Get it on Google Play
Download on the App Store

शाहीर अण्णा भाऊ साठे

शाहीर अण्णा भाऊ साठे

वैयक्तिक दु:खांचा विचार न करता; आपले  विचार, कार्य व प्रतिभा यांच्या साहाय्याने लोककलेला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे आणि वंचितांच्या व्यथा प्रभावीपणे मांडणारे लोकशाहीर!

 

शाहीर अण्णा भाऊ साठे म्हणजे जातिभेदांमुळे, जातींच्या उतरंडीमुळे शिक्षणापासून, समग्र विकासापासून वंचित राहिलेल्या मातंग समाजातील एक समृद्ध व्यक्तिमत्त्व. त्या काळातील कुरुंदवाड संस्थानातील वटेगावमध्ये १९२० साली त्यांचा जन्म झाला. आई आणि घरातील मोठे लोक दोर वळण्याच्या कामाला जात. त्यांचे वडील पोटापाण्यासाठीच मुंबईत राहत असत. त्यामुळे लहान भावंडांना सांभाळण्याची जबाबदारी तुकारामांवर (अण्णांचे मूळ नाव) म्हणजेच अण्णा भाऊंवर होती. त्यांच्या वडिलांनी उच्चभ्रू आणि उच्चशिक्षित समाज मुंबईत पाहिल्याने आपल्या मुलांनी शिकले पाहिजे अशी त्यांची इच्छा होती. त्यांच्या आग्रहामुळेच वयाच्या १४ व्या वर्षी अण्णांनी प्राथमिक शिक्षणाला सुरुवात केली. परंतु तत्कालीन मागास जातींतील मुलांसाठी त्या काळी वेगळ्या शाळा होत्या. त्या मुलांशी शिक्षकांचे वर्तनही निर्दयीपणाचे होते. वाढलेले वय, सदोष शिक्षण पद्धती यांमुळे अण्णा फार दिवस शाळेत गेलेच नाहीत.

लहानपणापासूनच त्यांना विविध छंद होते. मैदानी खेळ खेळण्याचा त्यांचा पिढीजात वारसा असल्याने दांडपट्टा चालविण्यात त्यांचा हात धरणारा कोणी नव्हते. याशिवाय जंगलात एकटे भटकणे, पोहणे, मासेमारी, शिकार करणे, विविध पक्षांशी मैत्री करणे, जंगलातील पानाफुलांमधील सूक्ष्म फरक शोधणे असे एक ना अनेक छंद त्यांना होते. या छंदांमध्ये निरागसपणे बागडण्यातच त्यांचे बालपण गेले. मोठे होत असताना त्यांच्या आवडींमध्ये वाढच होत होती. लोकगीते पाठ करून ती टिपेच्या आवाजात म्हणणे, पोवाडे, लावण्या पाठ करणे, इतरांना त्या आत्मीयतेने म्हणून दाखवणे या छंदांमुळे त्यांच्याभोवती नेहमीच मित्र मंडळी जमलेली असत. रेठर्‍याच्या जत्रेत त्यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांचे भाषण ऐकले. त्याचा परिणाम अण्णा भाऊंवर झाला आणि ते स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होऊ लागले.

चळवळीत सामील होऊन लोकनाट्यांत छोटी मोठी कामे त्यांनी केली. याच काळात दुष्काळ पडल्याने अण्णांच्या वडिलांनी आपल्या कुटुंबाला मुंबईत न्यायचे ठरविले. त्याच वेळी अण्णा भाऊंचे बालपण संपले. वयाच्या ११ व्या वर्षी अण्णा आपल्या आई-वडिलांबरोबर मुंबईत आले. हे कुटुंब भायखळ्याच्या चांदबीबी चाळीत राहायला गेले. त्या काळी मुंबईत स्वस्ताई असल्याने सुरुवातीचा काळ सुखाचा गेला. मुंबईत फिरताना दोन गोष्टींकडे ते आकर्षिले गेले, एक म्हणजे विविध राजकीय संघटना आणि दुसरे म्हणजे मूक चित्रपट.

