Get it on Google Play
Download on the App Store

अध्याय २

श्रीगणेशाय नमः । श्रीदत्तात्रेयाय नमः ।

सूत सांगे ऋषींप्रती । सौराष्ट्रदेशींचा भूपती । देवनगरी चक्रवती । धर्मनीती राज्य करी ॥१॥

वेदशास्त्रार्थ तत्त्वज्ञ । धर्मशास्त्री अतिप्राज्ञ । सकलकला अभिज्ञ । जो का मान्य भूलोकी ॥२॥

निजकांति सुलक्षणे । चंद्रसूर्यासि आणिले उणे । स्वरूपी लाजोनि मदन म्हणे । व्यर्थ जिणे जगोनिया ॥३॥

ज्याचे अवलोकून विद्याचातुर्य । खिन्न होय सुराचार्य ॥ प्रतापे जाहला हतवीर्य । अनल स्वये ज्यापुढे ॥४॥

गांभीर्ये उणा समुद्र जाण ॥ गरिबा भासे वैश्रवण । क्षमा ज्याची परिपूर्ण । पृथ्वीहून विशेष पै ॥५॥

ज्याचे अमात्य पाच बळी । त्यांची ऐका नामावळी । ज्याणी पराक्रमे अवनीतळी । राजमंडळी जिंकिली ॥६॥

पहिला रूपवान नामे चतुर । दुसरा विद्याधीश साचार । तिसरा तो क्षेमकर । ज्ञानगम्य चौथा पै ॥७॥

पाचवा तो सुबळ । ऐसे पाच अमात्य सबळ । ज्याणीं जिंकोनिया महीतल । सकल भूपाल वश केले ॥८॥

अमित ज्याचा सेनागण । रथ तुरंगम वारण । पदातिवीरा गणील कोण । अग्नियंत्रधर असंख्य पै ॥९॥

ऐसा तो महाराज । सोमकांतनामे भूभुज । सुधर्मानामे त्याची भाज । गुणशालिनी सहज पै ॥१०॥

अनुपम्य सौंदर्याची खाणी । जीते पाहून लाजल्या रमणी । रति रंभा तिलोत्तमा गुणी । ऐसी तरुणी सुंदर ते ॥११॥

कनकलतिका गजगामिनी । सिंहकटी चक्रवाकस्तनी । वस्त्राभरणे सीमंतिनी । युक्त अनुदिनी सर्वदा ॥१२॥

महासाध्वी पतिव्रता । ईश्वरवत माजी निज भर्ता । अतिथीदेवदानरता । पत्योद्देशे व्रतस्थ जी ॥१३॥

ऐशी ती राजमहिषी सुलक्षणा । सेवी सदा पतिचरणा । क्रीडाकौतुके क्षणक्षणा । भुपमंडणा रिजवी सदा ॥१४॥

हेमकंठ नामे सुपवित्र । तिचे उदरी जाहला पुत्र । शुभलक्षणी कीर्तिपात्र । जे का छत्र प्रजेचे ॥१५॥

ऐसा तो सोमकांत भूपाळ । प्रजा पाळी पुत्रवत् केवळ । धर्म नीतीने अवनीतळ । भोगी सकळ निजसत्ता ॥१६॥

ऐसा असता भूपती । गहन वोढवली कर्मगती । भोगिल्यावाचोनि निश्चिती । त्याची गती खुंटेना ॥१७॥

गलितकुष्ठ अकस्मात । शरीरी जाहले अत्यद्‌भुत । तेणे दुःखे सोमकांत । अतिदुःखित जाहला ॥१८॥

शरीर अवघे नासले । क्षते पडूनि रक्त गळे । दंश करिता जेवि व्याळे । शरीरी आतळे वेदना ॥१९॥

झडो लागले हातपाय । त्यांतोन गळे दुर्गंधी पूय । छिन्न भिन्न दिसे काय । मक्षिकासमुदाय घोंगावे ॥२०॥

शरीरी जाहला अस्थिशोष । राजयक्ष्मा तो विशेष । क्षीणशक्ती निःशेष । नर विशेष जाहला ॥२१॥

ऐसी भोगिता आपदा । चिंताव्याकुल जाहला सदा । बोलाऊनि अमात्यवृंदा । म्हणे संपदा सांभाळा ॥२२॥

कर्माची ओढवली गहनगती । मज ह्या वेदना न साहती । वना जाईन निश्चिती । पुण्यगति साधीन पै ॥२३॥

