क्रीडाखंड अध्याय २५
श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीगुरुभ्यो नमः । श्रीक्षेत्रपालाय नमः ।
जयजयाजी अनंतशक्ती । अप्रमेया मंगलमूर्ती ।
अंबात्मजा अनंतकीर्ती । भक्तपती दयोदधी ॥१॥
तुझे मंगलनाम गातां । त्याची निरसे सकल चिंता ।
ऐसें ब्रीद खरें आतां । करोनि अनंता दावी मज ॥२॥
तुझी कृपा होय गोमटी । त्याच्या नसती विघ्नकोटी ।
आहे शरण मी याचेसाठीं । कृपादृष्टी लावी मशी ॥३॥
पूर्वाध्यायीं अनुसंधान । केलें यमाचें गर्वमोचन ।
पंधरा वर्षांचा अंबानंदन । जगज्जीवन जाहला ॥४॥
एके दिवसीं हिमनग तनया । शंकराचे लागोन पायां ।
मधुरोक्तीनें बोले आर्या । करोनियां हास्यमुख ॥५॥
संसारीं देवा हेंचि सुख । स्त्रियांनीं पाहवे स्नुषामुख ।
वरमायेपणाचें दावी कौतुक । कृपा करोनी मजलागीं ॥६॥
सुशीला सुमुखी लावण्यराशी । नवरी शोधणें मत्पुत्राशी ।
करोनियां विवाह सिद्धीशी । सुखसोहळ्याशी मज भोगवी ॥७॥
आपणा जोगा पहा सोयिरा । त्रिभुवनामाजी शोध करा ।
वचन ऐकतां आल्हाद शंकरा । तेणें दारा आलंगिली ॥८॥
विवाहोद्देश आणोन चित्तीं । चिंतातुर आर्यापती ।
तव नारद आला सुमती । लग्न मध्यस्थी करावया ॥९॥
पाहतां शंभू नारदाशीं । आसन देउनी गौरवी त्याशी ।
कोणी कडोन तूं आलाशी । हें मजशीं सांग म्हणे ॥१०॥
येरु म्हणे गौरीरंजना । करीत फिरतों वरयोजना ।
पाहोनियां तव नंदना । तुमचें दर्शना पातलों ॥११॥
ब्रह्मतनया माझ्या स्वसा । अतीलावण्य आहेत डोळसा ।
उपवर जाहल्या त्या राजसा । वरचिंता विधीस असे ॥१२॥
अनुसूयाशवीर ती युवती । त्यांचें स्वरुप पाहोनी लाजती ।
वडवा जाहली सूर्यसती । रुप पाहोनी तयांचें ॥१३॥
द्यावया तयाशी उपमा । ललना नाहीं सर्वोत्तमा ।
सुना त्या सासू उमा । योग्य आह्मा वाटतसे ॥१४॥
कृपा करोनियां मन्मथारी । आम्हाशी घ्यावें आतां पदरीं ।
शंकर गिरिजेशी विचार करी । तुज सुंदरी मानतें हें ॥१५॥
हर्षें बोले तेव्हां गौरी । आहेत चतुर्मुखाच्या कुमरी ।
पंचमुखा तूं विचार करी । घ्यावें पदरीं नारद म्हणे ॥१६॥
घेऊनि गिरिसुतेचें मत । शिव तेव्हां तथास्तु म्हणत ।
पाहोनियां सुमुहूर्त । लग्ननिश्चय पैं केला ॥१७॥
सत्यलोकीं गेला मुनी । वृत्तांत सांगे विधीलागुनी ।
धाता आनंदोनीयां मनीं । म्हणे नंदिनी देवाच्या ॥१८॥
पाचारोनी वनितांशीं । सांगे वर योजिला गुणेशाशी ।
साहित्य करा वेगेंशी । असे नगजेशी वरमायपण ॥१९॥
त्या सर्व म्हणती विधिलागीं । विहीण आहे आह्माजोगी ।
उणें न करुं लग्नप्रसंगीं । तुम्ही चिंता करुं नये ॥२०॥
लिहोन सर्वांसी कुंकुमपत्रें । शिव पाठवी तेव्हां पवित्रें ।