विविध राजकीय संघटनांचे ध्येय ब्रिटिशांना हाकलून देणे हेच होते. परंतु प्रत्येकाची विचारसरणी वेगळी होती. यांपैकी कम्युनिस्ट विचारसरणीचे अण्णा अनुयायी बनले. पक्षाच्या सभांचे आयोजन करणे, वॉलपेंटिंग करणे, हॅण्डबिले वाटणे, मोर्चे काढणे, छोट्या-मोठ्या सभेसमोर गोष्टी सांगणे, पोवाडे, लोकगीते म्हणून दाखविणे या सर्व गोष्टींमुळे कम्युनिस्ट वर्तुळात ते सर्वांना एकदम हवेहवेसे झाले. याच वेळी त्यांच्या तुकाराम या नावाचे अण्णा या नावात रूपांतर झाले.

मुंबईत पोटासाठी वणवण भटकत असताना अण्णांनी हमाल, बूट पॉलीशवाला, घरगडी, हॉटेल बॉय, कोळसे वाहक, डोअरकीपर, कुत्र्याला सांभाळणारा, मुलांना खेळविणारा, उधारी वसूल करणारा, खाण कामगार, ड्रेसिंगबॉय अशी नाना प्रकारची कामे केली. यावरून त्यांच्या कष्टमय जीवनाची आपल्याला कल्पना येते. या काळातच त्यांना सिनेमा पाहण्याचा छंद लागला. या छंदानेच त्यांना साक्षर बनविले. चित्रपटांच्या पाट्या, रस्त्यावरील दुकानांच्या बोर्डवरील अक्षरे जुळवित ते साक्षर झाले. या अक्षर ओळखीनंतरच त्यांना वाचनाची आवड निर्माण झाली.

वयाच्या १७-१८ व्या वर्षी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी अण्णांवर आली होती. गिरणी कामगार म्हणून त्यांच्या जीवनाला सुरुवात झाली होती. परंतु कोहिनूर मिलमधील नोकरी सुटल्याने त्यांच्यावर मोठेच संकट आले. या वेळी पुन्हा साठे कुटुंब वटेगावला आले. मुंबईतील धकाधकीचे जीवन, मोर्चे, सभा, सत्याग्रह, आंदोलने या सर्व गोष्टी पाहिलेल्या अण्णा भाऊंना वटेगावमध्ये राहणे शक्य होत नव्हते. अत्यंत अस्वस्थतेत त्यांनी घर सोडले आणि ते त्यांच्याच नातेवाईकांच्या तमाशाच्या फडात सामील झाले. अण्णा भाऊंचा धारदार आवाज, त्यांचे पाठांतर, पेटी, तबला, ढोलकी, बुलबुल ही वाद्ये वाजवण्याची कला या गुणांमुळे त्यांचे तमाशात स्वागतच झाले. महाराष्ट्राच्या तमाशा या कलेच्या परंपरेत मातंग समाजाने जी वैशिष्ट्यपूर्ण भर घातली ती शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या सहभागानेच. महाराष्ट्रातील लोकांना या वारणेच्या वाघाचे दर्शन पहिल्यांदा तमाशातच झाले. तमाशासारख्या कलेला अधिक प्रसिद्धी, प्रतिष्ठा, व समृद्धी अण्णा भाऊंनीच मिळवून दिली.

भारतीय स्वातंत्र्य चळवळीसह संयुक्त महाराष्ट्र चळवळीत, तसेच गोवा मुक्ती संग्रामाच्या वेळीही त्यांनी जनजागृतीचे प्रचंड काम केले. एक कलाकार म्हणून तसेच एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणूनही ते प्रत्येक उपक्रमात, आंदोलनात सहभागी होत असत. चलेजाव चळवळीच्या काळात वटेगावातही बर्डे गुरुजींच्या नेतृत्वाखाली अनेक घडामोडी सुरू होत्या. अण्णा भाऊ त्यात सामील असल्याने त्यांच्यावर वॉरंट निघाले. परिणामी त्यांनी कायमचे घर सोडले. पुढे त्यांना तत्त्वज्ञानाची, विचारांची एक दिशा मिळत गेली आणि त्यांनी कम्युनिस्ट पक्षाचे पूर्णवेळ काम करायला सुरुवात केली. पक्ष कार्यासाठी झोकून दिलेले असतानाच १९४४ साली त्यांनी ’लाल बावटा’ या कला पथकाची स्थापना केली. या वेळी शाहीर अमर शेख, शाहीर गव्हाणकर हे देखील त्यांच्या समवेत होतेच. या माध्यमातूनच त्यांच्या लिखाणाला सुरुवात झाली. लावण्या, पोवाडे, पथनाट्ये म्हणजे त्यांच्या ललित साहित्याची पूर्वतयारी होती. त्यांनी एकूण सुमारे १५ वगनाट्ये लिहिली व त्यातूनच त्यांना प्रसिद्धीही मिळत गेली.

