Get it on Google Play
Download on the App Store

पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर

पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर

भारतीय शास्त्रीय संगीताला शास्त्रबद्ध चौकटीत बसविणारे आणि सर्वप्रथम त्याचे दस्तावेजीकरण करणारे श्रेष्ठ संगीततज्ज्ञ!

संगीताचे लोकशाहीकरण करणारे, ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रगीत सभेमध्ये म्हणण्याचा प्रघात सुरू करून त्याला सुंदर चाल देऊन ते अजरामर करणारे, राष्ट्रीय बाण्याचे संगीतातील ‘युगपुरुष’ म्हणजे पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर हे होत.

पश्र्चिम महाराष्ट्रातील कुरुंदवाड संस्थानात नारळी पौर्णिमेला विष्णू दिगंबर पलुस्कर यांचा जन्म झाला. यांचे वडील दिगंबर गोपाळ पलुस्कर हे कुरुंदवाड संस्थानचे अधिपती श्रीमंत दाजीसाहेब पटवर्धन यांच्या आश्रयाला होते. ते एक उत्तम कीर्तनकार म्हणून  प्रसिद्ध होते. वडिलांना कीर्तनात साथ करता करताच लहानपणापासून विष्णू दिगंबर यांच्यावर संगीताचे संस्कार घडत होते. विष्णू पलुस्कर यांचा आवाज गोड व मोठा असल्यामुळे साध्या गाण्यानेही त्यांची छाप श्रोत्यांवर पडत असे. श्रीमंत दाजीसाहेब पटवर्धन यांचा लोभ पहिल्यापासूनच विष्णुवर होता. त्यांच्या आशीर्वादानेच त्यांचे इंग्रजी सहावीपर्यंत शिक्षण झाले. पुढील आयुष्य हे आपल्या वडिलांप्रमाणेच कीर्तने करून,  संस्थानात एखादी नोकरी करून जीवन व्यतीत करावे असा त्यांचा विचार होता. मात्र नियतीला काही वेगळेच घडवायचे होते.

कुरुंदवाड संस्थानापासून जवळच्याच अंतरावर असणारे दत्ताचे स्थान म्हणजे नरसोबाची वाडी. येथे दत्त जयंतीला तेथील मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात शोभेची दारू उडवीत असत. विष्णुपंत हे दारुकाम पाहत असताना मोठा अपघात झाला व त्यात विष्णुपंतांच्या चेहर्‍यावर शोभेची दारू उडाली.  श्रीमंत दाजीसाहेब पटवर्धन यांनी त्यांना मिरजेला औषधोपचारासाठी पाठवले. त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. भडभडे विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्याकडून भजने गाऊन घेत असत. डॉ. भडभडे यांना तो आवाज खूप आवडला. इलाज चालू होता मात्र गुण येत नव्हता. दुर्दैवाने विष्णुपंतांना आपले डोळे कायमचे गमवावे लागले. पुढे काय हा प्रश्न पडला असतानाच डॉ. भडभडे यांनी सुचवले की, विष्णुपंतांनी आपल्या आवाजाचा उपयोग करून संगीत शिकावे. ही कल्पना त्यांनी मिरजेचे अधिपती बाळासाहेब पटवर्धन यांच्याकडे मांडली. बाळासाहेब पटवर्धनांनी विष्णुपंतांना आपल्याच दरबारातील राजगवयांकडे संगीत शिक्षण द्यायचे ठरवले. त्यांचे गान विद्येचे शिक्षण मिरजेला १८८७ साली, वयाच्या १५ व्या वर्षी सुरू झाले.

महाराष्ट्रात संगीत क्षेत्रातील ‘पितामह’ म्हणून ओळखले जाणारे गायनाचार्य बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर हे मिरजेच्या दरबारी राज गायक होते. विष्णुपंतांनी सलग ९ वर्षे पंडित बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांच्याकडे गुरुकुल पद्धतीने गानविद्या ग्रहण केली. १२-१२ तास  रियाज करून उरलेल्या वेळात गुरूंनी सांगीतलेली कामे करणे अशा प्रकारे त्यांनी संगीत शिक्षण घेतले.