शरीरी नसे समाधान । धिग् राज्य हे यौवन । धिग् विलास अंगनारत्‍न । मजलागोन कायसे ॥२४॥

अंगतेजे रोहिणीकांत । जिंकिला म्हणोनि सोमकांत ॥ नाम पावलो निश्चित । उमाकांत आराधिला ॥२५॥

सप्तदश रोज रज । सेवन केले नित्य सहज । पाहिली नाही परकी भाज । संन्यासि पूज्य सेविले ॥२६॥

पुत्रवत्‌ प्रजापालन केले । धेनु ब्राह्मणासी रक्षिले । परोपकारी झिजविले । शरीर आपुले सत्कार्या ॥२७॥

नाही धरिली दुष्टसंगती । शरणांगत रक्षिले निश्चिती । परि पूर्वील ही दुष्कर्मगती । काय रिती तिणे केली ॥२८॥

तुम्ही वृद्ध अमात्य निश्चिती । हेमकंठबाळ धरोनि हाती । राज्य चालवा यथानीती । माझी खंति करू नका ॥२९॥

मी पावोनिया तपोवन । करीन कर्माचे खंडण । तेणे परलोकी सुखसंपन्न । अक्षय पदी नांदेन मी ॥३०॥

ऐसे बोलोनि नरकेसरी । दुःखे व्याकुळ होऊन अंतरी । मूर्छित पडला धरणीवरी । तरूपरी चंडवाते ॥३१॥

राजा पडता मूर्छित । धावोनि आले दारासुत । सोयरे नागरीकजन समस्त । शोक करिती आक्रोसे ॥३२॥

कपाळ पिटोनिया करी । राजांगना शोक करी । रुदन करी दीर्घस्वरी । नगरनारी समवेत ॥३३॥

आक्रोशे रडती सेवकजन । हेमकंठ करी रुदन । वृद्ध मंत्री तेथे येऊन । उपाय करू लागले ॥३४॥

महामंत्र महौषधी । उदके सिंपिती संधिसंधी । तेणे जाऊनि मूर्च्छाव्याधी । उठोनि आधी बैसविला ॥३५॥

स्वस्थ करोनिया मानसी । प्रधान बोलती रायासी । तव प्रसादे इंद्रासी । समभाग्यासी भोगीतो ॥३६॥

तूच सुखनिधी सकळाते । जाऊ म्हणसी वनवासाते । मृतप्राय आम्हा जनाते । सुख केउते होईल ॥३७॥

बलवान रिपुघ्न प्रभूतकोश । हेमकंठ हा नरेश । राज्य करील चालवील वंश । आम्ही येऊ तुजसवे ॥३८॥

ऐकोन त्याचे ऐसे वचन । आसुवे भरूनिया नयन । बोले सुधर्मा अंगनारत्‍न । सहगामिनी मी असे ॥३९॥

पतीचे सुखदुःख विभागाशी । कुलांगना त्याचेसरशी । याचे राज्यसुखसोहळ्याशी । पूर्वी मजशी विभाग ॥४०॥

आता महादुःखाचा अवसर । त्याभागी मी अग्रसर । याचेसवे टाकोन शरीर । परलोकतर पावेन पै ॥४१॥

हेमकंठ होऊनि दुःखे व्याकुळ । नमने बोले नम्र बोल । हे तात नृपशार्दूळ । धर्मपालक सुखाब्धे ॥४२॥

तुजवाचोन राज्यभोग । विषतुल्य जाळतील माझे अंग । तुझेच सेवने सुख सांग । जगी अव्यंग भोगणे ॥४३॥

स्नेहावीण दीप साचार । प्राणेवीण जैसे कलेवर । उदकावाचोन मत्स्य धीर । केवि तरि धरतील पै ॥४४॥

तैसे तुजवाचोन दारा धन । भोगिता होईन देही हीन । तुम्ही माझे पांघरूण । त्यागोनि दीन करू नका ॥४५॥

सूत म्हणे ऋषीलागून । पीयूषतुल्य त्याचे वचन । कर्णमुखे प्राशन करून । राजा संतुष्ट जाहला ॥४६॥

राजा म्हणे सत्सुता । ऐक धर्मवचन आता । जेणे पुत्र पावे धन्यता । त्याचा पिता सुख भोगी ॥४७॥

पितृआज्ञा वेदवचन । पाळोनि करी त्याचे अर्चन । अंती गयेशी पिंडदान । करी धन्य सत्पुत्र तो ॥४८॥