वर्हाडी येती हर्षपात्रें । लग्नालागीं तेधवां ॥२१॥
इंद्रादि सर्व अमर । कश्यपादि ऋषेश्वर ।
वर्हाडी निघाले सदार । प्रमोदे निर्भर चालले ॥२२॥
वृषारुढ पार्वती घेउनी । वेगें निघाला शूळपाणी ।
वर मयूरावरी बसूनी । समारंभें निघाला ॥२३॥
वरी शोभती आतपत्रें । ऋषी गर्जती वेदमंत्रें ।
अपार वाजती वाजंत्रें । वेत्रपाणी धांवती पुढें ॥२४॥
ऐसा क्रमितां मार्ग अपार । जवळ आलें गंडकीपुर ।
मार्गीं सहस्त्रशा असुर । करिती घुरघुर तेधवां ॥२५॥
वर्हाडानी असुर पाहिले । भयाभीत तेव्हां जाहले ।
हें मयुरेशें देखिलें । आश्वासिलें तयांशी ॥२६॥
बाळांसी म्हणे विनायक । तुम्ही धांवा रे सकळिक ।
असुर वधोनियां देख । मग सन्मुख यावें तुम्ही ॥२७॥
ऐसें ऐकतां ऋषिकुमर । घेऊनि चालले दर्भभार ।
मंत्रोनि टांकिती राक्षसांवर । जाहला संहार असुरांचा ॥२८॥
मुलानी मारले पाहूनि असुर । सर्वांस वाटे चमत्कार ।
म्हणती परम हा ईश्वर । सर्वेश्वर काय न करी ॥२९॥
वर्णीत महिमा गुणेशाचा । भार चालला व्हाराडयांचा ।
दिसे कोट गंडकीचा । दोन कोशांवरुनियां ॥३०॥
मार्गीं पाहिलें रम्यवन । स्वच्छ शीतळ असे जीवन ।
तेथें उतरला गौरीनंदन । दिल्हें आसन सेवकानीं ॥३१॥
वनीं उतरला जगज्जीवन । तेथें आला त्रिलोचन ।
गौरी सकल स्त्रिया घेऊन । पातली तेथें समारंभें ॥३२॥
वर्हाडी चालतां बहु श्रमले । तेही येउनियां उतरले ।
सुहास्यमुखें गुणेश बोले । शंभूप्रती तेधवां ॥३३॥
सिंधुनामा बलाढय दानव । तेणें बंदी घातले देव ।
ते सोडउनियां सर्व । समारंभाशी नेणें असे ॥३४॥
बलाढय चतुर निती जाणतां । शिष्टाईसी पाठवा आतां ।
तो नायके सामकरितां । तरी त्याशीं युद्ध करुं ॥३५॥
पुरुषार्थें सोडवोनि देवांशीं । घेऊनि जाऊं मग लग्नाशीं ।
वचन ऐकतां शिवाशी । जाहला हर्ष बहुसाल ॥३६॥
साधू साधू सकल म्हणती । मग शिवासीं विचार करिती ।
शिष्टाईस पाठवणें कवणाप्रती । अंबापती विचार करा ॥३७॥
मयूरेश म्हणे पार्वतीधवा । शिष्टाईसी नंदी पाठवा ।
बलाढय चतुर आहे बरवा । वचन सर्वां मानवलें ॥३८॥
शिव पाचारोनियां नंदीस । म्हणे तूं जावें शिष्टाईस ।
तो करुनी नमनास । गंडकीस चालला ॥३९॥
उल्लंघोनि महाद्वार । सभेंत पावला नंदीश्वर ।
सिंहासनी सिंधू असुर । महोत्साहे बैसला असे ॥४०॥
भोंवत्या बैसल्या वीरश्रेणी । अप्सरा नाचती नृत्यांगणी ।
सभा घनवट ते क्षणीं । पाहिली नयनीं शिवदूतें ॥४१॥
जैसा उगवला दिनकर । तैसा दिसे नंदिनीकुमर ।
पुढें चालला तो बलाढय थोर । पाहतां असुर गजबजले ॥४२॥
शस्त्रें घेऊनि उभे राहिले । नंदी न भीतां पुढें चाले ।
येवोनि सिंधूस बोले । जगताधीश म्हणविशी तूं ॥४३॥
