षक म्हणून रसिकांमध्ये व साहित्यिकांमध्ये, तर ज्ञानपीठ पुरस्कार विजेते म्हणून विंदा जनसामान्यांत विशेष लोकप्रिय आहेत. नुकताच २००८ मध्ये विंदांना साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार जाहीर झाला. विंदा ‘ज्ञानपीठ’ चा बहुमान मिळवणारे तिसरे मराठी साहित्यिक, दुसरे कवी! यांचा मूळ पिंड कवीचा. त्यांचा जन्म सिंधुदूर्ग जिल्ह्यामधील घालवळ गावचा. घरची परिस्थिती तेव्हा अत्यंत हलाखीची, वडील गरीब शेतकरी. पण एका स्नेह्यांमुळे विंदांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूर येथे झाले. इंग्रजी घेऊन एम.ए. झाल्यावर त्यांनी मुंबईला शिक्षकी पेशा स्वीकारला.
इंग्रजी काव्याचा अभ्यास करताना ब्राऊनिंग, हॉपकिन्स, एलिएटस् यांच्या कवितांनी ते खूप प्रभावित झाले. तसेच मराठीतील माधव ज्युलियन, बा. सी. मर्ढेकर यांच्या काव्याचाही त्यांच्यावर पडलेला प्रभाव त्यांच्या प्रारंभीच्या काव्यातून जाणवतो.
चिंतनशीलता हा मूळ पिंड असल्याने विश्र्वरहस्याचा शोध, पार्थिवतेचे आकर्षण, विज्ञाननिष्ठा, आध्यात्मिक कुतूहल असे वैचारिक विषय त्यांच्या काव्याचा आत्मा बनले. प्रयोगशीलता हे त्यांच्या काव्याचे ठळक वैशिष्ट्य आहे. गझल, गीत, मुक्त सुनीत, तालचित्रे, विरूपिका असे काव्याचे जुने-नवे रचनाबंध त्यांनी स्वीकारले. स्वच्छंद हा नवा छंद निर्माण केला. त्यांचे स्वेदगंगा (१९४९), मृद्गंध (१९५४), ध्रुपद (१९५९), जातक (१९६८) आदी काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.
विंदा करंदीकरांचे स्पर्शाची पालव (१९५८), आकाशाचा अर्थ (१९६५) हे लघुनिबंधांचे संग्रग्रहसुद्धा त्यांचे वैचारिक वेगळेपण आणि बुद्धीची चमक अधोरेखित करतात. त्यांनी लिहिलेल्या ‘परंपरा आणि नवता’ (१९६७) या समीक्षणात्मक लेख संहाचे मराठी समीक्षा ग्रंथांमधे महत्त्वाचे स्थान आहे.
विंदांच्या बालकविताही पारंपरिक बालगीतांपेक्षा वेगळ्या आहेत. त्यांच्या अद्भूतरम्य, गमतीदार व वैचित्र्यपूर्ण कल्पनांमुळे या बालकविता रसिकांवर छाप सोडून जातात. बालविश्र्वाशी समरसून नावीन्यपूर्ण कल्पनाशक्ती वापरून अनेक भन्नाट बालकविता त्यांनी लिहिल्या आहेत. एटू लोकांचा देश, पिशी मावशी आणि तिची भुतावळ या दीर्घ कवितांचा त्यात समावेश आहे. राणीचा बाग, एकदा काय झाले, अजबखाना, सर्कसवाला, परी गं परी, टॉप ह्यांसारख्या त्यांच्या बालकविता संग्रहांनी मुलांचे भावजीवन समृद्ध केले आहे.
त्यांच्या सर्वच लिखाणामधून संत तुकाराम महाराजांच्या काव्यातला परखडपणा व आशयघनता दिसून येते. त्यांच्या वेगळ्या जाणिवा, वेगळ्या प्रतिमा रसिकांना खिळवून ठेवतात.
‘मी च्या वेलांटीचा सुटो सुटो फास’ किंवा ‘अगा क्रियापदा, तुझ्या हाती अर्थ। बाकी सारे व्यर्थ, भाषेलागी।’
यातून त्यांचे वेगळेपण स्पष्ट होते.
‘देणार्याने देत जावे - घेणार्याने घेत जावे , घेता घेता एक दिवस - देणार्याचे हात घ्यावे’
किंवा
‘तीर्थाटन मी करीत पोचलो, नकळत शेवट तव दारी, अन् तुझिया देहात गवसली, सखये मज तीर्थे सारी’
या त्यांच्या कविताही विलक्षण परिणाम साधतात.
विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर व वसंत बापट या तीन कवींमुळे मराठी कविता महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात पोहोचली. हे तिघेही आपल्या कवितांचे एकत्रितपणे कविता वाचनाचे कार्यक्रम करत सार्या महाराष्ट्रभर फिरले.
विंदा करंदीकरांना त्यांच्या साहित्यातील देदिप्यमान कारकीर्दीसाठी जनस्थान पुरस्कार, कबीर पुरस्कार, सिनियर फुलब्राईट बहुमान असे अनेक पुरस्कार मिळाले. पण सर्वांत महत्त्वाचा, मानाचे पीस खोवणारा पुरस्कार म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार! या पुरस्काराने मराठी साहित्याचा झेंडा पुन्हा एकदा अखिल भारतीय स्तरावर, खर्या अर्थाने फडकला.