सत्पुत्राचा हाच धर्म । पितृवचनानुरूप करी कर्म । हेच सकल नीतीचे वर्म । त्याशी अधर्म शिवेना ॥४९॥

पितृवचने रघुनंदन । बंधुदारासह वन । प्रवेशोनि सत्वसंपन्न । पित्यालागोन तेणे केले ॥५०॥

तैसी पाळोनि माझी आज्ञा । निश्चये राज्य करी प्राज्ञा । अमात्ययुक्त सर्वज्ञा । प्रजारंजन करावे ॥५१॥

गलितकुष्ठ मी ग्रहित । तपोवन सेऊन त्वरित । सुधर्मयुक्त परलोकात । भोगीन अनंत सुखाते ॥५२॥

मग उठोनिया लवलाही । धरून आत्मजाची बाही । भद्रासन्निध नेऊन ते समई । धर्मसोई सांगतसे ॥५३॥

यामावशिष्ट निशा शेष । राहता उठे तो पुण्यपुरुष । मातृपितृगुरुध्यानविशेष । करिता दोष खंडती ॥५४॥

अवनी प्रार्थावी पुरुषोत्तमा । पादस्पर्श करील क्षमा । प्रातस्मरणादि करोनि नेमा । शौचकर्मा वर्तावे ॥५५॥

विधि वेदाचार संपूर्ण । करूनि नित्यकर्म आचरण । मग पूजावा उमारमण । तेणे कल्याण होय सदा ॥५६॥

जप होम स्वाध्यायन । वैश्वदेव अतिथीपूजन । आप्तबांधव आणि द्विजगण । घेऊन भोजन करावे ॥५७॥

मुखे वर्जावे निंद्य शब्द । अंतरी चिंतावे सद्‌गुरुपदी । अवमानू नयेत वेद । दुःखसंबंध सोडावा ॥५८॥

करावे नास्तिकाचे खंडण । न करावे अभक्ष भक्षण । वर्जावे परदारा निषेवण । स्वच्छाचर असावे ॥५९॥

वर्जू नये स्वकांतेशी । वर्जिल्या ऋतुमतीशी । अवश्य गमन करावे तिशी । क्रीडा दिवसासि करू नये ॥६०॥

मातापिता गुरुस्मरण । सत्पाद धेनू सुश्रूषण । जे का आपल्यासी शरण । त्याचे रक्षण करावे ॥६१॥

दीनांध कृपण हीन । त्यासी द्यावे वस्त्रान्न दान । वृद्धमर्यादा उल्लंघन । कदा मने न करावे ॥६२॥

जरी होईल प्राणांत । तरी सत्य रक्षावे निश्चित । जाणावे सर्वांचे मनोगत । हिताहित शोधावे ॥६३॥

अपराधाचा करूनि विचार । घेऊनि शास्त्राचा आधार । पंडितानुमते साचार । मग दंड करावा ॥६४॥

संपूर्ण जन न विश्वासावा । सर्वत्र अविश्वास न धरावा । प्रशस्तधर्म आचरावा । अधर्म त्यागावा मुळींहून ॥६५॥

वैरिया हाती निज वर्म । पडू न द्यावे पुरुषोत्तम । सत्क्रियेस लावावे अधम । याचक काम पुरवावे ॥६६॥

कोणाचे कैसे आचरण । चार मुखे करावे श्रवण । परधन न करावे हरण । तेणे कल्याण रायाशी ॥६७॥

कोणता अधिकार कवणासी । आधी विचार करोनि मानसी । मग नेमावा त्या पदासी । तेणे राज्यासी होय वृद्धी ॥६८॥

दंडभये प्रजाजन । स्वधर्मे वागती अनुदिन । म्हणोनिया राजयान । अपराध क्षमा न करावा ॥६९॥

गुप्त मंत्र तो षट्‌कर्णी । पडता होते कार्यहाणी । धने माने पाळावे गुणी । कार्यकारणी चतुर जे ॥७०॥

पूर्वी होता वैरभावे । परी शरण आला स्वच्छ भावे । निःसंशय त्यासी रक्षावे । न आठवावे पूर्व वैर ॥७१॥

कामक्रोधादि षट्‌ सपत्‍न । हटे जिंकिजे करोनि यत्‍न । तोच अवनीभुषा रत्‍न । मोक्ष बुद्धीस ब्रह्म जाणतो ॥७२॥