इतके बसले सभानायक । परी नितिज्ञ नाहीं एक ।
आलीयाचा अलोलिक । कांहीं न करिती शोध कसा ॥४४॥
ऐकुन नीतिज्ञ बुध भाषणें । सिंधू तयासी हासोन म्हणे ।
वृषा तुझे बुद्धीनें उणें । सुरगुरुसीं केलें वाटे ॥४५॥
कोठोनि आलास गा बैला । कायसें ठावकें शास्त्र तुला ।
ऐकोनियां नंदी हांसला । मदांधाला पाहूनियां ॥४६॥
अरे तूं मदांधपणें न जाणशी । नंदी ऐसें म्हणती मशी ।
शिवसुतें सांगितल्या निरोपासी । मी गा तुजशीं सांगों आलों ॥४७॥
आमचा आहे लग्न उत्सव । समारंभासी पाहिजेत देव ।
ते तूं स्ववश केले सर्व । करी मोकळे तयातें ॥४८॥
त्याचीं पदें त्यांस द्यावीं । संतोषें लग्नासीं यावें देवीं ।
मग तुवांही अवनी बरवी । वश ठेवावी राजसुता ॥४९॥
नाहीं तरीं करोन युद्ध । यमापासीं तूतें करोनि बद्ध ।
बळें सोडऊन देव सुबुद्ध । नेयीन दानवा लग्नासी ॥५०॥
ऐसें ऐकतां दानवेश । गदगदोनी हांसे त्यास ।
काय म्हणावें विरुपाक्ष सुतास । विचारास करीना ॥५१॥
मीं स्वामी त्रैलोक्याचा । निरोप ऐकोनियां मुलांचा ।
बंद खुला न करीन देवांचा । करील तुमचा धनी काय ॥५२॥
नंदी म्हणे तूं मदांध असा । न वोळखशी ईश्वरास कसा ।
जो करवोनी ब्रह्मांड ठसा । नाचवितो निजसत्ता ॥५३॥
अनंत ब्रह्मांडाचा नायक । पार्वतीतनय विनायक ।
ज्याचा शिव सर्वेश जनक । दावीतो कौतुक आजवरी ॥५४॥
करावया अपाय तयाशी । पाठविले तूं बलाढय असुरांशी ।
तेणें पाठविले यमसदनाशी । हें तुजशीं ठाऊक असे ॥५५॥
येरु करोन रक्तनयन । तयासी बोले सक्रोधवचन ।
नेऊन वृषा तुज बांधुन । आतां जुंपीन नांगरासी ॥५६॥
ऐकोन मुर्खाचे दुरोत्तर । तयासी बोले नंदी उत्तर ।
काळें भेदिलें तुझें शरीर । म्हणोनि पामरा बडबडशी तूं ॥५७॥
न ऐकोन अंगदाचें वचन । रावण गेला व्यर्थ मरुन ।
तैसा तूं कुळ संहारुन । निजकांता विधवा करिसील रे ॥५८॥
ऐसेम वदोनियां तत्काळ । आला मयूरेशा जवळ ।
वर्तमान सांगे सकळ । युद्ध तुंबळ करील तो ॥५९॥
ऐकोन मयुरेश गर्जे तेव्हां । मारा दुष्टाचा काय केवा ।
मारुनियां सिंधू दानवा । नेईन देवा मंगलासीं ॥६०॥
दुसरे दिवसीं मयूरावरी । आरुढतां भक्तकैवारी ।
वीरें केली युद्धतयारी । रणभेरी दुमदुमीत ॥६१॥
भूतराजा आणि पुष्पदंत । ते विनविती जोडोनि हात ।
आम्ही आज युद्ध अद्भुत । करोन जयवंत होऊन येऊं ॥६२॥
वरदपाणी ठेवोन शिरीं । मयूरेश त्यातें आज्ञा करी ।
असुर वधोनियां लौकरी । जयनवरी घेऊन या ॥६३॥
प्रळयकाळीं समुद्र वाढे । तैसें सैन्य बाहेर पडे ।
भूतराज पुष्पदंत वीर गाढे । निघती अमित क्रोधानळा ॥६४॥
विक्राळ गर्जे भूतसेना । वेगें पातले गंडकीभुवना ।