विष्णुपंत हे चौकस असल्यामुळे आजुबाजुच्या परिस्थितीचा विचार या काळात करू लागले होते. संगीतकला ही केवळ राजगृहापुरतीच मर्यादित होती. गवई हा राजाश्रीत असल्यामुळे त्याला राजाची मर्जी सांभाळून जीवन जगावे लागत होते. कलाकारांना समाजात प्रतिष्ठा नव्हती. संगीत शिकताना आवश्यक सोयी-सुविधा, विशिष्ट असा अभ्यासक्रम, पुस्तके अशी उपलब्ध नव्हती. आपण केवळ गायक न राहता या सर्व गोष्टींसाठी काम करायचे व संगीतविश्र्वात परिवर्तन घडवायचे असा क्रांतिकारी विचार करून त्यांनी आपल्या आयुष्याचे ध्येय ठरविले.

१८९६ साली नारळी पौर्णिमालाच त्यांनी आयुष्यातील ध्येयप्राप्तीसाठी मिरज सोडले. गाठीशी विशेष पैसा नव्हता. तरीही केवळ पोटापाण्याच्या मागे न लागता महत्त्वाकांक्षेने त्यांनी संपूर्ण भारतभर फिरण्यास सुरुवात केली. प्रथम ते काही दिवस सातारा येथे राहिले. नंतर बडोद्याला एका राममंदिरात निवारा घेतला. राजाश्रयाला न जाता स्वतंत्र गाण्याच्या मैफिली करून सर्व जनतेपर्यंत आपली गायकी पोहोचवायची व त्यातून झालेल्या अर्थप्राप्तीतून ध्येयकार्य उभे करायचे, या तत्त्वावरच त्यांनी बडोद्यात जनमानसात आपले स्थान तयार केले. बडोद्याहून ते सौराष्ट्रात गेले. तेथे राजकोट, जुनागढ वगैरे अनेक ठिकाणी त्यांच्या मैफिली झाल्या. यातून ‘सार्वजनिक संगीत जलसा’ ही नवी पद्धत त्यांनी १८९७ साली राजकोट येथून सुरू केली. सर्व इच्छूक रसिकांना प्रवेश शुल्क भरून संगीताचा आस्वाद घेता यावा, केवळ ठरावीक लोकांचीच ती मक्तेदारी असू नये हा त्यामागचा हेतू. या ‘संगीत जलसा’ पद्धतीमुळेच त्यांनी संगीताचे लोकशाहीकरण केले असे म्हटले जाते. ते पुढे ग्वाल्हेरला आले. ग्वाल्हेर हे त्यांच्या गायन परंपरेचे स्थान असल्यामुळे त्यांना त्या ठिकाणाविषयी विशेष आकर्षण होते. ग्वाल्हेरमध्ये अनेक बड्या मंडळींमध्ये त्यांची उठबस सुरू झाली. त्यांच्या गायनाचा आस्वाद अनेकांना घेता आला. अनेक संगीततज्ज्ञ लोकांकडून त्यांच्या गाण्याची तारीफ झाली. तेथूनच ते पुढे मथुरेस गेले.

मथुरेमध्ये त्यांनी अधिक काळ व्यतीत केला. तेथे राहून त्यांनी केवळ मैफिली केल्या नाहीत, तर शास्त्रीय संगीताच्या चीजांची रचना ज्या ब्रज भाषेतून केली जाते, त्या भाषेचा अभ्यास केला. हिंदी भाषेवर प्रभुत्व मिळविले. मथुरेतील प्रसिद्ध ध्रुपद गायक पं. चंदन चोबे यांच्याकडून ध्रुपद गायकीचेही शिक्षण घेतले व काही ध्रुपदांची स्वररचनाही त्यांनी केली. काही प्राचीन ग्रंथांचा अभ्यास त्यांनी इथे केला.