१९४५ च्या दरम्यान मुंबईत अण्णांच्या आयुष्याला काहीशी स्थिरता लाभली. लोकयुद्ध साप्ताहिकात वार्ताहराचे काम करीत असताना त्यांनी अकलेची गोष्ट, खापर्‍या चोर, माझी मुंबई अशी गाजलेली लोकनाट्ये लिहिली. या काळातच संत साहित्यासह अनेक प्रतिभावंतांच्या अभिजात कलाकृती त्यांनी वाचून काढल्या. वैचारिक आणि कलाविषयक वाचनाची समृद्ध लेखक व्हायला त्यांना मदत झाली. अण्णांचे लेखक म्हणून यशाचे रहस्य म्हणजे त्यांनी नेहमी सामान्य वाचकाच्या मनाची व्यथा मांडली.सामान्य वाचकालाच प्रमाण मानल्याने वस्तुनिष्ठ असलेले त्यांचे साहित्य वाचकांच्या गळ्यातील ताईत बनले.

१९५० ते १९६२ हा त्यांचा साहित्य क्षेत्रातील सुवर्णकाळ होता. याच काळात त्यांच्या पुस्तकांच्या अनेक आवृत्ती निघाल्या. प्रचंड यशस्वी होत असताना त्यांचे स्वत:चे जीवन मात्र धकाधकीचे होत होते. मुंबई सरकारने ’लाल बावटा’ या कला पथकावर बंदी घातली होती. पुढे तमाशावरही बंदी आली. तमाशातील कलाकारांचे संसार देशोधडीला लागले. अण्णांनी तमाशाचे लोकनाट्यात रूपांतर करून तमाशा कलेचा उद्धार केला. तमाशाला लोकनाट्याचे वैभव मिळवून दिल्याने सरकारची बंदी कुचकामी ठरली.

या सुवर्णकाळातच त्यांनी वैजयंता, माकडीचा माळ, चिखलातील कमळ, वारणेचा वाघ, फकिरा अशा अनेक कादंबर्‍या लिहिल्या. ३०० च्या वर कथा लिहिल्या. खुळंवाडी, बरबाह्या कंजारी, कृष्णाकाठच्या कथा असे त्यांचे कथासंग्रहही प्रसिद्ध आहेत. त्यांनी स्टॉलीनग्राडचा पोवडा, महाराष्ट्राची परंपरा, मुंबईचा कामगार असे पोवाडेही लिहिले. निवडणुकीत घोटाळे, दुष्काळात तेरावा, अकलेची गोष्ट ही त्यांची वगनाट्ये प्रसिद्ध आहेत. दोनशे-अडीचशे गाणी, लावण्या त्यांनी लिहिल्या आहेत. कामगारांमध्ये त्यांची गाणी आणि लावण्या लोकप्रिय आहेत.

मराठीतील ग्रामीण, प्रादेशिक, दलित साहित्यावर अण्णा भाऊंचे प्रभुत्व होते. अण्णा भाऊंच्या साहित्याचे हिंदी, गुजराती, उडीया, बंगाली, तमीळ, मल्याळी या भारतीय भाषांबरोबरच रशियन, झेक, पोलीश, इंग्रजी, फ्रेंच अशा जगातील २७ भाषांमधे भाषांतर झाले आहे. लेखणीचे हत्यार बनवून त्यांनी पुरोगामी, विज्ञाननिष्ठ, स्त्रीवादी, लढाऊ अविष्काराचा दीपस्तंभ मराठी साहित्याच्या क्षेत्रात उभा केला. एवढ्या मोठ्या कर्तृत्वामुळे त्यांना प्रसिद्धी मिळत होती. अण्णांच्या १२ कथांवर चित्रपट निघाले. एवढे साहित्य प्रसिद्ध झाले तरी त्यांचे दारिद्रय संपले नाही. लक्ष्मी त्यांना प्रसन्न नव्हती. ते मितभाषी असल्याने व्यावहारिक बाबतीत लोकांनी त्यांचा गैरफायदा घेतला. परंतु चित्रपट सृष्टीतील भालजी पेंढारकर, सूर्यकांत मांढरे, जयश्री गडकर, सुलोचना यांसारख्या दिग्गज कलाकारांनी अण्णांवर खूप प्रेम केले. हिंदी चित्रपट सृष्टीतीलही राजकपूर, शंकर, शैलेंद्र, बलराज सहानी, गुरुदत्त, उत्पल दत्त या कलाकारांचे अण्णांवर प्रेम होते. ऑलेगसारखे रशियन कलावंतही अण्णा भाऊंचे मित्र होते.