महाद्वारीं असुरपृतना दशकोटी गण राक्षसांची ॥६५॥
परचक्र पाहतां हडबडले । राक्षस युद्धासी सन्मुख जाहले ।
नानावाहनी आरुढले । गर्जूं लागले सिंहनादें ॥६६॥
भिंडीपालगदातोमर । कुंतअसीलताधनुष्यशर ।
घेऊनियां तरु डोंगर । गर्जत असुर निघाले ॥६७॥
दोहीं दळां पडली गांठ । वीरां पडलें प्राणसंकट ।
निकुरें भीडती तेव्हां भट । स्वामीकार्या कारणें ॥६८॥
मयूरेशबळें शिवगण । करिती तेव्हां अद्भुत रण ।
कोटिशा असुरांचे प्राण । मारोनि बाण घेती ते ॥६९॥
बहुतेक मारिले शिवगणीं । घायाळ जाहल्या वीरश्रेणी ।
कासावीस पळोनि ते क्षणीं । घायाळ गेले सभांतरीं ॥७०॥
सिंहासनीं दानवपती । तेथें घायाळ येऊनि सांगती ।
निश्चळ बसलास काय निगुती । घूर्णीतमती जाहली तुझी ॥७१॥
दशकोटी असुर द्वारपाळक । शिवगणीं विध्वंसिलें सकळिक ।
आरामें विध्वंसूनियां देख । नगर जाळिती सभोंवतें ॥७२॥
नगरांत असतां तूं नगरनाथ । भयें नागरिक पळती समस्त ।
ऐसें ऐकतां भुपती सुत । नयन करी आरक्त तेव्हां ॥७३॥
करुनियां विक्राळ गर्जना । क्षणें करोनि राहिला स्तब्धमना ।
ऐसें पाहतां वीर नाना । करुन प्रतिज्ञा बोलती ॥७४॥
आम्हांसी आज्ञा देशील जरीं । गुणेशातें संहारुं तरीं ।
दानवेश म्हणें करा तयारी । बाहेर झडकरी निघा कीं रे ॥७५॥
निशाणीं घातला घावो । अश्वावरी आरुढला रावो ।
गर्जना करीत वीरसमुदावो । नगराबाहेर निघाला ॥७६॥
जयवाद्यें वाजवोनी । शिवगण मयूरेशापाशीं येउनी ।
स्वामी आले जय घेउनी । गौरविले स्वामीनी तेधवा ॥७७॥
युद्धासी निघाला दैत्यपती । पायदळें पुढें गर्जत येती ।
त्यामागें तुरंग पंक्ती । गज धांवती अपरिमित ॥७८॥
त्याचे मागें रथाचे थाट । वरी गर्जती दानवभट ।
नेमी वाजती घडघडाट । वायूस वाट न मिळे तेथें ॥७९॥
शिवापाशीं सांगती च्यार । युद्धास पातले निशाचर ।
शिव नंदीवरी सत्वर । जाहला तयार तेधवां ॥८०॥
निलकंठ व गौरीसुत । बैसोनियां गर्जना करित ।
तेव्हां ब्रह्मांडगोळ कांपत । शेष सर्सावी निजशिरा ॥८१॥
निशाचराचा विक्राळ घोष । ऐकतां शिवगणास वाटे हर्ष ।
गुणेश तेव्हां पावोनि तोष । सेना अशेष घेत सवें ॥८२॥
वाजती रणवाद्यें भयंकर । गण गर्जती शब्द थोर ।
सिंव्हनाद करी मयुरेश्वर । तेणें चराचर कांपतसे ॥८३॥
दोन्ही दळांची पडली गांठी । शस्त्र घाव हाणोनि कंठीं ।
परस्परें प्राणहटी । वीर जगजेटी घेताती ॥८४॥
कुंतपरशूभिंडिपाळा । मारिती घालिती पाश गळां ।
अश्व खिजती वेळोवेळां । अवनीतळा कांपविती ॥८५॥
युद्ध मांडिले घोरांदर । गज लोटती महंतवीर ।
वीर सोडिती अपारशर । तेणें अंबर झांकूळले ॥८६॥