वृत्याराम प्रासादछेद । न कीजे कवणाशी प्रमाद । भलताच न धरावा छंद । मनी प्रमोद वागवावा ॥७३॥

स्त्रियांसी गुह्यगोष्टी । न सांगावी दूरदृष्टी । अमित्राची वचनराहटी । कदा सत्य मानू नये ॥७४॥

अमात्य आणी सेवकगण । त्यांचे हरावे अंतःकरण । पदोपदी देवता ब्राह्मण । नमस्करोन आर्जवावे ॥७५॥

चिखली गुंतली जी गाई । ऋणे गांजिले ब्राह्मण पाही । यांचा उद्धार लवलाही । नृपतीने करावा ॥७६॥

असत्ये वर्जावी वाणी । करावी परोपकारवाणी । शाठ्य ठेवावे दुर्जनगणी । दया अंतःकरणी असावी ॥७७॥

सर्वाभूती भगवद्भावो । तेणे जोडे वासुदेवो । ऐसी नीती धर्मपुत्रासि राहो । गुह्यभावो अनुवादला ॥७८॥

मग पाचारोनि पुरोहित । अमात्य सेवक समस्त । नागरिकजन आणि आप्त । महोत्साहो मांडिला ॥७९॥

राये नगर शृंगारिले । कुंकुम कस्तुरीचे सडे घातले । रम्य मंडप उभारिले । तोरणे बांधिले गोपुरी ॥८०॥

दुंदुभी वाजती महानादे । वाजू लागली मंगलवाद्ये । मंत्रघोषे ब्राह्मणवृंदे । आशीर्वादे गर्जती ॥८१॥

मग पत्‍नीसहित मंगलस्नान । हेमकंठासी राये घालुन । इच्छित दाने देऊन । जाचक जन केले सुखी ॥८२॥

विधिज्ञ ब्राह्मण समवेत । रायाचा मुख्य पुरोहित । तेणे अग्रपूजार्ह गणनाथ । निर्विघ्नार्थ पूजिला ॥८३॥

जे का रायाचे भद्रासन । रत्‍नखचित दैदीप्यमान । वस्त्राभरणे शृंगारून । पुण्याहवाचन पै केले ॥८४॥

सुमुहूर्ते करोनि राज्याभिषेक । हेमकंठ केला पृथ्वीनायक । सुभोजने ब्राह्मण देख । सकळिक तृप्त केले ॥८५॥

मग बोलाऊन अमात्य पंडित । त्याचे हाती देऊन सुत । त्यासि सांगे सोमकांत । यासि निश्चित सांभाळा ॥८६॥

माझे ठाई जसा भाव । करित होता अभिन्नव । तैसा मानोनि हा राव । अनुशासन तुम्ही करा ॥८७॥

पुत्र स्थापोनि भद्रासनी । राये सेवकजनालागोनी । वस्त्राभरणे ग्रामदानी । संतोष जनी वाढविला ॥८८॥

वनी निघाला काश्यपिपती । ऐकोनिया प्रजा धावती । रायामागे सकल जाती । आक्रंदती दीनस्वरे ॥८९॥

आम्हा सोडोनि अनाथाशी । राया वनी केवी जाशी । शून्य होऊनि सर्वसुखाशी । तुजपाशी राहू वनी ॥९०॥

न पाहतांचि मागे । राजा चालला मनोवेगे । महावनी दुस्तर मार्गे । क्रमोनिया जातसे ॥९१॥

तन्वी सुकुमार राजकांता । सुधर्मा सती पतिव्रता । त्याचे मागे मागे धावता । पडे अवचिता अडखळोनी ॥९२॥

अमात्यासहित राजसुत । धावती मागे नागरिक आप्त । सकलजन रुदन करित । महावनात प्रवेशिले ॥९३॥

राजा होऊनि श्रमभरित । दुसरे वनी पुढे चालत । तव तेथे अकस्मात । वापी एक अवलोकिली ॥९४॥

तेथे पावोनि विश्रांती । सकला प्रार्थना करी भूपती । माझे अपराध निश्चिती । क्षमा निगुती करावे ॥९५॥

तुम्ही मागे जावे आता । न धरावी माझी ममता । हीच विनंती तुम्हा समस्ता । आग्रह आता न करावा ॥९६॥

तुम्ही राहाल जरि वनात । तरि स्वस्थ न पावे माझे चित्त । तेणे न साधे स्वकार्यहित । मग काय वनात येऊनिया ॥९७॥