लौकिक अर्थाने कोणतेही शिक्षण न घेता साहित्य क्षेत्रात जगप्रसिद्ध झालेला हा कलाकार काही दुर्दैवी (वैयक्तिक कौटुंबिक) संघर्षांमुळे खचत गेला. त्यांच्या शेवटच्या काळात महाराष्ट्र सरकारने त्यांना बरेच सहकार्य केले.  मनाने खचल्यानेच १८ जुलै, १९६९ रोजी अण्णा भाऊंचे निधन झाले. त्यांच्या साहित्याच्या व कार्याच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक अन्यायामुळे जो समाज शैक्षणिक, सांस्कृतिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे, त्या समाजामध्ये आत्मविश्र्वास व प्रगतीची आस निर्माण केली.

महाराष्ट्राचे शिल्पकार

अभिषेक ठमके
Chapters
प्रस्तावना छत्रपती शिवाजी महाराज महात्मा - फुले लोकमान्य टिळक राजर्षी शाहू महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर संत श्री ज्ञानेश्वर संत तुकाराम समर्थ रामदास संत नामदेव संत एकनाथ शहाजीराजे भोसले राजमाता जिजाबाई बाजीप्रभू देशपांडे तानाजी मालुसरे श्रीमंत बाजीराव पेशवे तात्या टोपे झाशीची राणी लक्ष्मीबाई वासुदेव बळवंत फडके सावित्रीबाई फुले संत गाडगेबाबा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर प्रबोधनकार ठाकरे कर्मवीर भाऊराव पाटील आचार्य विनोबा भावे साने गुरुजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बाबा आमटे कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे एस. एम. जोशी यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील बाळासाहेब ठाकरे शरद पवार डॉ. इरावती कर्वे डॉ. य. दि. फडके शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे डॉ. वसंत गोवारीकर जयंत विष्णू नारळीकर डॉ. रघुनाथ माशेलकर डॉ. विजय भाटकर श्री.वालचंद हिराचंद दोशी डॉ.विठ्ठलराव विखे पाटील प्रा.धनंजयराव गाडगीळ शंतनुराव किर्लोस्कर जहांगीर रतन दादाभॉय (जे. आर. डी.) टाटा राहूल बजाज बी. जी. शिर्के केशवसुत-कृष्णाजी केशव दामले दादासाहेब फाळके पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर बहिणाबाई नथूजी चौधरी राम गणेश गडकरी बालगंधर्व केशवराव भोसले वि. स. खांडेकर प्रल्हाद केशव अत्रे व्ही. शांताराम बा.सी.मर्ढेकर कुसुमाग्रम -वि.वा.शिरवाडकर शाहीर अमर शेख गोविंद विनायक (विंदा) करंदीकर सुधीर फडके गजानन दिगंबर माडगूळकर (गदिमा) पु.ल.देशपांडे डॉ.सरोजिनी बाबर शाहीर अण्णा भाऊ साठे पंडित भीमसेन जोशी लता मंगेशकर किशोरी आमोणकर आशा भोसले शांता शेळके नारायण गंगाराम सुर्वे विजय तेंडुलकर शाहीर साबळे बाबुराव रामचंद्र बागूल सुरेश भट विठाबाई भाऊ (मांग) नारायणगावकर दया पवार सचिन तेंडुलकर खाशाबा जाधव सुनील गावस्कर अभिजित कुंटे निळू फुले संदर्भ सूची - व्यक्तिमत्त्वे