धुरोळा आच्छादी रविमंडळा । अधंकार रणीं तेव्हां दाटला ।
वीर न ओळखती परस्परांला । प्रळय वर्तला असुरांशीं ॥८७॥
महा मोठे मयुरेश वीर । त्याहीं माघारलें निशाचर ।
तव येऊनी नंदीवीर । करी नमस्कार गुणेशाशी ॥८८॥
गगनमार्गें तो उसळला । दानव सेनेमाजीं पडला ।
तेणें महाप्रळय केला । ध्वज पाडला असुरांचा ॥८९॥
शिंगें फिरवोनियां धेनुपुत्रें । दानवेशाची पाडिली छत्रें ।
दैत्य जाहले भयपात्रें । आणिलीं छत्रें गुणेशापाशीं ॥९०॥
पाहतां नंदीचें कर्म दुस्तर । भयचकित जाहले निशाचर ।
शिवगणासी आनंद थोर । गौरव फार केला त्याहीं ॥९१॥
असुराचें मानस जाहलें खिन्न । पाहतां बोलती त्याचे प्रधान ।
मित्र कौस्तुभ कर जोडुन । बोलती वचन रायासीं ॥९२॥
कांहो जाहला खिन्न स्वामी । युद्धास जातों आतां आम्हीं ।
शत्रु जिंकोनियां श्रमी । करुं त्यांच्या वनिताशीं ॥९३॥
शत्रूंस जिंकिल्यावांचुन । आम्हीं न दावूं तुला वदन ।
ऐशी दुस्तर प्रतिज्ञा करुन । रणकंदन करुं चालले ॥९४॥
महारथींची सहस्त्रशतें । योजिलीं त्याहीं धनुष्यशतें ।
आकर्ण ओढोनि गुणातें । अमुपम शरातें वर्षती ॥९५॥
भिंडिपाला गदा वोढणें । घेउनि हाणिती वीरराणें ।
कितीक मुकलें तेधें प्राणें । घायाळपणें लोळती ॥९६॥
कोणाचे तुटले चरण कर । कोणाचे फुटोन गेलें उदर ।
कोणाचें फाटलें अर्धशरीर । खटारे अपार पडले किती ॥९७॥
वाहती रक्ताचे तुंबळपूर । गजकलेवरें वाहती अपार ।
करिती शस्त्रांचे भडमार । निशाचर तेधवां ॥९८॥
माघारली देवसेना । क्रोध न साहे अंबानंदना ।
तंव करीत पातले गर्जना । वीरभद्र षडानन ॥९९॥
त्याहीं धनुष्यें वाहिलीं हातीं । स्वसेनेसी अभय देती ।
जैशा मेघधारा वर्षती । शर तेव्हां वीर ते ॥१००॥
तों अस्तास गेला दिनकर । दानव गर्जती भयंकर ।
जयवाद्यें वाजवोनियां सत्वर । निशाचर मागें गेलें ॥१॥
दुसरें दिवसीं सिंधुसेना । करीत पातली घोरगर्जना ।
क्रोध न साहे षडानना । वीरभद्रा समवेत ॥२॥
दोहीं सैन्या पडली गांठ । शर वर्षती अमुप भट ।
निशाचर वीर धीट । मारीत नीट चालले ॥३॥
त्यांहीं माघारली गुणेशसेना । म्हणोन धांवला करित गर्जना ।
वीरभद्र वीरराणा । अमुप बाण वर्षतसे ॥४॥
सिंहनाद करी जेव्हां । उर्वी थरथरोनी कांपे तेव्हां ।
धरल्या राक्षसानी हेवा । घालिती कावा त्याभोंवती ॥५॥
वीरभद्र जैसा रणभैरव । तेणें संहारिले दानव ।
शरजाळें गगन सर्व । आच्छादिलें तेधवां ॥६॥
युद्ध मांडिलें घोरांदर । गाढ पडला अंधकार ।
बाणीं खोंचलें सर्व असुर । जाहला संहार असुरांचा ॥७॥
वीरभद्र वीरराणा । रणीं दृष्टीस नाणी कोणा ।
संहारिलें दानवगणा । सोडुनी रणा पळती ते ॥८॥