ऐसे ऐकता निष्ठुरवचन । शोक करिती सकलजन । म्हणती राया तुज टाकून । आम्हालागून न जाववे ॥९८॥

प्राणावाचोनि जैसे शरीर । तैसे तुजवाचोनि शून्य नगर । की दीपावाचोनि शून्य मंदिर । तैसे साचार नगर हे ॥९९॥

मग बोले नरनायक । हेमकंठा पुत्रा ऐक । सवे घेऊन सकल लोक । तुवा जावे परतोनी ॥१००॥

ऐकताच ऐसे वचन । हेमकंठी करी रुदन । राया तुज वनी टाकुन । कैसा जाऊ नगरात मी ॥१॥

त्वद्वियोगानलबाधा । सोसवेना मज कदा । सेऊनि तुमचे पदारविंदा । वनी सर्वदा राहेन मी ॥२॥

राजा म्हणे गा सुमती । यदर्थ पूर्वी म्या धर्म नीती । उपदेशिली ती चित्ती । विचारून तैसे करी ॥३॥

माझे व्हावे कल्याण । हेच मनी तुझे जाण । तरी घेऊन प्रजाजन । राजकारण संपादी ॥४॥

पाळावे माझे नीतिवचन । सर्व जनाते सुख देऊन । गोब्राह्मणा प्रतिपाळुन । धर्मरक्षण करावे ॥५॥

आग्रह न करावा काही । जरी जाहलो आरोग्यदेही । तरी पुन्हा भेटेन लवलाही । असत्य नाही वाक्य हे ॥६॥

हेमकंठ होऊन दुःखभरित । चरणी मस्तक ठेवित । राजा आशीर्वाद देत । ह्रदयी सुत आलिंगुनी ॥७॥

घेऊनि रायाचे आज्ञावचन । मातेपुढे करी रुदन । तुम्हावाचोनि मी बालक दीन । कैसे गमन करू आता ॥८॥

पोटी धरूनिया तयासी । सुधर्मा रडे उकसाबुकसी । मुख कुरवाळोनि त्यासी । मग नीतीसी अनुवादे ॥९॥

पातिव्रत्ये स्त्रियांप्रती । भर्त्यावाचोनि नाही गती । राहोनिया वनाप्रती । सेवा निगुती करीन मी ॥११०॥

तुज आता हीच आज्ञा । आग्रह न करि सत्सुतप्राज्ञा । स्वनगरी जाऊन नीतिज्ञा । यथासुखे राज्य करी ॥११॥

हेमकंठ होऊन दुःखेपूर्ण । वंदोनि मातेचे चरण । घेऊन अमात्य प्रजागण । निजनगरी प्रवेशला ॥१२॥

स्वस्तिश्रीगणेशप्रतापग्रंथ । श्रीगणेशपुराणसंमत । उपासनाखंड रसभरित । द्वितीयोध्याय गोड हा ॥११३॥

अध्याय दुसरा समाप्त

श्री गणेश प्रताप

भगवान दादा
Chapters
प्रस्तावना अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ क्रीडाखंड अध्याय ४ क्रीडाखंड अध्याय ५ क्रीडाखंड अध्याय ६ क्रीडाखंड अध्याय ७ क्रीडाखंड अध्याय ८ क्रीडाखंड अध्याय ९ क्रीडाखंड अध्याय १० क्रीडाखंड अध्याय ११ क्रीडाखंड अध्याय १२ क्रीडाखंड अध्याय १३ क्रीडाखंड अध्याय १४ क्रीडाखंड अध्याय १५ क्रीडाखंड अध्याय १६ क्रीडाखंड अध्याय १७ क्रीडाखंड अध्याय १८ क्रीडाखंड अध्याय १९ क्रीडाखंड अध्याय २० क्रीडाखंड अध्याय २१ क्रीडाखंड अध्याय २२ क्रीडाखंड अध्याय २३ क्रीडाखंड अध्याय २४ क्रीडाखंड अध्याय २५ क्रीडाखंड अध्याय २६ क्रीडाखंड अध्याय २७ क्रीडाखंड अध्याय २८ क्रीडाखंड अध्याय २९ क्रीडाखंड अध्याय ३० क्रीडाखंड अध्याय ३१ क्रीडाखंड अध्याय ३२ क्रीडाखंड अध्याय ३३ क्रीडाखंड अध्याय ३४