मथुरा, भरतपूर, दिल्ली, जालंधर असा प्रवास करणार्‍या पंडितजींची कीर्ती उत्तर भारतात पसरली. सर्व ठिकाणी आपल्या गायनाची छाप पाडत त्यांनी बराच लोकसंग्रह केला. त्यांच्या कार्यासाठी हे आवश्यक होते. पंजाबमधील दौरे चालू असताना पंजाबमधील एक प्रतिष्ठीत सर बाबा खेमसिंह वेदी यांनी आपल्या गावी, आपल्या नातवाला संगीत शिकवण्यासाठी पंडितजींना आमंत्रित केले. पंडितजींना जे संगीत शिक्षणाचे कार्य करायचे होते, त्यासाठी काही काळ अभ्यास करायचाच होता. थोडा निवांतपणा या ठिकाणी मिळेल या विचाराने ते पंजाबात गेले.

येथे पलुस्करांनी भारतीय संगीतात स्वरलेखन करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. बुद्धीच्या, अभ्यासाच्या व प्रतिभेच्या जोरावर त्यांनी उपयुक्त अशी स्वरलेखन पद्धती (नोटेशन) निर्माण केली. मंद्र, मध्य, तार या तीन सप्तकांना वेगळे तीन स्तंभ, कोमल व तीव्र स्वरांसाठी विशिष्ट खुणा, तालनिदर्शक वेगळी चिन्हे, या सर्व गोष्टींसह त्यांनी एक वेगळीच स्वरलेखनपद्धती सुरू केली. स्वरलेखन पद्धती निश्र्चित झाल्यावर गुरूकडून मिळालेल्या अनेक चीजांचे स्वरलेखन त्यांनी केले. ते संगीताचे विद्यालय, त्यासाठीचा विशिष्ट असा अभ्यासक्रम, त्याची पाठ्यपुस्तके या विषयीच्या योजनाही तयार करत होते. पुढे ते लाहोर येथे आले.

लाहोर येथे आल्यावर त्यांनी आपल्या सर्व स्नेह्यांना आपणास संगीताचे विद्यालय उभे करायचे आहे असे सांगितले व सर्वांचा पाठिंबा मिळवला. पं. दीनदयाळ शर्मा यांनी सुचवलेले ‘गांधर्व महाविद्यालय’ हे नाव सर्वांना पसंत पडले. आजतागायत याच नावाने कार्यरत असलेल्या ‘गांधर्व महाविद्यालयाची’ स्थापना लाहोर येथे दिनांक ५ मे, १९०१ रोजी झाली. भारतीय शास्त्रीय संगीताच्या इतिहासात सोनेरी अक्षरांनी लिहून ठेवावी अशी ही घटना!  ज्या काळात एखादा विषय घेऊन त्याचा अभ्यास करणे, शास्त्रशुद्ध अभ्यासक्रम तयार करणे व सर्वांपर्यंत तो पोहोचवणे या गोष्टींचा विचार भारतीय मनात रुजलाही नव्हता त्या काळात त्यांनी हे पुरोगामी कार्य केले. तसेच त्यांनी संगीत क्षेत्रात संस्थीकरण किंवा मंडळीकरणाचेही प्रमुख कार्य केले.

 

भारतीय संगीताची आवड सर्व स्तरांतील लोकांमध्ये निर्माण व्हावी. राजापासून रंकापर्यंत सर्वांना भारतीय संगीताचे शिक्षण घेता यावे. याचबरोबर संगीताला एक सांस्कृतिक वैशिष्ट्य मानले जावे. केवळ मनोरंजन हा याचा उद्देश नसावा. कलाकारांना समाजात मानाचे स्थान मिळावे . या सर्व हेतूंनी त्यांनी या महाविद्यालयाची स्थापना केली.