राक्षस चमूंत हाहाःकार । दशदिशा पळती असुर ।
तेव्हां हाक देवोन घोर । प्रधान शूर धांवले पुढें ॥९॥
मित्र कौस्तुभ सक्रोध धांवती । शर तेव्हां अमुप वर्षती ।
मारिलें त्यांहीं वीर किती । त्याची गणती करील कोण ॥११०॥
माघारतां मयूरेश सेना । क्रोध न साहे षडानना ।
करित लोटला तेव्हां गर्जना । असुर सेना दचकली ॥११॥
सिंधू प्रधान दानव खळ । रणीं घालती पाहोन गोंधळ ।
कार्तिक उडाला तत्काळ । करित विक्राळ गर्जना ॥१२॥
मित्राचे हृदयीं अकस्मात । मारिला तेणें मुष्टीघात ।
दानव रथाखालीं पडत । वमीं शोणित भडभडां ॥१३॥
मित्रें सोडिला रणीं प्राण । कौस्तुभें पाहतां अतिदारुण ।
मुष्टिघातें षडानन । ताडोन पाडिला भूमीस पैं ॥१४॥
मूर्च्छा सांवरोनि गौरीकुमर । तीक्ष्ण सोडिता जाहला शर ।
कौस्तुभ तोडी ते अपार । अनिवार मार गौरीजाचा ॥१५॥
सर्वांगी भेदले सायक । विकल जाहला वीरनायक ।
फुलला जैसा वृक्ष किंशुक । पाहे षण्मुख तयातें ॥१६॥
धांवत गेला षडानन । कौस्तुभ पाडला आसुडोन ।
मुष्टिघातें मस्तक फोडुन । घेतला प्राण दानवाचा ॥१७॥
वीरभद्रें असुर वाहिनी । सकल टांकिली संव्हारुनी ।
जयवाद्यें वाजवुनी । आले परतोनि शिवगण ॥१८॥
कौस्तुभ मित्र पावले मरण । ऐकोन शोक करी अतिदारुण ।
वीरास म्हणे चक्रपाणी नंदन । शत्रू मारीन मीच आतां ॥१९॥
क्रोधें भृकुटी चढवोन । सांवरोनी अश्ववाहन ।
क्रोधें आरक्त जाहले नयन । सेना घेऊन निघाला ॥१२०॥
अगण्य सेना वीरराणे । युद्ध कळांनी पूर्ण शहाणे ।
तयांस सिंधू तेव्हां म्हणे । व्यूह करणें सात तुम्हीं ॥२१॥
धमण आणि गंधासूर । वीरध्वज कांतवीर ।
महाकाय शार्दुल दुर्धर । धुर्तासुर सातवा तो ॥२२॥
ऐसे सात दानव वीर । सेना करोन व्यूहाकार ।
सात व्यूहासेना दुर्धर । येतां पाहिलीं शिवगणीं ॥२३॥
मयुरेशें काय केलें । तयावरी वीर धाडिलें ।
रणचतुर सुयोध भले । गर्जत चालिले रणमदें ॥२४॥
नंदी आणि पुष्पदंत । महाबळ भूतराज विख्यात ।
विकट दशलक्ष सेनेसहित । संहार करीत उठावले ॥२५॥
चपल निघाला गणाग्रणी । अर्धलक्ष सेना सवें घेउनी ।
बाणें त्रासिलीं दानव वाहिनी । प्रेतें मेदिनी आच्छादली ॥२६॥
अमित सेना तेव्हां घेऊन । वीरभद्र आणि षडानन ।
अग्नीजाळी शुष्कवन । तैसें सैन्य जाळिती शरें ॥२७॥
षडाननाशी गंधासुर । हाका मारोनि करी स्थिर ।
उभा राहे माझेसमोर । धरी धीर षडानना ॥२८॥
वीरभद्र आणीक दानव । दाविती परस्परें युद्धवैभव ।
नंदी आणि वीरराज हांव । धरोनियां भिडती ॥२९॥
ध्वजासुर पुष्पदंत । भूतराज महाअद्भुत ।
वीरश्रीमदें अतिउन्मत्त । भिडताती अतिनिकुरें ॥१३०॥
विकट आणि धुर्तासुर । रणीं भिडती परस्पर ।
चपल आणि शाद्वल थोर । करिती मार परस्परें ॥३१॥
चपलें मारोन खड्गघात । शाद्वल पाडिला रणीं मूर्च्छित ।
तो मूर्च्छा सांवरोन उठत । शरें ताडिती चपलाशी ॥३२॥
शाद्वल आकर्ण वोढोन वोटी । चपलावरी शर सोडी ।
चपल शरें तयास तोडी । अर्धा पाडी अवनी तळीं ॥३३॥
अर्धा येऊनि हृदयीं खोचला । तेणें चपल मूर्च्छित जाहला ।
घोर संग्राम विस्तारला । नाश जाहला बहुत वीरां ॥३४॥
वीर गर्जती सिंहनादें । गज किंकाळती तेथें मदें ।
वीर भिडती वाद्यनादें । पाय मागें न ठेविती ॥३५॥
शिरकमळाचि लाखोली । भूलिंगावरी पडली ।
शोणित नदी वाहूं लागली । झाली दरडी प्रेतांचीं ॥३६॥
वीरमस्तकाचे केंश कुरळ । तेच शोणित नदींत सेवाळ ।
खड्ग वाहती ते मत्स्य तुंबळ । खेटक कमठें तळपती ॥३७॥
काष्ठें अशीं वाहती प्रेतें । चामरें तींच वाढलीं गवतें ।
गजकलेवर सुसर तें । मांसकर्दम पैं तेथें ॥३८॥
वीरप्रमोदें संव्हारणीं । घोरांदर भयविवर्धिनी ।
शोणित वाहे नदी रणीं । वीरतारणीं स्वर्गप्रदा ॥३९॥
वीर पडले रणांगणीं । त्यांस वरुनी अप्सरामानिनी ।
नेत्या जाहल्या स्वर्गभुवनीं । नंदनवनीं क्रीडताती ॥४०॥
तीन दिवस अहोरात । देवासुरां युद्ध जाहलें अद्भुत ।
वीर पडले त्यांचें अमित । नाहीं जाण मानवेंद्रा ॥४१॥
रात्रीं होतां घोरांदर । करावया मांसाहार ।
पातले तेथें वनचर। शृगालादी इतर बहू ॥४२॥
सेनानी आणि गंधार । युद्ध करिती घोरतर ।
परस्परें मारिती शर । दोघे वीर बलाढय पैं ॥४३॥
सरली शस्त्रास्त्र सामुग्री । गंधासुर उड्डाण करी ।
मुष्टिघातें हाणोनि उरीं । मूर्च्छित करीं षडानना ॥४४॥
वज्रहत महापर्वत । तैसा पडला अंबासुत ।
सांवरुनी मूर्च्छा अद्भुत । बसे त्वरित रथावरी ॥४५॥
तेथून उडे षडानन । शत्रुस्यंदनावरी जाऊन ।
द्वादशहस्तें करी ताडण । मूर्च्छा दाटोन असुर पडे ॥४६॥
सांवरोनियां मूर्च्छा थोर । रथावरी चढला असुर ।
घनदाट वर्षतसे शर । केला संव्हार शिवगणाचा ॥४७॥
पाहतां स्वचमूचा नाश । बाणजाळें भुलवीं असुरास ।
विकळ पाहतां तयास । धरला चरणास गंधासुर ॥४८॥
भोवंडोनियां गरगरां । षण्मुखें आपटिलें असुरा ।
त्याचे शरिराचा जाहला चुरा । प्राण पुरा गेला त्याचा ॥४९॥
पाहतां गंधासुराचें निधन । वीरसेन आणि क्रोधन ।
तैसा धांवला शतघ्न । रणकंदन करावया ॥१५०॥
त्यांहीं वेष्टोन अंबासुत । शर वर्षती अपरिमित ।
षडानन बाणजाळ तोडित । मांडिलें अद्भुत युद्ध तेणें ॥५१॥
तीनबाण चापी लाविले । षण्मुखानें आकर्ण वोढिलें ।
असुरांवरी त्याणें टांकिले । जाऊनि भरले त्यांचे उरीं ॥५२॥
त्यातें मूर्च्छा बहुत दाटली । असुर पडले रथाखालीं ।