गांधर्व महाविद्यालयाच्या कार्यात ते स्वत: जातीने लक्ष घालत असत. स्वरसाधनेवर पंडितजींचा विशेष भर असे. संगीताचा रियाज, स्वरसाधना या गोष्टी ते विद्यार्थ्यांकडून काटेकोरपणे करून घेत असत. विद्यार्थ्याला केवळ संगीताचे शिक्षण देऊन त्याचा पूर्ण विकास होत नाही, तर तो चारित्र्यवान असला पाहिजे, समाजात त्याला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे या दृष्टीनेही या विद्यालयात विद्यार्थ्यांवर संस्कार केले जात असत. जनमानसात हे केवळ विद्यालय न राहता एक उत्कृष्ट गुरुकुल बनले होते.पंडितजी आपल्या शिष्यांना नेहमी सांगत की, ‘भारतीय संगीताचा सर्वत्र जयजयकार झाला पाहिजे.’

लाहोरमधील या संगीत विद्यालयात क्रमिक पुस्तकांच्या छपाईसाठी एक छापखानाही सुरू करण्यात आला. विद्यालयातर्फे ‘संगीतामृत प्रवाह’ या नावाचे हिंदी मासिकही पंडितजींनी चालवले. या मासिकातून देशभक्तीपर गीते स्वरलिपीसहीत लिहून त्यांचा प्रचार केला जाई.

१९०१ ते १९०८ या कालावधीत लाहोरमधील त्यांचा व्याप वाढला. लाहोरनंतर मुंबई येथे १९०८ च्या दसर्‍याच्या मुहूर्तावर जगद्गुरू शंकराचार्य यांच्या हस्ते ‘गांधर्व महाविद्यालयाचे’ उद्‌घाटन करण्यात आले.

प्रथम गिरगाव बँक मार्गावर (विठ्ठलभाई पटेल रोड) हे संगीत विद्यालय सुरू झाले. पूर्वीचा आठ वर्षांचा अनुभव, शिस्त, पद्धतशीरपणा, शिक्षण देण्याची सुलभ पद्धत या सर्व गुणांमुळे थोड्याच कालावधीत विद्यालयाची ख्याती मुंबईभर पसरली व आहे ती जागा कमी पडू लागली. विद्यार्थ्यांची संख्या इतकी वाढली की क्रमिक पुस्तकांचा छापखाना मुंबईस हालवण्यात आला. वाद्यांच्या दुरुस्तीसाठी पंडितजींनी ‘म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स सप्लाईंग कं.’ सुरू केली. मुंबईमध्येही ‘गांधर्व महाविद्यालय’ या नावाने मराठी मासिक त्यांनी चालू केले. अनेक नवीन क्रमिक पुस्तके प्रसिद्ध केली. इतर अभ्यासक्रमांप्रमाणे संगीत अभ्यासक्रमातही पदवी असावी, पदवीदान समारंभ असावा, व ती पदवी मान्यताप्राप्त व्हावी यासाठी त्यांनी धडपड चालू केली. या त्यांच्या इच्छेचे व धडपडीचे फळ म्हणजे गांधर्व महाविद्यालयाचा पहिला पदवीदान समारंभ १९११ साली मुंबईचे त्या वेळचे गव्हर्नर लॉर्ड सिडनेहॅम यांच्या हस्ते मोठ्या थाटात साजरा झाला. या घटनेमुळे गांधर्व महाविद्यालयाची प्रतिष्ठा अधिकच वाढली. पुढे पंडितजींनी ‘संगीत बाल प्रकाश’ व रागांवरील सुमारे १८ खंड - हे ग्रंथ लिहून प्रकाशित केले.

मुंबईतील कार्याचा व्याप वाढल्यामुळे मुंबई ही गांधर्व महाविद्यालयाची उपशाखा न राहता प्रमुख कार्यालयच झाले. नवी स्वतंत्र इमारत बांधण्यात यश आले. गांधर्व महाविद्यालयाच्या स्वतंत्र, मोठ्या वास्तुत अनेक कार्यक्रम होऊ लागले.

मुंबईतील इमारतीसाठी काढलेल्या कर्जाची परतफेड करण्याचे प्रयत्न कसोशीने करूनही कर्जफेड पूर्ण होत नव्हती. आर्थिक अडचणी निर्माण झाल्या.  हा मोठा धक्का पंडितजींना सहन झाला नाही. तेव्हापासून त्यांची प्रकृती खालावली. पुढील काळात नाशिकला आल्यावर रामभक्तीकडे त्यांचे लक्ष अधिक वळले. रामायणावरील प्रवचने व कीर्तने यासाठी त्यांचे दौरे मोठ्या प्रमाणावर होऊ लागले.  त्यांचे अनेक शिष्य भारतभर दूरपर्यंत पोहचले होते. अनेक शाखा भारतभर स्थापन झाल्या होत्या. हिंदुस्थानी संगीताच्या प्रचाराचे कार्य अनेक शिष्यांमार्फत सर्वदूर होत आहे, चारित्र्यवान कलावंत म्हणून त्यांच्या शिष्यांना प्रतिष्ठा मिळत आहे, हे पाहून ते दु:ख विसरले. आपले खरे ध्येय सफल झाले याचा त्यांना परमानंद झाला व प्रभू रामचंद्रानेच हे सर्व करवून घेतले या समाधानात ते पुढील कार्य करत राहिले.

पंडितजींनी संगीताला प्रतिष्ठा मिळवून दिली. स्त्रियांनाही संगीत शिकण्याचा हक्क आहे हे सिद्ध व रूढ करण्यासाठी त्यांनी स्वत:च्या पत्नीला संगीत शिकवले. पुढे अनेक स्त्रियांनी गांधर्व महाविद्यालयात संगीताचे शिक्षण घेतले. याचा परिणाम आज आपण पाहतच आहोत. जुन्या बुरसटलेल्या प्रथा मोडून त्यांनी संगीताचे सार्वत्रिकीकरण केले. ‘सार्वजनिक संगीत जलसा’,  संगीत परिषद या प्रकारचे नवीन उपक्रम त्यांनी सुरू केले. पं. ओंकारनाथ ठाकूर, पं. विनायकबुवा पटवर्धन यांच्यासारखे शिष्य त्यांच्या तालमीत घडले. त्यांचे पुत्र डी. व्ही. पलुस्कर हेही त्यांची परंपरा पुढे नेण्याइतपत ‘तयार’ झाले.

‘रघुपती राघव राजाराम’ हे भजन त्यांनी अजरामर केले. महात्मा गांधीजींच्या दांडी यात्रेवेळी  पंडितजींनी दिलेल्या चालीवर ‘रघुपती राघव राजाराम’ ही धून गायली गेली व त्या तालावर हजारो लोकांची पावले दांडी यात्रेत पुढे मार्गक्रमण करू लागली. या भजनाप्रमाणेच ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताला पंडितजींमुळेच लोकप्रियता मिळाली. १९०७ मध्ये लाहोर येथे लाला लजपतराय व अजितसिंग यांना अटक झाल्यावर ‘पगडी सम्हाल ओजट्टा’ व कवी इक्बाल यांचे ‘सारे जहांसे अच्छा’ - या राष्ट्रभक्तीपर गीतांना स्वरबद्ध करून ती लोकप्रिय करण्याचे श्रेयही पंडितजींनाच जाते.

त्यांचे सुरांच्या माध्यमातून व्यक्त होणारे राष्ट्रप्रेम बघून अनेक राष्ट्रीय सभांना ‘वंदे मातरम्’ गाण्यासाठी त्यांना निमंत्रण येत असे. १९२३ साली कॉंग्रेसच्या अधिवेशनात पलुस्करांना निमंत्रित केले होते. त्यांनी अनेक सभा, संमेलने, अधिवेशने यांमध्ये ‘वंदेमातरम्’ प्रभावीपणे सादर करून या ‘राष्ट्रमंत्रा’ चा प्रसार केला, लोकांना प्रेरित केले.

‘कलावंताने देशातील परिस्थितीची जाणीव ठेवली पाहिजे. लोक जरी करमणुकीसाठी आले असले, तरी कलावंताने आपली जबाबदारी ओळखून परिस्थितीशी सुसंगत असे वर्तन केले पाहिजे तरच कलावंताचा दर्जा समाजात वाढेल.’ हा विचार त्यांनी वेळोवेळी मांडला, स्पष्ट केला. अशा प्रकारचे अनेक प्रसंग पंडितजींमधील राष्ट्रभक्ती व सामाजिक जाणीवेचे पुरेपूर दर्शन घडवितात.