षडाननें हाक दिधली । कांपूं लागली अवनी तेव्हां ॥५३॥
सावध होवोनियां दानव । धरोनि धांवती युद्धहाव ।
शर वर्षती अभिन्नव । करिती रव भयंकर ॥५४॥
तिघे वर्षती शरजाळ । तेणें षण्मुख जाहला विव्हळ ।
त्याचे कंठीं पाश तत्काल । घालोनियां वोढिला ॥५५॥
बांधोन नेला कार्तिकेय । त्याची सेना पावली भय ।
कोणी न ठेविती पुढें पाय । हाहाःकार करिती मुखें ॥५६॥
धरोनि नेतां षण्मुखाला । हिरण्यगर्भ तेव्हां धांवला ।
रक्तलोचन वेगें आला । शामल पावला लागवेगीं ॥५७॥
हाका मारोनी भयंकर । असुरउरी मुष्टी प्रहार ।
वोपोनि मारिले त्याहीं असुर । शिवकुमर सोडवीला ॥५८॥
गण गर्जती जयजयकारें । ते वाजविती जयतुरें ।
बाणें केले दैत्य घाबरे । पळती सारे दशदिशां ॥५९॥
असुर धावला मदनकांत । त्यावरी वीरभद्र लोटला त्वरित ।
वातवेगे ये धांवत । शर सोडित अपार पैं ॥६०॥
जाहली दोघांस झोडधरणी । अंबर आच्छादिलें त्यांहीं बाणीं ।
असुर गर्जोनियां रणीं । दावी करणी शूरत्वपणें ॥६१॥
मदनकांतें सोडोनि शर । मूर्च्छित पाडिला वीरभद्र ।
मूर्च्छा सांवरोनियां सत्वर । गर्जना थोर केली तेणें ॥६२॥
चापीं लाविला शर निर्वाण । असुरांचे हृदयीं भेदला बाण ।
मदनकांतें सोडिला प्राण । झोडिलें रण सैनिकांनीं ॥६३॥
मदनकांत रणीं पडतां । महासुर धांवे तेव्हां तत्वता ।
तेणें निर्वाण बाण सोडितां । भयविव्हलता शिवगणीं ॥६४॥
दानव पाहोनी धुरंधर । नंदी धांवला त्याचेसमोर ।
श्रृंगें लाऊनी त्याचा उर । करी चूर क्षणमात्रें ॥६५॥
महासुराचा नंदी प्राण । घेतां धावले असुर दारुण ।
त्याहीं माजवोनियां रण । पाडिले गण अनेक तेथें ॥६६॥
ध्वजासुर आणी महाकायधृत । तिघांजणाशीं नंदी भिडत ।
त्याही केला नंदी मूर्च्छित । भुमीशी पडत नंदिकेश्वर ॥६७॥
नंदी पावतां पराभव । विक्राळ गर्जती ते दानव ।
त्यांचें पाहोनियां लाघव । धरिली हांव शिवगणीं ॥६८॥
पुष्पदंत आणि विकट । भूतराज चवथा चपलभट ।
चार पर्वत घेऊनि सुभट । मारिती दाट असुरांवरी ॥६९॥
पर्वतांतळीं सांपडले । सेनेसहित असुर मेले ।
मग निशाचर पळूं लागले । घायाळ गेले सिंधूपाशीं ॥१७०॥
विजयी जाहले शिवगण । विक्राळ शब्द करिती दारुण ।
वंदिती येवोन गुणेशचरण । आनंदोनी तेधवां ॥७१॥
श्रोते पुढें करा श्रवण । सिंधू माजवील महारण ।
मयूरेशें त्याचे छेदिले कर्ण । संग्राम दारुण होईल हो ॥७२॥
जयजयाजी विश्वनाथा । पुढें बोलवी आपली कथा ।
विनायक कविचा सदां माथा । राहो आतां तव चरणीं ॥७३॥
स्वस्ति श्रीगणेशप्रतापग्रंथ । श्रीगणेशपुराण संमत ।
क्रीडाखंड रसभरित । पंचविंशत्यध्याय गोड हा ॥अध्याय २५॥ओव्या॥१७४॥
अध्याय पंचविसावा समाप्त