हळूहळू पंडितजींची प्रकृती अधिक बिघडत होती. ही बातमी मिरजेचे अधिपती श्रीमंत बाळासाहेब पटवर्धन यांच्या कानावर गेली. श्रीमंतांनी ताबडतोब त्यांना मिरजेला आणले व आपल्या देखरेखीत त्यांच्यावर औषधोपचार सुरू केले. परंतु अखेरीस दि. २१ ऑगस्ट, १९३१ रोजी दुपारी दीडच्या सुमारास पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर या क्रांतिकारी संगीततज्ज्ञाची प्राणज्योत मालवली. मिरज येथूनच त्यांनी जीवनकार्यास सुरुवात केली व तेथेच त्यांच्या जीवनाची अखेर झाली. आजची तरूण पिढीही त्यांचे नाव अभिमानाने घेते. काही संगीत क्षेत्रातील कार्यकर्ते आजही गांधर्व महाविद्यालयाची धुरा समर्थपणे वाहत आहेत, आणि या संगीत क्षेत्रातील क्रांतिकारकाची स्मृती चिरंतन ठेवत आहेत.

महाराष्ट्राचे शिल्पकार

अभिषेक ठमके
Chapters
प्रस्तावना छत्रपती शिवाजी महाराज महात्मा - फुले लोकमान्य टिळक राजर्षी शाहू महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर संत श्री ज्ञानेश्वर संत तुकाराम समर्थ रामदास संत नामदेव संत एकनाथ शहाजीराजे भोसले राजमाता जिजाबाई बाजीप्रभू देशपांडे तानाजी मालुसरे श्रीमंत बाजीराव पेशवे तात्या टोपे झाशीची राणी लक्ष्मीबाई वासुदेव बळवंत फडके सावित्रीबाई फुले संत गाडगेबाबा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर प्रबोधनकार ठाकरे कर्मवीर भाऊराव पाटील आचार्य विनोबा भावे साने गुरुजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बाबा आमटे कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे एस. एम. जोशी यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील बाळासाहेब ठाकरे शरद पवार डॉ. इरावती कर्वे डॉ. य. दि. फडके शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे डॉ. वसंत गोवारीकर जयंत विष्णू नारळीकर डॉ. रघुनाथ माशेलकर डॉ. विजय भाटकर श्री.वालचंद हिराचंद दोशी डॉ.विठ्ठलराव विखे पाटील प्रा.धनंजयराव गाडगीळ शंतनुराव किर्लोस्कर जहांगीर रतन दादाभॉय (जे. आर. डी.) टाटा राहूल बजाज बी. जी. शिर्के केशवसुत-कृष्णाजी केशव दामले दादासाहेब फाळके पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर बहिणाबाई नथूजी चौधरी राम गणेश गडकरी बालगंधर्व केशवराव भोसले वि. स. खांडेकर प्रल्हाद केशव अत्रे व्ही. शांताराम बा.सी.मर्ढेकर कुसुमाग्रम -वि.वा.शिरवाडकर शाहीर अमर शेख गोविंद विनायक (विंदा) करंदीकर सुधीर फडके गजानन दिगंबर माडगूळकर (गदिमा) पु.ल.देशपांडे डॉ.सरोजिनी बाबर शाहीर अण्णा भाऊ साठे पंडित भीमसेन जोशी लता मंगेशकर किशोरी आमोणकर आशा भोसले शांता शेळके नारायण गंगाराम सुर्वे विजय तेंडुलकर शाहीर साबळे बाबुराव रामचंद्र बागूल सुरेश भट विठाबाई भाऊ (मांग) नारायणगावकर दया पवार सचिन तेंडुलकर खाशाबा जाधव सुनील गावस्कर अभिजित कुंटे निळू फुले संदर्भ सूची - व्यक्तिमत्त्वे